आपण यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालू!
आपण यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालू!
“आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.”—मीखा ४:५.
१. मीखा अध्याय ३ ते ५ यांत कोणते संदेश आहेत?
यहोवाला आपल्या लोकांना काही सांगायचे होते आणि तो मीखाला आपला संदेष्टा म्हणून उपयोगात आणतो. त्याने दुष्कर्म्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. इस्राएल राष्ट्राच्या धर्मत्यागाकरता तो त्यास दंड देणार आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे जे यहोवाच्या नावाने चालतात त्यांना तो आशीर्वादित करणार आहे. मीखाच्या भविष्यवाणीच्या ३ ते ५ अध्यायांत हेच संदेश निनादतात.
२, ३. (अ) इस्राएलच्या पुढाऱ्यांनी कोणता गुण प्रदर्शित केला पाहिजे, पण प्रत्यक्षात ते काय करत आहेत? (ब) मीखा ३:२, ३ येथे वापरण्यात आलेल्या अलंकारिक भाषेचे तुम्ही कसे स्पष्टीकरण द्याल?
२ देवाचा संदेष्टा घोषित करतो: “याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हाला नसावी काय?” होय, न्याय करणे त्यांचेच काम होते, पण ते काय करत होते? मीखा सांगतो: “तुम्ही बऱ्याचा द्वेष करिता व वाइटाची आवड धरिता; तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढिता व त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडिता; तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता. ते त्यांजवरचे कातडे सोलून काढितात, बहुगुण्यात टाकिलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे ते त्यांची हाडे मोडून तुकडे तुकडे करितात.”—मीखा ३:१-३.
३ हे पुढारी गरीब असहाय लोकांवर चक्क अत्याचार करत आहेत! येथे उपयोगात आणलेले भाषालंकार मीखाचे संदेश ऐकणाऱ्यांना सहज समजणारे होते. एखादे मेंढरू कापल्यावर ते शिजवण्याआधी, त्याची कातडी काढली जाते व मग त्याची हाडे तोडली जातात. कधीकधी हाडांतील मज्जा काढण्याकरता ती मोडतात. मग मांस व हाडे दोन्ही, मीखाने वर्णन केल्याप्रमाणे एका मोठ्या कढईत शिजवली जातात. (यहेज्केल २४:३-५, १०) मीखाच्या काळातील लोकांना त्यांच्या दुष्ट पुढाऱ्यांच्या हातून सहन करावा लागत असलेला अत्याचार या दृष्टान्तातून किती चांगल्याप्रकारे स्पष्ट होतो!
यहोवा आपल्याकडून न्यायी असण्याची अपेक्षा करतो
४. यहोवा व इस्राएलचे पुढारी यांच्यात कोणता फरक आहे?
४ प्रेमळ मेंढपाळ यहोवा आणि इस्राएलचे पुढारी यांच्यात मोठा फरक आहे. ते न्यायी नसल्यामुळे कळपाचे रक्षण करण्याकरता त्यांना नेमले आहे पण ते असे करत नाहीत. उलट ते या लाक्षणिक मेंढरांची स्वार्थीपणे पिळवणूक करतात, त्यांना न्याय मिळू देत नाहीत आणि मीखा ३:१० येथे सांगितल्यानुसार ते त्यांच्याविरुद्ध “रक्तपात” करतात. या परिस्थितीवरून आपण काय शिकू शकतो?
५. यहोवा आपल्या लोकांचे नेतृत्व करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करतो?
५ देव आपल्या लोकांचे नेतृत्व करणाऱ्यांकडून न्यायप्रियतेची अपेक्षा करतो. हेच आज यहोवाच्या सेवकांच्या बाबतीत खरे असल्याचे आपल्याला दिसून येते. शिवाय हे यशया ३२:१ या वचनाच्या सामंजस्यात आहे जेथे आपण असे वाचतो: “पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवितील.” पण मीखाच्या काळाप्रमाणेच आपण काय पाहतो? ‘बऱ्याचा द्वेष करणारे व वाइटाची आवड धरणारे’ अन्याय करणे चालूच ठेवतात.
