एक रूबाबदार पक्षी ज्याच्या पिसाऱ्यावर अनेक डोळाकृती
एक रूबाबदार पक्षी ज्याच्या पिसाऱ्यावर अनेक डोळाकृती
भारतातील सावध राहा! लेखकाद्वारे
लेखाच्या शीर्षकावरूनच, आम्ही मोराविषयी बोलत आहोत हे तुम्ही ओळखले असेल. नर पक्ष्यास एक लांबसडक पिसारा असतो जो संपूर्ण जगभरात अगदी प्रसिद्ध आहे. * परंतु या लांबसडक पिसाऱ्याचा काय उद्देश असावा आणि या पक्ष्याच्या सौंदर्याव्यतिरिक्त त्याचे आणखी काही वैशिष्ट्य आहे का, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?
फॅजिॲनिडी कुळातल्या या पक्ष्याच्या तीन जाती आहेत. या लेखात आपण भारतात आढळणाऱ्या पक्ष्याची अर्थात मोराची चर्चा करणार आहोत जो प्रामुख्याने निळसर-हिरव्या रंगात असतो व ज्याची लांबी २०० ते २३५ सेंटीमीटर इतकी असते आणि ज्याच्या पिसाऱ्याची लांबी १५० सेंटीमीटर इतकी असते. पिसाऱ्यातील पिसांचा रंग हिरवा आणि सोनेरी असतो आणि प्रत्येक पिसाच्या टोकावर निळसर बिरंजी डोळाकृती असते. शरीरावरील पिसांचा रंग बहुतेक बिरंजी निळसर-हिरवा असतो.
मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे शिवाय तो दिसायलाही अगदी रूबाबदार असतो. म्हणूनच कदाचित काही भाषांमध्ये गर्विष्ठ मानवांचे वर्णन करण्याकरता “मोरासारखा गर्विष्ठ” ही संज्ञा वापरली जाते. परंतु, या पक्ष्याच्या स्वरूपावरून वाटते तसा मात्र तो गर्विष्ठ मुळीच नाही. उलट त्याला सहज माणसाळविता येते. काही लोक मोराला पवित्र मानतात. म्हणूनच, भारतातील खेडेगावातील शेतकरी, मोर करत असलेली पिकांची नासाडी मुकाट्याने सहन करतात.
त्याचा डौलदार नाच
मोर आपला पिसारा पसरवून पंख्याप्रमाणे तो हलवत दिमाखाने नाचत असल्यामुळे तो लोकप्रिय झाला आहे. पण तो हे सर्व का करतो? अर्थातच, मादीचे किंवा लांडोरीचे मन आकर्षित करण्यासाठी त्याचे हे सर्व प्रयत्न चाललेले असतात.
लांडोर जरा नखरटच असते आणि तिची एक कमजोरी असते; मोराला तिच्यासमोर नेहमी भाव मारावा लागतो. भडक रंगांच्या डोळ्यांनी भरलेला मोराचा पूर्णपणे पसरवलेला हा पिसारा पाहून लांडोरीचे लक्ष त्याच्याकडे जाते. सर्वात रूबाबदारपणे नाच करणाऱ्या मोराला ती आपला सोबती म्हणून सहसा निवडते.
परंतु पिसारा पसरवणे हा प्रदर्शनाचा केवळ एक भाग आहे. मोर पहिल्यांदा पिसारा पसरवून तो पंख्याप्रमाणे पुढेमागे हलवतो. मग तो त्याचा नाच सुरू करतो. तो त्याचे शरीर थरथरवीत असतो तेव्हा त्याचे बिरंजी रंगाचे पंख बाजूला खाली करतो आणि ताठ उभे असलेल्या पिसाऱ्यातील पंखांतून सळसळ आवाज ऐकू येतो. तो मोठ्याने किंकाळीसुद्धा फोडतो. त्याची ही किंकाळी ऐकावयास मधूर नसली तरी, लांडोरीला कळते, की त्याला ती आवडली आहे.
कधीकधी, लांडोरसुद्धा मोराप्रमाणे नाचण्याचा प्रयत्न करते, पण बहुतेकदा तिचे मोराच्या नाचण्याकडे लक्ष नसते. तरीपण, सर्वात दिमाखदार नाच तिला मोहीत करतो. एका मोराला पाच लांडोरी असू शकतात आणि एका वर्षात त्याला २५ पिल्ले होऊ शकतात.
मोराचे कौटुंबिक जीवन
विणीच्या हंगामानंतर, पिसाऱ्यातील पिसे गळून पडतात. पिसाऱ्यात सर्वसाधारपणे २०० च्या जवळपास पिसे असतात. भारतातील खेड्यातील लोक, पाश्चिमात्य देशांत पाठवण्यासाठी ही पिसे गोळा करून निर्यात करत असत; नंतर या पक्ष्यांचे रक्षण करण्यासाठी ही निर्यात थांबवण्यात आली. परंतु स्थानीयरीत्या आजही, या पिसांचे पंखे किंवा इतर आकर्षक वस्तू बनवल्या जातात.
