व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरे सांत्वन कोठे सापडेल?

खरे सांत्वन कोठे सापडेल?

खरे सांत्वन कोठे सापडेल?

“आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, . . . आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो.”—२ करिंथकर १:३, ४.

१. कशाप्रकारच्या परिस्थितींमुळे एखाद्या व्यक्‍तीला सांत्वनाची गरज प्रकर्षाने जाणवू शकते?

आजाराने जर्जर झालेल्या व्यक्‍तीला आपल्या जीवनात आता काहीच उरलेले नाही असे वाटते. भूकंप, वादळे आणि दुष्काळ यांमुळे लोक निराश्रित होतात. युद्धामुळे कुटुंबातील सदस्य मरतात, लोकांची घरे नष्ट होतात किंवा घरमालकांना घरदार, मालमत्ता इत्यादी वाऱ्‍यावर सोडून पळ काढणे भाग पडते. अन्यायाला बळी पडलेल्यांना, असे वाटू लागते जणू त्यांना न्याय मिळवून देणारा कोणीही नाही. अशाप्रकारच्या दुःखद परिस्थितींत अडकलेल्यांना सांत्वनाची अत्यंत गरज आहे. हे सांत्वन कोठे सापडेल?

२. यहोवाने पुरवलेले सांत्वन अतुलनीय का आहे?

काही व्यक्‍ती व संस्था सांत्वन देण्याचा प्रयत्न करतात. दयाळूपणे बोललेले शब्द आभार मानण्यालायक असतात. भौतिक स्वरूपाचे मदत कार्य देखील अल्पकालीन गरजा भागवू शकते. पण झालेले सर्व नुकसान भरून काढणे आणि अशी संकटे पुन्हा कधीही घडणार नाहीत या दृष्टीने मदत पुरवणे केवळ खरा देव यहोवा यालाच शक्य आहे. त्याच्याविषयी बायबल असे म्हणते: “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याहि संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे.” (२ करिंथकर १:३, ४) यहोवा आपल्याला कशाप्रकारे सांत्वन देतो?

समस्यांचे मूळ कारण शोधणे

३. देवाने दिलेले सांत्वन कशाप्रकारे मानवांच्या समस्यांच्या मुळाशी जाते?

आदामाच्या पापामुळे सबंध मानवी कुटुंबाला उपजत अपरिपूर्णता मिळाली आहे; यामुळे असंख्य समस्या निर्माण होतात ज्या शेवटी मृत्यूला कारणीभूत ठरतात. (रोमकर ५:१२) शिवाय “ह्‍या जगाचा अधिकारी” सैतान असल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. (योहान १२:३१; १ योहान ५:१९) देवाने केवळ, मानवजातीपुढे असलेल्या या दुःखद परिस्थितीबद्दल खेद व्यक्‍त केला नाही. तर त्याने आपल्याला यातून सोडवण्याकरता आपल्या एकुलत्या एक पुत्राला खंडणी देण्याकरता पाठवले आणि आपल्याला सांगितले की जर आपण त्याच्या पुत्रावर विश्‍वास ठेवला तर आदामाच्या पापामुळे झालेल्या सर्व परिणामांपासून मुक्‍त होणे शक्य आहे. (योहान ३:१६; १ योहान ४:१०) देवाने हे देखील भाकीत केले की येशू ख्रिस्त, ज्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार देण्यात आला आहे तो सैतानाचा व त्याच्या सबंध दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करेल.—मत्तय २८:१८; १ योहान ३:८; प्रकटीकरण ६:२; २०:१०.

४. (अ) यहोवाने आपल्याला सोडवण्याविषयी ज्या प्रतिज्ञा केल्या आहेत, त्यांवर आपला विश्‍वास बळकट करण्याकरता यहोवाने काय तरतूद केली आहे? (ब) ही सुटका केव्हा मिळेल हे समजण्याकरता यहोवा आपल्याला कशाप्रकारे मदत करतो?

