टेम्स नदी इंग्लंडला लाभलेला अनोखा वारसा
टेम्स नदी इंग्लंडला लाभलेला अनोखा वारसा
ब्रिटनमधील सावध राहा! लेखकाकडून
दक्षिण-मध्य इंग्लंडच्या कॉट्सवोल्ड हिल्स या नयनरम्य ठिकाणाहून चार पात्रांतून उगम पावणाऱ्या टेम्स नदीला प्रेमाने ओल्ड फादर टेम्स म्हणून ओळखले जाते. ती पूर्वेकडे ३५० किलोमीटर वाहत जाते तेव्हा इतर नद्या तिला येऊन मिळतात आणि शेवटी ती सुमारे २९ किलोमीटर विस्तीर्ण असलेल्या नदीमुखातून थेट उत्तर समुद्रात विलिन होते. या लहानशा नदीने इंग्रज इतिहास कसा घडवून आणला ती एक रोचक कहाणी आहे.
इंग्लंडवर रोमनांनी पहिल्यांदा आक्रमण केले ते सा.यु. ५५ मध्ये. ज्युलियस सिझर त्यांचा नेता होता. पुढील वर्षी तो पुन्हा आला तेव्हा एका नदीमुळे त्याच्या मार्गात अडथळा आला; या नदीला त्याने टेमेसिस असे नाव दिले; हीच ती टेम्स नदी. कालांतराने ९० वर्षांनंतर, रोमन सम्राट क्लॉडीयसने देशावर कब्जा मिळवला.
त्या वेळेला टेम्स नदीच्या दोन्ही बाजूला दलदल होती. पण नदीमुखापासून सुमारे ५० किलोमीटर दूर जेथून समुद्राच्या भरतीचे पाणी पुन्हा मागे जाते तेथे रोमन सैन्याने नंतर एक लाकडी पूल बांधला. नदीच्या उत्तर किनाऱ्यावर त्यांनी लाँडिनियम नावाचे एक बंदर देखील बांधले. *
पुढील चार शतकांत रोमनांनी युरोपच्या इतर भागांत आपला व्यापार वाढवला होता. भूमध्यातून महागड्या वस्तूंची आणि लेबनानहून लाकूडही ते निर्यात करू लागले. आंतील क्षेत्रांतून लंडनला सामानसुमानांची नेआण करण्यासाठीही ते टेम्स नदीचा उपयोग करू लागले. सर्व मुख्य रस्ते शहरात येऊन मिळत असल्यामुळे लंडन शहर एक महत्त्वपूर्ण व्यापार केंद्र बनले.
विल्यम द काँकररचा प्रभाव
रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर, रोमन सैनिकांनी सा.यु. ४१० मध्ये ब्रिटन सोडले तेव्हा लंडनकडे दुर्लक्ष झाले; साहजिकच टेम्स नदीजवळचा व्यापार ठप्प झाला. अकराव्या शतकात विल्यम द काँकररने नॉर्मंडीवर आपले स्वामित्व प्रस्थापित करेपर्यंत अँग्लो-सॅक्सन राजे किंग्स्टनवर राज्य करत होते. लंडनपासून टेम्स नदीमुखापर्यंतच्या १९ किलोमीटरपर्यंत म्हणजे जेथून टेम्स नदी आरामशीर पार करता येत होती तेथपर्यंत या राजांची वसाहत होती. १०६६ मध्ये वेस्टमिनिस्टर येथे विल्यमचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्याने रोमन शहराच्या भिंतींच्या आत, टॉवर ऑफ लंडन बांधला. तेथून तो उद्योगपतींवर वर्चस्व गाजवू शकत होता, व्यापार वाढवू शकत होता
आणि बंदरावरही नजर ठेवू शकत होता. उद्योगधंद्यास पुन्हा एकदा तेजी आली आणि लंडनची लोकसंख्या जवळजवळ ३०,००० पर्यंत गेली.विल्यम द काँकररने लंडनच्या पश्चिमेकडे सुमारे ३५ किलोमीटर दूर असलेल्या एका चुनखडीच्या खडकावर एक किल्ला देखील बांधला. त्यालाच आज विन्डसर असे म्हटले जाते. त्याच्या जागी आली राजेशाही सॅक्सन लोकांची वसाहत. तेथून टेम्स नदीचे मन हरखून टाकणारे दृश्य दिसते. या वसाहतीत अनेक बांधकामे व बदल केल्यानंतर तिला विन्डसर कॅसल हे नाव पडले. आजही, विन्डसर कॅसल हे ब्रिटनमधील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे.
