यशस्वी होण्याचे रहस्य काय?
यशस्वी होण्याचे रहस्य काय?
दोघा साहसी तरुणांनी मिळून एका निराळ्याच यंत्राची निर्मिती केली होती, ते त्याची तपासणी करून पाहत होते; ती वेळ त्यांच्यासाठी फार महत्त्वाची होती. तितक्यात सुसाट्याचा वारा आला नि ते नाजूकसे यंत्र हवेच्या झोताने उचलले जाऊन खाली कोसळले आणि त्याचा पार चुरा चुरा झाला. यंत्राची ती दशा पाहून ते दोघे हवालदिल झाले. त्यांची सगळी मेहनत मातीला मिळाली होती.
तो १९०० सालामधील ऑक्टोबरचा महिना होता; पण ऑर्व्हिल आणि विल्बर राईट यांना हवेपेक्षा जड उड्डाण यंत्र बनवताना अशी निराशा काही पहिल्यांदाच आली नव्हती. या आधी त्यांनी बरीच वर्षे असे प्रयोग केले होते आणि त्यासाठी भरपूर पैसाही ओतला होता.
सरतेशेवटी, सातत्याच्या प्रयत्नांचे फळ त्यांच्या पदरी पडले. डिसेंबर १७, १९०३ साली राईट बंधूंनी किटी हॉक, उत्तर कॅरोलिना, अमेरिका येथे मोटार बसवलेल्या विमानाच्या प्रतिकृतीचे पहिले यशस्वी उड्डाण केले; हे उड्डाण अवघे १२ सेकंद टिकले—आजच्या विमानांच्या तुलनेत हे अंतर फारच लहान असले तरी सबंध जगभरात बदल घडवून आणण्याइतके मोठे नक्कीच होते!
प्रयत्नांती परमेश्वर हेच बहुतेकदा खरे ठरते. नवीन भाषा शिकायची असली, एखादे कौशल्य हस्तगत करायचे असले किंवा मैत्री वाढवायची असली तरी चिकाटी ही फार आवश्यक असते आणि अशा चिकाटीनेच या मोलाच्या गोष्टी हस्तगत करता येतात. लेखक चार्ल्झ टेम्पलटन म्हणतात की, “दहापैकी नऊ वेळा यश मिळते ते कठीण परिश्रमामुळेच.” स्तंभलेखक लेनर्ड पिट्स ज्युनियर म्हणतात: “आपण कौशल्याच्या आणि नशीबाच्या गोष्टी करतो पण कोणत्याही कामाकरता मेहनतीची गरज आहे आणि अनेकदा अपयशच हाती लागत असते तसेच लवकर कामाला सुरवात करून उशिरापर्यंत काम करावे अशा महत्त्वाच्या बाबींकडे आपण कानाडोळा करतो.”
बायबलमध्येही बऱ्याच वर्षांआधी असे म्हटले होते: “कष्ट करणाऱ्यांच्या हाती सत्ता येईल.” (नीतिसूत्रे १२:२४, मराठी कॉमन लँग्वेज) कष्ट करणे म्हणजे सातत्याने प्रयत्न करत राहणे. आपल्याला यश हवे असेल तर सातत्याने प्रयत्न करत राहणे फार आवश्यक आहे. सातत्याने प्रयत्न करणे म्हणजे काय? आपली ध्येये साध्य करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न कसा करू शकतो आणि कशासाठी सातत्याने प्रयत्न करावा? पुढच्या लेखामध्ये या प्रश्नांची उत्तरे सापडतील.
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
U.S. National Archives photo