देवाच्या प्रतिज्ञांवर आपला आत्मविश्‍वास वाढवण्याकरता त्याने, आपण भाकीत केलेले सर्वकाही कशाप्रकारे पूर्ण होते हे दाखवणारा भरपूर पुरावा जतन करून ठेवला आहे. (यहोशवा २३:१४) मानवाच्या दृष्टीने अशक्य असलेल्या परिस्थितीतही आपल्या सेवकांना सोडवण्याकरता त्याने काय केले याचा अहवाल त्याने बायबलमध्ये समाविष्ट केला आहे. (निर्गम १४:४-३१; २ राजे १८:१३-१९:३७) आणि येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने यहोवाने दाखवले आहे की लोकांना ‘सर्व प्रकारच्या दुखण्यांपासून’ मुक्‍त करण्याचा, इतकेच काय तर मृतांनाही जिवंत करण्याचा त्याचा उद्देश आहे. (मत्तय ९:३५; ११:३-६) हे सर्व केव्हा घडेल? या प्रश्‍नाचे उत्तर देताना बायबल, देवाचे नवे आकाश व नवी पृथ्वी स्थापित होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या जुन्या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसांचे वर्णन करते. येशूने केलेले वर्णन आपण ज्या काळात जगत आहोत त्याच्याशी जुळते.—मत्तय २४:३-१४; २ तीमथ्य ३:१-५.

दुःखितांकरता सांत्वन

५. प्राचीन इस्राएलास सांत्वन देताना यहोवाने त्यांचे लक्ष कशाकडे वळवले?

यहोवाने प्राचीन इस्राएलसोबत ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून आपण शिकतो की दुःखाच्या काळात त्याने त्यांना कशाप्रकारे सांत्वन दिले. तो कशाप्रकारचा देव आहे याची त्याने त्यांना आठवण करून दिली. यामुळे त्याच्या प्रतिज्ञांवर त्यांचा विश्‍वास बळकट झाला. एक खरा व जिवंत देव या नात्याने तो स्वतः आणि दुसरीकडे पाहता, स्वतःला किंवा आपल्या उपासकांना मदत करण्यास असमर्थ असलेल्या मूर्ती या दोहोंतील फरक स्पष्टपणे दाखवण्यास त्याने आपल्या संदेष्ट्यांना प्रेरित केले. (यशया ४१:१०; ४६:१; यिर्मया १०:२-१५) “सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा,” असे यशयाला सांगताना यहोवाने आपल्या या संदेष्ट्याला त्याच्या महानतेविषयी आणि तोच केवळ खरा देव आहे हे लोकांच्या मनावर ठसवण्याकरता आपल्या निर्मितीकृत्यांतील दृष्टान्त व वर्णने वापरण्यास प्रवृत्त केले.—यशया ४०:१-३१.

६. सुटका केव्हा होईल याविषयी यहोवाने कधीकधी कशाप्रकारचे संकेत पुरवले?

काही प्रसंगी यहोवाने जवळची किंवा दूरची अशी विशिष्ट वेळ सांगण्याद्वारे त्यांना सांत्वन दिले. उदाहरणार्थ, ईजिप्तमधून सुटकेची वेळ जवळ आली तेव्हा गुलामीत जखडलेल्या इस्राएलांना त्याने असे सांगितले: “मी फारोवर व मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन; त्यानंतर तो तुम्हाला येथून जाऊ देईल.” (निर्गम ११:१) राजा यहोशाफाटच्या काळात तीन राष्ट्रांच्या सैन्यांनी मिळून यहूदावर चाल केली तेव्हा यहोवाने त्यांना सांगितले की मी “उद्या” तुमच्या वतीने कार्य करेन. (२ इतिहास २०:१-४, १४-१७) दुसरीकडे पाहता, बॅबिलोनपासून त्यांच्या सुटकेविषयी यशयाने जवळजवळ २०० वर्षांआधी लिहून ठेवले होते आणि अधिक सविस्तर माहिती यिर्मयाने सुटका होण्याच्या जवळजवळ शंभर वर्षांआधी पुरवली होती. सुटकेचा काळ निकट येऊ लागला तेव्हा हे भविष्यवाद देवाच्या सेवकांकरता किती सांत्वनदायक ठरले असतील!—यशया ४४:२६–४५:३; यिर्मया २५:११-१४.

७. सुटकेच्या प्रतिज्ञांत सहसा काय सामील असायचे आणि याचा इस्राएलातील विश्‍वासू लोकांवर कसा प्रभाव पडला?