कोणाच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाते?
६, ७. मीखा ३:४ यातून कोणता महत्त्वाचा मुद्दा समोर येतो?
६ मीखाच्या काळातील दुष्ट लोक यहोवाच्या कृपेची अपेक्षा करू शकतात का? मुळीच नाही! मीखा ३:४ म्हणते: “त्या समयी ते परमेश्वराला आरोळी मारितील तरी तो त्यांचे ऐकावयाचा नाही; तो त्या समयी त्यांना पराङमुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत.” यावरून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो.
७ आपण जाणूनबुजून वारंवार पाप करत असू तर यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देणार नाही. विशेषतः जर आपण एक कपटी जीवन जगत असू, अर्थात देवाची विश्वासूपणे सेवा करण्याचे ढोंग करून आपल्या पातकावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असू, तर निश्चितच यहोवा आपल्या प्रार्थना ऐकणार नाही. स्तोत्र २६:४ अनुसार, दाविदाने असे स्तोत्र गायिले: “अधम लोकांत मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही.” जे जाणूनबुजून यहोवाच्या वचनाचे उल्लंघन करतात त्यांच्या प्रार्थनांचे तो मुळीच उत्तर देणार नाही!
देवाच्या आत्म्याचे साहाय्य
८. मीखाच्या काळातील खोट्या संदेष्ट्यांना कोणती ताकीद देण्यात आली?
८ इस्राएलच्या आध्यात्मिक नेत्यांमध्ये अत्यंत दोषास्पद गोष्टी आचरल्या जात होत्या! खोटे संदेष्टे देवाच्या लोकांना आध्यात्मिकरित्या पथभ्रष्ट करत होते. लोभी नेते “शांती” घोषित करत होते पण जे त्यांचे पोट भरत नाहीत त्यांच्याविरुद्ध ते पवित्र युद्ध घोषित करत होते. यहोवा म्हणतो: “तुम्हावर रात्र गुदरून तुम्हास दृष्टांत होणार नाही; तुम्हावर अंधार पडून तुम्हास भविष्य सांगता येणार नाही; संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल. द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली मिशी झाकितील.”—मीखा ३:५-७अ, NW.
९, १०. ‘मिशी झाकण्याचा’ काय अर्थ होतो आणि मीखाला असे करण्याची गरज का नाही?
९ ते ‘मिशी का झाकतील?’ मीखाच्या काळातील लोक लज्जित झाल्याचे चिन्ह म्हणून मिशी झाकतात. आणि हे दुष्ट लोक तर लज्जित होण्याच्याच लायकीचे आहेत. त्यांच्याकरता “देवाकडून काही उत्तर मिळणार नाही.” (मीखा ३:७ब) गर्विष्ठ व दुष्ट लोकांच्या प्रार्थनांकडे देव लक्ष देत नाही.
१० पण मीखाला आपली ‘मिशी झाकण्याची’ गरज नाही. तो लज्जित झालेला नाही. यहोवा त्याच्या प्रार्थनांचे उत्तर देतो. मीखा ३:८ याकडे लक्ष द्या, जेथे हा विश्वासू संदेष्टा म्हणतो: “मी तर याकोबास त्याचा अपराध आणि इस्राएलास त्यांचे पाप दाखवावयास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने, पूर्ण आहे.” मीखा किती कृतज्ञ आहे की त्याच्या दीर्घ विश्वासू सेवेत यहोवाने त्याला आपल्या ‘आत्म्याने व सामर्थ्याने पूर्ण’ केले! यामुळेच त्याला ‘याकोबास त्याचा अपराध व इस्राएलास त्यांचे पाप’ दाखवता आले.
११. कोणत्याही मनुष्याला देवाचे संदेश घोषित करण्याची शक्ती कशाप्रकारे प्राप्त होते?
