दया आणि करुणा दाखवण्यास साहाय्य करणारी सहानुभूती
दया आणि करुणा दाखवण्यास साहाय्य करणारी सहानुभूती
“जैसी इतरां दुःखा शमवे तैसी जीवना अर्थ राहे,” असे हेलन केलरने लिहिले. केलरला भावनिक दुःख समजत होते. १९ महिन्यांची असताना एका विकारामुळे ती पूर्णपणे अंधळी आणि बहिरी झाली. परंतु एका करुणामय शिक्षिकेने हेलनला ब्रेल लिपीतून लिहायला-वाचायला आणि नंतर बोलायलाही शिकवले.
केलरची शिक्षिका, ॲन सलिव्हन हिला शारीरिक अपंगत्व काय असते ते चांगल्याप्रकारे माहीत होते. ती स्वतःच जवळजवळ अंधळी होती. परंतु ॲनने अगदी धीराने हेलनबरोबर संवाद साधण्याचा एक मार्ग शोधून काढला; ती हेलनच्या हातावर एक एक अक्षर जणू काय ‘उच्चारायची.’ आपल्या शिक्षिकेने दाखवलेल्या सहानुभूतीने प्रेरित होऊन हेलनने अंधळ्या व बहिऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आपले जीवन वाहून घेण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच प्रयत्नांनंतर ती आपल्या अपंगत्वावर मात करू शकली; त्यामुळे तिच्यासारख्या परिस्थितीत असलेल्या लोकांबद्दल तिला कळवळा होता. ती त्यांना मदत करू इच्छित होती.
या स्वार्थी जगात, लोक इतरांबद्दल ‘कळवळा येऊ देत नाहीत,’ इतरांच्या गरजांकडे ते चक्क दुर्लक्ष करतात. (१ योहान ३:१७) परंतु, ख्रिश्चनांना आपल्या शेजाऱ्यांवर तसेच एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (मत्तय २२:३९; १ पेत्र ४:८) तरीपण, तुम्हाला कदाचित या वस्तुस्थितीची जाणीव असेल, की एकमेकांवर प्रेम करण्याची आपली कितीही इच्छा असली तरीसुद्धा अनेकदा आपण इतरांचे दुःख कमी करण्याच्या संधींकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला त्यांच्या गरजांची जाणीव नसते म्हणून कदाचित आपण असे करत असू. परंतु सहानुभूती ही अशी एक चावी आहे जी दया आणि करुणा दाखवण्यासाठी आपल्या अंतःकरणाची कवाडे उघडते.
सहानुभूती म्हणजे काय?
एक शब्दकोश म्हणतो, की सहानुभूती म्हणजे “प्रकृतिसाम्य, इतरांच्या भावना, त्यांचे हेतू जाणणे व समजणे.” स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवण्याची कल्पना, असाही सहानुभूतीचा एक अर्थ होतो. यास्तव, आपल्याला सहानुभूती दाखवायची असेल तर आधी आपण दुसऱ्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि मग, त्या परिस्थितीमुळे त्या व्यक्तीला अमुकप्रकारे वागण्यास प्रवृत्त करणाऱ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, सहानुभूतीचा अर्थ दुसऱ्याचे दुःख जणू काय आपण आपल्या काळजात अनुभवतो.
“सहानुभूती” हा शब्द बायबलमध्ये आढळत नसला तरी, बायबल या गुणाचा अप्रत्यक्ष उल्लेख करते. प्रेषित पेत्राने ख्रिश्चनांना, “समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू” होण्याचा सल्ला दिला. (१ पेत्र ३:८) “समसुखदुःखी” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ “दुःखाचा भागीदार” किंवा “कळवळा” असा होतो. “आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा” असे जेव्हा प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना सांगितले तेव्हा त्याच्या मनात हीच गोष्ट होती. पौल पुढे म्हणाला: “परस्पर एकचित्त असा.” (रोमकर १२:१५, १६) पण, आपण जर स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवले नाही तर आपल्याला स्वतःप्रमाणे आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करणे जवळजवळ अशक्यच होणार नाही का?