लक्ष देण्याजोगी बाब ही आहे, की देवाच्या लोकांना सांत्वनाकरता दिलेल्या प्रतिज्ञांमध्ये सहसा मशीहाविषयी माहिती होती. (यशया ५३:१-१२) या माहितीने पुढच्या प्रत्येक पिढीतील विश्‍वासू जनांना विविध परीक्षांना तोंड देत असताना आशेचा किरण दाखवला. लूक २:२५ येथे आपण असे वाचतो: “पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरूशलेमेत होता; तो नीतिमान व भक्‍तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची [प्रत्यक्षात, मशीहाच्या येण्याची] वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता.” शिमोनाला मशीहाविषयी शास्त्रवचनांत नमूद केलेल्या आशेविषयी माहीत होते आणि त्याच्या पूर्णतेच्या आशेमुळे त्याच्या जीवनावर बराच प्रभाव पडला. सांगितलेल्या सर्व गोष्टी कशा पूर्ण होतील याची त्याला कल्पना नव्हती आणि भाकीत केलेले तारण वास्तवात उतरलेले पाहण्याकरता तो स्वतः जिवंत राहिला नाही पण देवाच्या “तारणाचे माध्यम” ठरणार असलेल्यास त्याने पाहिले तेव्हा तो आनंदित झाला.—लूक २:३०, NW.

ख्रिस्ताद्वारे सांत्वन पुरवण्यात आले

८. येशूने दिलेली मदत लोकांच्या अपेक्षेच्या तुलनेत कशाप्रकारे वेगळी होती?

येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरील सेवाकार्य पार पाडताना लोकांना नेहमीच त्यांच्या अपेक्षेनुसार मदत केली नाही. काहीजणांना रोमच्या प्रभुत्वाचा तिरस्कार वाटत होता आणि मशीहाने येऊन रोमी साम्राज्यापासून आपली सुटका करावी अशी त्यांची इच्छा होती. पण येशूने क्रांतीकारी चळवळीला प्रोत्साहन दिले नाही; त्याने त्यांना ‘कैसराचे ते कैसराला भरण्यास’ सांगितले. (मत्तय २२:२१) लोकांना एका राजकीय साम्राज्याच्या वर्चस्वातून मुक्‍त करणे इतकाच देवाचा उद्देश नव्हता, तर त्यात बरेच काही समाविष्ट होते. लोकांना येशूला राजा बनवायचे होते पण त्याने म्हटले की तो “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” करील. (मत्तय २०:२८; योहान ६:१५) राजपद हस्तगत करण्याची त्याची वेळ अद्याप आलेली नव्हती; शिवाय, राज्य करण्याचा अधिकार त्याला देवाकडून मिळणार होता, असंतुष्ट लोकांच्या जमावाकडून नव्हे.

९. (अ) येशूने घोषित केलेला सांत्वनाचा संदेश काय होता? (ब) लोकांना त्यांच्या जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांशी राज्याच्या संदेशाचा संबंध असल्याचे येशूने कशाप्रकारे प्रदर्शित केले? (क) येशूच्या सेवाकार्याने कशाकरता एक आधार तयार केला?

येशूने दिलेले सांत्वन ‘देवाच्या राज्याच्या सुवार्तेत’ सामावलेले होते. हाच संदेश येशूने तो जेथे कोठे जाईल तेथे घोषित केला. (लूक ४:४३) मशीही राज्याचा राजा या नात्याने तो मानवजातीकरता काय करेल हे दाखवण्याद्वारे त्याने या संदेशाचा लोकांच्या दररोजच्या समस्यांशी कसा संबंध आहे हे स्पष्ट केले. अंधळ्याना दृष्टी व मुक्यांना वाणी देण्याद्वारे (मत्तय १२:२२; मार्क १०:५१, ५२), पांगळ्यांना बरे करण्याद्वारे (मार्क २:३-१२), सह-इस्राएलांना किळसवाण्या रोगांपासून शुद्ध करण्याद्वारे (लूक ५:१२, १३), आणि इतर कष्टदायक आजारांपासून त्यांना मुक्‍त करण्याद्वारे (मार्क ५:२५-२९) त्याने त्यांच्या जीवनाला एक नवीन अर्थ दिला. शोकमग्न आईवडिलांच्या मृत मुलांना पुन्हा जिवंत करून त्याने त्यांच्यावर आलेले संकट दूर केले. (लूक ७:११-१५; ८:४९-५६) भयानक वादळांवर नियंत्रण करण्याचे आणि हजारो लोकांच्या जमावांना अन्‍न देऊन तृप्त करण्याचे आपले सामर्थ्य त्याने प्रदर्शित केले. (मार्क ४:३७-४१; ८:२-९) शिवाय, येशूने लोकांना असे तत्त्व शिकवले जे सध्याच्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्याकरता त्यांना मदत करील आणि मशीहाच्या नीतिमान राज्याखालील जीवनाची आशा त्यांच्या मनात उत्पन्‍न करील. अशाप्रकारे आपले सेवाकार्य करत असताना येशूने विश्‍वासाने त्याचे शब्द ऐकणाऱ्‍यांना केवळ सांत्वनच दिले नाही तर येणाऱ्‍या हजारो वर्षांपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळेल याकरता एक आधार तयार केला.

