तरुणांनो—यहोवा तुमचे कार्य विसरणार नाही!
तरुणांनो—यहोवा तुमचे कार्य विसरणार नाही!
“तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.
१. इब्री लोकांस लिहिलेले पत्र आणि मलाखी या बायबलमधील पुस्तकांतून यहोवाला तुमच्या सेवेची कदर आहे हे कशाप्रकारे दिसून येते?
तुम्ही एखाद्या मित्रावर काहीतरी उपकार केला आणि त्याने एका शब्दानेही कृतज्ञता व्यक्त केली नाही असे कधी तुमच्यासोबत घडले आहे का? एखादी व्यक्ती आपल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही किंवा त्याहूनही वाईट म्हणजे त्याविषयी पूर्णपणे विसरून जाते तेव्हा साहजिकच आपले मन दुखावते. पण आपण यहोवाची पूर्ण मनाने सेवा करतो तेव्हा परिस्थिती किती वेगळी असते! बायबल म्हणते: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री लोकांस ६:१०) याचा काय अर्थ होतो याविषयी विचार करा. तुम्ही यहोवाची आजवर केलेली सेवा आणि सध्या तुम्ही त्याच्या सेवेत जे करत आहात ते विसरून जाणे हे यहोवाच्या नजरेत एक अन्यायाचे कृत्य—पाप आहे. किती हा कृतज्ञ देव!—मलाखी ३:१०.
२. यहोवाची सेवा करणे खरोखर एक बहुमान आहे असे का म्हणता येते?
२ कदर बाळगणाऱ्या या देवाची उपासना व सेवा करण्याचा बहुमान तुम्हाला मिळाला आहे. जगातील ६०० कोटी लोकांच्या तुलनेत तुमच्यासोबत यहोवाची सेवा करणारे केवळ ६० लाख उपासक आहेत, त्याअर्थी हा बहुमान खरोखरच अत्यंत मोलवान आहे. शिवाय, तुम्ही सुवार्तेच्या संदेशाकडे लक्ष देऊन त्याला प्रतिसाद देत आहात हा देखील एक पुरावा आहे की यहोवाला तुमच्याबद्दल वैयक्तिक आस्था आहे. म्हणूनच तर येशूने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) होय, ख्रिस्ताच्या बलिदानाचा फायदा उचलण्याकरता यहोवा वैयक्तिकरित्या लोकांना मदत करतो.
तुम्हाला मिळालेल्या बहुमानाची कदर करणे
३. कोरहच्या पुत्रांनी यहोवाची सेवा करण्याच्या बहुमानाविषयी कदर कशाप्रकारे व्यक्त केली?
३ याआधीच्या लेखांत चर्चा केल्याप्रमाणे, यहोवाचे हृदय आनंदित करण्याचा वैयक्तिक बहुमान तुम्हाला लाभला आहे. (नीतिसूत्रे २७:११) हा बहुमान तुम्ही कधीही क्षुल्लक लेखता कामा नये. आपल्या एका देवप्रेरित स्तोत्रांत कोरहपुत्रांनी यहोवाची सेवा करण्याच्या विशेषाधिकाराबद्दल कदर व्यक्त केली. त्यांनी म्हटले: “तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूंत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते.”—स्तोत्र ८४:१०.
४. (अ) काहींना यहोवाची उपासना स्वातंत्र्यावर आळा घालणारी आहे असे का वाटू शकते? (ब) आपल्या सेवकांच्या विश्वासूपणाची दखल घेऊन त्यांना प्रतिफळ देण्यास आपण उत्सुक आहोत हे यहोवा कसे दाखवतो?
४ तुमचा स्वर्गीय पिता यहोवा याची सेवा करण्याच्या विशेषाधिकाराबद्दल तुमच्याही अशाच भावना आहेत का? कधीकधी मात्र यहोवाची उपासना आपल्या स्वातंत्र्यावर आळा घालते, असे वाटू शकते. बायबलच्या तत्त्वांनुसार आचरण करण्याकरता काही प्रमाणात आत्मत्याग करावा लागतो हे खरे आहे. पण शेवटी, यहोवा तुमच्याकडून जे काही अपेक्षितो ते तुमच्या भल्याकरताच आहे. (स्तोत्र १:१-३) शिवाय, तुम्ही केलेल्या प्रयत्नांची यहोवा दखल घेतो आणि तुमच्या विश्वासूपणाची त्याला कदर आहे हे प्रदर्शित करतो. म्हणूनच पौलानेही लिहिले की यहोवाचा “शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) असे करण्याकरता यहोवा संधी शोधतो. प्राचीन इस्राएलातील एका नीतिमान संदेष्ट्याने म्हटले: “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.”—२ इतिहास १६:९.
