सैतान केवळ कल्पना की एक दुष्ट वास्तविकता?
सैतान केवळ कल्पना की एक दुष्ट वास्तविकता?
अगदी सुरवातीपासून दुष्टाईच्या उगमाविषयी विचारवंतांना कुतूहल वाटले आहे. जेम्स हेस्टिंग्स यांचे अ डिक्शनरी ऑफ द बायबल यात म्हटल्यानुसार: “मानवाला जाणीव होऊ लागली तेव्हा त्याच्यासमोर अशा शक्ती होत्या ज्यांच्यावर तो नियंत्रण करू शकत नव्हता आणि ज्यांचा हानीकारक किंवा नाशकारक प्रभाव त्याच्यावर पडत होता.” त्याच संदर्भात पुढे असेही म्हटले आहे: “प्राचीन मानव उपजतपणे कारणे शोधण्याचा प्रयत्न करत असत आणि कोणत्याही शक्तीला आणि निसर्गाच्या इतर आविष्कारांना व्यक्ती समजत असत.”
इतिहासकारांच्या मते, मेसोपोटेमियाच्या प्राचीन इतिहासात राक्षसी देवता आणि दुष्ट आत्म्यांची उपासना केली जात होती. प्राचीन बॅबिलोनियन लोकांचा विश्वास होता की, नेरगाल हा क्रूर देवता पाताळाचा किंवा “जेथून पुन्हा येता येत नाही त्या प्रदेशाचा” राजा होता आणि “अग्नीने जाळणारा” असा तो ओळखला जात होता. त्यांना भुतांचीही भीती होती आणि जादुई मंत्रांद्वारे ते त्यांना प्रसन्न करायचा प्रयत्न करत असत. ईजिप्शियन दंतकथेनुसार, सेट हा दुष्टाईचा देवता होता; “बारीक, पोपटाच्या चोचीसारखे नाक, सरळ, चौकोनी कान आणि ताठ दुभंगलेली शेपटी अशा विचित्र प्राण्याच्या रूपात त्याचे चित्रण केले जात होते.”—लारूस एन्सायक्लोपेडिया ऑफ मायथोलॉजी.
ग्रीक आणि रोमनांचे चांगले तसेच वाईट देवी-देवता होते तरीही त्यांच्यात प्रमुख असा दुष्टाईचा देवता नव्हता. त्यांचे तत्त्ववेत्ते दोन विरुद्ध तत्त्वांच्या अस्तित्वाची शिकवण देत असत. एम्पेडोकल्सनुसार, ही तत्त्वे म्हणजे प्रेम आणि विसंगती होती. प्लेटोनुसार, जगात दोन “आत्मे” होते; एक चांगले घडवून आणणारा आणि दुसरा वाईट घडवून आणणारा. जॉर्ज मीन्वा यांनी ला द्याबल (दियाबल) या आपल्या पुस्तकात म्हटले, “प्राचीन [ग्रेको-रोमन] मूर्तिपूजक धर्मात दियाबलाचा समावेश नव्हता.”
इराणमध्ये झोरास्ट्रियन धर्मात असे शिकवले जात होते की, सर्वशक्तिमान देव, अहूरा माझदा किंवा ओरमझ्द याने ॲन्ग्रा माइन्यू किंवा आरइमान याला निर्माण केले आणि त्याने दुष्टाई करायचे निवडले व म्हणून तो नाशकारी आत्मा किंवा विध्वंसक बनला.
यहुदी धर्मात, सैतान हा देवाचा शत्रू असून त्याच्यामुळे पाप आले असे साधे वर्णन देण्यात आले होते. पण अनेक शतकांनंतर, मूर्तिपूजक कल्पनांनी हे चित्र बदलले. एन्सायक्लोपेडिया जुडायका यात म्हटले आहे: “सा.यु.पू. च्या शेवटल्या शतकांमध्ये . . . एक मोठा बदल घडून आला. या काळात [यहुदी] धर्माने . . . द्वैतवादाची अनेक गुणलक्षणे आत्मसात केली ज्यामध्ये वाईटाच्या व फसवणुकीच्या बलवान शक्ती, स्वर्गात आणि पृथ्वीवर देवाच्या विरोधात तसेच चांगुलपणाच्या व सत्याच्या शक्तींच्या विरोधात होत्या. हे पर्शियन धर्माच्या प्रभावाखाली असल्याचे भासते.” द कन्साईज ज्यूईश एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “नियमांचे
पालन व ताईतांचा वापर करण्याद्वारे [दुरात्म्यांपासून] संरक्षण मिळत होते.”धर्मत्यागी ख्रिस्ती तत्त्वज्ञान
यहुदी धर्माने सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांविषयीच्या बायबलच्या बाहेरील कल्पनांना आत्मसात केले त्याचप्रमाणे धर्मत्यागी ख्रिश्चनांनी गैरशास्त्रीय कल्पना आणल्या. दि अँकर बायबल डिक्शनरी म्हणते: “प्राचीन थिओलॉजिकल कल्पनांपैकी सर्वात टोकाची एक कल्पना म्हणजे देवाने सैतानाला किंमत देऊन आपल्या लोकांना त्याच्या तावडीतून सोडवले.” ही कल्पना आयरिनियसने (सा.यु. दुसरे शतक) मांडली होती. पुढे या कल्पनेला ओरिजेनने (सा.यु. तिसरे शतक) आणखी वाढवून असा दावा केला की, “दियाबलाने कायदेशीररित्या मानवांवर आपला हक्क असल्याचे प्रतिपादन केले होते” व त्याचा असा समज होता की, “ख्रिस्ताचा मृत्यू . . . दियाबलाला दिलेले खंडणी मूल्य होते.”—अडॉल्फ हारनाक यांचे लिखित हिस्टरी ऑफ डॉग्मा.
