व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रचार कार्याची अविस्मरणीय मोहीम

प्रचार कार्याची अविस्मरणीय मोहीम

प्रचार कार्याची अविस्मरणीय मोहीम

“सूर्य तळपत होता. डोंगरांमधले चढण काही संपत नव्हते. एकामागोमाग एक अडखळणे पार करून आम्ही शेवटी आमच्या निर्धारित ठिकाणी येऊन पोचलो; हे सर्वात दूरवरचे गाव होते. पहिल्याच घराचे दार आम्ही वाजवले आणि तेथे आमचे स्वागत करण्यात आले तेव्हा आमचा थकवा गायब होऊन आम्हाला आनंद झाला. संध्याकाळपर्यंत आम्ही आणलेले सर्व साहित्य संपले होते आणि आम्ही कित्येक बायबल अभ्यास सुरू केले होते. लोक शिकण्यास उत्सुक होते. आम्हाला आता जाणे भाग होते पण आम्ही परत येऊ असे आम्ही लोकांना वचन दिले.”

मेक्सिकोतील पायनियर सेवकांच्या एका गटाला असे अनुभव नेहमी येतात. “पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल” या येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलेल्या कामगिरीची पूर्णता करण्यामध्ये आवेशाने सहभागी होण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे. (प्रेषितांची कृत्ये १:८) मेक्सिकोत, जी क्षेत्रे कोणत्याही मंडळीला नेमलेली नाहीत व यामुळे ज्यांना नियमितरित्या देवाच्या राज्याची सुवार्ता ऐकायला मिळत नाही अशा क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी खास प्रचाराच्या मोहिमा आयोजित केल्या जातात; यांना पायनियर रूट म्हटले जाते. सहसा ही क्षेत्रे दूरवर वसलेली किंवा पोहंचायला कठीण असलेली क्षेत्रे असतात. विस्तारित क्षेत्र असलेल्या एकाकी मंडळ्यांनाही मदत केली जाते.

पायनियर रूटमध्ये देशांतील कोणते भाग पूर्ण केले जावेत हे ठरवण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांचे शाखा दफ्तर त्या क्षेत्राच्या गरजांची आधी तपासणी करते. * हे झाल्यावर, खास पायनियरांच्या गटांना क्षेत्र पूर्ण करण्यासाठी नेमले जाते. अशा क्षेत्रांपर्यंत पोहंचणाऱ्‍या ओबडधोबड, कच्च्या रस्त्यांकरता साजेशी वाहने त्यांना दिली जातात. आवश्‍यकता पडल्यास, ही वाहने साहित्याची गुदामे आणि झोपण्याच्या खोल्यांचीही कामे करतात.

तत्परतेने प्रतिसाद

ऑक्टोबर १९९६ पासून, खास पायनियरांसोबत या कार्यात भाग घेण्यासाठी सुवार्तेच्या इतर प्रचारकांना आमंत्रण देण्यात आले. अधिक गरज असलेल्या ठिकाणी कार्य करण्यास उत्सुक असलेले राज्य प्रचारक त्याचप्रमाणे नियमित पायनियर वेगवेगळ्या वेळी मोहिमेत भाग घेतात. काहींना रूटमध्ये असलेल्या मंडळ्यांना नेमण्यात आले आहे जेणेकरून ते क्षेत्राचे कार्य पाहू शकतात आणि लोकांमध्ये आस्था निर्माण करू शकतात. अनेक तरुण प्रचारकांनी व पायनियरांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे आणि त्यांना अनेक प्रोत्साहनदायक अनुभव देखील आले आहेत.

उदाहरणार्थ, एका मोबाईल फोन कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्‍या अबीमाएल नामक एका तरुण ख्रिश्‍चनाने अशा एकाकी भागांमध्ये प्रचाराच्या कार्यात भाग घेण्याचा निर्णय घेतला. तो नोकरी सोडण्याचा विचार करत आहे हे त्याच्या मालकांना कळले तेव्हा त्यांनी त्याला प्रोमोशन देऊ केले आणि पगारही वाढवून देऊ असे म्हटले. त्याच्या सहकामगारांनी त्याला म्हटले, ही अनोखी संधी गमावू नकोस; ती नाकारशील तर मूर्खपणा होईल. परंतु, खास प्रचाराच्या मोहिमेत तीन महिन्यांकरता सहभाग घेण्याचा अबीमाएलने पक्का निश्‍चय केला होता. या सेवेचा आनंद लुटल्यावर, अबीमाएलने राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या एका एकाकी मंडळीत अनिश्‍चित कालावधीपर्यंत राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याच्याजवळ एक बऱ्‍यापैकी नोकरी आहे आणि साधेसुधे जीवन जगण्यास तो शिकला आहे.