सन १२०९ मध्ये, ३० वर्षांपासून चाललेले एक बांधकाम पूर्ण झाले. हे होते, लंडनमधील टेम्स नदीवरील दगडी पूलाचे बांधकाम. युरोपमधील दगडी पुलांपैकी हे पहिले बांधकाम आहे. ही असामान्य रचना आहे. याच्यावर, दुकाने, घरे आणि एक चॅपल देखील बांधण्यात आले. येथे दोन चलसेतू (ड्रॉब्रिज) आहेत आणि दक्षिणेकडे साऊथवॉर्क येथे संरक्षणासाठी एक बुरूजही आहे.
इंग्लंडच्या राजा जॉनने १२१५ साली, विन्डसर जवळील टेम्स नदीवर असलेल्या रनीमीड येथे त्याच्या प्रसिद्ध मॅग्ना कार्टावर मोहोर लावला. यामुळे फक्त इंग्रज नागरीकांनाच नव्हे तर विशेषकरून लंडन शहराला तसेच शहरातील गोदी व उद्योजकांनाही त्याला स्वातंत्र्याची हमी द्यावी लागली.
टेम्स समृद्धता आणते
या सर्व शतकांमध्ये, टेम्सवरील उद्योगधंद्यांची भरभराट झाली. हळूहळू, वाढत्या व्यापारामुळे नदीच्या सुविधा देखील वाढल्या. दोनशे वर्षांपूर्वी टेम्स नदीवर फक्त ६०० जहाजांना नांगर टाकता येत होता. पण कधीकधी १,७७५ प्रवासी जहाजे, त्यांचा माल उतरवण्यासाठी धक्क्यावर थांबलेली असत. या दाटीवाटीमुळे, मोठ्या प्रमाणावर चोरी होऊ लागली. रात्रीच्या वेळी माल असलेल्या जहाजांना लुटण्यासाठी चोरटे, नांगर काढून त्यांना बंदरापासून दूर न्यायचे. आणि मग, लहान बोटी असलेले लोक या चोरट्यांना, चोरलेला माल वाहून नेण्यास मदत करून पोट भरायचे. चोरीवर नियंत्रण करण्यासाठी लंडनने जगातील सर्वात पहिली नदीवरील पोलीस दलांची यंत्रणा सुरू केली. ही यंत्रणा आजही चालू आहे.
पण बंदराच्या सुविधा पूर्ण करण्याकरता आणखी पुष्कळ काही करायचे होते. त्यामुळे, एकोणीसाव्या शतकादरम्यान
इंग्लीश पार्लिमेंट, जगातील सर्वात मोठी बंदिस्त गोदी बांधण्यास तयार झाले. प्रवाहाच्या खालच्या भागात नदीच्या दोन्ही बाजूस या गोद्या बांधण्यात आल्या. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला, द सर्रे कमर्शियल डॉक्स, लंडन डॉक आणि वेस्ट ॲण्ड ईस्ट इंडिया डॉक्स या गोद्या बांधून झाल्या; त्यानंतर १८५५ मध्ये रॉयल व्हिक्टोरिया डॉक आणि त्याच्याबरोबरची रॉयल अल्बर्ट डॉक ही गोदी १८८० मध्ये बांधून पूर्ण झाली.मार्क आय. आणि ईझमबर्ड के. ब्रुनल या बाप-लेकाने १८४० मध्ये, जगातील सर्वात पहिला पाण्याखालील बोगदा बांधून टेम्स नदीचे दोन्ही बाजूचे किनारे जोडले. दोघेही बाप-लेक अभियंत्रिकी होते. हा ४५९ मीटर लांबीचा बोगदा आहे. आणि, ग्रेटर लंडनमधील भूयारी रेल्वेच्या नेटवर्कचा एक भाग म्हणून आजही वापरला जातो. १८९४ मध्ये आधुनिक पर्यटक आकर्षण असलेल्या टॉवर ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले. हा दुहेरी झडपांचा बुरूजासारखा पूल ७६ मीटर उघडतो तेव्हा उंच जहाजे देखील पार होऊ शकतात. तुम्ही ३०० पायऱ्या चढून गेलात तर एका पादचारी मार्गावर येता जेथून तुम्हाला नदीचे विहंगम दृश्य पाहायला मिळेल.