११ मीखाला देवाच्या प्रतिकूल न्यायाचा संदेश घोषित करण्यासाठी निव्वळ मानवी सामर्थ्यावर विसंबून राहता येत नाही. यहोवाचा आत्मा किंवा त्याची सामर्थ्यशाली सक्रिय शक्ती आवश्यक आहे. आपल्याविषयी काय? आपल्या प्रचार कार्याला यहोवाने त्याच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने पाठिंबा दिला तरच आपण ते पूर्ण करू शकू. जर आपण जाणूनबुजून वारंवार पाप करत असू तर प्रचार करण्याचे आपले प्रयत्न निश्चितच व्यर्थ ठरतील. कारण देवाचे कार्य करण्यासाठी आपण साहाय्याकरता त्याला प्रार्थना करू तेव्हा तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर देणार नाही. आणि ‘यहोवाचा आत्मा’ आपल्यावर नसल्यास आपण निश्चितच आपल्या स्वर्गीय पित्याचे न्यायसंदेश घोषित करू शकत नाही. ऐकल्या जाणाऱ्या प्रार्थनांच्या माध्यमाने व पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपण मीखाप्रमाणे देवाचे वचन धैर्याने घोषित करू शकतो.
१२. येशूचे सुरवातीचे शिष्य ‘देवाचे वचन धैर्याने का सांगू’ शकले?
प्रेषितांची कृत्ये ४:२३-३१ येथील अहवाल आठवत असेल. तुम्ही येशूच्या पहिल्या शतकातील शिष्यांपैकी एक आहात अशी कल्पना करा. छळ करणारे धर्मांध लोक ख्रिस्ताच्या अनुयायांचे तोंड बंद करू पाहात आहेत. पण हे एकनिष्ठ सेवक आपल्या सार्वभौम प्रभूला अशी प्रार्थना करतात: “हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्यांकडे पाहा; आणि . . . आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.” याचा परिणाम? ते प्रार्थना करत असताना, ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ते स्थान हादरले आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने सांगू लागले. तेव्हा, आपण सर्वजण आपली सेवा करत असताना, प्रार्थनापूर्वक यहोवाकडे साहाय्याकरता प्रार्थना करू आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या मदतीवर विसंबून राहू या.
१२ कदाचित तुम्हाला१३. जेरूसलेम व शोमरोन यांचे काय होईल आणि का?
१३ पुन्हा एकदा मीखाच्या काळाविषयी विचार करा. मीखा ३:९-१२ यानुसार, रक्तपाती सरदार लाच खाऊन न्याय करत होते, याजक वेतन घेऊन धर्मशिक्षण देत होते आणि खोटे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगत होते. म्हणूनच, यहुदाची राजधानी जेरूसलेम ही “नासधुशीचा ढीग होईल” असे देवाने ठरवले यात काहीही आश्चर्य नाही! खोटी उपासना आणि नीतिभ्रष्टता इस्राएलमध्ये फोफावली असल्यामुळे मीखाला असा इशारेवजा संदेश देण्यास प्रेरित केले गेले की देव शोमरोनास “दगडांच्या ढिगारासारखे” करील. (मीखा १:६) भविष्यवाणीनुसार सा.यु.पू. ७४० साली अश्शूरी सैन्य शोमरोनाचा विनाश करतात तेव्हा संदेष्टा मीखा ही घटना प्रत्यक्ष पाहतो. (२ राजे १७:५, ६; २५:१-२१) जेरूसलेम व शोमरोनाविरुद्धचे हे जबरदस्त संदेश केवळ यहोवाच्या सामर्थ्यानेच घोषित करता येऊ शकत होते, हे तर स्पष्टच आहे.
१४. मीखा ३:१२ यात लिहिलेली भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण झाली आणि याचा आपल्यावर कसा परिणाम व्हावा?
