व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचे शिकवणे परिणामकारक आहे का?

तुमचे शिकवणे परिणामकारक आहे का?

तुमचे शिकवणे परिणामकारक आहे का?

आईवडील, मंडळीतील वडील, सुवार्तेचे उद्‌घोषक या सर्वांना शिक्षकांची भूमिका पार पाडावी लागते. आईवडील आपल्या मुलांना शिकवतात, वडील ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांना शिकवतात आणि सुवार्तेचे प्रचारक आस्था दाखवणाऱ्‍यांना शिकवतात. (अनुवाद ६:६, ७; मत्तय २८:१९, २०; १ तीमथ्य ४:१३, १६) तुमची शिकवण्याची पद्धत अधिक परिणामकारक ठरावी म्हणून तुम्ही काय करू शकता? पहिली गोष्ट म्हणजे, देवाच्या वचनात उल्लेख केलेल्या निपुण शिक्षकांचे उदाहरण व शिक्षणपद्धतीचे तुम्ही अनुकरण करू शकता. एज्रा अशाप्रकारच्या शिक्षकांपैकी एक होता.

एज्राच्या उदाहरणावरून धडा घेणे

एज्रा हा २,५०० वर्षांपूर्वी बॅबिलोनमध्ये राहणारा अहरोनाच्या कुळातील एक याजक होता. सा.यु.पू. ४६८ साली तो जेरूसलेममध्ये राहणाऱ्‍या यहुद्यांमध्ये शुद्ध उपासना सुस्थापित करण्याकरता तेथे गेला. (एज्रा ७:१, ६, १२, १३) हा उद्देश साध्य करण्याकरता लोकांना देवाच्या नियमाचे शिक्षण देणे आवश्‍यक होते. आपली शिकवण्याची पद्धत परिणामकारक ठरावी म्हणून एज्राने काय केले? त्याने अनेक आवश्‍यक पावले उचलली. नवे जग भाषांतरातील एज्रा ७:१० यात त्याने उचललेल्या कोणकोणत्या पावलांचा उल्लेख केला आहे हे आपण पाहू या:

एज्राने [१] आपल्या मनाची तयारी केली. हे त्याने परमेश्‍वराच्या नियमशास्त्रातून [२] सल्ला घेण्याकरता [३] त्याप्रमाणे चालण्याकरता आणि [४] इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकविण्याकरता केले. यांपैकी प्रत्येक पावलावर आपण लक्ष देऊ आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते ते पाहू.

‘एज्राने आपल्या मनाची तयारी केली होती’

पेरणी करण्याआधी शेतकरी नांगराच्या साहाय्याने जमीन तयार करतो त्याप्रमाणे एज्राने देवाचे वचन ग्रहण करण्याकरता आपल्या मनाची तयारी केली. (एज्रा १०:१) दुसऱ्‍या शब्दांत त्याने यहोवाच्या शिक्षणाकडे ‘मन लावले.’—नीतिसूत्रे २:२.

त्याचप्रकारे, बायबल सांगते की यहोशाफाट राजाने “आपले मन देवाच्या भजनी लाविले.” (२ इतिहास १९:३) याउलट, इस्राएलच्या एका पिढीच्या लोकांनी ‘आपले अंतःकरण नीट न राखल्यामुळे [“आपले मन तयार न केल्यामुळे,” NW]’ त्यांचे वर्णन “हट्टी व बंडखोर” अशा शब्दांत करण्यात आले. (स्तोत्र ७८:८) यहोवा ‘अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाची’ पारख करतो. (१ पेत्र ३:४) होय, तो “दीनांस आपला मार्ग शिकवितो.” (स्तोत्र २५:९) म्हणूनच शिक्षकांची भूमिका निभावणाऱ्‍या सर्वांनी आज एज्राच्या पावलांवर पाऊल ठेवून सर्वात आधी आपले अंतःकरण योग्य स्थितीत आणण्याकरता प्रार्थना करणे अत्यावश्‍यक आहे!