दुसऱ्‍या एका प्रकरणात, कुलीसाला आपल्या नेमलेल्या क्षेत्रात पोहंचायला २२ तास बसने प्रवास करावा लागत असे. शेवटल्या खेपेला त्या दिवसाकरता असलेली तिची शेवटची बस चुकली. परंतु, कामगारांची ने-आण करणारा एक पिक-अप ट्रक होता. कुलीसाने धैर्य एकवटून तिला त्यांच्यासोबत नेण्याची विनंती केली. तिला भीती वाटणे साहजिक होते कारण सर्व पुरुषांमध्ये ती एकटीच स्त्री होती. ती एका तरुणाला प्रचार करू लागली तेव्हा तिला कळले की तोही एक यहोवाचा साक्षीदार आहे! कुलीसा आठवून सांगते, “शिवाय, पिक-अप ट्रकचा ड्रायव्हर, तिला नेमलेल्या मंडळीचे वडील होते!”

वृद्ध जनांचा सहभाग

परंतु, हे कार्य केवळ तरुणांकरता नाही. एथेला नावाच्या एका वयस्क बहिणीला प्रचार कार्यात जास्त वेळ घालवण्याची खूप इच्छा होती. या खास प्रचार कार्यात भाग घेण्याचे आमंत्रण तिला मिळाले तेव्हा तिला ही संधी प्राप्त झाली. ती म्हणते: “मला ही नेमणूक इतकी आवडली की, माझ्या मंडळीतल्या वडिलांना मी अनिश्‍चित कालावधीसाठी मला तेथेच राहू देण्याची विनंती केली. मला आनंद वाटतो कारण मी वयस्क असले तरीसुद्धा यहोवा माझा उपयोग करून घेत आहे.”

अशाचप्रकारे, यहोवाबद्दल कृतज्ञता आणि शेजाऱ्‍याप्रती प्रेम यांनी प्रेरित होऊन ६० वर्षांच्या मार्ताने मोहिमेत सहभागी होण्यास स्वतःला उपलब्ध केले. दूरदूरचा प्रवास आणि क्षेत्रापर्यंतचा मार्ग खडतर असल्यामुळे सर्व लोकांपर्यंत पोहंचणे तिच्या गटाला कठीण जात होते हे पाहिल्यावर तिने पायनियरांकरता एक कार विकत घेतली. या बहिणीच्या हातभारामुळे अधिक क्षेत्रात कार्य करणे आणि अधिक लोकांना बायबलचे सत्य सांगणे शक्य झाले.

आनंदविणारा प्रतिसाद

प्रचाराच्या या खास मोहिमांमध्ये भाग घेणाऱ्‍यांचे ध्येय, “शिष्य बनवणे” हे आहे. या बाबतीत, उत्तम परिणाम लाभले आहेत. दूरच्या क्षेत्रात राहणाऱ्‍यांना बायबलमधील जीवन वाचवणारी सत्ये प्राप्त झाली आहेत. (मत्तय २८:१९, २०) अनेक बायबल अभ्यास स्थापित करण्यात आले आहेत. ते अभ्यास, त्या भागातील प्रचारक किंवा क्षेत्रात राहिलेले सुवार्तिक चालवत आहेत. काही ठिकाणी, प्रचारकांचे गट बनवण्यात आले आहेत आणि इतर ठिकाणी तर लहान मंडळ्या देखील स्थापित करण्यात आल्या आहेत.

मॅग्डालेनो आणि त्याच्या साथीदारांना आपल्या नेमलेल्या दूरवरच्या क्षेत्रात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा लागला. जाताना, त्यांनी चालकाला प्रचार करण्याची संधी दवडली नाही. “या माणसाने आम्हाला सांगितले की, मागच्या आठवडी तो घरात नसताना काही साक्षीदार त्याच्या घरी आले होते. तो घरी आल्यावर त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी त्याला साक्षीदारांनी सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या. आम्ही जवळपासच्या ठिकाणांहून नव्हे तर देशातल्या विविध राज्यातून या खास प्रचाराच्या मोहिमेत भाग घेण्यासाठी आलो आहोत आणि आमच्यातील प्रत्येकाने आपापला खर्च दिला आहे असे आम्ही त्याला सांगितले. हे ऐकून तो चालक प्रभावित झाला आणि त्याच आठवडी तो आपल्या कुटुंबासोबत बायबलचा अभ्यास सुरू करेल असे म्हणाला. प्रवासाचा खर्च आमच्याकडून न घेता त्यानेही या कार्यात योगदान दिले.”

