देवाच्या भविष्यसूचक वचनात भविष्याची आशा!
देवाच्या भविष्यसूचक वचनात भविष्याची आशा!
देवाच्या वचनामुळे अर्थात पवित्र बायबलमुळे खऱ्या ख्रिश्चनांना भविष्याबद्दल विश्वास व आशा लाभली आहे; भविष्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. यहोवा देवासोबत नातेसंबंध असल्याने त्यांना सुरक्षित वाटते आणि म्हणून ते भविष्याकडे डोळे लावून आहेत. “देवाचे भविष्यसूचक वचन” या प्रांतीय अधिवेशनांमधील सुरवातीच्या भाषणात स्पष्ट केल्यानुसार यहोवाचे साक्षीदार अनेक वर्षांपासून बायबलमधील भविष्यवाणींचा खोलवर अभ्यास करत आहेत. तर मग, या अधिवेशनांमध्ये यहोवाने आपल्या लोकांसाठी कोणता खजिना राखून ठेवला आहे? याबद्दल बायबलमधून जाणून घ्यायला तेथे उपस्थित असलेले सगळेजण अगदी उत्सुक होते. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसाचा विषय उपशीर्षकाच्या रूपात दिला आहे.
पहिला दिवस: देवाच्या वचनाच्या उजेडात चालणे
“देवाच्या वचनाने मार्गदर्शित झालेले” या भाषणात यहोवाच्या लोकांची तुलना रात्रीच्या अंधारात प्रवासाला निघालेल्या एका माणसाशी केली आहे. सूर्य उगवू लागतो तेव्हा त्याला अंधुकसे दिसू लागते; पण सूर्य डोक्यावर येतो तेव्हा सर्वकाही त्याला स्पष्ट दिसू लागते. नीतिसूत्रे ४:१८ मध्ये सांगितल्यानुसार, देवाच्या भविष्यसूचक वचनातील सत्याच्या प्रखर उजेडात यहोवाच्या लोकांना त्यांचा मार्ग अगदी स्पष्ट दिसू लागला आहे. आध्यात्मिक अंधकारात ते चाचपडत नाहीत.
“देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या” या मुख्य भाषणातून श्रोत्यांना आठवण करून देण्यात आली की, खोट्या मशीहांमागे आणि खोट्या संदेष्ट्यांमागे धावणाऱ्यांची जशी निराशा होते तशी यहोवाकडून मार्गदर्शन मिळवणाऱ्यांची निराशा होत नाही. खरा मशीहा, येशू ख्रिस्त याची पात्रता या खोट्या मशीहांपुढे आणि संदेष्ट्यांपुढे अतुलनीय आहे! उदाहरणार्थ, चमत्कारिक पद्धतीने झालेल्या येशूच्या रूपांतरामुळे देवाच्या राज्यात तो सिंहासनावर बसलेला राजा आहे याची पूर्वझलक मिळाली. १९१४ मध्ये येशूच्या हाती राज्य सत्ता आल्यापासून तो २ पेत्र १:१९ मध्ये उल्लेखलेला “पहाटचा तारा” देखील आहे. “हा पहाटचा तारा मशीहा असल्यामुळे तो सर्व आज्ञाधारक मानवजातीसाठी असलेल्या एका नवीन दिवसाची किंवा नवीन युगाची घोषणा करतो,” असे वक्ता म्हणाला.
“ज्योतिसारखे जगात दिसणे” या दुपारच्या कार्यक्रमातील पहिल्या भाषणात इफिसकर ५:८ वर अधिक चर्चा केली होती; त्या वचनात पौल आपल्याला म्हणतो, “प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला.” ख्रिस्ती जन, केवळ देवाच्या वचनातील गोष्टींबद्दल इतरांना सांगतात म्हणून ज्योतिसमान आहेत असे नाही तर येशूचे अनुकरण करून आपल्या जीवनात बायबलचे पालन करतात म्हणून ज्योतिसमान आहेत.
