व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरी धार्मिक मूल्ये तुम्हाला कोठे सापडू शकतील?

खरी धार्मिक मूल्ये तुम्हाला कोठे सापडू शकतील?

खरी धार्मिक मूल्ये तुम्हाला कोठे सापडू शकतील?

“तुम्हाला केवळ कुटुंबाच्या परंपरेनुसार एखादा धर्म पाळायचा असल्यास २,००० वर्षांआधी आपल्या पूर्वजांचा सेल्टिक धर्म का नाही पाळत?” असे रॉडॉल्फ यांनी उपरोधाने विचारले. त्याचे बोलणे ऐकत असलेल्या तरुणाला याचे हसू येते.

“देवासोबतचा माझा नातेसंबंध माझ्याकरता फार महत्त्वाचा आहे,” असे रॉडॉल्फ म्हणतो. “शेकडो वर्षांआधी हयात असलेले माझे पूर्वज अमुक धर्म पाळत होते म्हणून माझ्यावर परंपरेनुसार चालत आलेले धार्मिक विश्‍वास थोपवले जावेत याच्या मी साफ विरोधात आहे.” रॉडॉल्फने सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला; या महत्त्वाच्या बाबीविषयी, आईवडिलांकडून प्राप्त झालेला हा वारसा आहे असा त्याने दृष्टिकोन बाळगला नाही.

आजकाल, एका पिढीपासून दुसऱ्‍या पिढीला धर्माचा वारसा प्राप्त होण्याची प्रथा नाहीशी होत असली तरी बहुतांश लोक अजूनही आपल्या कुटुंबाचा धर्म पाळतात. परंतु, आपल्या आईवडिलांच्या धार्मिक विश्‍वासांना जडून राहणे नेहमीच योग्य आहे का? बायबल काय म्हणते?

रानात ४० वर्षे घालवल्यावर, मोशेचा वारसदार यहोशवा याने इस्राएली लोकांसमोर एक निवड ठेवली: “परमेश्‍वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहा त्या देशांतल्या अमोऱ्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्‍वराची सेवा करणार.”—यहोशवा २४:१५.

यहोशवाने, पूर्वज म्हणून ज्यांना संबोधित केले त्यांपैकी एक होता तेरह; तो अब्राहामाचा पिता होता व फरात नदीच्या पूर्वेकडे वसलेल्या ऊर शहरात राहत असे. बायबलमध्ये तेरहविषयी अधिक काही सांगितलेले नाही; इतकेच की, तो इतर देवांची उपासना करत असे. (यहोशवा २४:२) त्याचा पुत्र अब्राहाम याला देवाच्या उद्देशांविषयी पक्के ज्ञान नसतानाही यहोवाने त्याला आपला मायदेश सोडायला सांगितले तेव्हा तो लगेच राजी झाला. होय, अब्राहामाने आपल्या पित्याचा धर्म नव्हे तर एक वेगळा धर्म निवडला. असे केल्यामुळे, देवाने अब्राहामाला वचन दिल्याप्रमाणे आशीर्वाद प्राप्त झाले आणि अनेक धर्मांमध्ये ओळखतात त्याप्रमाणे तो ‘देवावर श्रद्धा असलेल्यांचा पिता’ बनला.—रोमकर ४:११, मराठी कॉमन लँग्वेज.

बायबलमध्ये येशू ख्रिस्ताची पूर्वज रूथ हिच्याविषयी देखील चांगला अहवाल दिला आहे. मवाबी स्त्री असलेल्या रूथचा एका इस्राएली व्यक्‍तीशी विवाह झाला होता, नंतर ती विधवा झाली आणि मग तिच्याजवळ दोन पर्याय होते: स्वतःच्या मायदेशात राहणे किंवा आपल्या सासूबरोबर इस्राएलला परतणे. आपल्या आईवडिलांच्या मूर्तिपूजक उपासनेच्या तुलनेत यहोवाच्या उपासनेची श्रेष्ठता ओळखून रूथ आपल्या सासूला म्हणाली: “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.”—रूथ १:१६, १७.

