टॉवर ब्रिज लंडनचे प्रवेशद्वार
टॉवर ब्रिज लंडनचे प्रवेशद्वार
ब्रिटनमधील सावध राहा! लेखकाकडून
इंग्लंडला पूर्वी कधी भेट न दिलेले विदेशी यात्री लगेच याला ओळखतात. हजारो पर्यटक वर्षाकाठी याला पाहायला येतात. दररोज, लंडनचे रहिवासी याच्याकडे लक्ष न देता किंवा तो अस्तित्वात कसा आला याचा कसलाही विचार न करता तो पार करतात. होय, टॉवर ब्रिज हा लंडनच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी सर्वोत्तम आहे.
पण टॉवर ब्रिज हाच लंडन ब्रिज आहे अशी गल्लत आपण करू नये. टॉवर ब्रिज, जवळच्याच टॉवर ऑफ लंडनशी संबंधित आहे. अठराशे बहात्तर साली इंग्लंडच्या संसदेने थेम्स नदीवर पूल बांधण्यासाठी जो प्रस्ताव ठेवण्यात आला त्यावर विचारविमर्श केला. टॉवरच्या राज्यपालांच्या विरोधाला न जुमानता संसदेने, थेम्स नदीवर आणखी एक पूल बांधण्याची योजना, हा पूल टॉवर ऑफ लंडन सदृश्य असला पाहिजे या अटीवर पूर्ण करण्याचे ठरवले. या अधिकृत प्रस्तावातून, सध्याचा टॉवर ब्रिज साकार झाला.
अठराव्या व एकोणीसाव्या शतकांमध्ये, थेम्स नदीचे दोन्ही काठ जोडणारे अनेक लहान-मोठे पूल होते. सर्वात जुना पूल आहे ओल्ड लंडन ब्रिज. सतराशे पन्नास पर्यंत हा पूल कसाबसा नदीवर उभा होता. शिवाय तो चिंचोळा असल्यामुळे वाहुतकीसाठी त्रास व्हायचा. जगभरातून आलेली जहाजे या पुलाखाली गजबजलेल्या बंदरावर जागा मिळण्यासाठी धडपडायची. तेव्हा बंदर जहाजांनी इतके गच्च भरलेले असायचे, की एकाला एक लागून उभ्या असलेल्या जहाजांच्या तक्तपोशींवरून आपण मैलोमैल चालत जाऊ शकतो, असे म्हटले जायचे.
लंडन कॉर्पोरेशनच्या विनंतीवरून, शहराचे वास्तुशिल्पकार होरेस जोन्स यांनी, लंडन ब्रिज पासून खाली नदीमुखापर्यंत गॉथिक पद्धतीचा चलसेतू बांधण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे, जहाजांसाठी थेम्स नदीवर पश्चिमेस बंदराकडे जाण्याकरता मार्ग मोकळा होणार होता. या पुलाची ही रचना अनेकांना अभिनव कल्पना वाटली.
अनोखी रचना
जोन्स, बारा गावचे पाणी पिऊन आलेला मनुष्य असल्यामुळे व नेदरलँड्समधील कालव्यांवर असलेले लहान चलसेतू पाहून आल्यावर त्याला, एकमेकांस संतुलित करणाऱ्या गाळ्यांचा झडपांचा पूल बांधण्याची कल्पना सुचली. स्टीलच्या सांगाड्यावर सिमेंटने अतिशय सुबकरीतीने बनवलेला हा प्रसिद्ध टॉवर ब्रिज, जोन्स यांच्या गटाने बांधला.
टॉवर ब्रिजवर दोन मुख्य मनोरे आहेत जे दोन पादचारी मार्गांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. हे पादचारी मार्ग रस्त्यापासून ३४ मीटर आणि नदीच्या सरासरी उच्च पाण्याच्या पातळीपासून ४२ मीटर उंच आहेत. नदीच्या दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावरून आलेला रस्ता पुलाच्या मध्यभागी संपतो जेथे झडपांची उघड-झाप होते. या पुलाच्या एकेका झडपेचे वजन सुमारे १,२०० टन इतके आहे. या झडपा उघडतात व ८६ अंशाच्या कोनात वर उचलल्या जातात. १०,००० टन वजनाची जहाजे या पुलाखालून आरामात पार होऊ शकतात.
अवजड झडपा कशा काय उचलल्या जातात?
हायड्रॉलिक अर्थात पाण्याच्या दाबावर चालणाऱ्या शक्तीने पूर्वी पुलाच्या झडपा उचलल्या जात, मनोऱ्यात असलेल्या लिफ्ट चालत ज्यामुळे लोक वरच्या पादचारी मार्गाचा उपयोग करू शकतील आणि वाहतुकीचे सिग्नल देखील दिले जाई. होय, या पुलासाठी पाण्याचा उपयोग केला जाई! आणि ही हायड्रॉलिक शक्ती, दुप्पटपेक्षा अधिक होती.
