मोटार अपघात तुम्ही सुरक्षित आहात का?
मोटार अपघात तुम्ही सुरक्षित आहात का?
“मला गाडी चालवण्याचा खूप अनुभव आहे, मला अपघाताची चिंता करायची गरज नाही.” “अपघात फक्त तरुणांचे आणि निष्काळजी चालकांचे होतात.” अनेकांना वाटते की, त्यांचा कधीही मोटार अपघात होणार नाही. तुम्हालाही तसेच वाटते का? मोटार अपघातात तुम्ही कधीच सापडणार नाही असे आहे का?
आकडेवारींवरून असे निष्पन्न होते की, तुम्ही विकसनशील देशात राहत असल्यास, तुमच्या आयुष्यात एकदा तरी मोटार अपघातात जखमी होण्याची शक्यता आहे. अनेकांचा अपघातात जीव जातो. जगभरात, दरवर्षी पाच लाखांहून अधिक लोक मोटार अपघातांमध्ये ठार होतात. मागच्या वर्षी अपघातात ठार झालेल्या पुष्कळांनी कदाचित आपला अपघात होईल अशी कल्पनाही केली नसेल. वाहन अपघातापासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता? अपघात टाळणे हाच उपाय आहे. झोप लागण्यामुळे आणि वार्धक्यामुळे होणारे अपघात कसे टाळावेत ते पाहा.
झोपाळू चालक
काही तज्ज्ञांच्या मते, झोपाळू चालक दारू प्यायलेल्या चालकाइतकाच धोकेदायक असू शकतो. अहवालांवरून दिसून येते की, झोपेमुळे अनेक अपघात होतात. अलीकडेच, फ्लीट मेन्टेनन्स ॲण्ड सेफ्टी रिपोर्ट यात म्हटले होते की, एकाच वर्षात, नॉर्वेतील १२ चालकांपैकी १ चालकाला गाडी चालवताना झोप लागते. दक्षिण आफ्रिकेतील जोहॅनसबर्गच्या द स्टार यानुसार, त्या देशातील एक तृतीयांश वाहन अपघात चालक थकल्यामुळे घडतात. इतर देशांमधील अहवालांमधूनही हे प्रकट होते की, तेथे देखील थकव्याचा चालकांवर परिणाम होऊ लागला आहे. इतके झोपाळू चालक का आहेत?
आजच्या धकाधकीचे जीवन या समस्येचे एक कारण आहे. अलीकडेच न्यूझवीक पत्रिकेने अहवाल दिला की, अमेरिकन लोक “या शतकाच्या सुरवातीपेक्षा दररोज रात्री दीड तास कमी झोपत असतील—आणि ही समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.” का? त्या पत्रिकेत निद्रा तज्ज्ञ, टेरी यंग यांचे शब्द दिले होते: “लोकांना वाटते की झोप एखाद्या वस्तूसारखी आहे जिच्यापासून आपण स्वतःला वंचित करू शकतो. कमीत कमी झोपणे म्हणजे परिश्रमाचे आणि प्रगतीचे चिन्ह मानले जाते.”
असे म्हटले जाते की, सर्वसाधारण व्यक्तीला साडे सहा ते नऊ तासांची झोप लागते. परंतु, झोप घेतली नाही तर ती “जमा” होत राहते. वाहन सुरक्षा एएए संस्थेच्या वृत्तात म्हटले आहे: “एका सर्वसाधारण कामाच्या आठवड्यात दररोज रात्री आवश्यक असलेल्या वेळेपेक्षा ३० किंवा ४० मिनिटे कमी झोपल्यामुळे आठवड्याच्या शेवटी ३ ते ४ तासांची झोप जमा होऊ शकते; या जमा झालेल्या झोपेमुळे दिवसा वाटणारा झोपाळुपणा एकदम वाढतो.”
काही वेळा, एखाद्या रात्री तुम्हाला झोप मिळणार नाही. निद्रानाश, आजारी मुलाची काळजी घेणे किंवा तुमच्या नियंत्रणाबाहेरील इतर गोष्टींमुळे तुमची झोपमोड होऊ शकते. दुसऱ्या दिवशी याचा परिणाम गाडी चालवताना दिसू लागेल. असे झाल्यास तुम्ही काय करावे?