चिआपास पर्वतांमध्ये राहणाऱ्‍या मूळच्या रहिवाशांनी कसा प्रतिसाद दिला हे पाहून मॅग्डालेनो खूप प्रभावित झाला. “मला व माझ्या पत्नीला २६ तरुणांच्या एका गटाला राज्याचा संदेश सांगण्याचा सुहक्क मिळाला; ते प्रेसबिटेरियन चर्चला जात होते. त्या सगळ्यांनी ३० मिनिटे शांत बसून आमचे बोलणे ऐकले. त्यांनी आपापले बायबल आणले आणि आम्ही त्यांना यहोवाच्या उद्देशांविषयी अगदी सविस्तर सांगू शकलो. बहुतांश लोकांजवळ त्झेलतॉल भाषेत स्वतःचे बायबल आहे.” अनेक प्रगतीशील बायबल अभ्यास सुरू करण्यात आले.

विरोध निवळतो

चिआपास येथील काही लोकांकडून विरोध झाल्यामुळे एका विशिष्ट समाजाला दोन वर्षांहून अधिक काळापर्यंत बायबल संदेश ऐकवण्यात आला नव्हता. पूर्ण-वेळेची सुवार्तिक असलेल्या टेरेसाने पाहिले की, काही साक्षीदारांना त्या गावात प्रचार करायची भीती वाटत होती. “आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, तेथील लोक ऐकायला तयार होते. प्रचार करून झाल्यावर मुसळधार पाऊस पडू लागला. आडोसा शोधत असताना, सबास्टियन नावाच्या एका मैत्रिपूर्ण गृहस्थाच्या आम्ही घरी गेलो आणि त्याने आम्हाला पावसापासून आसरा देण्यासाठी घरात घेतले. आत गेल्यावर, मी त्याला विचारले, तुम्हाला कोणी भेट दिली आहे का? त्याने नाही म्हटल्यावर, मी त्याला साक्ष द्यायला सुरवात केली आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान * या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू केला. आमचा अभ्यास संपल्यावर, सबास्टियनचे डोळे भरून आले आणि त्याने आम्हाला पुन्हा त्याचा अभ्यास घ्यायला येण्यासाठी विनंती केली.”

चिआपासला गेलेल्या आणखी एका पायनियरांच्या गटाने असा अहवाल दिला: “यहोवाच्या आशीर्वादामुळे आम्हाला चांगले परिणाम मिळाले. पहिल्या आठवड्यात आम्ही २७ अभ्यास सुरू केले; दुसऱ्‍या आठवडी, आम्ही लोकांना, द बायबल—इट्‌स पावर इन युवर लाईफ हा व्हिडिओ पाहायला आमंत्रित केले. त्यासाठी साठ लोक जमले होते. सर्वांना तो फार आवडला. शेवटी, आम्ही त्यांना एका गटासोबत बायबल अभ्यास करण्याविषयी सांगितले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, या गावात दोन अभ्यास गट तयार करण्यात आले.

नेमलेल्या क्षेत्रांमध्ये काम करून झाल्यावर, गावात आस्था दाखवलेल्यांना अधिक उत्तेजन देण्यासाठी व आयोजित केलेले बायबल अभ्यासाचे गट कसे चालले आहेत हे पाहण्यासाठी आम्ही परत गेलो. आम्ही त्यांना जाहीर सभा आणि टेहळणी बुरूज अभ्यासाकरता आमंत्रण दिले. या सभा भरवण्यासाठी मात्र कोठेही इतकी मोठी जागा नव्हती. एका अभ्यास गटासाठी ज्याने आपले घर दिले होते त्याने घरामागील अंगण दाखवून म्हटले: ‘तुम्ही या अंगणात सभा भरवा.’

त्या आठवड्याच्या शनिवारी-रविवारी भेट देणारे पायनियर तसेच आस्थेवाईक लोक यांनी सभेसाठी अंगण तयार करायला उत्साहाने हातभार लावला. पहिल्या सभेला १०३ जण उपस्थित होते. सध्या त्या गावात ४० बायबल अभ्यास चालवले जात आहेत.

“अनोखा अनुभव”

प्रचार कार्यात उत्तम परिणाम मिळण्याव्यतिरिक्‍त, या सुवार्तेच्या कार्यात गोवलेल्यांना स्वतःच पुष्कळ लाभ मिळाला आहे. मारिया नावाची एक तरुण पायनियर, अशा या मोहिमेत सहभागी झाली होती; ती आपल्या भावना अशाप्रकारे व्यक्‍त करते: “दोन कारणांसाठी हा एक अनोखा अनुभव होता. प्रचार कार्यामधला माझा आनंद द्विगुणित झाला आणि यहोवासोबत माझा नातेसंबंध अधिक घनिष्ठ झाला. एकदा, डोंगर चढत असताना आम्ही खूप थकून गेलो होतो. पण यहोवाकडे मदत मागितल्यावर, आम्हाला यशया ४०:२९-३१ मधील या शब्दांचा प्रत्यय आला: ‘परमेश्‍वराची आशा धरून राहणारे नवीन शक्‍ति संपादन करितील.’ आम्ही तेथे पोहंचलो आणि ज्यांनी आमचे स्वागत केले त्यांच्याशी अभ्यास सुरू केला.”