५. (अ) तुमचे हृदय यहोवाला पूर्णपणे समर्पित आहे हे दाखवण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे? (ब) आपल्या धार्मिक विश्वासांबद्दल इतरांना सांगणे कठीण का वाटू शकते?
५ तुमचे अंतःकरण पूर्णपणे यहोवाला समर्पित आहे हे दाखवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे इतरांना त्याच्याविषयी सांगणे. तुमच्या वर्गसोबत्यांना साक्ष देण्याची संधी कधी योहान १५:२०) पण, याचा अर्थ तुम्हाला सतत केवळ उपहास आणि तिरस्कार सहन करावा लागेल असे समजू नका. उलट, अनेक साक्षीदार तरुणांना त्यांच्या शाळेत राज्याचा संदेश ऐकून घेणारे सापडले आहेत; इतकेच काय तर, स्वतःच्या धार्मिक विश्वासांना खंबीरपणे जडून राहिल्यामुळे त्यांचे सोबती त्यांचा अधिकच आदर करू लागले आहेत.
तुम्हाला मिळाली का? सुरवातीला तुम्हाला भीती वाटेल, किंबहुना आपल्या मित्रांशी याविषयावर बोलण्याच्या विचारानेही तुम्ही घाबरून जाल. ‘ते आपल्यावर हसले तर? काय विचित्र धर्म आहे असा त्यांनी विचार केला तर?’ अशाप्रकारचे विचार तुमच्या मनात येतील. राज्याचा संदेश सर्वजण ऐकून घेणार नाहीत हे येशूनेही मान्य केले होते. (‘यहोवा तुमचे साहाय्य करील’
६, ७. (अ) सतरा वर्षांच्या एका मुलीला तिच्या वर्गसोबत्यांना कशाप्रकारे साक्ष देता आली? (ब) जेनिफरच्या उदाहरणावरून तुम्हाला काय शिकायला मिळते?
६ तुमच्या विश्वासाबद्दल इतरांना सांगण्याचे धैर्य तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकता? तुम्हाला तुमच्या धर्माविषयी विचारले जाते, तेव्हा प्रामाणिक आणि स्पष्ट उत्तर देण्याचा निर्धार करा. १७ वर्षीय जेनिफरचे उदाहरण पाहा. ती सांगते, “शाळेत जेवणाच्या सुटीत माझ्यासोबत बसलेल्या मुली धर्माविषयी चर्चा करत होत्या. एका मुलीने माझा धर्म कोणता असे विचारले.” जेनिफरला या प्रश्नाचे उत्तर द्यायला भीती वाटली का? ती कबूल करते, “हो, क्षणभर मी घाबरले कारण त्यांची काय प्रतिक्रिया असेल याची मला काळजी होती.” मग जेनिफरने काय केले? “मी त्यांना सांगितले की मी यहोवाची साक्षीदार आहे.” ती पुढे सांगते, “सुरवातीला त्यांना आश्चर्य वाटले. कारण यहोवाचे साक्षीदार म्हणजे विचित्र लोक असा त्यांचा ग्रह होता. त्यामुळे त्यांनी मला अनेक प्रश्न विचारायला सुरवात केली आणि मी त्यांचे अनेक गैरसमज दूर करू शकले. त्या दिवसानंतरही काही मुली अधूनमधून माझ्याजवळ येऊन प्रश्न विचारायच्या.”
७ आपल्या विश्वासांबद्दल सांगण्याच्या संधीचा फायदा उचलल्याबद्दल जेनिफरला पस्तावा होतो का? मुळीच नाही! ती म्हणते, “दुपारची सुटी संपल्यावर त्या दिवशी मला खूप बरे वाटले. आता त्या सर्व मुलींना यहोवाचे साक्षीदार खरोखर कशाप्रकारचे लोक आहेत याची कल्पना आली होती.” जेनिफर इतर तरुणांना हा साधा सोपा सल्ला देते: “वर्गसोबत्यांना किंवा शिक्षकांना साक्ष देणे तुम्हाला कठीण वाटत असेल, तर लगेच प्रार्थना करा. यहोवा तुम्हाला मदत करेल. आणि साक्ष देण्याच्या संधीचा फायदा उचलल्याबद्दल तुम्हाला आनंद वाटेल.”—१ पेत्र ३:१५.