कॅथलिक एन्सायक्लोपिडियानुसार “सुमारे एक हजार वर्षांकरता [दियाबलाला खंडणी मूल्य देण्यात आले होते ही कल्पना] थिओलॉजीच्या इतिहासातील प्रमुख हिस्सा होती” आणि ती चर्चच्या विश्वासाचा भाग बनून राहिली. ऑगस्टीनसोबत (सा.यु. चवथे व पाचवे शतक) चर्चच्या इतर धर्मगुरूंनी, खंडणी मूल्य सैतानाला देण्यात आल्याची ही कल्पना स्वीकारली. शेवटी, सा.यु. १२ व्या शतकापर्यंत अन्सेल्म आणि अबीलार्ड हे कॅथलिक तत्त्ववेत्ते या निष्कर्षापर्यंत पोचले की, ख्रिस्ताचे बलिदान सैतानाला नव्हे तर देवाला अर्पण करण्यात आले होते.
मध्ययुगीन अंधविश्वास
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, कॅथलिक चर्चच्या बहुतांश सभांमध्ये सैतानाविषयी काही चर्चा केली जात नव्हती तरी सा.यु. १२१५ साली, चवथ्या लेटरन मंडळाने न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडियाच्या मते ज्याला “विधीपूर्वक विश्वासाची घोषणा” म्हटले ते सादर केले. नियम पहिला म्हणतो: “देवाने दियाबल आणि इतर दुरात्म्यांना चांगल्या स्वभावासह निर्माण केले होते पण ते स्वतःहून वाईट बनले.” त्यात पुढे म्हटले आहे की, ते मानवांना पाशात पाडण्याचा सतत प्रयत्न करत असतात. या शेवटल्या विचाराने मध्ययुगातील अनेक लोकांना पछाडले होते. कसलीही असाधारण गोष्ट जसे की, कारण स्पष्ट नसलेले आजारपण, आकस्मिक मृत्यू किंवा खराब पीक निघणे या सर्व गोष्टींसाठी सैतानाला जबाबदार ठरवले जाई. सा.यु. १२३३ साली, पोप ग्रेगरी नववे यांनी पाखंड्यांविरुद्ध अनेक हुकूम जारी केले; यांमध्ये लुसिफरियन अर्थात तथाकथित दियाबलाचे उपासक यांविरुद्धही एक हुकूम काढला होता.
दियाबल किंवा त्याचे दुरात्मे लोकांना पछाडू शकतात या विश्वासामुळे लोकांमध्ये खळबळ माजली—जादुटोणा आणि चेटूकविद्येची एक भयंकर भीती त्यांच्यामध्ये पसरली. १३ व्या ते १७ व्या शतकांदरम्यान युरोपभर चेटकिणींविषयी भीती पसरली आणि युरोपियन वसाहतकारांसोबत उत्तर अमेरिकेपर्यंत पोचली. प्रोटेस्टंट धर्मसुधारक, मार्टिन ल्यूथर आणि जॉन कॅल्व्हिन यांनी देखील चेटकिणींना हुडकून काढण्यास मंजुरी दिली. युरोपमध्ये धर्मसभा आणि लौकिक न्यायालयांनी केवळ अफवा किंवा वैमन्स्यामुळे केलेल्या दोषारोपांमुळे चेटकिणींची चौकशी केली. “दोषी” असल्याचा कबुलीजबाब मिळण्यासाठी छळण्याची पद्धत सर्रास वापरली जात असे.