बहुतेक लोकांजवळ सहानुभूती हा गुण निसर्गतःच असतो. भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांना किंवा दैन्यावस्थेतील निर्वासित लोकांना पाहून कोणाच्या काळजाचे पाणी-पाणी होत नाही? कुठली आई आपल्या रडणाऱ्या बाळाकडे दुर्लक्ष करते? परंतु, जगात होणारे सर्वच दुःख आपल्याला लगेच समजून येत नाही. नैराश्य आलेल्या व्यक्तीच्या, गुप्त शारीरिक व्यंगत्व असलेल्या व्यक्तीच्या किंवा आहारासंबंधीचा विकार असलेल्या व्यक्तीच्या भावना समजणे—आणि तेही या समस्या जर आपण स्वतः कधी अनुभवल्या नसतील तर त्यांच्या भावना समजणे आणखीनच कठीण होते! तरीपण, शास्त्रवचनांत सांगितले आहे, की इतरांप्रमाणे आपली परिस्थिती नसली तरीसुद्धा आपण त्यांना सहानुभूती दाखवू शकतो, नव्हे दाखवली पाहिजे.
बायबलमधील सहानुभूतीची उदाहरणे
सहानुभूती दाखवण्यात यहोवाने सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडले. तो स्वतः परिपूर्ण असला तरी, मानवांकडून तो तशी अपेक्षा करीत नाही “कारण तो [आपली] प्रकृति जाणतो; [आपण] केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१४; रोमकर ५:१२) शिवाय, तो आपल्या मर्यादा जाणत असल्यामुळे ‘आपली परीक्षा आपल्या सहनशक्तीपलीकडे होऊ देत नाही.’ (१ करिंथकर १०:१३) आपले सेवक आणि आपला पवित्र आत्मा यांच्याद्वारे तो मार्ग काढायला आपली मदत करतो.—यिर्मया २५:४, ५; प्रेषितांची कृत्ये ५:३२.
आपल्या लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या यातना यहोवा देवाला जाणवतात. बॅबिलोनहून परतलेल्या यहुद्यांना त्याने सांगितले: “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो [माझ्या] डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जखऱ्या २:८) देवाच्या सहानुभूतीची जाणीव असलेला बायबल लेखक दावीद यहोवाला म्हणाला: “माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेविली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?” (स्तोत्र ५६:८) सचोटी कायम राखण्याकरता त्याच्या विश्वासू सेवकांनी जे अश्रू वाहिले त्यांची यहोवाला आठवण आहे—जणू ते त्याच्या वहीत नमूद आहेत. किती दिलासा देणारी ही गोष्ट!
आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणेच येशू ख्रिस्ताला लोकांच्या भावनांची संवेदना समजत होती. एका बहिऱ्या माणसाला बरे करताना त्याने त्याला लोकांपासून बाजूला नेले; चमत्कारिकरीत्या बरे झाल्यावर या मनुष्याला लाजीरवाणे वाटू नये किंवा आश्चर्याने तो गोंधळून जाऊ नये म्हणून कदाचित त्याने त्याला बाजूला नेले असावे. (मार्क ७:३२-३५) दुसऱ्या एका प्रसंगी येशूने, एकुलत्या एका मुलाला पुरण्यासाठी नेणाऱ्या विधवेला पाहिले. तिला होणारे अतीव दुःख त्याने ओळखले; तो अंत्ययात्रेजवळ गेला आणि त्याने त्या मृत तरुणाचे पुनरुत्थान केले.—लूक ७:११-१६.