८. (अ) एका अनपेक्षित प्रसंगी प्रार्थनेमुळे नहेम्याला कोणती मदत मिळाली? (ब) शाळेत असे कोणते प्रसंग येऊ शकतात जेव्हा तुम्हाला मनातल्या मनात लहानशी प्रार्थना करावी लागू शकते?
८ आपल्या विश्वासाबद्दल साक्ष देण्याची संधी येते तेव्हा यहोवाला ‘लगेच प्रार्थना करण्याचा’ जेनिफरने सल्ला दिला. पर्शियन राजा अर्तहशश्त याचा प्यालेबरदार नहेम्या यानेही एका अनपेक्षित प्रसंगी असेच केले. यहुद्यांच्या दैनावस्थेची तसेच जेरूसलेमचा तट व फाटके भग्नावस्थेत असल्याची खबर मिळाल्यापासून नहेम्या अत्यंत खेदित होता आणि त्याचे यामुळे तोंडही उतरले होते. नहेम्या काळजीत असल्याचे राजाने ताडले आणि त्याने नहेम्याला याचे कारण विचारले. उत्तर देण्याआधी नहेम्याने मार्गदर्शनाकरता प्रार्थना केली. मग त्याने शहराची पुनर्बांधणी करण्यात हातभार लावण्याकरता जेरूसलेमला परतण्याची धैर्यपूर्वक विनंती केली. अर्तहशश्ताने नहेम्याची विनंती मान्य केली. (नहेम्या २:१-८) यातून आपण काय शिकतो? तुमच्या विश्वासासंबंधी साक्ष देण्याची संधी येते तेव्हा भीती वाटल्यास, मनातल्या मनात प्रार्थना करण्याच्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. पेत्राने लिहिले: “[यहोवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७; स्तोत्र ५५:२२.
“उत्तर देण्यास सिद्ध असा”
९. तेरा वर्षांच्या लियाला तरुणांचे प्रश्न या पुस्तकाच्या २३ प्रती कशाप्रकारे देता आल्या?
९ दुसरा अनुभव विचारात घ्या. १३ वर्षांची लिया शाळेत जेवणाच्या सुटीत तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे * हे पुस्तक वाचत होती. ती म्हणते, “इतरजण मला पाहात होते, आणि काही वेळानंतर कित्येक मुली माझ्यामागे येऊन उभ्या राहिल्या व मी वाचत असलेल्या पुस्तकाकडे पाहू लागल्या. हे पुस्तक कशाविषयी आहे असे त्या सर्वजणी मला विचारू लागल्या.” त्याच दिवशी चार मुलींनी लियाला तरुणांचे प्रश्न या पुस्तकाची एकेक प्रत मिळण्याची विनंती केली. लवकरच या मुली इतर मुलींनाही हे पुस्तक देऊ लागल्या आणि मग त्या मुलींनीही स्वतःकरता या पुस्तकाची प्रत मागितली. पुढच्या काही आठवड्यांत, लियाने आपल्या शाळेतील सोबती व त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये एकूण २३ प्रतींचे वाटप केले. लियाला ती कोणते पुस्तक वाचत होती असे विचारण्यात आले तेव्हा तिला त्याविषयी सांगणे सोपे गेले का? निश्चितच नाही. ती कबूल करते, “सुरवातीला मला भीती वाटली, पण मी प्रार्थना केली आणि मला खात्री होती की यहोवा माझ्यासोबत आहे.”
१०, ११. एका लहान इस्राएली मुलीने एका अरामी सेनापतीला यहोवाबद्दल जाणून घेण्यास कशी मदत केली आणि त्याने त्यानंतर कोणते बदल केले?
१० लियाच्या अनुभवावरून कदाचित तुम्हाला एका लहान इस्राएली मुलीच्या परिस्थितीची आठवण झाली असेल, जिला अरामास बंदिवान म्हणून नेण्यात आले होते. नामान नावाचा एक अरामी सेनापती कोडी होता. कदाचित त्याच्या पत्नीने या लहान मुलीसोबत संभाषण सुरू केल्यामुळे तिला आपल्या विश्वासाबद्दल सांगण्याची प्रेरणा मिळाली असावी. ती म्हणाली, “शोमरोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.”—२ राजे ५:१-३.
