यहोवाच्या मार्गात चालत राहणे प्रतिफलदायी आहे
यहोवाच्या मार्गात चालत राहणे प्रतिफलदायी आहे
तुम्ही डोंगरांवर कधी भटकंतीला गेलात का? आपण सर्वांपेक्षा उंच आहोत असा कदाचित तुम्हाला तेव्हा भास झाला असेल. डोंगरमाथ्यावरील शुद्ध हवा, विहंगम दृश्य, निसर्गाचे सौंदर्य हा सगळा खरोखरच किती सुखद अनुभव! अशा वेळी खालच्या जगातल्या चिंता तुम्हाला किती क्षुल्लक वाटल्या असतील!
पुष्कळ लोकांच्या जीवनात असे सुखदायक अनुभव फार क्वचित येतात; परंतु तुम्ही एक समर्पित ख्रिस्ती असाल तर, काही काळापासून तुम्ही आध्यात्मिक अर्थाने उंच ठिकाणाहून चालत असाल. प्राचीन काळच्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा निश्चितच अशी प्रार्थना केली असेल: “हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर.” (स्तोत्र २५:४) तुम्ही पहिल्यांदा जेव्हा यहोवाच्या पर्वतावरील भवनात जाऊन उच्च स्थानांवरून चालू लागला तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते ते आठवते का? (मीखा ४:२; हबक्कूक ३:१९) तुम्हाला निश्चितच याची जाणीव झाली असेल, की शुद्ध उपासनेच्या उंच मार्गावर चालल्याने तुम्हाला सुरक्षितता व आनंद मिळू शकतो. तेव्हा तुम्हालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटू लागले असावे: “ज्या लोकांस उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.”—स्तोत्र ८९:१५.
परंतु कधीकधी डोंगर चढणाऱ्या लोकांना उंच, उभे चढण चढावे लागते. त्यामुळे त्यांचे पाय दुखू लागतात आणि ते थकतात. देवाची सेवा करत असताना आपल्यालाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अलीकडील काळात आपल्याला कदाचित परिश्रम करावे लागले असतील. मग आपला आवेश व आनंद पुन्हा मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिले पाऊल म्हणजे, आपण यहोवाच्या मार्गांची श्रेष्ठता ओळखली पाहिजे.
यहोवाचे उच्च नियम
यहोवाचे मार्ग ‘मनुष्याच्या मार्गाहून उंच आहेत,’ आणि त्याची उपासना ‘पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात आली आहे व सर्व डोंगरांहून उंच’ करण्यात आली आहे. (यशया ५५:९; मीखा ४:१) यहोवाची बुद्धी ‘वरून येणारी बुद्धी’ आहे. (याकोब ३:१७, NW) त्याचे नीतिनियम सर्वांहून श्रेष्ठ आहेत. उदाहरणार्थ, कनानी लोक, मुलांचा बळी देण्याची क्रूर प्रथा आचरीत होते तेव्हा यहोवाने इस्राएली लोकांना जे नियम दिले ते नैतिकरीत्या सर्वोच्च होते आणि त्यांमध्ये दया या गुणाची झाक होती, जी सर्वांना दिसणारी होती. त्याने त्यांना सांगितले: “गरिबांच्या गरिबीकडे पाहू नको आणि समर्थापुढे नमू नको. . . . परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीति करा.”—लेवीय १९:१५, ३४.
पंधराशे वर्षांनंतर येशूने यहोवाच्या ‘थोर धर्मशास्त्राची’ आणखी उदाहरणे सांगितली. (यशया ४२:२१) डोंगरावरील प्रवचनात, तो आपल्या शिष्यांना असे म्हणाला: “तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र व्हावे.” (मत्तय ५:४४, ४५) आणि मग त्याने पुढे म्हटले: “ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्टग्रंथ हेच होत.”—मत्तय ७:१२.
या उच्च नियमांप्रमाणे वागणाऱ्या लोकांच्या मनावर प्रभाव पडतो व ते ज्या देवाची उपासना करतात त्याचे अनुकरण करण्यास प्रेरित होतात. (इफिसकर ५:१; १ थेस्सलनीकाकर २:१३) पौलाच्या व्यक्तिमत्त्वात घडलेल्या रूपांतराचा विचार करा. बायबलमध्ये त्याचा पहिला उल्लेख, स्तेफनाचा “वध मान्य” करणारा व “मंडळीस हैराण” करणारा म्हणून आला आहे. पण काही वर्षांनंतर मात्र थेस्सलोनिकामधील ख्रिश्चनांना त्याने “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे” सौम्यतेने वागवले. ईश्वरी शिक्षणाने पौलाला छळ करणाऱ्यापासून एक प्रेमळ ख्रिस्ती बनवले. (प्रेषितांची कृत्ये ८:१, ३; १ थेस्सलनीकाकर २:७) ख्रिस्ताच्या शिकवणुकींमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार आला होता याबद्दल तो निश्चितच आभारी होता. (१ तीमथ्य १:१२, १३) पौलासारखी कृतज्ञ मनोवृत्ती आपल्याला देवाच्या उच्च मार्गावर चालत राहण्यास मदत कशी करू शकते?