येशूच्या पुनरुत्थानानंतर दिमिष्काजवळ तो शौलाला प्रकट झाला तेव्हा, शौलाने आपल्या शिष्यांचा जो क्रूर छळ चालवला होता त्याविषयी त्याला काय वाटत होते हे त्याने शौलाला सांगितले. तो त्याला म्हणाला: “ज्या येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.” (प्रेषितांची कृत्ये ९:३-५) आपल्या आजारी मुलाचे दुःख पाहून जशी एक आई हेलावून जाते तसेच आपल्या शिष्यांना होणाऱ्या यातना येशूला जाणवल्या. आणि, आपला स्वर्गीय महायाजक या नात्याने येशूला ‘आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी सहानुभूती वाटते,’ किंवा रॉथरहॅम भाषांतरानुसार, त्याला ‘आपल्या दुर्बलतेसंबंधी समभावना’ आहे.—इब्री लोकांस ४:१५.
२ करिंथकर ११:२९) एका देवदूताने चमत्कारिकरीत्या पौल आणि सीलाची एका फिलिप्पी तुरुंगातून सुटका केली तेव्हा पौलाच्या मनात सर्वात पहिला विचार आला तो हा, की कोणीही तुरुंगातून पळून गेले नव्हते हे तुरुंगाधिकाऱ्याच्या कानावर घालायचे. कोणी जर पळून गेले तर तुरुंगाधिकारी कदाचित आत्महत्या करेल हे पौलाने लगेच जाणले. पौलाला माहीत होते, की एखादा कैदी जर पळून गेला आणि खासकरून तुरुंगाधिकाऱ्याला त्याच्यावर बंदोबस्त ठेवण्याची आधीच सूचना मिळालेली असतानासुद्धा जर तो पळून गेला, तर रोमी प्रथेनुसार त्या तुरुंगाधिकाऱ्याला कडक शिक्षा व्हायची. (प्रेषितांची कृत्ये १६:२४-२८) पौलाच्या या जीवन वाचवणाऱ्या दयाळू कृत्यामुळे तुरुंगाधिकारी प्रभावीत झाला आणि त्याने तसेच त्याच्या घराण्याने ख्रिस्ती होण्यासाठी पावले उचलली.—प्रेषितांची कृत्ये १६:३०-३४.
प्रेषित पौल, इतरांच्या दुःखाची व भावनांची जाणीव बाळगायला शिकला. “एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळविला गेला तर मला संताप येत नाही काय?” असे त्याने विचारले. (सहानुभूती कशी विकसित करावी
शास्त्रवचनांत वारंवार आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याचे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्याचे उत्तेजन देण्यात आल्यामुळे आपण सर्वांनी सहानुभूती हा गुण विकसित करणे महत्त्वाचे आहे. हे आपण कसे करू शकतो? तीन मार्गांद्वारे आपण, इतरांच्या गरजांची आणि भावनांची जाणीव वाढवू शकतो: लक्षपूर्वक ऐकण्याद्वारे, पाहण्याद्वारे आणि कल्पना करण्याद्वारे.
लक्षपूर्वक ऐका. लक्ष देऊन ऐकल्यामुळे इतरांना कोणत्या समस्या आहेत हे आपल्याला समजते. आपण जितके लक्षपूर्वक त्यांचे बोलणे ऐकू तितके अधिक ते आपल्याजवळ त्यांचे मन मोकळे करतील, आपल्या भावना व्यक्त करतील. मिरियम म्हणते: “हे वडील माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात असा मला भरवसा वाटतो तेव्हा मी त्यांच्याशी बोलू शकते. वडिलांना माझी समस्या समजली आहे का, हे मला कळलं पाहिजे. माझं बोलणं त्यांनी लक्षपूर्वक ऐकलं आहे आणि त्यामुळेच ते मला शोधक प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्यावरील माझा भरवसा आणखी वाढतो.”
पाहा. सर्वच लोक, आपल्याला कसे वाटत आहे किंवा आपल्यावर काय गुदरत आहे हे उघडपणे सांगणार नाहीत. पण, एखादा सहख्रिस्ती निराश झाला आहे, एखादा किशोरवयीन बोलेनासा झाला आहे किंवा एक आवेशी सेवक त्याचा आवेश गमावत चालला आहे हे, एका चाणाक्ष व्यक्तीच्या पटकन नजरेत येते. समस्येची नुकतीच सुरवात झालेली असते तेव्हा तिची जाणीव होण्याची क्षमता खासकरून पालकांमध्ये असली पाहिजे. मारी म्हणते: “माझ्या आईला मी काही सांगायच्या आधीच मला कसं वाटतंय ते तिला माहीत असतं, त्यामुळे माझी काय समस्या आहे हे मी तिच्याशी अगदी खुल्या मनानं बोलू शकते.”