१४ यहुदा निश्चितच यहोवाच्या प्रतिकूल न्यायापासून बचावू शकत नव्हता. मीखा ३:१२ यातील भविष्यवाणीनुसार सियोनेस ‘शेताप्रमाणे नांगरले’ जाणार होते. या २१ व्या शतकातून त्या घटनेकडे पाहिल्यास, आपल्याला माहीत आहे की सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी लोकांनी यहुदा व जेरूसलेमवर विनाश आणला तेव्हा या घटना घडल्या. मीखाच्या भविष्यवाणीनंतर कित्येक वर्षांनी हे घडले पण त्याला खात्री होती हे जरूर घडेल. आपल्याला देखील असाच आत्मविश्वास असला पाहिजे की, ‘यहोवाच्या दिवशी’ सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण निश्चित संपुष्टात येईल.—२ पेत्र ३:११, १२.
यहोवा इनसाफ करतो
१५. तुमच्या स्वतःच्या शब्दांत मीखा ४:१-४ येथे दिलेल्या भविष्यवाणीचे वर्णन तुम्ही कसे द्याल?
१५ मागे वळून पाहताना, आपण पाहू शकतो की यानंतर मीखाने एक अत्यंत आनंददायक आशेचा संदेश दिला. मीखा ४:१-४ येथील शब्द किती दिलासादायक आहेत! मीखा म्हणतो: “शेवटल्या दिवसात असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील. देशोदेशींच्या लोकांच्या झुंडींच्या झुंडी जातील. . . . तो देशोदेशींच्या बहुत लोकांचा न्याय करील, दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा इनसाफ ठरवील, तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.”
१६, १७. मीखा ४:१-४ येथील भविष्यवाणी आज कशाप्रकारे पूर्ण होत आहे?
१६ येथे उल्लेखलेले ‘बहुत लोक’ व ‘बलवान राष्ट्रे’ कोणाला सूचित करतात? ते या जगातील राष्ट्रे व सरकारे नाहीत. उलट ही भविष्यवाणी सर्व राष्ट्रांतील अशा व्यक्तींना सूचित करते ज्यांनी खऱ्या उपासनेच्या यहोवाच्या डोंगरावर त्याच्या सेवकांसोबत एकत्र मिळून पवित्र सेवा करण्यास आरंभ केला आहे.
१७ मीखाच्या भविष्यवाणीनुसार, यहोवाची शुद्ध उपासना लवकरच सबंध पृथ्वीवर पूर्णार्थाने केली जाईल. आज ‘सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती असलेल्या’ लोकांना यहोवाच्या मार्गांचे शिक्षण दिले जात आहे. (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW) जे विश्वास धरून यहोवाच्या राज्याचा पक्ष घेतात त्यांच्यासाठी तो आध्यात्मिक अर्थाने न्याय करत आहे व इनसाफ करत आहे. हे लोक एक ‘मोठा लोकसमुदाय’ या नात्याने ‘मोठ्या संकटातून’ पार होतील. (प्रकटीकरण ७:९, १४) त्यांनी आपल्या तरवारीचे फाळ केले आहे आणि आज देखील ते यहोवाच्या इतर साक्षीदारांसोबत व इतरांसोबत शांतीने वास्तव्य करत आहेत. त्यांच्यासोबत मिळून कार्य करणे खरोखर आनंददायक आहे!
यहोवाच्या नावाने चालण्याचा निर्धार
१८. ‘आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसण्याचा’ काय अर्थ होतो?
१८ आपल्या काळात सबंध पृथ्वीवर भीतीचे सावट पसरले असताना आपल्याला या गोष्टीचा आनंद वाटतो, की अनेकजण यहोवाच्या मार्गांचे शिक्षण घेत आहेत. आपण सर्व त्या जवळ आलेल्या काळाची वाट पाहतो, जेव्हा देवावर प्रेम करणारे कधीही युद्धकला शिकणार नाहीत आणि स्वतःच्या द्राक्षवेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. अंजिराची झाडे सहसा द्राक्षमळ्यांत लावली जातात. (लूक १३:६) स्वतःच्या द्राक्षवेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसणे हे लाक्षणिकरित्या शांतीपूर्ण, समृद्ध व सुरक्षित परिस्थितीस सूचित करते. आजही यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आपल्याला मानसिक शांती आणि आध्यात्मिक सुरक्षा मिळवून देतो. जेव्हा ही परिस्थिती राज्य शासनाखाली वास्तवात उतरेल तेव्हा आपण पूर्णपणे निर्धास्त व सुरक्षित होऊ.