बायबलच्या पुस्तकांच्या स्वीकृत यादीमधील या अहवालाच्या महत्त्वावर टिप्पणी देताना, डिक्शनेर द ला बायबल म्हणते की, या अहवालावरून “परदेशात जन्मलेली व इस्राएल लोकांचा द्वेष करणाऱ्‍या आणि त्यांना मुळीच पसंत नसलेल्या मूर्तिपूजक लोकांमध्ये जन्मलेली स्त्री . . . यहोवाच्या राष्ट्राप्रती व त्याच्या उपासनेप्रती प्रेम असल्यामुळे पवित्र राजा दावीदाची पूर्वज कशी बनली” हे दिसून येते. आपल्या आईवडिलांच्या धर्मापेक्षा वेगळा धर्म निवडण्यास रूथ कचरली नाही आणि असा निर्णय घेतल्यामुळे तिला देवाचा आशीर्वाद प्राप्त झाला.

येशूच्या शिष्यांनी आपल्या पूर्वजांचा धर्म का सोडून दिला याची कारणे ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीसंबंधीच्या अहवालात स्पष्टरित्या दिली आहेत. मनाला भिडेल अशा अत्यंत प्रभावकारी भाषणात प्रेषित पेत्राने आपल्या श्रोत्यांना स्वतःच्या पापांचे प्रायश्‍चित करून व येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेऊन “या कुटिल पिढीपासून . . . आपला बचाव” करण्यास सांगितले. (प्रेषितांची कृत्ये २:३७-४१) सर्वात उल्लेखनीय उदाहरण होते शौलाचे; तो ख्रिश्‍चनांचा छळ करणारा एक यहुदी होता. दमिष्काला जात असताना रस्त्यात, त्याला ख्रिस्ताचा एक दृष्टान्त झाला आणि त्यानंतर शौल एक ख्रिस्ती बनला व प्रेषित पौल या नावाने तो ओळखला जाऊ लागला.—प्रेषितांची कृत्ये ९:१-९.

परंतु, आरंभीच्या बहुतांश ख्रिश्‍चनांना असा जबरदस्त अनुभव आला नाही. तरीही, सर्वांना एक तर यहुदी धर्म किंवा विविध विदेशी देवांची उपासना सोडून द्यावी लागली. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्यांनी वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव राखून व सहसा मशीहा या नात्याने येशूच्या भूमिकेविषयी सविस्तर चर्चा केल्यानंतरच तो स्वीकारला. (प्रेषितांची कृत्ये ८:२६-४०; १३:१६-४३; १७:२२-३४) त्या आरंभीच्या ख्रिश्‍चनांना आपल्या जीवनात बदल करण्याची गरज आहे हे स्पष्टरित्या सांगण्यात आले होते. ते आमंत्रण यहुदी आणि गैर-यहुदी दोघांनाही देण्यात आले होते पण संदेश एकच होता. देवाला संतुष्ट करायचे असल्यास, ख्रिस्ती धर्म हा उपासनेचा नवीन प्रकार अवलंबण्याची गरज होती.

आपल्याकरता समर्पक निवड

पहिल्या शतकात, यहुदी धर्म, सम्राटाची उपासना, मूर्तिपूजक देवतांची उपासना अशा पिढीजात धार्मिक परंपरांना नकार देऊन यहुदी व रोमी दोघांनाही तिस्करणीय असलेला नवीन धर्म स्वीकारण्यास निश्‍चितच धैर्य लागत असे. हा मार्ग निवडल्यामुळे लगेचच कठोर छळास सुरवात झाली. वर युन फ्रॉन्स पेइन? (फ्रान्सचे मूर्तिपूजक राष्ट्रात रूपांतर?) या आपल्या पुस्तकात, क्लरमाँन-फररांडचे कॅथलिक बिशप, इपोलीट सीमोन म्हणतात, आज देखील “इतरांसारखे करण्याच्या व्यापक वातावरणात खेचले जाऊन त्यात अडकण्यास” नकार द्यायला असेच धैर्य लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या अल्पसंख्यांक व टीकेचे लक्ष्य असलेल्या धार्मिक चळवळीत सहभागी होण्यास धैर्य लागते.