कृतज्ञ मनोवृत्ती बाळगून चालत राहा
डोंगरावरून डोळे दिपवून टाकणारे दृश्य पाहून भटकंती करणाऱ्यांना किती सुखावह वाटते. चालत असताना ते लहानसहान गोष्टींचाही आनंद घ्यायला शिकतात; जसे की एखादा वेगळाच दगड, एखादे सुंदर फूल किंवा एखाद्या जंगली प्राण्याचे ओझरते दर्शन. आध्यात्मिक अर्थाने आपणही, देवाबरोबर चालल्याने मिळणाऱ्या लहान-मोठ्या प्रतिफळांबद्दल जागृत असले पाहिजे. या जागृततेमुळे आपण आपले प्रत्येक पाऊल नव्या जोमाने टाकू आणि कंटाळवाणा वाटणारा आपला प्रवास उत्साही होईल. दाविदाच्या पुढील शब्दांशी आपणही सहमत असू: “प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव.”—स्तोत्र १४३:८.
यहोवाच्या मार्गात अनेक वर्षांपासून चालत असलेली मेरी नावाची एक भगिनी म्हणते: “मी यहोवाच्या सृष्टीकडे पाहते तेव्हा त्यातील फक्त क्लिष्ट रचनाच पाहत नाही तर त्यातून प्रतिबिंबित होणारे देवाचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व पाहते. प्राणी असो, पक्षी असो किंवा एखादा कीटक असो, प्रत्येकाची एक वेगळीच, मोहक दुनिया असते. असाच आनंद आपल्याला, आध्यात्मिक सत्ये हळूहळू स्पष्ट होत जातात तेव्हा होतो.”
आपली कृतज्ञता आपण कशी वाढवू शकतो? यहोवा आपल्यासाठी जे करतो ते क्षुल्लक न मानता आपण कृतज्ञता वाढवू शकतो. पौलाने लिहिले: “निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुति करा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१७, १८; स्तोत्र ११९:६२.
व्यक्तिगत अभ्यास आपल्याला कृतज्ञ मनोवृत्ती बाळगण्यास मदत करतो. कलस्सै येथील ख्रिश्चनांना पौलाने उत्तेजन दिले: “ख्रिस्त येशू जो प्रभु, . . . त्याच्यामध्ये चालत राहा; . . . निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा.” (कलस्सैकर २:६, ७) बायबलचे वाचन केल्यामुळे आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन केल्यामुळे आपला विश्वास मजबूत होतो आणि बायबलचा मूळलेखक याच्या अधिक जवळ आपण जातो. संपूर्ण बायबलमध्ये, आपल्याला “निरंतर उपकारस्तुती” करण्यास प्रवृत्त करणारा खजिना आहे.
आपल्या बांधवांबरोबर यहोवाची सेवा केल्यानेही आपल्याला चालत राहायला सोपे वाटेल. स्तोत्रकर्ता स्वतःविषयी म्हणाला: “तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, . . . मी सोबती आहे.” (स्तोत्र ११९:६३) सर्वात आनंददायक क्षण, ख्रिस्ती संमेलनांमध्ये किंवा आपल्या बांधवांच्या सहवासात आपण घालवलेले असतात. यहोवा आणि त्याचे उच्च मार्ग यांच्यामुळे आपले मौल्यवान जगव्याप्त ख्रिस्ती कुटुंब अस्तित्वात आहे हे आपण जाणतो.—स्तोत्र १४४:१५ब.
कृतज्ञतेसह जबाबदारीची जाणीवसुद्धा आपल्याला यहोवाच्या उच्च मार्गांवर पुढे चालत राहण्यास बळकट करील.
जबाबदारीची जाणीव बाळगून पुढे चालत राहणे
जबाबदारीची जाणीव असलेल्या भटकंती करणाऱ्यांना माहीत असते की वाट चुकू नये म्हणून किंवा उभ्या कडांच्या जवळ जाऊ नये म्हणून त्यांना सांभाळून चालण्याची गरज आहे. स्वतंत्र नैतिक प्राणी या नात्याने यहोवाने आपल्याला पुरेशा प्रमाणात स्वातंत्र्य व पुढाकार घेण्याचे सामर्थ्य दिले आहे. परंतु या स्वातंत्र्याचा आपल्याला जर उपभोग घ्यायचा आहे तर, आपले ख्रिस्ती कर्तव्य पूर्ण करत असताना आपण जबाबदारीची जाणीव बाळगली पाहिजे.