विसाव्या शतकापर्यंत, लंडनमधील गोद्या, शहरासाठी लागणाऱ्या मालाची नेआण करणाऱ्या वाढत्या संख्येच्या मोठमोठ्या जहाजांना आपला माल उतरवण्यासाठी व चढवण्यासाठी सज्ज होत्या. १९२१ साली राजा जॉर्ज पाचवा याच्या नावाने शेवटली गोदी बांधून झाली. तोपर्यंत लंडन “जगातील सर्वात मोठे आणि समृद्ध बंदर व्यवस्था” बनले होते.
नदीवरील राजमहाल, राजेशाही आणि थाटमाट
लंडनचा विकास होत असतानाच्या काळातले रस्ते अतिशय हलक्या प्रतीचे व कच्चे होते; हिवाळ्यात तर ते अतिशय बेकार व्हायचे. त्यामुळे वाहतुकीचा सर्वात जलद आणि सोईस्कर मार्ग म्हणजे टेम्स नदी. अनेक वर्षांपर्यंत टेम्स नदी वाहतुकीचा प्रमुख मार्ग होती. टेम्स नदीच्या काठावर बांधलेल्या पायऱ्यांजवळ दाटीवाटीने थांबलेल्या बोटी, प्रवाशांची नेआण करायच्या किंवा फ्लीट व वॉल्ब्रुक सारख्या नागमोडी उपनद्यांच्या किनाऱ्यांवर नेण्याकरता थांबलेल्या असायच्या. प्रवाशांना आपल्या बोटीकडे येण्यासाठी बोलवणाऱ्या खलाश्यांचा “ओर्स!, ओर्स!” हा ओळखीचा आवाज ऐकू यायचा. आता, फ्लीट व वॉल्ब्रुक या दोन्ही उपनद्यांची फक्त नावेच तेवढी राहिली आहेत. लंडनच्या रस्त्यांखाली त्या पुरलेल्या आहेत. या रस्त्यांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.
हळूहळू लंडन व्हेनिससारखे दिसू लागले. तेथे बांधण्यात आलेल्या राजवाड्यांच्या पायऱ्या अगदी नदीपर्यंत होत्या. टेम्स नदीच्या काठावर राहणे जणू काय, राजेशाही कुटुंबातील सदस्यांमध्ये एक फॅशनच झाली. ग्रिनविच, व्हाईट हॉल, वेस्टमिनस्टर हे सर्व राजवाडे याचा पुरावा आहेत. तसेच, हॅम्पटन कोर्ट इंग्लंडच्या राजा-राणींचे निवासस्थान होते व आजही टेम्स नदीच्या मुखाजवळ असलेल्या विन्डसर कॅसलमध्ये राजघराण्यातील लोक राहतात.
सन १७१७ मध्ये, जॉर्ज फ्रिड्रीक हॅन्डेल यांनी, एका शाही जलसहलीच्या प्रसंगी राजा जॉर्ज पहिला याला खूष करण्यासाठी “वॉटर म्यूझिक” नावाची संगीत मैफल तयार केली. राजाच्या बोटीबरोबर आलेल्या “इतर बोटींचे लटांबर इतके होते की संपूर्ण नदी झाकून गेली होती,” अशी त्या दिवसांतील एका वृत्तपत्रकाने बातमी दिली. राजाच्या शेजारच्या बोटीवर ५० वाजंत्री होते. नदीमुखापासून म्हणजे वेस्टमिनस्टरपासून चेलसीपर्यंतच्या आठ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान या वाजंत्र्यांनी तीनदा हॅन्डलने तयार केलेले संगीत वाजवून दाखवले.