‘यहोवाच्या नियमशास्त्रातून सल्ला घेण्याकरता’

निपुण शिक्षक होण्याकरता एज्राने देवाच्या वचनातून सल्ला घेतला. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला गेल्यास तुम्ही त्यांचे लक्षपूर्वक ऐकून ते जे काही सांगतात किंवा ज्या सूचना देतात, त्या तुम्ही नीट समजून घेणार नाही का? निश्‍चितच तुम्ही असे कराल, कारण हा तुमच्या आरोग्याचा प्रश्‍न आहे. त्याचप्रकारे, यहोवा ज्या गोष्टी आपल्याला त्याच्या वचनाच्या अर्थात बायबलच्या आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने सांगत आहे किंवा ज्या सूचना देत आहे त्यांच्याकडे आपण आणखी किती मनःपूर्वक लक्ष दिले पाहिजे. कारण काही झाले तरी त्याचा सल्ला आपल्या जीवनाशी संबंधित आहे! (मत्तय ४:४; २४:४५-४७) अर्थात, डॉक्टरचे एखाद्या वेळेस चुकू शकते, पण “परमेश्‍वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे.” (स्तोत्र १९:७) त्याचे मार्गदर्शन स्वीकारल्यावर आपल्याला दुसऱ्‍या डॉक्टरचा सल्ला घेण्याची गरज उरणार नाही.

बायबलमधील पहिला व दुसरा इतिहास ही पुस्तके (जी एज्राने सुरवातीला एकच खंडाच्या रूपात लिहिली होती) दाखवून देतात की एज्रा खरोखर एक समर्पित विद्यार्थी होता. ही पुस्तके लिहिण्याकरता त्याने अनेक माहितीसूत्रांचा संदर्भ घेतला. * बॅबिलोनहून अलीकडेच आपल्या मायदेशी परतलेल्या यहुद्यांना त्यांच्या राष्ट्राचा इतिहास माहीत असणे आवश्‍यक होते. त्यांच्या धार्मिक विधींसंबंधी, मंदिरातील सेवेसंबंधी आणि लेव्यांच्या जबाबदाऱ्‍यांसंबंधी त्यांच्याकडे पुरेसे ज्ञान नव्हते. वंशावळ्या देखील त्यांच्याकरता अत्यंत महत्त्वाच्या होत्या. या सर्व बाबींकडे एज्राने खास लक्ष दिले. मशीहा येईपर्यंत यहुद्यांना आपले राष्ट्र, मंदिर, याजकगण आणि अधिपती कायम राखणे आवश्‍यक होते. एज्राने संकलित केलेल्या माहितीमुळेच त्यांच्यातील एकता आणि खरी उपासना कायम राखणे शक्य झाले.

अभ्यासाच्या सवयींच्या बाबतीत तुमची एज्राशी कशाप्रकारे तुलना करता येईल? बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यामुळे तुम्हाला बायबलचे शिक्षण परिणामकारक रितीने देण्यास साहाय्य होईल.

कुटुंब मिळून ‘यहोवाच्या नियमशास्त्राचे अध्ययन करा’

यहोवाच्या नियमशास्त्राचे अध्ययन वैयक्‍तिक अभ्यासापुरते मर्यादित नाही. कौटुंबिक अभ्यासादरम्यान देखील असे करण्याची उत्तम संधी आहे.

नेदरलँड्‌स येथील एक जोडपे, यान व युल्या यांनी त्यांच्या दोन मुलांना जवळजवळ त्यांच्या जन्माच्या दिवसापासूनच मोठ्याने वाचून दाखवण्याचा नित्यक्रम पाळला आहे. आज ईव्हो १५ वर्षांचा आहे आणि एडो १४ वर्षांचा; पण आजही आठवड्यातून एकदा त्यांचा कौटुंबिक अभ्यास होतो. यान सांगतात: “अभ्यासादरम्यान जास्तीत जास्त भाग संपवण्याचा आमचा उद्देश नसतो तर ज्यांवर आम्ही चर्चा केली त्या गोष्टी मुलांना समजाव्यात अशी आमची इच्छा असते.” ते पुढे सांगतात: “मुलं बरेच संशोधन करतात. नवीन शब्दांविषयी व बायबलमधील व्यक्‍तिमत्त्वांविषयी—ते कोणत्या कालखंडात हयात होते, कोण होते, त्यांचा व्यवसाय काय होता इत्यादी गोष्टींविषयी ते अतिरिक्‍त वाचन करतात. त्यांना वाचता येऊ लागल्यापासूनच त्यांनी शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), शब्दकोष आणि विश्‍वकोषांतून संदर्भ पाहण्यास सुरवात केली. यामुळे आमचा कौटुंबिक अभ्यास अधिकच आनंददायक ठरतो. मुलं तर अभ्यासाकरता थांबूनच असतात.” यामुळे झालेला एक अतिरिक्‍त चांगला परिणाम म्हणजे दोघेही मुले आता आपापल्या वर्गात भाषाज्ञानात आपल्या वर्गसोबत्यांपेक्षा पुढे आहेत.

