बवाज आणि रूथ यांचा असामान्य विवाह
बवाज आणि रूथ यांचा असामान्य विवाह
बेथलेहम जवळचा परिसर, सुगीचे दिवस सुरू झाल्यामुळे व्यस्त होता. दिवस मोठा होता. हवेत दरवळणारा हुरड्याचा खमंग वास कामकऱ्यांना जेवणाच्या वेळेची आठवण करून देतो. प्रत्येक जण आपल्या कष्टाचे फळ खाणार आहे.
बवाज नावाचा एक धनाढ्य सावकार, तृप्त होईपर्यंत खातो-पितो आणि धान्याच्या एका मोठ्या राशीशेजारी आरामात पहुडतो. दिवस मावळतीला झुकतो तसा कापणीचा एक दिवस सरतो आणि जो तो आराम करू इच्छितो. तृप्त झालेला बवाजही पांघरूण ओढून गाढ झोपी जातो.
चोरपावलांनी प्रवेश
मध्यरात्री, थंडी आणि कुडकुडण्यामुळे बवाजाची झोपमोड झाली. कोणीतरी त्याच्या पायांवरचे पांघरूण मुद्दामहून बाजूला सारले आहे आणि त्याच्या पायांजवळ झोपले आहे! अंधारात काही दिसत नसल्यामुळे तो विचारतो: “तू कोण आहेस?” एक स्त्री त्याला उत्तर देते: “मी आपली दासी रूथ आहे; या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या; कारण आमचे वतन सोडविण्याचा हक्क आपल्याला आहे.”—रूथ ३:१-९.
अंधारात त्यांच्याव्यतिरिक्त तेथे तिसरे कोणी नाही. खळ्यात अशाप्रकारे एखादी स्त्री कधी एकटी येत नसे. (रूथ ३:१४) पण बवाजाच्या विनंतीखातर रूथ पहाट होईपर्यंत निजून राहिली आणि कोणीही बिनबुडाची तक्रार करू नये म्हणून तांबडे फुटण्याआधीच उठून निघून गेली.
ही प्रणय भेट होती का? एका मूर्तीपूजक राष्ट्रातून आलेली ही तरुण गरीब विधवा रूथ, या श्रीमंत, वृद्ध मनुष्याला भुलवत होती का? की, बवाज त्या रात्री रूथच्या परिस्थितीचा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेत होता? नाही. जे काही घडले ते देवाप्रती एकनिष्ठेचे आणि प्रेमाचे एक उदाहरण होते. आणि वस्तुस्थिती देखील अगदी हृदयस्पर्शी आहे.
पण ही रूथ होती तरी कोण? तिचा काय हेतू होता? आणि तो श्रीमंत मनुष्य बवाज कोण होता?
“सद्गुणी स्त्री”
ही घटना घडण्याच्या कित्येक वर्षांआधी, यहुदात दुष्काळ पडला होता. अलीमलेख, त्याची पत्नी नामी आणि त्यांचे दोन पुत्र महलोन व खिल्योन असे चार सदस्य असलेले हे इस्राएली कुटुंब, मवाबच्या सुपीक देशात राहायला आले. दोन्ही मुलांनी, रूथ व अर्पा नावाच्या दोन मवाबी स्त्रियांबरोबर विवाह केला. मवाबमध्ये घरातील तिन्ही पुरुषांचा मृत्यू झाल्यावर, या तिन्ही स्त्रियांना अशी बातमी ऐकायला मिळाली की इस्राएलमधील परिस्थिती सुधारली होती. यास्तव, विधवा झालेल्या नामीने, आपल्या पोटचे एकही मूल किंवा नातवंडे नाहीत म्हणून मनात कटू भावना घेऊन आपल्या मायदेशी परतण्याचे ठरवले.—रूथ १:१-१४.
