व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

दुःख “तरुण लोक विचारतात . . . देव आपल्यावर दुःखद प्रसंग का येऊ देतो?” (जुलै-सप्टेंबर, २००४) या लेखाबद्दल तुमचे शतशः आभार. मी १४ वर्षांची आहे आणि मी ज्यांच्या अगदी जवळ होते असे दोन लोक—माझे आजीपप्पा आणि माझी आत्या—अलिकडेच वारले. मला माहीत आहे, की देव त्यांच्या मृत्यूला जबाबदार नाही. तर सैतान आहे आणि त्याचा फार थोडा वेळ राहिला आहे. या लेखानं खरोखरच माझं खूप सांत्वन केलं आहे. कृपया असे लेख लिहित राहा. मी पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचे आभार मानते.

बी. बी., अमेरिका

अलिकडेच, माझं जिच्याबरोबर लग्न होणार होतं, तिचा एका कार अपघातात मृत्यू झाला. माझ्यावर, मंडळीतल्या बंधूभगिनींवर आणि खासकरून तिच्या आईवडिलांवर खूप मोठं संकट कोसळलं होतं. दुःखाच्या खोल दरीतून वर येण्यासाठी यहोवानं मला मदत केल्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानतो. आणि तुम्ही “देव आपल्यावर दुःखद प्रसंग का येऊ देतो?” सारखे लेख प्रकाशित केल्याबद्दल मी तुमचेही आभार मानतो. हा लेख अगदी वेळेवर आला होता.

ई. डी., जर्मनी

पहिल्यांदा मला हा लेख वाचावासा वाटत नव्हता. तो वाचून मी आणखी दुःखी होईन, असं मला वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी माझा थोरला भाऊ एका आजारात गेला, मी अजूनही त्याला विसरू शकलेलो नाही. पण या लेखानं मला आठवण करून दिली, की यहोवा चांगल्या गोष्टींचा दाता आहे. माझ्या जखमा भरून निघत असल्यासारखं मला वाटलं आणि या अस्थिर जगात धैर्यानं जगण्याची उर्मी मला मिळाली. या लाभदायक माहितीसाठी तुमचे खूप आभार.

एस. एच., जपान (g०५ १/८)

विद्रुप मूल मायलीनचा अनुभव वाचून मला अगदी भरून आले. (“मायलीनचा नवा चेहरा,” जुलै-सप्टेंबर २००४) हे ११ वर्षांचे लेकरू, एका भयानक आजाराचा सामना करत असताना, आपल्या बायबल आधारित आशेविषयी इतरांना कसं सांगतं, हे वाचून मला खूप प्रोत्साहन मिळालं.

एम. बी., इटली

मायलीन आणि तिच्या कुटुंबाचा सकारात्मक दृष्टिकोन, मला प्रोत्साहन देणारा होता. आजच्या जगात, प्रसार माध्यमं शारीरिक सौंदर्यावर फाजील भर देत आहे. हे निराशजनक असू शकते. पण मी मायलीनला सांगू इच्छिते, की तिचे खरे सौंदर्य मला स्पष्टपणे दिसते. यहोवा आपल्या नव्या जगात तिला एक नवा चेहरा देईल तेव्हा तिच्या आनंदात मलाही तिच्याबरोबर सहभाग घ्यायची संधी मिळेल, अशी मी आशा करते. तिच्या विश्‍वासानं माझा विश्‍वास आणखी मजबूत केला आहे.

एम. एस., अमेरिका

लवकरच माझ्या स्तनाची शस्त्रक्रिया करून एक स्तन काढावे लागणार आहे. एखाद्या आजारपणामुळे जेव्हा तुमचं स्वरुप बिघडतं तेव्हा, निराश न होण्यासाठी धैर्याची आणि शक्‍तीची गरज असते. मायलीनच्या धैर्याबद्दल आणि आशावादी दृष्टिकोनाबद्दल वाचल्यावर मला धैर्य मिळाले. मी मायलीनला म्हणेन: माझ्या सदिच्छा तुझ्याबरोबर आहेत. माझ्या दृष्टीत तू सुंदर आहेस!

जी. आर., फ्रान्स

जन्मतःच, खंडौष्ठ (वरच्या ओठामध्ये खिंडार पडणे) म्हटले जाणारे व्यंग माझ्यात होते. शाळेतील मुलं माझ्याकडे विचित्र नजरेनं बघायची. काही तर माझ्यावर थुंकतात देखील. पण माझ्या आईनं मला बायबलमधून जे शिकवलं त्यामुळे मी धैर्यानं आणि आत्म-विश्‍वासानं जगू शकलो. आताही वयाच्या ३१ व्या वर्षी मला माझ्या स्वरुपाविषयी वाईट वाटतं. त्यामुळे, मायलीनचा अनुभव वाचल्यावर मला अगदी भरून आले. मला माहीत आहे, यहोवाच्या मदतीनं आपण, आपल्यासमोर येणाऱ्‍या सर्व आव्हानांवर मात करू शकतो.

टी. एस., जपान

मायलीननं मला हे सिद्ध करून दाखवलं, की शारीरिक रूपानं आनंद आणि समाधान मिळत नाही. तर आपल्या देवाची सेवा केल्यावर व त्याच्यावर प्रेम केल्यावरच मिळतं. मायलीनच्या अनुभवानं मला प्रेरणा दिली आहे.

ए. टी., फिलिपाईन्स (g०५ ३/८)