दोषी सापडलेल्या लोकांना एकतर जाळून किंवा इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये फाशी देऊन मृत्यूदंड दिला जात असे. बळी पडलेल्यांच्या संख्येविषयी द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “१४८४ पासून १७८२ पर्यंतच्या काळात, काही इतिहासकारांच्या मते, ख्रिस्ती चर्चने सुमारे ३,००,००० स्त्रियांना जादूटोण्याकरता ठार मारले.” मध्ययुगातील
या भयंकर घटनांमागे सैतान जबाबदार होता तर त्याचे साधन कोण होते—बळी पडलेले की त्यांचा छळ करणारे धर्मवेडे?चालू विश्वास किंवा अविश्वास
अठराव्या शतकात, प्रबोधन चळवळ सुरू झाली ज्यात बुद्धिवादी कल्पनेचा विकास होऊ लागला. एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात म्हटले आहे: “प्रबोधन काळातील तत्त्वज्ञानाने आणि थिओलॉजीने ख्रिस्ती लोकांच्या मनातून दियाबलाची कल्पना, मध्ययुगातील दंतकथांमधील काल्पनिक गोष्ट आहे असे दाखवून काढून टाकण्याचा प्रयत्न केला.” रोमन कॅथलिक चर्चने लगेच प्रतिक्रिया दाखवली आणि पहिल्या व्हॅटिकन काऊंसिलमध्ये (१८६९-७०) दियाबल सैतानावर विश्वास असल्याचे पुन्हा जाहीर केले आणि दुसऱ्या व्हॅटिकन काउंसिलमध्ये (१९६२-६५) सौम्यपणे त्याची पुनरुक्ती केली.
अधिकृतपणे, न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया मान्य करतो त्याप्रमाणे, “देवदूत आणि दुरात्मे यांवर चर्चचा विश्वास आहे.” कॅथलिक धर्मावरील फ्रेंच शब्दकोश, टेओ असे कबूल करतो की, “जगातील दुष्टाईला दियाबल कारणीभूत आहे असे आज अनेक ख्रिस्ती मानत नाहीत.” अलीकडील वर्षांमध्ये कॅथलिक तत्त्ववेत्ते, अधिकृत कॅथलिक सिद्धान्त आणि आधुनिक विचारसरणी यांच्यात समतोल साधण्याकरता जणू तारेवरची कसरत करत आहेत. एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो, “उदारमतवादी ख्रिस्ती थिओलॉजी, बायबलमधील सैतानाच्या वर्णनाला शब्दशः न समजता केवळ ‘कल्पना चित्र’ अर्थात विश्वातील वाईटाचे वास्तव व प्रमाण दंतकथांच्या माध्यमाने व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे असे समजते.” प्रोटेस्टंटांविषयी त्याच संदर्भात असे म्हटले आहे: “आधुनिक उदारमतवादी प्रोटेस्टंट धर्म, व्यक्तीरूपातील दियाबलावर विश्वास ठेवण्याच्या आवश्यकतेला नकार देतो.” पण खऱ्या ख्रिश्चनांनी बायबलमधील सैतानाचे वर्णन केवळ “कल्पना चित्र” आहे असे समजावे का?
शास्त्रवचनांची शिकवण
मानवी तत्त्वज्ञानाने आणि थिओलॉजीने बायबलमधील वाईटाच्या उगमाविषयी दिलेल्या स्पष्टीकरणापेक्षा समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही. शास्त्रवचनांमध्ये सैतानाविषयी दिलेली माहिती वाईटाचा व मानवी दुःखाचा उगम त्याचप्रमाणे दरवर्षी बिकट होणाऱ्या क्रूर हिंसेचे कारण समजून घेण्यासाठी मूलभूत आहे.
काहीजण विचारतील: ‘देव जर चांगला आणि प्रेमळ निर्माणकर्ता आहे तर त्याने सैतानासारखा दुष्ट आत्मिक प्राणी का निर्माण केला?’ बायबलमध्ये हे तत्त्व मांडले आहे की, यहोवा देवाच्या सर्व कृती परिपूर्ण आहेत आणि त्याच्या सर्व बुद्धिमान प्राण्यांना स्वतंत्र इच्छा देण्यात आली आहे. (अनुवाद ३०:१९; ३२:४; यहोशवा २४:१५; १ राजे १८:२१) यावरून कळते की, जी आत्मिक व्यक्ती सैतान बनली तिला परिपूर्ण असे निर्माण करण्यात आले असावे पण ती सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गापासून स्वच्छेने बहकली असावी.—योहान ८:४४; याकोब १:१४, १५.