११ या लहान मुलीच्या धैर्यवान भूमिकेमुळे नामानाला कळले की “अखिल पृथ्वीत इस्राएलाबाहेर देव नाही.” त्याने निर्धार केला की तो “कोणत्याहि देवास होमबलि अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही.” (२ राजे ५:१५, १७) त्या लहान मुलीच्या धैर्यवान प्रयत्नावर यहोवाने आशीर्वाद दिला. आजही तो तरुण जनांना अशाचप्रकारे आशीर्वादित करू शकतो आणि अवश्य करील. लियाला याचा प्रत्यय आला. कालांतराने तिच्या शाळासोबत्यांपैकी काहींनी येऊन तिला सांगितले की तरुणांचे प्रश्न हे पुस्तक त्यांना योग्यप्रकारे वागण्यास मदत करत आहे. लिया म्हणते, “हे ऐकून मला आनंद झाला कारण आपण इतरांना यहोवाबद्दल अधिक जाणून घेण्यास आणि जीवनात बदल करण्यास मदत करत आहोत याची मला जाणीव होती.”
१२. आपल्या विश्वासाचे समर्थन करण्याकरता तुम्हाला कशाप्रकारे साहाय्य मिळू शकते?
१२ जेनिफर व लियासारखेच अनुभव तुम्हालाही येऊ शकतात. पेत्राच्या सल्ल्याचे पालन करा; त्याने लिहिले की एक ख्रिस्ती या नात्याने तुम्ही “तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) तुम्ही हे कसे करू शकता? पहिल्या शतकातील त्या ख्रिश्चनांचे अनुकरण करा ज्यांनी “पूर्ण धैर्याने” प्रचार करण्यास मदत करण्याकरता यहोवाकडे प्रार्थना केली. (प्रेषितांची कृत्ये ४:३०) त्यानंतर, इतरांशी आपल्या विश्वासांबद्दल धैर्याने बोला. तुम्हाला मिळणारे परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. शिवाय, तुम्ही यहोवाचे हृदय आनंदित कराल.
व्हिडिओ आणि खास प्रकल्प
१३. काही तरुणांनी साक्ष देण्याकरता कोणत्या संधींचा फायदा उचलला आहे? (पृष्ठे २० व २१ वरील पेट्या पाहा.)
१३ अनेक तरुणांनी व्हिडिओंच्या मदतीने शाळासोबत्यांना किंवा शिक्षकांना आपल्या विश्वासांविषयी समजावून सांगितले आहे. कधीकधी, शाळेत हाती घेतल्या जाणाऱ्या खास प्रकल्पांमुळे यहोवाची स्तुती करण्याची संधी मिळाल्याची उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार असलेल्या दोन १५ वर्षीय मुलांना जागतिक इतिहासाच्या वर्गात, जगातील विविध धर्मांपैकी कोणत्याही एका धर्माबद्दल एक रिपोर्ट लिहिण्याचे काम देण्यात आले. या दोघांनी यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) या पुस्तकातील माहितीचा आधार घेऊन यहोवाच्या साक्षीदारांविषयी रिपोर्ट लिहिण्याचे ठरवले. * यासोबत त्यांना पाच मिनिटांचा तोंडी रिपोर्टही द्यायचा होता. त्यांनी रिपोर्ट सादर केल्यानंतर त्यांच्या शिक्षकाला व विद्यार्थ्यांना इतके प्रश्न होते की या दोन मुलांना आणखी २० मिनिटे वर्गासमोर उभे राहावे लागले. यानंतर कित्येक आठवड्यांपर्यंत त्यांचे वर्गसोबती यहोवाच्या साक्षीदारांबद्दल प्रश्न विचारत होते!
१४, १५. (अ) मनुष्याची भीती एक पाश का ठरू शकते? (ब) तुम्ही इतरांना आपल्या विश्वासांबद्दल आत्मविश्वासाने का सांगू शकता?
१४ वरील अनुभवांवरून दिसून येते त्याप्रमाणे, यहोवाचे साक्षीदार या नात्याने तुमच्या धार्मिक विश्वासांबद्दल इतरांना सांगितल्याने अनेक आशीर्वाद मिळतात. मनुष्याच्या भीतीमुळे इतरांना यहोवाविषयी जाणून घेण्यास मदत करण्याचे विशेषाधिकार गमावू नका. बायबल म्हणते: “मनुष्याची भीति पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.”—नीतिसूत्रे २९:२५.
