जगावरील दृष्टिक्षेप
जगावरील दृष्टिक्षेप
प्राचीन इजिप्शियन दंतमंजन तयार करण्याची रीत
“कोलगेटने १८७३ मध्ये सर्वात पहिले व्यापारी ब्रॅण्ड सुरू करायच्या १,५०० पेक्षा अधिक वर्षांआधी, दंतमंजन तयार करण्याची जगातील सर्वात जुनी पद्धत, एका विएनीझ संग्रहालयाच्या तळघरात धूळ खात पडलेल्या एका पपायरसच्या पानांवर आढळली,” अशी इलेक्ट्रॉनिक टेलिग्राफने बातमी दिली. “काजळी आणि पाण्यात मिसळलेल्या डिंकापासून बनवलेल्या फिक्या रंगाच्या शाईत, एका प्राचीन इजिप्शियन नक्कलाकाराने अगदी काळजीपूर्वक, ‘पांढऱ्या शुभ्र व सुदृढ दातांसाठी असलेल्या मंजनाचे’ वर्णन केले. तोंडातील लाळेत मिसळल्यावर ‘शुद्ध दंतमंजन’ तयार होते.” सा.यु. चौथ्या शतकातील या दस्ताऐवजात दंतमंजन तयार करण्याच्या पद्धतीमध्ये, खडे मीठ, पुदीना, वाळलेली आयरीस फुले आणि काळ्या मिरीचे दाणे—सर्वांची एकत्र पूड करावी, असे सांगण्यात आले आहे. विएन्ना येथील दातांच्या एका परिषदेत या शोधामुळे बरीच खळबळ माजली. “जुन्या काळातील प्रगत दंतमंजन तयार करण्याची रीत अस्तित्वात असेल, अशी दंत व्यवसायातील कोणालाही कल्पना नव्हती,” असे डॉ. हायन्ट्स नॉयमन म्हणाले; त्यांनी स्वतः हे दंतमंजन वापरून पाहिले तेव्हा त्यांचे दात “तजेलादायक व स्वच्छ” असल्याचे त्यांना वाटू लागले. लेखात पुढे म्हटले होते: “दंतवैद्यकांना अलीकडेच आयरीसच्या लाभदायक गुणधर्मांचा शोध लागला आहे जे हिरड्यांच्या आजारांवरील उत्तम औषध आहे; आता त्याचा व्यापारी जगात वापर सुरू झाला आहे.” (g०३ ११/२२)
कुटुंबात संवादाची गरज
“आजकाल कुटुंबातला संवाद नाहीसा होत चालला आहे, आईवडील फक्त ‘हं, हं’ इतकेच बोलतात; यामुळे मुले मनमोकळ्यापणाने बोलू शकत नाहीत,” असे लंडनच्या द टाईम्सने अहवाल दिला. हे असे का घडत चालले आहे त्याचे कारण, ब्रिटनमध्ये शैक्षणिक दर्जे टिकवून ठेवण्यास जबाबदार असलेल्या सरकारच्या मूलभूत कला एजन्सीचे व्यवस्थापक ॲलन वेल्स यांच्यामते मुले “टीव्ही व कंप्युटरपुढे सतत बसलेली असतात, कुटुंबे जेवतानासुद्धा एकत्र बसून वेळ घालवत नाहीत.” वेल्स असेही म्हणतात, की एक-पालक कुटुंबात आजी-आजोबा नसतात, तसेच फार कमी पालक आपल्या मुलांना काही वाचून दाखवतात. वेल्स यांचा असा विश्वास आहे, की वरील कारणांवरून हे स्पष्ट होते, की पूर्वीच्या मुलांपेक्षा शाळेत दाखल होणारी आताची चार किंवा पाच वर्षांची मुले “कमी बोलतात, स्वतःचे विचार फार कमी व्यक्त करतात.” वेल्स असे सुचवतात, की आपल्या मुलांबरोबर दळणवळण कसे करायचे यासंबंधाने पालकांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यक्रम आखले पाहिजेत. (g०३ ९/२२)
धर्मात आवड नाही
“सध्याच्या उदास परिस्थितीशी झुंज देत असताना, उत्तरे शोधण्यासाठी जपानी लोकांचा धर्माकडे कल दिसत नाही,” अशी आयएचटी असाही शिंबुन या बातमीपत्रकाने बातमी दिली. “तुमची धर्मावर श्रद्धा किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विश्वासाची आवड आहे का?” असा प्रश्न विचारल्यावर केवळ १३ टक्के स्त्रीपुरुषांनी होय असे उत्तर दिले. आणखी ९ टक्के पुरुषांनी व १० टक्के स्त्रियांनी म्हटले, की त्यांना “थोडीफार” आवड होती. बातमीपत्रात पुढे म्हटले होते, की “खास नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, विशीत असलेल्या केवळ ६ टक्के स्त्रियांना धर्मामध्ये थोडीशी आवड असल्याचे दिसून आले.” वार्षिक सर्व्हेत दिसून आले, की जपानमधील ७७ टक्के पुरुषांचे आणि ७६ टक्के स्त्रियांचे असे म्हणणे आहे, की त्यांना धर्मामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विश्वासावर श्रद्धा नाही. जपानमध्ये धार्मिक विश्वासाच्या संबंधाने १९७८ साली असाच एक सर्व्हे घेण्यात आला होता; त्या संख्येपेक्षा आताची संख्या अर्ध्याने कमी झाली आहे. सहसा वृद्धांनी, खासकरून ६० पेक्षा अधिक वय असलेल्यांनी धर्मामध्ये आवड असल्याचा दावा केला. (g०३ १०/०८)
शिकायला वयाची मर्यादा नसते
निरक्षरतेचे अधिक प्रमाण असलेल्या नेपाळमध्ये, १२ पेक्षा अधिक नातवंडे असलेले एक वृद्ध गृहस्थ शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लोकप्रिय झाले आहेत. लेखक बाजे म्हणून ओळखले जाणारे बाल बहादूर करकी यांचा जन्म १९१७ साली झाला होता व त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. वयाच्या ८४ व्या वर्षी, चार वेळा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी आपल्या शाळेचा दाखला मिळवला. आता वयाच्या ८६ व्या वर्षी ते कॉलेजचा कोर्स करत आहेत. ते इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि दुसऱ्यांनाही इंग्रजी शिकवत आहेत. तरुणांबरोबर बाकांवर बसल्याने आपण आपले वय विसरून जातो, आपल्याला तरुण असल्यासारखे वाटते, असे त्यांचे म्हणणे आहे. राजधानी काठमांडू येथील शेवटल्या फेरीत त्यांना, त्यांच्या साध्यतांसाठी अनेक बक्षीसे आणि जनतेची वाहवा मिळाली. त्यांनी इतरांनाही असेच प्रोत्साहन दिले, की म्हातारे झाला म्हणून शिकण्याचे सोडून देऊ नका. परंतु लेखक बाजे यांनी एक खंत व्यक्त केली. राजधानीकडे जाणाऱ्या विमानाच्या भाड्यात सूट देण्यात आली नाही आणि विमानाचे भाडे त्यांना परवडत नव्हते म्हणून बस धरण्यासाठी त्यांना तीन दिवस चालावे लागले. द काठमांडू पोस्ट नावाच्या बातमीपत्राला त्यांनी सांगितले: “एअरलाईन्सवाल्यांनी विद्यार्थ्यांना मिळणारी सूट मलाही द्यायला हवी होती कारण मी देखील एक विद्यार्थीच आहे.” (g०३ १२/२२)