इस्राएलकडे जात असताना नामीने अर्पाची समजूत घालून तिला आपल्या लोकांकडे जाण्यास सांगितले. मग नामी रूथला म्हणाली: “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे तर तूहि आपल्या जावेच्या मागून जा.” पण रूथने तिला उत्तर दिले: “मला सोडून जा . . . असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी रूथ १:१-१७) त्यामुळे या दोन निराश्रित विधवा बेथलेहमेस पुन्हा आल्या. रूथला आपल्या सासूवर किती प्रेम आहे आणि ती तिची किती काळजी घेते हे पाहून शेजारपाजारचे लोक प्रभावीत झाले; इतकेच काय तर त्यांनी नामीला म्हटले की रूथ तिला “सात पुत्रांहून अधिक” होती. काहींनी रूथला “सद्गुणी स्त्री” म्हटले.—रूथ ३:११; ४:१५.
येईन, . . . तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव; तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल.” (बेथलेहममध्ये सातूच्या कापणीच्या सुरवातीला रूथ नामीला म्हणाली: “मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची मजवर कृपादृष्टि झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचीत जाईन.”—रूथ २:२.
योगायोगाने ती बवाजच्या शेतात येते; बवाज हा रूथचा सासरा अलीमलेखचा नातेवाईक होता. शेतात कामाची देखरेख करणाऱ्या मुकादमाला रूथ सरवा वेचण्याची परवानगी मागते. सरवा वेचण्याचे काम ती इतक्या मन लावून करते, की मुकादम तिच्या कामाची तारीफ बवाजजवळ करतो.—रूथ १:२२–२:७.
संरक्षक आणि उपकारकर्ता
बवाज यहोवाचा एक धार्मिक उपासक होता. दररोज सकाळी तो कापणी करणाऱ्यांस अशा शब्दांत नमस्कार करायचा: “परमेश्वर तुमच्या समागमे असो” आणि ते त्याला “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो” असे उत्तर द्यायचे. (रूथ २:४) रूथचा कामासूपणा पाहिल्यानंतर व नामीशी ती कशी विश्वासू राहिली होती हे ऐकल्यानंतर बवाजाने रूथसाठी सरवा गोळा करण्याची खास व्यवस्था केली. थोडक्यात तो तिला असे म्हणाला: ‘तू माझ्याच शेतात काम कर. दुसऱ्याच्या शेतात तुला जायची गरज नाही. माझ्या नोकरिणींबरोबर राहा. तुला कसली भीती राहणार नाही. तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी गड्यांस दिली आहे. तुला तहान लागल्यास गडी तुला पाणी आणून देतील.’—रूथ २:८, ९.
रूथ खाली वाकून नमस्कार करते आणि म्हणते: “मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टि करून माझा समाचार घेतला याचे काय कारण बरे?” बवाज तिला उत्तर देतो: “तुझा पति मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमि सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर . . . तुला पुरे पारितोषिक देवो.”—रूथ २:१०-१२.
बवाज तिची मर्जी प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत नाही. तो करत असलेली प्रशंसा ही प्रामाणिक आहे. रूथही अत्यंत नम्र होती; त्याच्या सांत्वनाबद्दल ती त्याचे आभार मानते. ही प्रशंसा मिळवण्यास आपण पात्र नाही असे समजून ती अधिक कष्टाने काम करू लागते. नंतर, जेवणाच्या वेळी बवाज रूथला बोलवून म्हणतो: “इकडे ये, भाकर खा; ह्या कढीत आपली भाकर बुडीव.” ती पोटभर जेवते आणि उरलेले जेवण आपली सासू नामी हिच्यासाठी घेऊन जाण्यासाठी ठेवते.—रूथ २:१४.
संध्याकाळपर्यंत रूथने एफाभर सातू गोळा केला होता. ते आणि उरलेले अन्न घेऊन ती आपल्या घरी नामीकडे जाते. (रूथ २:१५-१८) तिने किती बहुत प्रमाणात सरवा वेचून आणला होता, हे पाहून नामी खूष होऊन म्हणते: “आज तू कोठे सरवा वेचिला? . . . ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण होवो.” नामीला जेव्हा कळते की रूथ बवाजाच्या शेतात कामाला गेली होती तेव्हा ती तिला म्हणते: “ज्या परमेश्वराने जिवंतांवर व मृतांवरहि आपली दया करावयाचे सोडिले नाही, तो त्याचे कल्याण करो. . . . हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास हक्क आहे.”—रूथ २:१९, २०.