१९. यहोवाच्या नावाने चालण्याचा काय अर्थ होतो?
१९ देवाची कृपा व आशीर्वाद अनुभवण्याकरता आपण यहोवाच्या नावाने चालले पाहिजे. हे मीखा ४:५ येथे अतिशय प्रभावशालीरितीने सांगण्यात आले आहे. तेथे संदेष्टा मीखा म्हणतो: “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.” यहोवाच्या नावाने चालण्यात केवळ तो आमचा देव आहे असे म्हणणे पुरेसे नाही. ख्रिस्ती सभांमध्ये उपस्थित राहणे, राज्यप्रचाराच्या कार्यात सहभाग घेणे इत्यादी आवश्यक असले तरीसुद्धा इतकेच पुरेसे नाही. यहोवाच्या नावाने आपण चालत असल्यास, आपण त्याला समर्पित असू आणि मनःपूर्वक प्रीतीने प्रेरित होऊन विश्वासूपणे त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करत असू. (मत्तय २२:३७) त्याचे उपासक या नात्याने निश्चितच आपला देव यहोवा याच्या नावाने सदासर्वकाळ चालण्याचा आपला निर्धार आहे.
२०. मीखा ४:६-१३ येथे काय भाकीत करण्यात आले होते?
२० आता कृपया मीखा ४:६-१३ येथील भविष्यसूचक शब्दांकडे लक्ष द्या. ‘सियोनकन्येला’ हद्दपार होऊन ‘बाबेलपर्यंत’ जावे लागेल. सा.यु.पू. सातव्या शतकात जेरूसलेमच्या रहिवाशांना हेच अनुभवावे लागले. तरीपण, मीखाची भविष्यवाणी दाखवते की एक शेषवर्ग यहुदाला परतेल आणि सियोनची पुनःस्थापना झाल्यानंतर यहोवा तिच्या शत्रूंचा सर्वनाश करील.
२१, २२. मीखा ५:२ यातील शब्दांची कशाप्रकारे पूर्णता झाली?
२१ मीखाच्या ५ व्या अध्यायात इतर नाटकीय घडामोडींविषयी भाकीत केले आहे. उदाहरणार्थ, मीखा ५:२-४ येथे काय सांगितले आहे याकडे लक्ष द्या. मीखा भाकीत करतो की देवाने नियुक्त केलेला एक शास्ता, ज्याचा “उद्भव प्राचीन काळापासून” आहे, तो बेथलेहेमातून येईल. तो “परमेश्वराच्या सामर्थ्याने” मेंढपाळ म्हणून राज्य करेल. शिवाय, हा शास्ता महान होईल, व तो केवळ इस्राएलातच नव्हे तर “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत” राज्य करेल. जगातले लोक कदाचित तो कोण आहे याविषयी गोंधळात असतील, पण आपल्याकरता हे कोडे नाही.
२२ बेथलेहेमात जन्म झालेली सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती कोण होती? आणि कोण आहे ज्याची “थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल?” हा खुद्द मशीहा, येशू ख्रिस्त आहे! हेरोद राजाने मुख्य याजकांना व शास्त्र्यांना, मशीहाचा जन्म कोठे होईल असे विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “यहूदीयातील बेथलेहेमात.” किंबहुना, त्यांनी मीखा ५:२ यातील शब्द देखील उद्धृत केले. (मत्तय २:३-६) काही सामान्य लोकांना देखील हे ठाऊक होते, कारण योहान ७:४२ त्यांच्याविषयी असे म्हणते: “दावीदाच्या वंशाचा व ज्या बेथलेहेमात दावीद होता त्या गावातून ख्रिस्त येणार असे शास्त्रात सांगितले नाही काय?”
