चूक कबूल करणे इतके कठीण का वाटते?
चूक कबूल करणे इतके कठीण का वाटते?
सन २००० च्या जुलै महिन्यात, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य विधानमंडळाने एक प्रस्ताव संमत केला ज्यामध्ये अपघातात गोवलेल्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला सहानुभूती दाखवली तर तिला जबाबदार ठरवले जाणार नाही अशी तरतूद होती. हा कायदा का करावा लागला? असे पाहण्यात आले होते की, अपघातामुळे कोणी जखमी झाले किंवा काही नुकसान झाले तर सहसा लोक माफी मागायला मागेपुढे पाहतात कारण ही अपराधाची कबुली आहे असे कोर्टात समजले जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला पाहता, लगेच माफी मागितली जावी अशी अपेक्षा करणारे लोक रागावू शकतात आणि एखाद्या लहानशा अपघातावरून मोठे भांडण होऊ शकते.
अर्थात, तुमच्या चुकीमुळे अपघात घडला नसला तर तुम्हाला माफी मागायची गरज नाही. आणि काही वेळा, आपण जे काही बोलतो ते विचारपूर्वक बोलणे शहाणपणाचे ठरते. एक प्राचीन नीतिसूत्र म्हणते: “फार वाचळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.” (नीतिसूत्रे १०:१९; २७:१२) तरीही, तुम्ही सभ्य असू शकता व मदत करायला पुढे येऊ शकता.
पण कोर्टाची भीती नसतानाही अलीकडे पुष्कळ लोक माफी मागत नाहीत हे खरे नाही का? घरी, पत्नी खेदाने
म्हणू शकते, ‘माझे पती कधीच माफी मागत नाहीत.’ कामाच्या ठिकाणी एखाद्या फोरमनची तक्रार असेल, ‘माझ्या हाताखाली काम करणारे कामगार कधीच आपल्या चुका मान्य करत नाहीत, माफी मागणे तर दूरची गोष्ट झाली.’ शाळेत एखादे शिक्षक म्हणतील, ‘मुलांना साधे शिष्टाचार शिकवले जात नाहीत.’माफी मागायला काहीजण पुढेमागे पाहतात त्याचे एक कारण म्हणजे नाकारले जाण्याची भीती. समोरची व्यक्ती थंड प्रतिसाद देईल या भीतीने ते आपल्या भावना व्यक्त करणार नाहीत. किंबहुना, दुखावलेली व्यक्ती आपल्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे समेट करणे अतिशय कठीण होऊन बसते.
इतर लोकांच्या भावनांबद्दल कदर नसणे हे माफी न मागण्याचे दुसरे कारण असू शकते. ते असा विचार करतील, ‘चूक तर माझ्या हातून झाली आहे, आता माफी मागितल्यानं परिस्थिती थोडीच बदलणार आहे, मग कशाला माफी मागायची?’ आणखी इतरजण संभाव्य परिणामांमुळे माफी मागायला कचरतात. ते विचार करतात, ‘मला जबाबदार ठरवले जाऊन भरपाई करावी लागेल का?’ परंतु, चूक मान्य करणे कठीण वाटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अहंकार. ज्या व्यक्तीचा अहंकार तिला ‘माझे चुकले’ असे म्हणू देत नाही, ती एका अर्थाने असा विचार करत असते की, ‘मी चूक कबूल करून माझी नालस्ती का करून घ्यावी? तो माझ्यासाठी कमीपणा होईल.’
कारण काहीही असले तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, अनेकांच्या तोंडून ‘मी चुकलो’ हे शब्द फार मुश्कीलीने निघतात. पण आपली चूक कबूल करायची खरीच काही गरज आहे का? चूक कबूल करण्याचे फायदे काय आहेत?
[३ पानांवरील चित्र]
“मुलांना साधे शिष्टाचार शिकवले जात नाहीत”
[३ पानांवरील चित्र]
“माझे पती कधीच माफी मागत नाहीत”
[३ पानांवरील चित्र]
“माझ्या हाताखाली काम करणारे कामगार कधीच आपल्या चुका मान्य करत नाहीत”