बास्तिया, कोरसिका येथील पॉल नावाच्या एका तरुणाचे कॅथलिक धर्मात संगोपन झाले होते; अधूनमधून तो चर्चच्या कार्यांमध्ये भाग घेत असे; जसे की, केक विकून एका कॅथलिक धर्मदाय संस्थेकरता निधी गोळा करणे वगैरे. त्याला बायबलविषयी अधिक समज प्राप्त करायची होती म्हणून यहोवाच्या साक्षीदारांसोबत नियमित चर्चा करायला तो तयार झाला. कालांतराने, त्याला समजले की, तो शिकत असलेल्या गोष्टींद्वारे त्याला अनंतकालिक लाभ मिळू शकतो. त्यानुरूप, पॉलने बायबलची मूल्ये पूर्णपणे स्वीकारली आणि एक यहोवाचा साक्षादीर बनला. त्याने केलेल्या निवडीबद्दल त्याच्या पालकांनी त्याचा आदर केला आणि यामुळे त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधात दुरावा निर्माण झालेला नाही.

एमीली दक्षिण फ्रान्समध्ये राहते. चार पिढ्यांपासून तिच्या कुटुंबातले सदस्य यहोवाचे साक्षीदार राहिले आहेत. आपल्या पालकांची धार्मिक मूल्ये निवडण्याचा निर्णय तिने का घेतला? ती म्हणते, “तुमचे आईवडील किंवा आजीआजोबा यहोवाचे साक्षीदार होते म्हणून तुम्ही यहोवाचे साक्षीदार बनू शकत नाही. तर कालांतराने तुम्हाला वाटू लागते की, ‘हा माझा धर्म आहे कारण या सर्व गोष्टींवर माझा ठाम विश्‍वास आहे.’” यहोवाच्या इतर अनेक तरुण साक्षीदारांप्रमाणे, एमीलीला हे ठाऊक आहे की, तिच्या ठाम धार्मिक विश्‍वासांमुळे तिला जीवनात उद्देश आणि कायमचा आनंद मिळाला आहे.

देवाची मूल्ये का स्वीकारावीत

नीतिसूत्रे पुस्तकाच्या ६ व्या अध्यायात आणि २० व्या वचनात देवाला संतुष्ट करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍यांना असे उत्तेजन दिले आहे: “माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” हा सल्ला आंधळेपणाने आज्ञा पाळण्याचे उत्तेजन देत नाही तर आपला विश्‍वास वाढवून आणि देवाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय स्वतः घेऊन देवाचे दर्जे स्वीकारण्यास प्रोत्साहन देतो. प्रेषित पौलाने त्याच्या साथीदारांना “सर्व गोष्टींची पारख” करण्यास अर्थात शिकवलेल्या गोष्टी देवाच्या आणि त्याच्या इच्छेच्या अनुरूप आहेत किंवा नाहीत हे तपासून त्यानुसार कार्य करण्यास उत्तेजन दिले.—१ थेस्सलनीकाकर ५:२१.

साठ लाखांहून अधिक यहोवाचे साक्षीदार असलेल्या अबालवृद्धांनी, ख्रिस्ती घरात संगोपन झाले असले किंवा नसले तरी हा निर्णय स्वतःहून घेतला आहे. बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याद्वारे जीवनाच्या उद्देशाविषयी त्यांच्या मनात असलेल्या प्रश्‍नांची त्यांना विश्‍वसनीय उत्तरे प्राप्त झाली आणि मानवजातीकरता देवाच्या इच्छेची स्पष्ट समज देखील त्यांना मिळाली. हे ज्ञान प्राप्त केल्याने त्यांनी देवाची मूल्ये स्वीकारली आणि देवाच्या इच्छेनुरूप कार्य करण्याचा होता होईल तितका ते प्रयत्न करतात.

या मासिकाचे तुम्ही नियमित वाचक असला किंवा नसला तरी बायबलच्या धार्मिक मूल्यांचे परीक्षण करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांकडून तुम्ही मदत घेऊ शकता. अशाप्रकारे, तुम्ही “यहोवा किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव” घेऊ शकाल आणि ज्ञान प्राप्त करू शकाल जे आचरणात आणल्याने तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल.—स्तोत्र ३४:८, NW; योहान १७:३.

[५ पानांवरील चित्र]

फ्रान्समध्ये यहोवाचे साक्षीदार असलेल्या एका कुटुंबाच्या चार पिढ्या

[७ पानांवरील चित्र]

रूथने आपल्या पूर्वजांच्या देवांची उपासना करण्याऐवजी यहोवाची सेवा करण्याची निवड केली