मनास सुख व आराम देणारी नदी
सन १७४० मध्ये वेस्टमिनस्टर ब्रिज बांधला जाईपर्यंत, टेम्स नदी पायी पार करण्याचा एकच मार्ग म्हणजे लंडन ब्रिज. या पुलाची नंतर पुनर्बांधणी करण्यात आली आणि सरतेशेवटी १८२० मध्ये जुन्या पुलाच्या जागी दुसरा पूल बांधण्यात आला. मूळ दगडी पुलाच्या १९ कमानींना आधार देणाऱ्या खांबांमुळे, नदीच्या प्रवाहास खूप अडथळा निर्माण
होत होता. त्यामुळे, हा पूल होता तितका काळ म्हणजे जवळजवळ ६०० वर्षांपर्यंत टेम्स नदीचे पाणी कमीतकमी आठ वेळा तरी गारठून बर्फ झाले. असे घडायचे तेव्हा, बर्फावर मोठमोठाल्या “हिम जत्रा” भरवण्यात येत असत. या जत्रांमध्ये अनेक खेळ आयोजित केले जात. गोमांस भाजले जाई आणि शाही घराण्याचे लोक त्यावर ताव मारताना दिसायचे. “टेम्सवर खरेदी करण्यात आलेले” असे शब्द छापलेली पुस्तके व खेळणी लोक उत्साहाने विकत घ्यायचे. इतकेच नव्हे तर, बर्फ झालेल्या नदीवर उभारण्यात आलेल्या छपाई यंत्रांवर बातमीपत्रके आणि प्रभूच्या प्रार्थनेच्या प्रती देखील छापण्यात आल्या!आधुनिक काळांत, ऑक्सफर्ड आणि केंब्रीज विद्यापीठांमध्ये चालणारी युनिव्हर्सिटी बोटींची शर्यत दरवर्षी वसंतऋतूत होते. या वेळेला, पटनी व मॉर्टलेक यांच्या दरम्यान टेम्स नदीच्या काठावर लोकांचे समूहच्या समूह जमलेले असतात व शर्यतीत भाग घेणाऱ्या आठ वल्हेकरांना उत्साहाने प्रोत्साहन देत असतात. हे आठ वल्हेकरी २० पेक्षा कमी मिनिटात जवळजवळ सात किलोमीटर पार करतात. पहिली शर्यत १८२९ मध्ये टेम्स नदीमुखाजवळ असलेल्या हेन्ले येथे झाली होती. शर्यतीचे ठिकाण नदीच्या दुसऱ्या एका ठिकाणी बदलण्यात आले तेव्हा, हेन्लेमध्ये दुसरी एक शाही शर्यत सुरु करण्यात आली. ही शर्यत युरोपमधील सर्वात जुनी व प्रसिद्ध बोटींची शर्यत आहे. सुमारे १,६०० मीटरच्या या शर्यतीसाठी जगातील सर्वात कुशल वल्हेकरी स्त्रीपुरुष आकर्षित होतात. ही उन्हाळ्यातली बोटींची शर्यत आजकाल एक सामाजिक कार्यक्रम बनली आहे.
ब्रिटनमधील एका मार्गदर्शकाने म्हटले, की टेम्स नदीवरून प्रवास करताना “आपल्या डोळ्यांचे लाड पुरवले जातात; खालचे डोंगर, जंगले, कुरणे, हवेल्या, सुंदर खेडेगावं, लहान शहरे ही सर्व अस्सल इंग्लिश उपनगरांची विलोभनीय दृश्ये आपल्याला पाहायला मिळतात. . . . खूप दूरपर्यंत नदीच्या जवळून पक्का रस्ता नसला तरी कच्चा रस्ता असतो. यामुळे, एक व्यक्ती आपल्या कारमध्ये बसून, शहरातून जिथून जिथून नदी वाहत जाते तिथून तिचे सौंदर्य न्याहाळू शकते; पण टेम्स नदीच्या निरव शांततेचा आणि तिच्या सौंदर्याचा अनुभव फक्त बोटीतून जाताना किंवा काठावरून चालत असताना घेता येतो.”