१०. येशूच्या बलिदानामुळे काय शक्य झाले आहे?

१० येशूने आपल्या जीवनाचे बलिदान दिले व त्याचे स्वर्गीय जीवनात पुनरुत्थान झाल्यावर ६० वर्षांपेक्षा अधिक काळ गेल्यानंतर प्रेषित योहानाला असे लिहिण्याची प्रेरणा झाली: “अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.” (१ योहान २:१, २) येशूच्या परिपूर्ण मानवी बलिदानाच्या फायद्यांमुळे आपल्याला मोठे सांत्वन प्राप्त झाले आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्याला आपल्या पापांची क्षमा, एक शुद्ध विवेक, देवाची संमती व त्याच्यासोबत एक नातेसंबंध आणि सार्वकालिक जीवनाची आशा मिळू शकते.—योहान १४:६; रोमकर ६:२३; इब्री लोकांस ९:२४-२८; १ पेत्र ३:२१.

सांत्वनदात्याच्या भूमिकेत पवित्र आत्मा

११. येशूने आपला मृत्यू होण्याआधी सांत्वनाच्या आणखी कोणत्या तरतुदीविषयी आश्‍वासन दिले?

११ आपल्या बलिदानरूपी मृत्यूआधीच्या शेवटल्या संध्याकाळी प्रेषितांसोबत असताना, आपल्या स्वर्गीय पित्याने त्यांना सांत्वन देण्याकरता केलेल्या आणखी एका तरतुदीबद्दल येशूने सांगितले. येशू म्हणाला: “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी [सांत्वनदाता; ग्रीक, पॅराक्लीटॉस] म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.” येशूने त्यांना आश्‍वासन दिले: “तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल.” (योहान १४:१६, १७, २६) पवित्र आत्म्याने त्यांना कशाप्रकारे सांत्वन दिले?

१२. येशूच्या शिष्यांना आठवण करून देणारा या नात्याने पवित्र आत्म्याने पार पाडलेल्या भूमिकेमुळे अनेकांना कशाप्रकारे सांत्वन मिळाले?

१२ प्रेषितांना येशूकडून भरपूर शिक्षण मिळाले होते. हा अनुभव निश्‍चितच अविस्मरणीय होता, पण येशूने नेमके काय सांगितले हे त्यांच्या स्मरणात राहिले का? अपरिपूर्णतेमुळे ते येशूच्या काही महत्त्वाच्या सूचना विसरले का? येशूने त्यांना आश्‍वासन दिले की पवित्र आत्मा त्यांना, ‘ज्या गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या त्या सर्वांची आठवण करून देईल.’ म्हणूनच येशूच्या मृत्यूच्या आठ वर्षांनंतर मत्तय पहिले शुभवर्तमान लिहू शकला, ज्यात त्याने येशूचा डोंगरावरील प्रेमळ उपदेश, राज्याविषयी त्याने दिलेले अनेक दृष्टान्त आणि त्याच्या उपस्थितीच्या चिन्हाच्या केलेल्या सविस्तर चर्चेविषयी लिहिले. ५० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर प्रेषित योहान देखील एक विश्‍वासार्ह अहवाल लिहू शकला ज्यात येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या काही दिवसांतील घटनांचे सविस्तर वर्णन आढळते. हे प्रेरित अहवाल आजपर्यंत किती प्रोत्साहन देणारे ठरले आहेत!

१३. पवित्र आत्म्याने कशाप्रकारे आरंभीच्या ख्रिश्‍चनांकरता एका शिक्षकाची भूमिका पार पाडली?

१३ पण केवळ येशूच्या शब्दांची आठवण करून देण्याऐवजी पवित्र आत्म्याने शिष्यांना शिकवले आणि त्यांना देवाचा उद्देश अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत केली. येशू अद्याप त्याच्या शिष्यांसोबत होता तेव्हा त्याने त्यांना अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या तेव्हा त्यांना नीट समजल्या नाहीत. पण नंतर, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने योहान, पेत्र, याकोब, यहुदा आणि पौल यांनी देवाच्या उद्देशातील प्रगतिशील घडामोडींविषयी स्पष्टीकरण लिहिले. अशारितीने पवित्र आत्म्याने एका शिक्षकाची भूमिका घेतली आणि देवाच्या निर्देशनाची प्रेषितांना खात्री दिली.