अशाप्रकारचा प्रकाश असण्याकरता “देवाचे वचन वाचण्याची आवड निर्माण करणे” जरूरीचे आहे. या विषयाची हाताळणी तीन भागांच्या परिसंवादात करण्यात आली. बायबल म्हणजे “देवाने मनुष्याला दिलेली सर्वात उत्तम देणगी” आहे असे उद्गार अब्राहाम लिंकनने काढले; हा उल्लेख केल्यानंतर, पहिल्या वक्त्याने श्रोत्यांना विचारले, यहोवाच्या वचनासाठी किती कदर आहे याबद्दल बायबलच्या आपल्या वाचनावरून काय प्रकट होते? श्रोत्यांना उत्तेजन देण्यात आले की त्यांनी लक्षपूर्वक बायबलचे वाचन करावे, वेळ काढून शास्त्रवचनांतील अहवालांचे चित्र डोळ्यासमोर उभे करायचा प्रयत्न करावा आणि नवीन मुद्द्यांचा संबंध आधी वाचलेल्या गोष्टींशी लावावा.
परिसंवादाच्या नंतरच्या भागात यावर जोर देण्यात आला की, “जड अन्न” पचवण्यासाठी फक्त वर वर वाचन करून फायदा नाही तर अभ्यास करण्याची गरज आहे. (इब्री लोकांस ५:१३, १४) इस्राएली राजा एज्रा याने जसा “निश्चयच केला होता” तसेच आपणही केले तर अभ्यासातून आपली उभारणी होईल असे वक्ता म्हणाला. (एज्रा ७:१०) पण अभ्यास इतका महत्त्वपूर्ण का आहे? कारण यहोवासोबतच्या आपल्या नात्याशी त्याचा थेट संबंध आहे. यास्तव, बायबलचा अभ्यास आपल्याकरता मोलाचा असायला हवा, त्याचप्रमाणे त्यातून आनंद आणि तजेला मिळायला हवा—मग त्याकरता आपल्याला स्वतःच्या मनाला वळण द्यावे लागले आणि फार प्रयत्न करावा लागला तरीही. अर्थपूर्ण अभ्यासासाठी आपल्याला वेळ कसा मिळू शकतो? कमी महत्त्वाच्या कार्यहालचालींमध्ये वेळ घालवण्याऐवजी “वेळेचा सदुपयोग” करून वेळ मिळवता येऊ शकतो असे परिसंवादाच्या शेवटच्या वक्त्याने म्हटले. (इफिसकर ५:१६) आपल्याला वेळ काढायचा असेल तर आपल्याजवळ असलेल्या वेळेचा सदुपयोग करणे हाच सर्वात उत्तम उपाय होय.
“थकलेल्यांना देव सामर्थ्य देतो” या भाषणात असे म्हटले होते की, आज पुष्कळजण थकलेले आहेत. ख्रिस्ती सेवाकार्यासाठी आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ मिळावे म्हणून आपल्याला यहोवावर विसंबून राहण्याची आवश्यकता आहे कारण तो “थकलेल्याला शक्ति देतो.” (२ करिंथकर ४:७; यशया ४०:२९) देवाचे वचन, प्रार्थना, ख्रिस्ती मंडळी, सेवाकार्यामधील नियमित सहभाग, ख्रिस्ती पर्यवेक्षक आणि इतर विश्वासू जणांची उदाहरणे या सर्व गोष्टींमुळे बळकटी मिळते. “तुम्ही शिक्षक व्हायला हवे होता” या विषयानेच हे दाखवून दिले की, ख्रिश्चनांनी शिक्षक असण्याची गरज आहे; त्याचसोबत त्यांनी प्रचारकही असले पाहिजे आणि ‘शिक्षणाची [कला]’ विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.—२ तीमथ्य ४:२.