इंग्लंडला भेट द्यायचा विचार करत आहात का? असाल, तर टेम्स नदीचे नेत्रसुखद दर्शन घेऊन तिचा रोचक इतिहास जाणून घेण्यासाठी वेळ काढा. गावाच्या आत असलेल्या नदीमुखापासून ती जिथे जिथे वाहत जाते तिथे तिथे तिच्यावरील त्या वर्दळीपर्यंत पुष्कळ काही पाहण्यासारखे, करण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे! “ओल्ड फादर टेम्स” तुमची निराशा करणार नाही. (g २/०६)
[तळटीप]
^ परि. 5 लंडन हे नाव लाँडिनियम या लॅटिन नावापासून आले असले तरी, दोन्ही शब्द लिन आणि डीन या केल्टिक शब्दांतून आले असावेत. या दोन्ही शब्दांना एकत्र केल्यास त्यांचा अर्थ “तलावावरील शहर [किंवा, किल्ला]” असा होतो.
[२५ पानांवरील चौकट]
वाङमय आणि टेम्स
जेरोम के. जेरोमने आपल्या थ्री मेन इन अ बोट नावाच्या पुस्तकात टेम्स नदीवरील ते आरामशीर वातावरण बंदिस्त केले आहे. तीन मित्र आपल्या कुत्र्यासोबत हॅम्पटन कोर्ट पासून ऑक्सफर्ड पर्यंत बोटीने कसा सुटीचा प्रवास करतात त्याचे वर्णन या पुस्तकात आहे. १८८९ साली लिहिण्यात आलेले व बराच खप असलेले हे पुस्तक, “उत्कृष्ट तऱ्हेवाईक विनोदी कथांचा” एक नमुना आहे.
द विंड इन द विलोज नावाची आणखी एक लोकप्रिय कथा आहे जी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना वाचायला आवडते. केनेत ग्रेहमने १९०८ साली या पुस्तकाचे लिखाण पूर्ण केले. टेम्स नदीकाठच्या पँगबर्न नावाच्या एका गावात तो राहायचा. नदीच्या पाण्यात किंवा काठावर राहणाऱ्या प्राण्यांची ही एक काल्पनिक कथा आहे.
[२५ पानांवरील चौकट/चित्र]
राजा विरुद्ध टेम्स
सतराव्या शतकाच्या सुरुवातीला राज्य करणारा राजा जेम्स पहिला याने एकदा कॉर्पोरेशन ऑफ लंडनकडे £२०,००० मागितले. लॉर्ड मेयरने जेव्हा हे पैसे देण्यास नकार दिला तेव्हा राजाने अशी धमकी दिली: “मी तुझा आणि तुझ्या शहराचा सर्वनाश करेन. मी माझी न्यायालये, माझा राजवाडा आणि माझे पार्लिमेंट विन्चेस्टरला किंवा ऑक्सफर्डला हलवीन आणि वेस्टमिनस्टरला बकाल करेन; मग बघ तुझी काय अवस्था होते ती!” यावर मेयरने उत्तर दिले: “लंडनच्या उद्योगपतींना एका गोष्टीचे नेहमी समाधान राहील: महाराज, तुम्ही टेम्स नदी आपल्यासोबत नेऊ शकत नाही.”
[चित्राचे श्रेय]
रिडपाथ यांच्या जगाचा इतिहास (खंड ६) पुस्तकातून
[२२ पानांवरील नकाशे]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
इंग्लंड
लंडन
टेम्स नदी
[चित्राचे श्रेय]
नकाशा: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.
[२२, २३ पानांवरील चित्र]
बिग बेन आणि संसदभवनाचे दृश्य, वेस्टमिनस्टर, लंडन
[२३ पानांवरील चित्र]
१७५६ साली, दगडाने बनवलेला लंडन ब्रिज
[चित्राचे श्रेय]
ओल्ड ॲण्ड न्यू लंडन पुस्तकातून: A Narrative of Its History, Its People, and Its Places (Vol. II)
[२४ पानांवरील चित्र]
टेम्स नदी आणि बंदरावर थांबलेली शेकडो जहाजे या १८०३ सालच्या कोरीव चित्रात दिसत आहे
[चित्राचे श्रेय]
Corporation of London, London Metropolitan Archive ▶
[२४, २५ पानांवरील चित्र]
१६८३ सालच्या हिम जत्रेचे हे कोरीव चित्र
[चित्राचे श्रेय]
◀ ओल्ड ॲण्ड न्यू लंडन पुस्तकातून: A Narrative of Its History, Its People, and Its Places (Vol. III)