१५ आठवणीत ठेवा, एक ख्रिस्ती तरुण या नात्याने, तुमच्याजवळ असे काहीतरी आहे ज्याची तुमच्या सोबत्यांना अत्यंत गरज आहे—सध्याकरता सर्वात उत्तम अशी एक जीवनशैली आणि भविष्याकरता सार्वकालिक जीवनाची प्रतिज्ञा. (१ तीमथ्य ४:८) खास गोष्ट म्हणजे, अमेरिकेत लोकांना देवाधर्मात फारशी रूची नाही असे कदाचित तुम्हाला वाटत असेल, पण एका सर्वेक्षणानुसार असे दिसून आले की निम्मे तरुण धार्मिक बाबी अत्यंत गांभिर्याने घेतात आणि एक तृतीयांश तरुणांचे असे म्हणणे आहे की धार्मिक विश्वास, त्यांच्या जीवनातील “सर्वात महत्त्वाचा प्रभाव” आहे. जगातील इतर भागांतही हीच परिस्थिती असावी. याचा अर्थ तुमच्या शाळेतील सोबती बायबलविषयी तुमचे विचार ऐकून घेण्यास उत्सुक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या तारुण्यात यहोवाच्या जवळ या
१६. यहोवाला संतुष्ट करण्याकरता त्याच्याबद्दल इतरांना सांगण्याव्यतिरिक्त आणखी काय करणे आवश्यक आहे?
१६ अर्थात, यहोवाचे हृदय आनंदित करण्याकरता केवळ त्याच्याविषयी इतरांना सांगणे पुरेसे नाही. त्याच्या दर्जांनुसार आचरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) तुम्ही यहोवाच्या जवळ आल्यास तुम्हाला याचा प्रत्यय येईल. पण तुम्ही त्याच्या जवळ कसे येऊ शकता?
१७. तुम्ही कशाप्रकारे यहोवाच्या जवळ येऊ शकता?
१७ बायबल व बायबल आधारित प्रकाशनांचे वाचन करण्याकरता वेळ काढा. तुम्ही यहोवाबद्दल जितके अधिक जाणून घ्याल तितके तुम्हाला त्याच्या आज्ञा पाळणे आणि इतरांना त्याच्याविषयी सांगणे सोपे जाईल. “चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो; तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) तेव्हा, आपल्या मनात चांगल्या गोष्टी भरा. या संबंधी तुम्हाला काही ध्येये डोळ्यापुढे ठेवता येतील का? कदाचित येत्या आठवड्याच्या मंडळीच्या सभांकरता अधिक चांगली तयारी करण्यापासून तुम्ही सुरवात करू शकता. यानंतर तुम्ही लहानशी पण स्वतःच्या शब्दांत टिप्पणी देण्याचे ध्येय ठेवू शकता. अर्थात, जे तुम्ही शिकत आहात त्यानुसार वागणेही तितकेच महत्त्वाचे आहे.—फिलिप्पैकर ४:९.
१८. विरोध सहन करावा लागला तरीसुद्धा तुम्ही कशाविषयी खात्री बाळगू शकता?
१८ यहोवाची सेवा केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद दीर्घकालीन—नव्हे, सार्वकालिक आहेत. अधूनमधून तुम्हाला यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे थोडाफार विरोध किंवा उपहास सहन करावा लागू शकतो. पण मोशेचा विचार करा. बायबल म्हणते की “त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.” (इब्री लोकांस ११:२४-२६) तुम्ही देखील खात्री बाळगू शकता की यहोवाविषयी शिकून घेण्याकरता आणि त्याच्याविषयी इतरांना सांगण्याकरता तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे प्रतिफळ यहोवा अवश्य तुम्हाला देईल. ‘तुमचे कार्य व तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति’ तो कधीही विसरणार नाही.—इब्री लोकांस ६:१०.
[तळटीपा]
^ परि. 9 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
^ परि. 13 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
तुम्हाला आठवते का?
• यहोवा तुमच्या सेवेची कदर करतो याविषयी तुम्ही खातरी का बाळगू शकता?
• शाळेत साक्ष देण्याच्या कोणत्या पद्धती काहींनी यशस्वीपणे उपयोगात आणल्या आहेत?
• वर्गसोबत्यांना साक्ष देण्याकरता तुम्हाला कशामुळे साहाय्य मिळू शकते?