“स्थळ” शोधणे
आपल्या सुनेसाठी एक “स्थळ” किंवा घर मिळावे अशी नामीची इच्छा असल्यामुळे, देवाच्या नियमशास्त्राच्या सुसंगतेत, वतनाचा भाग सोडवून आणण्याची विनंती करण्यासाठी ती आलेल्या संधीचा फायदा घेते. (लेवीय २५:२५; अनुवाद २५:५, ६) आता नामी रूथला, एका नाट्यमयरीतीने म्हटले तरी चालेल, एका खास कार्यासाठी अर्थात बवाजाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी जणू काय प्रशिक्षण देते. सज्ज व प्रशिक्षित रूथ अंधारात, बवाजाच्या खळ्यात जाते. तेथे ती त्याला झोपलेला पाहते. ती त्याच्या पायांवरचे पांघरूण काढते आणि त्याला जाग येईपर्यंत थांबून राहते.—रूथ ३:१-७.
बवाजाला जाग येते तेव्हा त्याला, “आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या,” या रूथने केलेल्या विनंतीचा अर्थ तिच्या लाक्षणिक कार्यांवरून कळतो. रूथच्या कार्यांवरून या वृद्ध यहुदी पुरुषाला स्पष्टपणे, वतन सोडवण्याचा हक्क पूर्ण करण्याच्या कर्तव्याची जाणीव होते; कारण तो रूथचा मृत पती, महलोन याचा नातेवाईक होता.—रूथ ३:९.
रूथने रात्रीच्या वेळी दिलेली ही भेट अनपेक्षित होती. तरीपण, बवाजाच्या प्रतिक्रियेवरून असे सूचित होते, की वतन सोडवून आणण्याच्या हक्काची रूथने केलेली विनंती ही पूर्णपणे अनपेक्षित नव्हती. बवाज रूथची विनंती मान्य करण्यास तयार होतो.
रूथच्या बोलण्यातून कदाचित काळजीचा स्वर निघाल्यामुळे बवाजने तिला असे आश्वासन दिले: “मुली, भिऊ नको, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करितो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस.”—रूथ ३:११.
बवाजने रूथची कार्ये पूर्णपणे निर्मळ समजली हे त्याच्या पुढील शब्दांवरून माहीत होते: “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखविलास.” (रूथ ३:१०) पहिल्या खेपेस रूथने नामीला प्रेमळ-दया अथवा एकनिष्ठ प्रीती दाखवली. दुसऱ्या खेपेस तिने निःस्वार्थीपणे, तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या बवाजाला आपली ओळख करून दिली; कारण त्याला वतन सोडवण्याचा हक्क होता. आपला मृत पती महलोन आणि नामी यांचा वंश पुढे चालवण्यासाठी ती संतानाला जन्म देण्यास तयार होती.
वतन सोडवण्याचा हक्क असलेला मागे हटतो
दुसऱ्या दिवशी सकाळी बवाज, नामीच्या नात्यात येणाऱ्या त्याच्यापेक्षा एका जवळच्या नातेवाईकाला बोलावतो; याला तो ‘गृहस्थ’ असे संबोधतो. लोकांसमोर आणि वडील जनांसमोर बवाज म्हणतो: ‘आपला पती अलीमलेख याच्या शेताचा वतनभाग नामी विकत आहे, तर मला वाटते की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि तू ती जमीन खरेदी करावी.’ बवाज पुढे म्हणतो: ‘तुला ती सोडवावयाची असली तर सोडीव. नाही तर मी ती सोडवितो.’ यावर तो गृहस्थ आपण सोडवू असे म्हणतो.—रूथ ४:१-४.
पण बवाज आणखी पुढे काय म्हणतो हे ऐकून या गृहस्थाला आश्चर्य वाटणार होते. सर्व साक्षीदारांसमोर बवाज म्हणतो: “ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत रूथ ४:५, ६.
घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनहि ती तुला विकत घ्यावी लागेल; यासाठी की मयताचे नाव त्या वतनाला कायम राहावे.” आपल्या वतनाचा बिघाड होईल या भीतीने हा गृहस्थ वतन सोडवून आणण्याच्या हक्कापासून मागे हटतो आणि म्हणतो: “माझ्याने ते सोडववत नाही.”—रीतीरिवाजानुसार, नकार देणाऱ्या मनुष्याला आपले पायतण काढून ते दुसऱ्यास द्यावे लागत असे. म्हणून हा गृहस्थ बवाजाला “तूच ते वतन संपादन करून घे” असे म्हणून आपले पायतण काढू लागतो. तेव्हा बवाज वडील जनांना आणि सर्व लोकांना म्हणतो: “आज तुम्ही साक्षी आहा की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्योन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे; ते यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे. . . . याविषयी तुम्ही आज साक्षी आहा.”—रूथ ४:७-१०.
तेव्हा वेशीतले सर्व लोक बवाजास म्हणतात: “ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेआ यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी प्रख्याती होवो.”—रूथ ४:११, १२.
लोकांचे आशीर्वाद मिळवून बवाज रूथला आपली पत्नी म्हणून स्वीकारतो. तिला मग ओबेद नावाचा एक पुत्र होतो आणि अशाप्रकारे रूथ व बवाज राजा दावीदाचे आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताचे पूर्वज बनतात.—रूथ ४:१३-१७; मत्तय १:५, ६, १६.
“पुरे पारितोषिक”
या संपूर्ण अहवालात, म्हणजे कामकऱ्यांना सकाळी केलेल्या प्रेमळ नमस्कारापासून अलीमलेखाच्या कुळाचे नाव वतनात ठेवण्याची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंत बवाज एक उल्लेखनीय मनुष्य ठरतो—तो कार्य करणाऱ्या व अधिकार असलेल्या मनुष्यासारखा वागतो. त्याचबरोबर तो आत्म-संयम बाळगणारा, विश्वास आणि एकनिष्ठा दाखवणारा देखील होता. तो उदार, दयाळू, नैतिकरीत्या शुद्ध आणि यहोवाच्या सर्व आज्ञांचे पालन करणारा देखील होता.
यहोवाबद्दलचे प्रेम, नामीशी एकनिष्ठता, कामासूपणा व नम्रता या सर्व गुणांमुळे रूथ उल्लेखनीय ठरते. म्हणूनच तर लोक तिला “सद्गुणी स्त्री” म्हणून ओळखायचे. ती “आळशी बसून अन्न खात” नसे; तिच्या कष्टामुळेच ती आपली सासू नामी हिची देखभाल करू शकली. (नीतिसूत्रे ३१:२७, ३१) नामीला सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आहे ही जाणीव असल्यामुळे रूथला देण्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव घेता आला असावा.—प्रेषितांची कृत्ये २०:३५; १ तीमथ्य ५:४, ८.
रूथच्या पुस्तकात किती उत्तम उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात! यहोवा देखील नामीची आठवण करतो. येशू ख्रिस्ताची पूर्वज म्हणून रूथला तिचे “पुरे पारितोषिक” मिळते. बवाजाला एक “सद्गुणी स्त्री” लाभते. आणि आपल्या सर्वांसाठी विश्वासाची ही उत्तम उदाहरणे मिळतात!
[२६ पानांवरील चौकट]
आशेचा किरण
आपण एका निराश काळात जगत आहोत असे तुम्हाला वाटत असेल तर रूथच्या कहाणीवरून तुम्हाला आशेचा एक किरण मिळू शकतो. शास्ते या पुस्तकाचा हा एक महत्त्वपूर्ण समारोप असल्याचे सहजपणे जाणवते. रूथच्या पुस्तकातून आपल्याला कळते, की यहोवाने आपल्या लोकांसाठी एक राजा नेमण्यासाठी मवाब या विदेशी राष्ट्रातून एका नम्र विधवेचा उपयोग केला. शास्ते या पुस्तकाच्या पार्श्वभूमीत रूथचा विश्वास त्या काळातील प्रकाशासारखा चमकतो.
रूथची कहाणी वाचल्यावर तुम्हाला हे आश्वासन मिळू शकते, की कितीही बिकट काळ असो, देव नेहमी आपल्या लोकांची काळजी घेतो आणि आपले उद्देश पूर्ण करतो.