पुलाच्या दक्षिणेकडे चार, कोळशाचे बॉयलर होते ज्यातून प्रत्येक चौरस सेंटीमीटरला पाच व सहा किलो दाबाच्या प्रमाणात वाफ निघायची; या वाफेवर दोन मोठाले पंप चालायचे. हे पंप प्रत्येक चौरस इंचाला ६० किलोग्रॅम दाबाच्या प्रमाणात पाणी चढवायचे. झडपा उचलण्यासाठी लागणारी उर्जा कायम राहण्याकरता, सहा मोठमोठ्या टाक्यांत दाबयुक्त पाणी साठवून ठेवले जात. या टाक्यांतून एकूण आठ इंजिनांना उर्जा पुरवली जात. या आठ इंजिनांवर झडपांचे कार्य चालायचे. उर्जेचा पुरवठा थांबवल्यावर, दोन्ही समवजनाच्या झडपा ५० सेंटीमीटर असलेल्या त्यांच्या सांध्यांवर उभ्या राहायच्या. त्यांना पूर्णपणे उचलण्याकरता केवळ एक मिनिट लागायचा.
आधुनिक टॉवर ब्रिजला भेट
आजकाल, वाफेच्या ऐवजी वीजेचा उपयोग केला जातो. पण पूर्वीप्रमाणेच टॉवर ब्रिज उघडला जातो तेव्हा रहदारी थांबवली जाते. पादचारी, पर्यटक आणि इतर भेट देणारे लोक, या पुलाचे कार्यनियंत्रण पाहून तोंडात बोट घालतात.
झडपा उघडण्याआधी, गजर वाजतो आणि मग रस्त्यावरील आडवे दांडे खाली येतात तेव्हा शेवटले वाहन पूल ओलांडल्यावर रस्ता साफ आहे म्हणून पूलावरील यंत्रणा खूण करते. झडपांना रोखून धरणारे चार सांधे सोडले जातात आणि झडपा आकाशात वर उचलल्या जातात. मग सर्वांचे लक्ष नदीकडे जाते. ती टगबोट असो किंवा मोटारबोट असो किंवा मोठे जहाज असो, सर्वजण पूलाखालून संथपणे जाणाऱ्या बोटींना एकटक पाहत राहतात. त्यानंतर काही मिनिटांतच लगेच सिग्नल बदलते. पुन्हा झडपा खाली येतात आणि रस्त्यावरील आडवे दांडे वर होतात. थांबून राहिलेल्या वाहनांच्या समोर उभे असलेले सायकलस्वार वाहनांच्या आधी जाण्याचा प्रयत्न करतात. काही सेकंदातच, टॉवर ब्रिज दुसरी हाक येईपर्यंत पुन्हा निःस्तब्ध उभा राहतो.
हा पूल कसा कार्य करतो त्यात आवड असलेले लोक केवळ, ही झडपांची उघड-झाप वगैरे इतक्यातच समाधान मानत नाहीत. तर, उत्तरेकडील मनोऱ्याच्या वरपर्यंत जाण्याकरता असलेली लिफ्ट घेऊन या पूलाच्या इतिहासाची माहिती पाहायला जातात. तिथे, “टॉवर ब्रिज एक्सपिरियन्स” नावाचे एक लहान प्रदर्शन मांडलेले आहे जिथे, टॉवर ब्रिजची एक लहानशी हालचाल करणारी प्रतिकृती आहे. शिवाय, हा पूल बांधणाऱ्या अभियांत्रिकांचे पराक्रम आणि मोठ्या दिमाखात झालेल्या उद्घाटन प्रसंगाची चित्रकाराने चितारलेली चित्रे तसेच तपकिरी रंगाचे जुने फोटो व प्रदर्शन फलकावर लावलेल्या चित्रांवरून टॉवर ब्रिजचे अनोखे बांधकाम कसे करण्यात आले ते पाहायला मिळते.
पूलावरील उंच पादचारी मार्गामुळे पर्यटकांना लंडनच्या क्षितिजरेषेवरील निरनिराळ्या इमारतींचे व वास्तूंचे सुखद दर्शन घडते. पश्चिमेकडे सेंट पॉल्स कॅथड्रल आणि आर्थिक प्रांताच्या बँक इमारती दिसतात आणि दूरवर पोस्ट ऑफिस टॉवर दिसतो. पूर्वेस आपण बंदर पाहण्याची अपेक्षा करू पण आता ते आधुनिक महानगरापासून दूरवर गेले आहे. त्याऐवजी, नविनीकरण झालेल्या डॉकलँड्समधील नाविन्यपूर्ण इमारत रचना पाहून आपण चाट पडतो. भव्य, सुरेख, लक्ष वेधक—होय हे सर्व शब्द लंडनच्या या नामांकित स्थळापासून दिसणाऱ्या दृश्याचे वर्णन करण्याकरता वापरता येतात.
लंडनला कधी तुम्ही भेट दिलीत तर या ऐतिहासिक वास्तुला आवश्यक भेट द्या. एका उल्लेखनीय अभियांत्रिकी प्रतापाची तुमच्या मनावर अमीट छाप नक्कीच पडेल! (g १०/०६)
[१६ पानांवरील चित्र]
इंजिनांना उर्जा देणाऱ्या वाफेवर चालणाऱ्या दोन पंपांपैकी एक पंप
[चित्राचे श्रेय]
Copyright Tower Bridge Exhibition
[१६, १७ पानांवरील चित्र]
पूलाच्या दोन झडपा एक मिनिटाहून कमी वेळात वर उचलल्या जातात
[चित्राचे श्रेय]
©Alan Copson/Agency Jon Arnold Images/age fotostock
[१५ पानांवरील चित्राचे श्रेय]
© Brian Lawrence/SuperStock