• तुम्ही यहोवाच्या जवळ कसे येऊ शकता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२० पानांवरील चौकट/चित्रे]
लहान बालकेही यहोवाची स्तुती करतात!
अद्याप किशोरावस्थेत न आलेल्या बालकांनीही शाळेत परिणामकारक रितीने साक्ष दिल्याची उदाहरणे आहेत. पुढील अनुभव विचारात घ्या.
पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षांच्या ॲम्बरच्या वर्गात दुसऱ्या महायुद्धादरम्यान नात्सींनी कशाप्रकारे यहुद्यांना छळले याविषयी एका पुस्तकाचे वाचन केले जात होते. ॲम्बरने जांभळे त्रिकोण (इंग्रजी) हा व्हिडिओ आपल्या शिक्षिकेला आणून देण्याचे ठरवले. यहोवाच्या साक्षीदारांनाही नात्सी अंमलाखाली छळले गेले हे जाणून ॲम्बरच्या शिक्षिकेला आश्चर्य वाटले. त्या शिक्षिकेने सबंध वर्गाला तो व्हिडिओ दाखवला.
आठ वर्षांची असताना अलेक्साने आपल्या वर्गाला एक पत्र लिहून आपण नाताळाच्या कार्यक्रमांत का भाग घेऊ शकणार नाही याविषयी समजावून सांगितले. तिच्या शिक्षिकेला अलेक्साचे इतके कौतुक वाटले की तिने अलेक्साला तिच्या स्वतःच्या वर्गात आणि आणखी दोन वर्गांत ते पत्र वाचून दाखवण्यास सांगितले! पत्राच्या शेवटी अलेक्साने लिहिले: “माझ्यापेक्षा वेगळे विश्वास असणाऱ्यांचा आदर करण्यास मला शिकवण्यात आले आहे आणि नाताळ साजरा न करण्याच्या माझ्या निर्णयाचा तुम्ही आदर करता याबद्दल मी तुमचे आभार मानते.”
पहिलीत गेल्यावर काही दिवसांनंतर एरिकने बायबल कथांचं माझं पुस्तक शाळेत नेले आणि आपल्या वर्गसोबत्यांना ते दाखवण्याची परवानगी मागितली. त्याच्या शिक्षिकेने म्हटले, “त्यापेक्षा, तूच वर्गाला यातली एखादी गोष्ट का नाही वाचून दाखवत?” एरिकेने मग एक गोष्ट वाचून दाखवली. यानंतर ज्या मुलांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी हात वर करावा अशी एरिकने विनंती केली. त्याच्या शिक्षिकेसहित अठरा जणांनी हात वर केला! एरिकच्या मते त्याला एक खास साक्षकार्याचे क्षेत्र मिळाले आहे.
नऊ वर्षांची व्हिट्नी यहोवाचे साक्षीदार व शिक्षण * (इंग्रजी) या माहितीपत्रकाबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. ती म्हणते: “दर वर्षी माझी आई माझ्या शिक्षकांना हे माहितीपत्रक आणून देत असते, पण या वर्षी हे काम मी स्वतःच केले. हे माहितीपत्रक वाचल्यानंतर माझ्या शिक्षिकेने मला ‘स्टूडंट ऑफ द वीक’ घोषित केले.”
[तळटीप]
^ परि. 56 येथे उल्लेख केलेली सर्व प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित आहेत.
[२१ पानांवरील चौकट/चित्रे]
आपल्या विश्वासाविषयी सांगण्याकरता काहींनी या प्रसंगांचा फायदा उचलला
शाळेत एखादा रिपोर्ट किंवा प्रकल्प तयार करण्याचे काम देण्यात आले तेव्हा काहींनी असा विषय निवडला, ज्यामुळे त्यांना साक्ष देण्याची संधी मिळाली
कित्येक तरुणांनी आपल्या शिक्षकांना वर्गात चर्चा केल्या जात असलेल्या विषयाशी संबंधित असलेला व्हिडिओ अथवा एखादे प्रकाशन दिले
जेवणाच्या सुटीत बायबल अथवा एखादे बायबल आधारित प्रकाशन वाचत असलेल्या कित्येक तरुणांना त्यांच्या वर्गसोबत्यांनी येऊन अनेक प्रश्न विचारले
[१८ पानांवरील चित्र]
अनुभवी लोक तरुणांना यहोवाची सेवा करण्यास मदत करू शकतात