त्या दिवसाच्या शेवटल्या भाषणाचा विषय होता, “देवाचे विरोधक जास्त काळ टिकणार नाहीत.” त्यात, काही देशांमध्ये अलीकडेच यहोवाचे साक्षीदार एका हानीकारक पंथाचे सदस्य आहेत असे सांगून लोकांची कशी दिशाभूल केली होती त्याविषयी सांगण्यात आले. पण आपण घाबरू नये कारण यशया ५४:१७ मध्ये म्हटले आहे: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
दुसरा दिवस: भविष्यसूचक शास्त्रवचनांतून प्रकट केलेल्या गोष्टी
त्या दिवसासाठी असलेले बायबलमधील वचन वाचून त्यावर चर्चा केल्यावर, “ज्योतिवाहक या नात्याने यहोवाचे
गौरव करणे” हा विषय असलेला अधिवेशनातील दुसरा परिसंवाद झाला. पहिल्या भाषणातून हे दाखवण्यात आले की, सगळीकडे प्रचार करण्याद्वारे यहोवाचे गौरव करणे हे एका ख्रिस्ती व्यक्तीचे ध्येय असले पाहिजे. त्यानंतरच्या भागात हे सांगण्यात आले की, प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तींना देवाच्या संघटनेकडे निर्देशित करण्याची गरज आहे. हे कसे करता येईल? प्रत्येक गृह बायबल अध्ययनाच्या आधी किंवा नंतर पाच किंवा दहा मिनिटांसाठी देवाच्या संघटनेचे कार्य कसे चालते हे दाखवण्याद्वारे. या परिसंवादाच्या तिसऱ्या भाषणात उत्तम कार्यांद्वारे देवाचे गौरव करण्याची गरज आहे यावर जोर देण्यात आला.“यहोवाच्या स्मरणिकांबद्दल अत्याधिक आवड बाळगा” या भाषणामध्ये स्तोत्र ११९ मधील काही निवडक वचनांची चर्चा करण्यात आली. आपल्याला काही गोष्टींची वारंवार आठवण करून द्यावी लागते कारण सर्वच गोष्टी आपल्या स्मरणात राहत नाहीत. म्हणूनच, स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही यहोवाच्या या स्मरणिकांबद्दल आवड बाळगावी हे किती महत्त्वाचे आहे.
त्यानंतर एक खास भाग होता—बाप्तिस्म्याचे भाषण. त्याचा विषय होता “भविष्यसूचक वचन बाप्तिस्म्यापर्यंत पोहंचवते.” बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना ही आठवण करून देण्यात आली की, फक्त बाप्तिस्मा घेतल्याने ते ख्रिस्ताचे अनुकरण करत नाहीत तर त्यासोबतच ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतात. (१ पेत्र २:२१) या नवोदितांना योहान १०:१६ च्या पूर्णतेमध्ये सहभागी होण्याचा केवढा विशेषाधिकार आहे. त्या वचनात येशूने भाकीत केले की, आत्म्याने अभिषिक्त असलेल्या आपल्या शिष्यांसोबत सेवा करण्यासाठी तो ‘दुसऱ्या मेंढरांना’ गोळा करील.
दुपारच्या कार्यक्रमातील पहिले भाषण होते “पवित्र आत्म्याचे ऐका.” त्या भाषणात समजावण्यात आले होते की, बायबल, ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ आणि बायबलने प्रशिक्षित केलेला आपला विवेक यांद्वारे यहोवाचा आत्मा आपल्याशी बोलतो. (मत्तय २४:४५) यास्तव, देवाला कशाप्रकारे संतुष्ट करावे हे जाणण्यासाठी ख्रिश्चनांना स्वर्गातून प्रत्यक्ष वाणी ऐकू येण्याची आवश्यकता नाही. “ईश्वरी भक्तीच्या एकवाक्यतेत असलेल्या शिकवणीलाच पाठिंबा देणे” या नंतरच्या विषयामध्ये ख्रिश्चनांना असे आर्जवण्यात आले की त्यांनी जगाचे दिशाभूल करणारे सल्ले अनुसरण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या उत्सुकतेवर नियंत्रण न ठेवल्यामुळे कदाचित धर्मत्यागी आणि सैतानाच्या इतर लोकांनी प्रकाशित केलेली माहिती वाचण्याचा आपण प्रयत्न करू. त्याऐवजी, बायबलचे त्याचप्रमाणे टेहळणी बुरूज आणि सावध राहा! पत्रिकांमधील लेखांचे नियमित वाचन करणे किती बरे राहील?