कॉफी घेणे, खिडकी उघडी ठेवणे, चुइंग गम चघळणे किंवा तिखट पदार्थ खाणे यांसारखे सामान्य उपाय करूनही तुमची झोप जाणार नाही. यातला कोणताही उपाय नेमक्या समस्येला सोडवू शकत नाही. तुम्हाला गरज आहे ती झोपेची. तर मग, थोडा वेळ थांबून झोप काढा. द न्यू यॉर्क टाईम्स यात असे
सुचवले होते: “दिवसा ताजेतवाने वाटण्यासाठी घेतली जाणारी झोप ३० मिनिटांपेक्षा जास्त असू नये नाहीतर गाढ झोप लागते आणि उठणे कठीण होते.” झोप काढल्याने कदाचित ठराविक ठिकाणी पोहंचण्यात तुम्हाला उशीर होईल पण त्यामुळे तुमचे आयुष्य वाढेल.तुमच्या जीवनशैलीमुळेही तुम्ही झोपाळू चालक बनू शकता. तुम्ही इंटरनेटवर तासन्तास घालवता का, किंवा रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत राहता का? अगदी पहाटेपर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांसाठी तुम्ही जाता का? या अशा सवयींमुळे आपली झोप चुकवू नका. सुज्ञ राजा शलमोनाने एकदा ‘विश्रामाने भरलेल्या एका मुठीच्या’ महत्त्वावर जोर दिला.—उपदेशक ४:६, NW.
अनुभवी परंतु वयाने मोठे
वयाने मोठे असलेल्या चालकांना सहसा सर्वाधिक अनुभव असतो. परंतु, ते कमीत कमी धोके स्वीकारतात आणि त्यांना आपल्या मर्यादा ठाऊक असतात. परंतु, वयस्क चालकांना वाहन अपघातांचा धोका नाही अशातला भाग नाही. उलट, वयामुळे कदाचित त्यांचा अपघात होण्याची शक्यता वाढू शकते. कार व प्रवास (इंग्रजी), या अमेरिकन पत्रिकेने असा अहवाल दिला: “लोकसंख्येतील केवळ ९ टक्के लोक ७० वर्षांहून अधिक आहेत परंतु १३ टक्के वाहन अपघातांमध्ये ठार होतात.” दुःखाची गोष्ट आहे की, वृद्ध चालकांना गोवणारे वाहन अपघात अधिकच वाढत आहेत.
मर्टल यांनी केलेले निरीक्षण विचारात घ्या; त्या ८० वर्षांच्या आहेत. * त्या गेल्या ६० वर्षांहून अधिक वर्षांपासून गाडी चालवत आहेत पण त्यांचा एकदाही अपघात झालेला नाही. पण, इतरांप्रमाणेच त्यांनाही वार्धक्याचे परिणाम जाणवू लागले आहेत—असे परिणाम ज्यांमुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता वाढू लागली आहे. अलीकडेच त्यांनी सावध राहा! मासिकाला सांगितले: “तुम्ही म्हातारे होत जाता तसे आयुष्यातले सर्वकाही [वाहन चालवणे देखील] एक आव्हान बनते.”
वाहन अपघात टाळण्यासाठी त्यांनी काय केले आहे? मर्टल म्हणतात, “माझ्या वयामुळे मी काही बदल केले आहेत.” जसे की, त्यांनी वाहन चालवण्याचे प्रमाण कमी केले आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी. हा छोटासा बदल केल्यामुळे त्या सुरक्षित राहू शकल्या आहेत आणि त्यांना गाडी चालवणे सोडावी लागली नाही.