लोकांकरता खरा तजेला
२३. आज मीखा ५:७ याची पूर्णता कशाप्रकारे होत आहे?
२३ मीखा ५:५-१५ यात अश्शूरी सैन्याच्या आक्रमणाविषयी सांगितले आहे. पण त्यांना फारसे यश मिळणार नाही. येथे सांगितले आहे की देव सर्व अवज्ञाकारक राष्ट्रांवर सूड उगवेल. मीखा ५:७ आश्वासन देते की पश्चात्तापी यहुदी शेषवर्गाची पुनःस्थापना होईल व ते आपल्या मायदेशी परततील. पण हे शब्द आपल्या काळालाही लागू होतात. मीखा असे घोषित करतो: “जसे परमेश्वरापासून दहिवर येते, व पर्जन्य गवतावर वर्षतो आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही, किंवा मानवजातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकांत पसरतील.” या सुरेख तुलनेच्या साहाय्याने असे भाकीत करण्यात आले आहे की आत्मिक याकोबाचा किंवा इस्राएलचा शेषवर्ग देवाकडून लोकांसाठी एक देणगी ठरेल. पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेली येशूची ‘दुसरी मेंढरे’, ‘देवाच्या इस्राएलाच्या’ आधुनिक काळातील शेषजनांसोबत आनंदाने खांद्याला खांदा लावून सेवा करतात व इतरांनाही आध्यात्मिक तजेला देतात. (योहान १०:१६; गलतीकर ६:१६; सफन्या ३:९) याबाबतीत एक महत्त्वाचा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. राज्याचे उद्घोषक या नात्याने आपण सर्वांनी, इतरांना खरा तजेला मिळवून देण्याच्या आपल्या विशेषाधिकाराची कदर केली पाहिजे.
२४. मीखा ३ ते ५ या अध्यायांतील कोणते मुद्दे तुम्हाला विशेष आवडले?
२४ मीखाच्या भविष्यवाणीतील ३ ते ५ अध्यायातून तुम्हाला काय शिकायला मिळाले आहे? कदाचित तुम्ही पुढील मुद्दे शिकला असाल: (१) देवाच्या लोकांमध्ये पुढाकार घेणाऱ्यांकडून तो न्यायप्रियतेची अपेक्षा करतो. (२) आपण जाणूनबुजून वारंवार पाप केल्यास यहोवा आपल्या प्रार्थना ऐकणार नाही. (३) देवाच्या पवित्र आत्म्याच्या पाठिंब्यानेच केवळ आपले प्रचार कार्य पूर्ण करणे शक्य आहे. (४) यहोवाची कृपा मिळवण्याकरता आपण त्याच्या नावाने चालले पाहिजे. (५) राज्य उद्घोषक या नात्याने लोकांना तजेला देण्याचा जो विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे त्याची आपण कदर केली पाहिजे. कदाचित याशिवाय इतर मुद्दे तुम्हाला विशेषतः आवडले असतील. बायबलच्या या भविष्यसूचक पुस्तकातून आपण आणखी काय शिकू शकतो? पुढील लेख आपल्याला मीखाच्या विश्वास बळकट करणाऱ्या भविष्यवाणीतील शेवटल्या दोन अध्यायांतून काही व्यावहारिक मुद्दे शिकण्यास मदत करेल.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• देवाच्या लोकांचे नेतृत्व करणाऱ्यांकडून तो काय अपेक्षा करतो?
• यहोवाची सेवा करत असताना प्रार्थना आणि पवित्र आत्मा महत्त्वाचे का आहेत?
• लोक कशाप्रकारे ‘यहोवाच्या नावाने चालतात?’
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्र]
मीखाने दिलेल्या कढईच्या दृष्टान्ताचे तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
[१६ पानांवरील चित्रे]
मीखाप्रमाणे आपण देखील धैर्याने आपली सेवा पूर्ण करतो