एका थंड, निष्ठुर जगात प्रवेश!
एका थंड, निष्ठुर जगात प्रवेश!
बाळ जन्माला येते, ते एका थंड, निष्ठुर, तणावपूर्ण जगात. आपल्याला काय वाटतंय हे अर्थातच त्याला सांगता येत नाही; पण काही शास्त्रज्ञांच्या मते, जन्माच्या आधीपासूनच मानवी भ्रूणाला सभोवताली काय घडत आहे याची जाणीव असते.
द सीक्रेट लाईफ ऑफ दि अन्बॉर्न चाइल्ड या पुस्तकात म्हटले आहे: “आईच्या पोटात असल्यापासूनच एक शिशू, घडणाऱ्या गोष्टींची जाणीव असलेला व प्रतिसाद देणारा मानवी प्राणी असतो असे आता आम्हाला कळले आहे; सहाव्या महिन्यापासून (किंवा कदाचित त्याच्या आधीपासूनच) तो भावनिकरित्या सक्रिय असतो.” बाळाला आठवत नसले तरी, जन्माला येण्याच्या तणावपूर्ण अनुभवाचे त्याच्या नंतरच्या जीवनात पडसाद उमटत असावेत का, असा काही शास्त्रज्ञांना प्रश्न पडला आहे.
जन्मानंतर तणाव संपत नाही. आईच्या पोटातून बाहेर आल्यावर बाळाचे आधीसारखे आपोआप पोट भरत नाही. आईच्या शरीरातून प्राणवायू व पोषक तत्त्वे पोचवणारी नाळ कापून टाकण्यात आलेली असते. आता जिवंत राहण्यासाठी बाळाला स्वतःहून श्वास घेणे व पोषक तत्त्वे मिळवणे आवश्यक होऊन बसते. आपल्याला भरवेल व इतर शारीरिक गरजांची काळजी घेईल अशा व्यक्तीची त्याला नितान्त गरज असते.
शिवाय, नवजात शिशूची मानसिक, भावनिक व आध्यात्मिक वाढ होणेही आवश्यक आहे. तेव्हा या लहानशा जिवाचे कोणीतरी संगोपन केलेच पाहिजे. हे करण्याकरता सर्वात योग्य कोण? बाळाला आपल्या आईवडिलांकडून काय हवंय? आणि त्याच्या या गरजा उत्तमरित्या कशा पुऱ्या करता येतील? पुढील लेख या प्रश्नांची उत्तरे देतील. (g०३ १२/२२)