म्हातारपणाचा दुष्परिणाम प्रत्येकावर होतो हे कबूल करणे कठीण असले तरी ही एक वास्तविकता आहे. (उपदेशक १२:१-७) अनेक स्वास्थ्य समस्या निर्माण होतात, आपली प्रतिक्रिया मंदावते, दृष्टी कमी होते—या सर्व गोष्टींमुळे सुरक्षितरितीने गाडी चालवणे कठीण होऊ शकते. तथापि, केवळ वय वाढल्यामुळे एखादी व्यक्ती गाडी चालवण्यासाठी अपात्र ठरत नाही. कारण चालकाची कार्यक्षमता महत्त्वाची आहे. आपल्या शारीरिक क्षमतेत बदल झाल्याचे कबूल केल्याने आणि आपल्या नित्यक्रमात योग्य फेरबदल केल्याने गाडी चालवण्यामधील आपली कार्यक्षमता वाढू शकेल.
तुमच्या लक्षात येणार नाही पण तुमची दृष्टी कमकुवत होत असेल. तुमचे वय वाढत जाते तसे तुमच्या दृष्टीचा परिघ कमी होतो आणि जालपटलाला अधिक प्रकाशाची गरज पडते. वयस्क आणि सुज्ञ चालक (इंग्रजी) या पुस्तिकेत म्हटले आहे: “६० वर्षांच्या चालकाला एखाद्या किशोरवयीनापेक्षा तीन पट अधिक प्रकाश लागतो आणि प्रकाशातून अंधारातील बदलाशी जुळवून घ्यायला दोन पट अधिक वेळ लागतो.” आपल्या डोळ्यांमधील या बदलांमुळे रात्रीच्या वेळी गाडी चालवणे कठीण होऊ शकते.
हेन्री ७२ वर्षांचे आहेत आणि गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून त्यांनी सुरक्षितपणे गाडी चालवली आहे. जसजसे त्यांचे वय वाढू लागले तसतसे त्यांना जाणवले की, रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशामुळे त्यांना गाडी चालवणे कठीण होऊ लागले. डोळे तपासल्यावर त्यांना कळाले की, रात्रीच्या वेळी प्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी
त्यांना वेगळ्या प्रकारचा चष्मा घालण्याची गरज होती. हेन्री म्हणतात, “आता रात्रीच्या वेळी गाडी चालवणे मला कठीण वाटत नाही.” त्यांनी हा छोटासा बदल केल्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडला. पण मर्टलसारख्या इतरांना कदाचित रात्रीच्या वेळी गाडी चालवणे पूर्णपणे सोडून द्यावे लागेल.म्हातारपणामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिक्रिया देखील मंदावते. वृद्ध लोक तरुणांपेक्षा अधिक सुज्ञ आणि हुशार असतील. परंतु, म्हातारपणामुळे माहिती शोषून प्रतिक्रिया दाखवायला अधिक वेळ लागतो. यामुळे गाडी चालवणे अधिकच कठीण होऊन बसते कारण वाहतुकीची आणि रस्त्याची परिस्थिती सतत बदलत असते. वेळेवर योग्य कार्यवाही करायची असल्यास हे बदल लवकर समजून घेतले पाहिजेत.
कार व प्रवास (इंग्रजी) मासिकानुसार, “वृद्ध चालक सहसा वाहन नियंत्रण व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे घातक अपघातांमध्ये गोवले जातात.” पण का? तेच वृत्त पुढे म्हणते: “ही समस्या . . . अशा परिस्थितींशी संबंधित आहे असे वाटते ज्यामध्ये वृद्ध चालकाने एखाद्या चौकात प्रवेश करण्याआधी डावीकडील आणि उजवीकडील बदलती माहिती लक्षात घेतली पाहिजे.”
मग, मंद प्रतिक्रियांवर काय उपाय करता येईल? पुढे चौक असतील तर सावधगिरी बाळगा. निघण्याआधी वाहतूक दोनदा तपासून पाहण्याची सवय करा. खासकरून वळणावर सावध असा. चौकांमध्ये वळण घेणे घातक असू शकते; खासकरून तुमचा रस्ता समोरून येणाऱ्या वाहतुकीच्या रस्त्याला ओलांडत असल्यास.
अमेरिकेत, ७५ वर्षे ओलांडलेल्या चालकांचे चौकात घडलेले ४० टक्के घातक अपघात डावीकडे वळताना घडले होते. वाहन सुरक्षा एएए संस्था त्या देशातील चालकांना असा सल्ला देते: “काही वेळा डावीकडे वळणे चुकवायचे असले तर तीन उजवी वळणे घ्या.” तुमच्या परिसरातील परिस्थितींशी तुम्ही हे तत्त्व जुळवण्याचा प्रयत्न करू शकता. पूर्वयोजनेमुळे तुम्ही धोकेदायक आणि कठीण चौक टाळू शकाल.