जॉन व टीनी, नेदरलँड्‌समधील दुसरे एक जोडपे. ते देखील एसली (आता तो २४ वर्षांचा असून दुसऱ्‍या एका मंडळीत पायनियर म्हणून सेवा करत आहे) आणि लिन्डा (आता ती २० वर्षांची असून एका सुशील बांधवाशी तिचे लग्न झाले आहे) यांच्यासोबत नियमित अभ्यास करत होते. पण नेहमीच्या प्रश्‍नोत्तर पद्धतीने एखाद्या प्रकाशनाचा अभ्यास करण्याऐवजी त्यांनी आपल्या कौटुंबिक अभ्यासात मुलांच्या वयानुसार व गरजेनुसार आवश्‍यक फेरबदल केले. त्यांनी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला?

जॉन सांगतात की त्यांचा मुलगा आणि मुलगी (टेहळणी बुरूज मधील) “वाचकांचे प्रश्‍न” आणि (सावध राहा! मधील) “बायबलचा दृष्टिकोन” या सदरांतून एखादा रोचक विषय निवडायचे. मग त्यांनी जे साहित्य तयार केले असेल ते सर्वांना सांगायचे आणि यामुळे नेहमी अतिशय रोचक कौटुंबिक चर्चा घडून येत असत. अशाप्रकारे या तरुणांना संशोधन करण्याचा आणि आपल्या अभ्यासाच्या निष्कर्षांविषयी चर्चा करण्याचा अनुभव प्राप्त झाला. तुम्ही आपल्या मुलांसोबत ‘यहोवाच्या नियमशास्त्राचे अध्ययन’ करता का? यामुळे केवळ तुमचीच शिकवण्याची पद्धत अधिक सुधारणार नाही तर तुमच्या मुलांनाही राज्य प्रचाराच्या कार्यात सहभाग घेताना अधिक परिणामकारक शिक्षक होण्यास मदत मिळेल.

“त्याप्रमाणे करण्यासाठी”

एज्राने शिकलेल्या गोष्टींचे पालन केले. उदाहरणार्थ, बॅबिलोनमध्ये असताना कदाचित तो अगदी आरामशीर जीवन जगत असेल. पण परदेशात राहणाऱ्‍या आपल्या लोकांना आपण मदत करू शकतो हे त्याला समजताच त्याने बॅबिलोनचा ऐषाराम त्यागला आणि गैरसोयी, समस्या आणि धोकेदायक परिस्थिती असलेल्या दूरच्या जेरूसलेम शहरी जायचे त्याने ठरवले. एज्राने केवळ बायबलचे ज्ञान गोळा केले नाही तर शिकल्याप्रमाणे आचरण करण्यास तो तयार होता. —१ तीमथ्य ३:१३.

नंतर, एज्रा जेरूसलेममध्ये राहत असताना एज्राने पुन्हा हे दाखवून दिले की तो जे शिकला होता व शिकवत होता त्याप्रमाणे तो वागतही होता. इस्राएल पुरुषांनी विदेशी स्त्रियांशी विवाह केल्याचे त्याला समजले तेव्हा हे स्पष्ट झाले. बायबल सांगते, की त्याने “आपली वस्त्रे व झगा फाडून आपल्या डोक्याचे व दाढीचे केस तोडिले व चिंताक्रांत होऊन [तो] खाली बसला.” त्याला ‘लाज वाटू लागली, देवापुढे तोंड वर करण्यास शरम वाटू लागली.’—एज्रा ९:१-६.