“सुवचनांचा नमुना दृढपणे राख” असा विषय असलेल्या पुढील भाषणामध्ये, सत्याचा शास्त्रवचनीय “नमुना” किंवा रचना पूर्णपणे जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे यावर जोर देण्यात आला. (२ तीमथ्य १:१३) हा नमुना समजून घेतल्याने आपण केवळ ईश्वराचे भक्तच होत नाही तर सत्याच्या एकवाक्यतेत नसलेल्या गोष्टी आपल्याला ओळखताही येतात.
यहोवा तुम्हाला मोलवान समजत असेल तर ही केवढी सन्मानाची गोष्ट! “‘मोलवान वस्तूंनी’ यहोवाचे मंदिर भरले जात आहे” हे हाग्गयच्या भविष्यवाणीवर आधारलेले भाषण फारच प्रोत्साहनदायक होते; कारण त्यातून श्रोत्यांना अशी खात्री मिळाली की ‘मोठ्या लोकसमुदायातल्या’ प्रत्येक सदस्याला यहोवा खरोखर मोलवान समजतो. (प्रकटीकरण ७:९) म्हणून, अशा निवडक लोकांना, येणाऱ्या मोठ्या संकटात जेव्हा यहोवा राष्ट्रांना शेवटल्या वेळी ‘हलवून सोडेल’ तेव्हा वाचवेल. (हाग्गय २:७, २१, २२; मत्तय २४:२१) परंतु, त्यादरम्यान यहोवाच्या लोकांनी आध्यात्मिकरित्या सतर्क राहिले पाहिजे हीच गोष्ट “भविष्यसूचक शास्त्रवचने सतर्क राहण्यास मदत करतात” या भाषणात समजावण्यात आली होती. वक्त्याने येशूचे शब्द उद्धृत केले: “म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मत्तय २४:४२) आध्यात्मिक दक्षता आपण कशी बाळगू शकतो? यहोवाच्या सेवेत व्यस्त राहण्याद्वारे, सतत प्रार्थना करण्याद्वारे आणि यहोवाच्या महान दिवसाची वाट पाहण्याद्वारे.
दुसऱ्या दिवसाच्या शेवटल्या भाषणाचा विषय होता, “शेवटल्या काळात भविष्यसूचक वचन.” हे भाषण कित्येक वर्षांपर्यंत आपल्या लक्षात राहील. का? कारण वक्त्याने दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) या नवीन पुस्तकाचे अनावरण केले. सुंदर चित्रे असलेल्या ३२० पृष्ठांच्या या प्रकाशनात दानीएलाच्या पुस्तकातल्या प्रत्येक भागावर चर्चा केली आहे. यहोवा आपल्या भविष्यसूचक वचनावर प्रकाश टाकत आहे याचा किती हा विश्वासाला उभारणीकारक पुरावा!
तिसरा दिवस: देवाचे भविष्यसूचक वचन कधीही टळत नाही
अधिवेशनाच्या शेवटल्या दिवसाची सुरवात, “नियुक्त समयासाठी भविष्यसूचक वचने” या परिसंवादाने झाली. परिसंवादाच्या तिन्ही भागांमध्ये संदेष्टा हबक्कूक याने केलेल्या
यहोवाच्या न्यायदंडांच्या तीन घोषणांचे परीक्षण करण्यात आले. यहूदाच्या लहरी राष्ट्राविरुद्ध एक घोषणा करण्यात आली आणि दुसरी घोषणा होती जुलमी बॅबिलोनविरुद्ध. शेवटची घोषणा (जी अद्याप पूर्ण व्हायची आहे) सर्व दुष्ट मानवांच्या लवकरच होणाऱ्या नाशाच्या बाबतीत आहे. परिसंवादातील शेवटल्या बांधवाने हर्मगिद्दोनविषयी म्हटले की, “यहोवा पूर्णतः आपले महान सामर्थ्य प्रकट करील तेव्हा ते अगदी भयप्रेरक असेल.” असे म्हणून त्यांनी श्रोतेगणांमध्ये बऱ्यापैकी ईश्वरी भय निर्माण केले.“आपल्या ख्रिस्ती वारशाबद्दल कदर बाळगणे” हा विषय होता अधिवेशनातल्या हृदयस्पर्शी बायबल-आधारित नाटकाचा. आत्म-परीक्षण करायला लावणाऱ्या या नाटकात याकोब आणि एसाव या दोघांची आध्यात्मिक गोष्टींबद्दलची मनोवृत्ती केवढी वेगळी होती हे दाखवण्यात आले. एसावने आपला आध्यात्मिक वारसा झिडकारला म्हणून तो याकोबाला देण्यात आला आणि याकोबाने त्याबद्दल कदर व्यक्त केली. यानंतर श्रोत्यांना विचारण्यात आले, “यहोवाने आपल्याला कोणता [आध्यात्मिक वारसा] दिला आहे?” “त्याच्या वचनातील अर्थात बायबलमधील सत्य, सार्वकालिक जीवनाची आशा आणि सुवार्तेचे घोषक या नात्याने त्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान” असे वक्त्याने उत्तर दिले.