कल्पना करा. आपल्यातील सहानुभूतीला जागे करण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग म्हणजे स्वतःला पुढील प्रश्न विचारणे: ‘मी या परिस्थितीत असतो, तर मला कसं वाटलं असतं? मी काय केलं असतं? मला कशाची गरज भासली असती?’ ईयोबाचे तीन खोटे सांत्वनकर्ते, स्वतःला ईयोबाच्या परिस्थितीत ठेवण्यात अपयशी ठरले. म्हणूनच, ईयोबाने कदाचित काही पापे केली असतील असे गृहीत धरून त्यांनी त्याला दोषी ठरवले.
अपरिपूर्ण मानवांना, इतरांच्या भावना समजायला जितके कठीण जाते तितकेच त्यांची टीका करायला सोपे जाते. परंतु, एखाद्यावर आलेल्या पीडेमुळे त्याला होणाऱ्या दुःखाची आपण कल्पना करायचा प्रयत्न केला तर त्याची टीका करण्यापेक्षा आपण त्याला सहानुभूती दाखवू. क्वान नावाचे वडील म्हणतात: “सूचना द्यायला सुरवात करण्याआधी मी लक्षपूर्वक ऐकतो आणि एकंदर परिस्थिती समजून घेतो तेव्हा मी उत्तम सल्ला देऊ शकतो.”
या बाबतीत, यहोवाचे साक्षीदार देत असलेल्या प्रकाशनांद्वारे अनेकांना मदत मिळाली आहे. नैराश्य आणि लहान
मुलांबरोबरचा दुर्व्यवहार यांसारख्या अगदी क्लिष्ट समस्यांची चर्चा टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांत केली आहे. उचित वेळी आलेली ही माहिती वाचकांना, अशाप्रकारे दुःख सहन करणाऱ्या लोकांच्या भावनांची जाणीव बाळगायला मदत करते. शिवाय, तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे या पुस्तकानेसुद्धा पुष्कळ पालकांना आपल्या मुलांच्या समस्या समजण्यास मदत केली आहे.ख्रिस्ती कार्यात साहाय्य करणारी सहानुभूती
भुकेने व्याकूळ झालेले मूल आपण पाहतो आणि आपल्याजवळ त्याला द्यायला अन्न असेल तर आपण त्याच्या दयनीय स्थितीकडे निश्चितच दुर्लक्ष करणार नाही. तसेच, आपण सहानुभूतीशील असलो तर एखाद्याची आध्यात्मिक स्थिती आपल्याला लगेच समजेल. येशूविषयी बायबल असे म्हणते: “लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) आज लाखो लोकांची आध्यात्मिक स्थिती अतिशय दयनीय आहे, त्यांना मदतीची आवश्यकता आहे.
येशूच्या दिवसांप्रमाणे आज आपल्याला देखील, काही लोकांच्या हृदयाप्रत पोहंचण्याकरता पूर्वग्रह किंवा आधीपासूनच मनात रुजलेल्या परंपरांवर मात करावी लागेल. सहानुभूतीशील सेवक आपला संदेश आणखी अपीलकारक बनवण्यासाठी, समान आवडीच्या किंवा लोकांच्या मनात असलेल्या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करतो. (प्रेषितांची कृत्ये १७:२२, २३; १ करिंथकर ९:२०-२३) फिलिप्पी तुरुंगाधिकाऱ्याच्या बाबतीत घडले तसे, सहानुभूतीने प्रेरित होऊन केलेल्या दयाळू कार्यांमुळे देखील लोक आपला राज्य संदेश ऐकतील.