अनेक बाबतीत, सैतानाची बंडखोरी ‘सोरेच्या राजासारखी होती’; काव्यात्मक रूपात त्याचे वर्णन “सर्वांगसुंदर” आणि ‘निर्माण केल्या दिवसापासून अधर्म दिसून येईपर्यंत यथायोग्य चालचालणूक असलेला’ असे करण्यात आले आहे. (यहेज्केल २८:११-१९) सैतानाने यहोवाचे श्रेष्ठत्व किंवा त्याचे निर्मातापद यावर शंका व्यक्त केली नाही. कसे करणार, कारण त्याला देवानेच निर्माण केले होते. परंतु, यहोवा आपले सार्वभौमत्व ज्या पद्धतीने वापरतो त्यावर सैतानाने संशय घेतला. एदेन बागेत, सैतानाने असे सूचित केले की, पहिल्या मानवी दंपतीला ज्या गोष्टीचा अधिकार होता आणि ज्यावर त्यांचे कल्याण अवलंबून होते त्या गोष्टीपासून देव त्यांना वंचित करत होता. (उत्पत्ति ३:१-५) आदाम आणि हव्वेला यहोवाच्या नीतिमान सार्वभौमत्वाविरुद्ध बंड करायला भाग पाडण्यात त्याने यश मिळवले आणि त्यांच्यावर व त्यांच्या संततीवर पाप आणि मृत्यू आणला. (उत्पत्ति ३:६-१९; रोमकर ५:१२) अशाप्रकारे बायबल दाखवते की, सैतान हा मानवी दुःखाचे मूळ आहे.
जलप्रलयाआधी केव्हातरी इतर देवदूतही सैतानाच्या बंडाळीत सामील झाले. त्यांनी मानवकन्यांसोबत आपला लैंगिक हव्यास तृप्त करण्यासाठी मानवी शरीरे धारण केली. (उत्पत्ति ६:१-४) जलप्रलय आला तेव्हा शत्रूपक्षाला मिळालेले हे देवदूत पुन्हा एकदा आत्मिक जगात गेले पण देवासोबत स्वर्गामध्ये असलेले “अधिकारपद” त्यांना मिळाले नाही. (यहूदा ६) आध्यात्मिक अंधकाराच्या स्थितीत त्यांना टाकण्यात आले. (१ पेत्र ३:१९, २०; २ पेत्र २:४) ते दुरात्मे बनले; ते यहोवाच्या सार्वभौमत्वाखाली राहिले नाहीत तर सैतानाच्या अधीन झाले. स्पष्टतः, या दुरात्म्यांना पुन्हा आपली शरीरे बदलणे शक्य नाही, परंतु, मानवांच्या मनांवर आणि जीवनांवर ते अद्याप प्रभाव पाडू शकतात; आणि आज पाहायला मिळणाऱ्या बहुतांश हिंसेकरता ते जबाबदार आहेत यात काहीच शंका नाही.—मत्तय १२:४३-४५; लूक ८:२७-३३.
सैतानाच्या शासनाचा अंत जवळ
आज जगात वाईट शक्तींचा प्रभाव आहे हे स्पष्ट आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”—१ योहान ५:१९.
तथापि, बायबलची पूर्ण झालेली भविष्यवाणी दाखवते की, दियाबल पृथ्वीवरील अनर्थ वाढवत आहे कारण त्याला ठाऊक आहे की, बंदिस्त केले जाण्याआधी खळबळ माजवण्याकरता त्याच्याजवळ “काळ थोडा आहे.” (प्रकटीकरण १२:७-१२; २०:१-३) सैतानाच्या शासनाचा अंत झाल्यावर एक नीतिमान नवे जग उदयास येईल जेथे अश्रू, मरण आणि दुःख ही राहणार “नाहीत.” मग, ‘जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरहि’ देवाची इच्छा पूर्ण केली जाईल.—प्रकटीकरण २१:१-४; मत्तय ६:१०.
[४ पानांवरील चित्रे]
बॅबिलोनी लोक नेरगाल (अगदी डावीकडे) या क्रूर देवतेची उपासना करत होते; प्लेटो (डावीकडे) याचा दोन विरुद्ध “आत्म्यांवर” विश्वास होता
[चित्राचे श्रेय]
वर्तुळस्तंभ: Musée du Louvre, Paris; प्लेटो: National Archaeological Museum, Athens, Greece
[५ पानांवरील चित्रे]
आयरिनियस, ओरिजन आणि ऑगस्टीन यांची अशी शिकवण होती की खंडणी मूल्य दियाबलाला देण्यात आले होते
[चित्राचे श्रेय]
ओरिजन: Culver Pictures; ऑगस्टीन: From the book Great Men and Famous Women
[६ पानांवरील चित्र]
चेटकिणींच्या भीतीमुळे लाखोंना ठार मारण्यात आले
[चित्राचे श्रेय]
From the book Bildersaal deutscher Geschichte