पुढील भागाचा विषय होता, “आपला मौल्यवान वारसा आपल्याकरता काय अर्थ राखून आहे?” यहोवाच्या सेवेला प्राधान्य देऊन आणि आध्यात्मिक विशेषाधिकारांना व्यक्तिगत किंवा भौतिक गोष्टींपेक्षा महत्त्वाचे मानून आपण आपल्या आध्यात्मिक वारशाबद्दल योग्य मनोवृत्ती राखतो. अशाप्रकारे, यहोवा देवासोबतच्या नातेसंबंधाला आपण आपल्या जीवनात सर्वप्रथम स्थान देतो आणि आदाम, एसाव व अविश्वासू इस्राएली लोक यांपेक्षा अगदी भिन्न मनोवृत्ती दाखवतो.
“भाकीत केल्याप्रमाणे सर्वकाही नवे करणे” या जाहीर भाषणामध्ये “नवे आकाश” आणि “नवी पृथ्वी” यांसंबंधी चार मुख्य भविष्यवाण्या जोडण्यात आल्या होत्या. (यशया ६५:१७-२५; ६६:२२-२४; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१, ३-५) स्पष्टतः, सा.यु.पू. ५३७ मध्ये आपल्या पुनर्स्थापित लोकांबाबत या भविष्यवाणींची जी पूर्णता झाली त्यापेक्षा मोठी पूर्णता होण्याचे यहोवाने उद्देशिले होते. होय, त्याच्या मनात त्याचे राज्य सरकार (“नवे आकाश”) आणि पृथ्वीवरील प्रजा (“नवी पृथ्वी”) होती जी सबंध पृथ्वीवर येणाऱ्या बागेसमान भव्य वातावरणात राहणार होती.
“देवाचे वचन मार्गदर्शन करत असता आपल्या अपेक्षा” या स्फुर्ती देणाऱ्या आणि प्रेरक भाषणाने अधिवेशन समाप्त झाले. राज्याची घोषणा करण्याच्या कामासाठी “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे” अशी सर्वांना आठवण करून देण्यात आली. (१ करिंथकर ७:२९) होय, यहोवाने सैतान आणि त्याच्या संपूर्ण दुष्ट व्यवस्थीकरणासाठी राखून ठेवलेल्या न्यायाची पूर्णता होण्याच्या काळातच आपण सध्या जगत आहोत. यास्तव, आपल्या भावनाही स्तोत्रकर्त्यासारख्याच असाव्यात, त्याने असे गायिले: “आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे; आमचे साहाय्य व ढाल तोच आहे.” (स्तोत्र ३३:२०) देवाच्या भविष्यसूचक वचनानुसार ज्यांनी आपल्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्यांच्यासमोर केवढे हे भव्य भवितव्य!
[७ पानांवरील चित्र]
या नाटकामुळे यहोवाच्या सेवकांची आपल्या आध्यात्मिक वारशाबद्दल कदर वाढली आणि त्यांना प्रोत्साहनही मिळाले
[७ पानांवरील चित्र]
देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष दिलेल्या अनेकांचा बाप्तिस्मा झाला