१४. पवित्र आत्म्याने यहोवाच्या लोकांना कोणकोणत्या मार्गांनी मदत केली?

१४ आत्म्याच्या चमत्कारिक देणग्यांमुळे हे देखील स्पष्ट झाले की देवाची कृपादृष्टी आता शारीरिक इस्राएलवर नसून ख्रिस्ती मंडळीवर होती. (इब्री लोकांस २:४) तसेच, जे येशूचे खरे शिष्य होते, त्यांच्या जीवनात या आत्म्याचे फळ त्यांची ओळख करून देणारे एक महत्त्वाचे चिन्ह होते. (योहान १३:३५; गलतीकर ५:२२-२४) आणि आत्म्याने त्या मंडळीच्या सदस्यांना निर्भयतेने व धाडसीपणे साक्ष देण्याची शक्‍ती दिली.—प्रेषितांची कृत्ये ४:३१.

अत्यंत दबावाखाली असताना साहाय्य

१५. (अ) गतकाळात व सध्याच्या काळात ख्रिश्‍चनांना कशाप्रकारच्या दबावांना तोंड द्यावे लागले आहे? (ब) जे प्रोत्साहन देतात त्यांना स्वतःलाही कधीकधी प्रोत्साहनाची गरज का पडू शकते?

१५ यहोवाला समर्पित असलेल्या व त्याला निष्ठावान राहणाऱ्‍या सर्वांना कोणत्या न कोणत्या प्रकारच्या छळाला तोंड द्यावे लागतेच. (२ तीमथ्य ३:१२) पण बऱ्‍याच ख्रिश्‍चनांना अत्यंत भयंकर प्रकारचा दबाव सहन करावा लागला आहे. आधुनिक काळात, काहींना जमावांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले, अमानुष परिस्थितीत काहींना छळ छावण्यांत, तुरुंगांत, अथवा श्रम शिबिरांत टाकण्यात आले. सरकारांनी सक्रियपणे या छळवणुकीत सहभाग घेतला किंवा बेकायदेशीर तत्त्वांना कोणत्याही शिक्षेशिवाय मनमानी करण्याची परवानगी दिली आहे. शिवाय, ख्रिश्‍चनांना गंभीर आरोग्य समस्यांना किंवा कौटुंबिक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक बांधवांना त्यांच्या कठीण परिस्थितीत मदत करणाऱ्‍या प्रौढ ख्रिश्‍चनालाही बराच दबाव अनुभवावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, प्रोत्साहन देणाऱ्‍याला स्वतःलाही प्रोत्साहनाची गरज पडू शकते.

१६. दावीद भयंकर दबावाखाली होता तेव्हा त्याला कशाप्रकारे मदत देण्यात आली?

१६ राजा शौल दाविदाचा पाठलाग करत होता तेव्हा दाविदाने आपल्या साहाय्यकर्त्या देवाकडे अशी याचना केली: “हे देवा, माझी प्रार्थना ऐक.” “मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.” (स्तोत्र ५४:२, ४; ५७:१) दाविदाला मदत करण्यात आली का? होय, निश्‍चितच. त्या काळात, यहोवाने गाद संदेष्टा आणि अब्याथार याजकाचा दाविदाला मार्गदर्शन देण्याकरता उपयोग केला आणि त्याला प्रोत्साहन देण्याकरता शौलाचा पुत्र योनाथान याचा उपयोग केला. (१ शमुवेल २२:१, ५; २३:९-१३, १६-१८) तसेच यहोवाने पलिष्ट्यांना त्या देशावर स्वारी करण्याची अनुमती दिली आणि अशारितीने शौलाचे लक्ष इतरत्र विचलित केले.—१ शमुवेल २३:२७, २८.

१७. भयंकर दबावाखाली असताना येशूने मदतीकरता कोणाची आस धरली?