उदाहरणार्थ, यहोवाला भरवसा आहे, की त्याचे सेवक आपली कर्तव्ये जबाबदारीने पूर्ण करतील. आपण ख्रिस्ती कार्यांसाठी किंवा इतर कार्यांसाठी किती शक्ती, वेळ, पैसा खर्च केला पाहिजे हे तो सांगत नाही. उलट, करिंथकरांना पौलाने जे लिहिले ते आज आपल्या सर्वांनाही लागू होते: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे.”—२ करिंथकर ९:७; इब्री लोकांस १३:१५, १६.
ख्रिस्ती जबाबदारीने देण्यामध्ये, इतरांना सुवार्ता सांगणे समाविष्ट आहे. जगभरात होणाऱ्या राज्याच्या कार्याला अनुदान देऊनही आपण दाखवतो की आपण जबाबदार लोक आहोत. गरहार्ट नावाचे एक वडील सांगतात, की पूर्व युरोपमधील एका संमेलनाला उपस्थित राहून आल्यानंतर त्यांनी व त्यांच्या पत्नीने जास्त अनुदान द्यायला सुरवात केली. ते म्हणाले: “आपले बांधव खरोखरच इतके गरीब असूनही बायबल साहित्याबद्दल त्यांच्या मनात किती कृतज्ञता आहे हे पाहिल्यावर इतर देशांतील आपल्या गरजू बांधवांना होता होईल तितकं अनुदान देण्याचं आम्ही ठरवलं.”
धीर वाढवणे
डोंगराळ भागातून प्रवास करण्यासाठी तब्येत चांगली असावी लागते. भटकंती करणारे, त्यांना जमेल तेव्हा व्यायाम करतात आणि पुष्कळ लोक तर लांबच्या भटकंतीला जाण्याची तयारी करण्याकरता कमी अंतरापर्यंत चालायला जात असतात. पौलानेही आपल्याला, आध्यात्मिक तंदुरुस्तीसाठी स्वतःला ईश्वरशासित कार्यांत व्यस्त ठेवण्याची शिफारस केली. त्याने म्हटले, की जे ‘यहोवाला शोभेल असे वागू’ व ‘समर्थ होऊ’ इच्छितात त्यांनी “प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ” देत राहिले पाहिजे.—कलस्सैकर १:१०, ११.
प्रेरणा, भटकंती करणाऱ्यांना धीर देते. कशाप्रकारे? डोळ्यांसमोर एक स्पष्ट ध्येय ठेवल्याने, जसे की दूरवरच्या डोंगरापर्यंत पोहंचण्याचे ध्येय ठेवल्याने, आपल्याला पुढे चालत राहण्याची प्रेरणा मिळते. आणि वाटेत काही ओळखीच्या खुणा गाठल्यावर भटकंती करणाऱ्याला आपण किती प्रगती केली आहे ते पाहता येते. मागे वळून तो, आपण किती अंतर पार केले हे पाहतो तेव्हा त्याला समाधान मिळते.
तसेच, सार्वकालिक जीवनाची आपली आशा आपल्याला टिकून राहायला मदत करते व आपल्याला प्रेरणा देते. (रोमकर १२:१२) तोपर्यंत, यहोवाच्या मार्गांत चालत असताना आपण, ख्रिस्ती ध्येये समोर ठेवून ती साध्य करतो तेव्हा आपल्याला काहीतरी साध्य केल्यासारखे वाटते. आपण अनेक वर्षांपासून विश्वासूपणे करत असलेली सेवा किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वात आपण किती बदल केले आहेत हे पाहतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो!—स्तोत्र १६:११.
लांबचा पल्ला गाठण्यासाठी व शक्तीची बचत करण्यासाठी भटकंती करणारे एकाच गतीने पुढे जात असतात. तसेच, सभांना व क्षेत्र सेवेत नियमितरीत्या उपस्थित राहण्याच्या चांगल्या सवयीमुळे आपण एकाग्रतेने आपल्या ध्येयाकडे जात राहू. म्हणूनच पौलाने सहख्रिश्चनांना असे उत्तेजन दिले: “आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.”—फिलिप्पैकर ३:१६.
अर्थात, आपण यहोवाच्या मार्गांवर चालणारे एकटेच नाही. पौलाने लिहिले: आपण “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.” (इब्री लोकांस १०:२४) चांगल्या आध्यात्मिक संगतीमुळे, सहविश्वासू बंधूभगिनींबरोबर योग्य गतीने चालत राहणे आपल्याला सोपे जाईल.—नीतिसूत्रे १३:२०.
शेवटली आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवा आपल्याला शक्ती देतो ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. यहोवापासून सामर्थ्य प्राप्त करणारे “अधिकाधिक शक्ति पावत जातात.” (स्तोत्र ८४:५, ७) कधीकधी आपल्याला ओबडधोबड मार्ग पार करावा लागतो; यहोवाच्या मदतीने आपण तो यशस्वीरीत्या पार करू शकतो.