आणखी एक १७ वर्षांची तरुण पायनियर म्हणते: “मला तर खूपच फायदा झाला. मला सेवेत अधिक कुशल असायला शिकायला मिळाले आणि यामुळे मला बराच आनंद मिळाला आहे व आध्यात्मिक ध्येये समोर ठेवायला मदत मिळाली आहे. शिवाय मी आध्यात्मिकरित्या अधिक प्रौढही बनले आहे. घरी माझी आईच मला सर्व करून द्यायची. आता, मला जास्त अनुभव मिळाल्यामुळे मी अधिक जबाबदार झाले आहे. उदाहरणार्थ, खाण्याच्या बाबतीत माझे फार नखरे असायचे. पण आता वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्याची मला सवय झाल्यामुळे मी जेवणाबद्दल कधी तक्रार करत नाही. या सेवेमुळे चांगले मैत्रीचे संबंध देखील करता आले आहेत. आम्ही आपापसांत सगळे काही वाटून घेतो आणि एकमेकांना मदत करत असतो.”

आनंदपूर्ण कापणी

या खास प्रयत्नाचे काय परिणाम मिळाले आहेत? २००२ सालाच्या सुरवातीपर्यंत या पायनियर रूटमध्ये २८,३०० पायनियरांनी सहभाग घेतला होता. त्यांनी १,४०,००० बायबल अभ्यास चालवले होते आणि प्रचार कार्यात २० लाखांहून अधिक तास खर्च केले होते. लोकांना बायबलचे सत्य शिकवण्यासाठी त्यांनी जवळजवळ १,२१,००० पुस्तकांचे आणि सुमारे ७,३०,००० मासिकांचे वाटप केले होते. काही पायनियरांकडे २० किंवा त्याहून अधिक बायबल अभ्यास असणे ही अगदी सामान्य बाब होती.

हा अनुग्रह प्राप्त केलेल्यांनी त्यांच्यापर्यंत बायबलचा हा संदेश पोचवण्यासाठी खास प्रयत्न करण्यात आला म्हणून मनापासून कृतज्ञता व्यक्‍त केली. गरीब असूनही बहुतेकांनी त्यांच्याकडून अनुदान स्वीकारण्यासाठी प्रचारकांना गळ घातली. ७० वर्षांची एक गरजू स्त्री नेहमी तिला भेट द्यायला येणाऱ्‍या पायनियरांना काहीतरी देत असते. त्यांनी घेण्यास नकार दिला तर तिच्या डोळ्यात अश्रू येतात. एक गरीब कुटुंब पूर्ण-वेळेच्या सुवार्तिकांना म्हणते की, त्यांच्या कोंबडीने खास त्यांच्यासाठी अंडी घातली आहेत म्हणून त्यांनी ती अंडी स्वीकारावीत.

पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे प्रांजळ लोक आध्यात्मिक गोष्टींना महत्त्वाचे समजतात. उदाहरणार्थ, एक तरुण स्त्री ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासाठी एकटीच साडे तीन तास चालत येते, पण एकही सभा ती चुकवत नाही. आस्थेवाईक असलेल्या एका वयस्क स्त्रीचे गुडघे दुखत असतानाही प्रवासी पर्यवेक्षकांची भेट होत असताना बायबलमधून शिक्षण प्राप्त करण्यासाठी ती दोन तासांचा प्रवास करून आली होती. निरक्षर असलेल्या काहींना बायबल शिक्षणाचा अधिक लाभ घेता यावा म्हणून लिहिणे-वाचणे शिकायचे होते. या सर्वांच्या प्रयत्नांना भरभरून आशीर्वाद प्राप्त झाला आहे.

प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात, प्रेषित पौलाला झालेल्या एका दृष्टान्ताचे लूक वर्णन करतो: “मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर.” पौलाने लगेच त्यानुसार केले. आज, मेक्सिकोच्या आंतरिक भागांमध्ये अनेकांनी हाच आत्मा दाखवला आहे; त्यांनी “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” सुवार्तेची घोषणा करण्यासाठी स्वतःला उपलब्ध केले आहे.—प्रेषितांची कृत्ये १:८; १६:९, १०.

[तळटीपा]

^ परि. 4 एका अलीकडील वर्षात, मेक्सिकोतील ८ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांचे नियमित कार्य होत नव्हते. याचा अर्थ, प्रचार कार्य सीमित असलेल्या अशा एकाकी ठिकाणी ८२,००,००० पेक्षा अधिक लोक राहत होते.

^ परि. 17 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[९ पानांवरील चित्र]

अनेक मेक्सिकन साक्षीदारांनी प्रचाराच्या खास मोहिमांमध्ये भाग घेतला आहे