विचारात घेण्याजोगा निर्णय
गाडी चालवण्याच्या आपल्या क्षमतेचे तुम्ही परीक्षण कसे करू शकता? कदाचित एखाद्या योग्य मित्राला किंवा कुटुंबाच्या सदस्याला सोबत घेऊन तुम्ही आपल्या कौशल्यांचे परीक्षण करू शकाल. मग, त्यांचे निरीक्षण लक्षपूर्वक ऐका. कदाचित तुम्ही सुरक्षित वाहन चालवण्याचा एखादा कोर्सही घेऊ शकता. अनेक वाहन प्रशालांमध्ये खास वयस्क चालकांसाठी काही कोर्सेस असतात. मरता मरता वाचण्याच्या एक किंवा दोन घटना घडल्यावर तुम्ही गाडी चालवण्यात पूर्वीसारखे चांगले राहिला नाहीत अशी सूचना तुम्हाला मिळू शकेल.
वास्तविक पाहता, काही काळानंतर गाडी चालवण्याचे थांबवणे तुमच्या फायद्याचे असेल. हा निर्णय घेणे फार कठीण असू शकते. आधी उल्लेखिलेल्या मर्टल यांना ठाऊक आहे की, लवकरच त्यांना गाडी चालवणे थांबवावे लागेल. तो दिवस जवळ येण्याआधी सवय करण्यासाठी त्या बहुतेक वेळा इतरांच्या गाडीत जाऊ लागल्या आहेत. दुसरी व्यक्ती गाडी चालवते याविषयी त्यांना काय वाटते? त्या म्हणतात, “गाडी चालवण्याच्या तणावाखाली न राहता प्रवासाची मजा घेणे छान वाटते.”
सर्व गोष्टींचा नीट विचार केल्यावर तुम्हालाही असेच वाटेल. मित्रासोबत गेल्यावर खरेदी करायला, लहानसहान कामे उरकायला, कोणाला भेटायला किंवा मिटिंगला जायला मजा येते. कदाचित तुमचा मित्र तुमच्या कारमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. अशाप्रकारचा प्रवास एकटे जाण्यापेक्षा जास्त सुरक्षित आणि आनंददायक असेल. किंवा सार्वजनिक वाहतूक असल्यास तिचा उपयोग करणे हा दुसरा व्यावहारिक पर्याय असू शकतो. हे लक्षात ठेवा की, तुमचे मूल्य गाडी चालवण्याच्या तुमच्या क्षमतेवर अवलंबून नाही. तर तुमच्या उत्तम गुणांमुळे तुम्ही आपल्या कुटुंबाकरता व मित्रांकरता मूल्याचे ठरता.—नीतिसूत्रे १२:२; रोमकर १४:१८.
तरुण असो नाहीतर वृद्ध, अनुभवी चालक नाहीतर कमअनुभवी, मोटार अपघातांच्या धोक्यापासून तुम्ही एकदम सुरक्षित असू शकत नाही. गाडी चालवण्यासोबत असलेली गंभीर जबाबदारी समजून घ्या. अपघात टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा. असे केल्याने, आणखी पुष्कळ प्रवासांमध्ये तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करू शकाल. (g०२ ८/२२)
[तळटीप]
^ या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.
[२२ पानांवरील चित्र]
रात्रीची चांगली झोप घेऊन शरीराला आवश्यक असलेले “इंधन” निश्चित पुरवा
[२३ पानांवरील चित्र]
थोडा वेळ आराम घेतल्याने किंचित उशीर होईल, पण त्यामुळे जीव वाचतील
[२३ पानांवरील चित्र]
वृद्ध चालकांना जास्त अनुभव असतो पण त्यांना वेगळ्याच आव्हानांना सामोरे जावे लागते
[२४ पानांवरील चित्र]
दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रवास करणे फायद्याचे आहे