सायंकाळी विश्रांतीसाठी मोर उंच झाडावर हळूहळू चढू लागतात. आणि सकाळ झाल्यावर हळूहळू खाली येऊ लागतात. या पक्ष्यांचे सौंदर्य पाहून तुम्ही भाळाल, पण त्यांचा आवाज त्यांच्या सौंदर्याला मुळीच शोभत नाही. अन्नाच्या शोधात निघेपर्यंत त्यांची कर्कश किंकाळी, संध्याकाळच्या शांततेचा भंग करते.
मोर सर्वभक्षी आहेत—ते जवळजवळ सर्व काही खातात. जसे की, किडे, पाली, कधीकधी लहान साप, बीया, धान्ये, डाळी आणि पीकांचे कोवळे कोंब.
मोर अतिशय तोऱ्यात चालत आहे असे वाटत असले तरी, तो स्वतः जागृत असतो व इतरांनाही जागृत करतो. त्याला धोक्याची लगेच चाहूल लागते, जसे की दबा धरून बसलेली एखादी जंगली मांजर; तेव्हा तो लगेच धोक्याची सूचना देण्यासाठी जंगलात मोठमोठ्याने ओरडत पळू लागतो. इतर नरही त्याला सामील होतात. आश्चर्य म्हणजे, ते एकापाठोपाठ अतिशय जलद गतीने पळतात. लांडोरी मात्र काहीही झाले तरी आपल्या पिल्लांना सोडून जात नाहीत.
मोराच्या लांबसडक पिसाऱ्यामुळे त्याच्या हालचाली कमी होत नाहीत; पण उडताना त्याला त्याच्या लांबसडक पिसाऱ्याचा त्रास होत असावा असे भासते. परंतु आकाशात झेप घेतल्यावर मात्र तो जलदगतीने उडतो आणि आपले पंख जोरजोराने फडफडतो.
पिले आठ महिन्यांची झाल्यावर आईवडिलांना सोडून स्वतंत्र राहू लागतात. यामुळे लांडोरीला दुसऱ्या खेपेच्या पिलावळीची तयारी करता येते. आठ महिन्यांनतर नर पक्ष्यांचा पिसारा वाढू लागतो; त्यांचा पूर्ण पिसारा वाढण्यासाठी चार वर्षे लागतात. मग ते आपले कुटुंब बनवण्यास तयार होतात.
इतिहासकालीन मोर
प्राचीन ग्रीक, रोम आणि भारताच्या उद्यानांत मोरांचे वास्तव्य होते. हजारो वर्षांपासून भारताच्या राजमहालातील चित्रकलेत व कलाकुसरींच्या कामांत मोराच्या प्रतिमेचा उपयोग केला जात असे. होय, मयूरसिंहासन हे भारतातील खजिन्यातील सर्वात महत्त्वपूर्ण उदाहरण समजले जात होते. अनेक हिरे कोंदलेल्या या सिंहासनावर, १०८ माणिक आणि ११६ पाचू बसवलेले होते असे म्हटले जाते. सिंहासनावरील आच्छादनावर सोन्याचा मोर होता; यावरूनच या सिंहासनाला मयूरसिंहासन हे नाव पडले. महत्त्वाच्या समारंभाच्या विधीच्या वेळीच हे सिंहासन ठेवून त्यावर राजा विराजमान होत असे.
बायबल दाखवते, की राजा शलमोनाला मिळणाऱ्या मौल्यवान गोष्टींमध्ये मोरांचा देखील समावेश होता. त्याच्या राजसी उद्यानांत आपला पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरांची आपण कल्पना करू शकतो. (१ राजे १०:२२, २३) या पक्ष्यांना पाहून आपण निश्चितपणे सांगू शकतो की एक बुद्धिमान रचनाकार अस्तित्वात आहे. भडक रंगाचा आपला पिसारा फुलवून मोराला नाचताना आपण पाहतो तेव्हा, ज्याने “सर्व काही निर्माण केले” त्या यहोवा देवाच्या कलात्मक बुद्धीचा आपण न कळत विचार करू लागतो.—प्रकटीकरण ४:११. (g०३ ६/२२)
[तळटीप]
^ नराच्या शेपटीपासून नव्हे तर त्याच्या पाठीपासून शेपटीभोवती हा पिसारा वाढतो. पिसारा ताठ उभा करण्यासाठी तो आपल्या शेपटीच्या पिसांचा उपयोग करतो.
[१८ पानांवरील चित्र]
मोराचा नाच पाहून लांडोर नेहमीच आकर्षित होत नाही
[चित्राचे श्रेय]
© D. Cavagnaro/Visuals Unlimited
[१९ पानांवरील चित्रे]
लांडोर उत्तम माता असते
[चित्राचे श्रेय]
© २००१ Steven Holt/stockpix.com
[१७ पानांवरील चित्राचे श्रेय]
मोर पृष्ठ २ आणि १७: Lela Jane Tinstman/Index Stock Photography
[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]
John Warden/Index Stock Photography