मंडळीतील इतरांच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करण्यासाठी सहानुभूती अत्यंत मोलाची आहे. आपले मन दुखावणाऱ्या बांधवाच्या भावना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करायला आपल्याला सोपे जाईल. आपण त्याच्या जागी असतो आणि त्याच्याप्रमाणेच आपलीही परिस्थिती असती तर आपणही अशाच प्रकारे वागलो असतो. यहोवाच्या सहानुभूतीमुळे ‘आपण केवळ माती आहो’ हे जर तो जाणत असेल तर, आपल्या सहानुभूतीमुळे आपणही इतरांच्या अपरिपूर्णतांचा विचार करून त्यांना अगदी मोठ्या मनाने “क्षमा” करू नये का?—स्तोत्र १०३:१४; कलस्सैकर ३:१३.
चूक करणाऱ्या व्यक्तीच्या भावनांचा आणि संवेदनांचा आपण विचार केला तर कदाचित आपण दयाळूपणे त्याला सल्ला देऊ. सहानुभूती असलेला ख्रिस्ती वडील स्वतःला नेहमी याची आठवण करून देईल की: ‘माझ्याकडूनसुद्धा ही चूक झाली असती. मीही त्याच्या जागी असू शकलो असतो.’ म्हणूनच, पौल अशी शिफारस करतो: ‘अशा [व्यक्तीला] सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तुम्हीही परिक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.’—गलतीकर ६:१.
मदत करणे आपल्या कुवतीत असेल व एखादा सहख्रिस्ती ती मागायला कचरत असला तरी, सहानुभूती आपल्याला व्यावहारिक मदत द्यायला प्रवृत्त करते. प्रेषित योहानाने लिहिले: “मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधु गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीति कशी राहणार? . . . आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी.”—१ योहान ३:१७, १८.
“कृतीने व सत्याने” प्रीती करण्यासाठी आपण आधी आपल्या बांधवांच्या विशिष्ट गरजा काय आहेत ते पाहिले पाहिजे. इतरांना मदत करण्याच्या दृष्टीने आपण त्यांना कशाची आवश्यकता आहे हे काळजीपूर्वक पाहतो का? यालाच सहानुभूती म्हणतात.
सहानुभूती विकसित करा
आपण स्वभावतःच कदाचित सहानुभूतीशील नसू, तरीपण आपण हा गुण अंगी विकसित करू शकतो. आपण जर लक्षपूर्वक ऐकले, काळजीपूर्वक पाहिले आणि जवळजवळ नेहमी स्वतःला इतरांच्या जागी ठेवले तर आपली सहानुभूती वाढेल. यामुळे आपण आपल्या मुलांना, ख्रिस्ती बंधूभगिनींना व आपल्या शेजाऱ्यांना अधिक प्रेम, दया आणि करुणा दाखवण्यास प्रेरित होऊ.
गर्विष्ठपणामुळे तुमच्यातील सहानुभूतीच्या आत्म्याला गुदमरू देऊ नका. पौलाने लिहिले: “तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेहि पाहा.” (फिलिप्पैकर २:४) आपले सार्वकालिक भवितव्य, यहोवा आणि महायाजक येशू ख्रिस्त यांच्या सहानुभूतीवर निर्भर आहे. त्यामुळे हा गुण विकसित करण्याची आपलीही नैतिक जबाबदारी आहे. आपली सहानुभूती आपल्याला उत्तम सेवक आणि उत्तम पालक बनण्यासाठी शक्ती देईल. आणि या सर्वाहून महत्त्वाचे म्हणजे, “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे” हे समजायला आपल्याला मदत करेल.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
[२५ पानांवरील चित्र]
मदतीच्या भावनेने इतरांच्या गरजांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे म्हणजे सहानुभूती दाखवणे
[२६ पानांवरील चित्र]
आपल्या लेकराबद्दल एका प्रेमळ आईला ज्याप्रकारची माया असते त्याप्रकारची सहानुभूती दाखवण्यास आपल्याला शिकता येईल का?