देवाच्या नियमशास्त्राच्या अभ्यासाचा त्याच्यावर किती मोठा प्रभाव पडला होता! लोकांच्या आज्ञाभंजक वृत्तीमुळे होणाऱ्‍या भयंकर दुष्परिणामांची त्याला जाणीव होती. परतलेल्या यहूद्यांची संख्या कमी होती. त्यांनी विदेश्‍यांशी विवाह केल्यास ते सभोवतालच्या, मूर्तिपूजक राष्ट्रांत सामावले जाऊन शुद्ध उपासना सहज जगातून नाहीशी होण्याची शक्यता होती!

आनंदाची गोष्ट म्हणजे श्रद्धापूर्ण भीती व आवेश दाखवण्याच्या एज्राच्या अनुकरणीय उदाहरणामुळे इस्राएल लोकांना आपले मार्ग सुधारण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी आपल्या विदेशी पत्नींना त्यागले. तीन महिन्यांच्या आत सर्वकाही पूर्ववत झाले. देवाच्या नियमशास्त्राला एज्रा वैयक्‍तिकपणे निष्ठावान राहिल्यामुळे त्याने दिलेले शिक्षण परिणामकारक ठरण्यास हातभार लागला.

आजही हेच खरे आहे. एका ख्रिस्ती पित्याने म्हटले: “मुले तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागत नाहीत, तर तुम्ही जसे वागता तसेच ते देखील वागतात!” ख्रिस्ती मंडळीत देखील हेच तत्त्व लागू होते. उत्तम आदर्श मांडणारे वडील त्यांच्या शिकवणुकीला मंडळीकडून उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा करू शकतात.

“इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकविण्याकरता”

एज्राची शिकवणूक परिणामकारक असण्याचे आणखी एक कारण होते. त्याने आपले स्वतःचे विचार शिकवले नाहीत तर त्याने “नियम व निर्णय” शिकवले. याचा अर्थ त्याने यहोवाचे नियम किंवा कायदे शिकवले. याजक या नात्याने ही त्याची जबाबदारी होती. (मलाखी २:७) त्याने निर्णय अर्थात न्यायाचेही शिक्षण दिले आणि एका निश्‍चित आदर्शानुसार जे योग्य त्याला न्याय्य व अपक्षपातीपणे जडून राहण्याद्वारे त्याने स्वतःचे उत्तम उदाहरण मांडले. ज्यांच्या हातात अधिकार असतो ते न्यायाने वागतात तेव्हा स्थैर्य निर्माण होते आणि याचे कायमचे उत्तम परिणाम दिसून येतात. (नीतिसूत्रे २९:४) त्याचप्रकारे, देवाच्या वचनाशी सुपरिचित असणारे ख्रिस्ती वडील, पालक, आणि राज्य उद्‌घोषक देखील यहोवाचे नियम व न्याय मंडळीत, कुटुंबांत व आस्थेवाईक लोकांना शिकवत असताना आध्यात्मिक स्थैर्य वाढवण्यात योगदान देतात.

तुम्हीही विश्‍वासू एज्राच्या उदाहरणाचे पुरेपूर अनुकरण केल्यास तुमचे शिक्षण देखील अधिकाधिक परिणामकारक बनू शकेल असे तुम्हाला वाटत नाही का? म्हणूनच, ‘परमेश्‍वराच्या नियमशास्त्रातून सल्ला घेऊन, त्याप्रमाणे चाला आणि त्यातले नियम निर्णय शिकवा व आपल्या मनाची तयारी करा.’—एज्रा ७:१०.

[तळटीप]

^ परि. 11 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) या ग्रंथाच्या पहिल्या खंडात पृष्ठे ४४४-५ यांत २० संदर्भग्रंथांच्या नावांची यादी देण्यात आली आहे.

[२२ पानांवरील चौकट/चित्र]

एज्राने दिलेले शिक्षण कशामुळे परिणामकारक ठरले?

१. त्याने योग्य मनोवृत्ती निर्माण केली

२. त्याने यहोवाच्या नियमशास्त्रातून सल्ला घेतला

३. शिकत असलेल्या गोष्टींप्रमाणे वागण्याचे उत्तम उदाहरण त्याने मांडले

४. त्याने इतरांना शास्त्रवचनीय दृष्टिकोन शिकवण्याचा प्रयत्न केला