१७ येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील जीवनाचा अंत जवळ आला तेव्हा त्याला देखील भयंकर दबावाचा सामना करावा लागला. त्याच्या कृतींचा त्याच्या स्वर्गीय पित्याच्या नावावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे सबंध मानवजातीच्या भविष्यावर कसा प्रभाव पडेल याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्याने अगदी कळकळीने, “अत्यंत विव्हळ होऊन” प्रार्थना केली. त्या कठीण समयी आवश्‍यक असलेला आधार देवाने येशूला दिला.—लूक २२:४१-४४.

१८. भयंकर छळाला तोंड देणाऱ्‍या आरंभीच्या ख्रिश्‍चनांना देवाने कशाप्रकारे सांत्वन दिले?

१८ पहिल्या शतकातील मंडळीच्या स्थापनेनंतर ख्रिश्‍चनांना इतका भयंकर छळ सोसावा लागला की प्रेषितांशिवाय इतर सर्वांची जेरूसलेममधून पांगापांग झाली. स्त्रीपुरुषांना अक्षरशः त्यांच्या घरांतून ओढून बाहेर काढण्यात आले. देवाने त्यांना कशाप्रकारे सांत्वन दिले? आपल्या वचनाद्वारे यहोवाने त्यांना हे आश्‍वासन दिले की त्यांना ‘अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता,’ अर्थात स्वर्गात ख्रिस्तासोबत वतन मिळेल. (इब्री लोकांस १०:३४; इफिसकर १:१८-२०) त्यांनी प्रचार कार्य सुरू ठेवले तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्यासोबत असल्याचा पुरावा त्यांना पाहायला मिळाला आणि त्यांना आलेल्या अनुभवांमुळे अधिकच आनंद मिळाला.—मत्तय ५:११, १२; प्रेषितांची कृत्ये ८:१-४०.

१९. पौलाला भयंकर छळाला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा देवाने पुरवलेल्या सांत्वनाविषयी त्याच्या काय भावना होत्या?

१९ कालांतराने, स्वतः हिंसक छळ करणाऱ्‍या शौलाला (पौलाला) देखील ख्रिस्ती बनल्यामुळे छळाला तोंड द्यावे लागले. सायप्रसच्या बेटावर राहणाऱ्‍या एका जादूगाराने कपट व फसवेगिरीने पौलाच्या सेवाकार्यात अडखळण आणण्याचा प्रयत्न केला. गलतिया येथे, पौलाला दगडमार करून तो मेला असे समजून टाकून देण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये १३:८-१०; १४:१९) मासेदोनिया येथे त्याला फटके मारण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये १६:२२, २३) इफिसस येथे एका जमावाने हिंसाचार केल्यानंतर त्याने लिहिले: “आम्ही आमच्या शक्‍तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले; फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हास सांगत होते.” (२ करिंथकर १:८, ९) पण त्याच पत्रात पौलाने या लेखातील २ ऱ्‍या परिच्छेदातील सांत्वनदायक शब्द लिहिले.—२ करिंथकर १:३, ४.

२०. पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

२० इतरांना देवाकडील सांत्वन देण्यात तुम्ही कशाप्रकारे सहभागी होऊ शकता? आपल्या काळातील बऱ्‍याच जणांना दुःखद अनुभवांतून जाताना, मग ते हजारो लोकांवर आलेल्या एखाद्या विपत्तीमुळे असोत किंवा फक्‍त त्यांच्यावर कोसळलेल्या संकटामुळे असोत, त्यांना अशा वेळी सांत्वनाची गरज भासते. पुढील लेखात आपण पाहणार आहोत की वर उल्लेख केलेल्या दोन्ही परिस्थितींत आपण कशाप्रकारे सांत्वन देऊ शकतो.

तुम्हाला आठवते का?

• देवाकडील सांत्वन सर्वात बहुमोल का आहे?

• ख्रिस्ताद्वारे कशाप्रकारचे सांत्वन मिळते?

• पवित्र आत्मा कशाप्रकारे एक सांत्वनदाता ठरला आहे?

• देवाचे सेवक तीव्र दबावाखाली असताना त्यांना देवाकडून पुरवण्यात आलेल्या सांत्वनाची उदाहरणे द्या.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

बायबल आपल्याला दाखवते की यहोवाने आपल्या लोकांना सोडवण्याद्वारे सांत्वन दिले

[१६ पानांवरील चित्रे]

येशूने लोकांना शिक्षण देण्याद्वारे, रोग बरे करण्याद्वारे आणि मृतांना जिवंत करण्याद्वारे सांत्वन दिले

[१८ पानांवरील चित्र]

येशूला देवाकडून मदत मिळाली