व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“या वेळी कदाचित तो बदलेल”

“या वेळी कदाचित तो बदलेल”

“या वेळी कदाचित तो बदलेल”

उत्साही, आकर्षक व्यक्‍तिमत्त्वाची रोक्साना * चार मुलांची आई आणि साऊथ अमेरिकेतील एका प्रतिष्ठित सर्जनची पत्नी आहे. ती सांगते, “माझे पती आपल्या वागण्याबोलण्याने लगेच सर्वांचे मन जिंकतात.” पण रोक्सानाच्या पतीच्या व्यक्‍तिमत्वाला तितकीशी आकर्षक नसणारी दुसरी बाजू देखील आहे. आणि दुर्दैवाने तिच्याशिवाय ती इतर कोणी पाहिलेली नाही, अगदी त्यांच्या जवळच्या लोकांनीही नाही. “घरात तो अक्षरशः राक्षसासारखा वागतो. तो भयंकर संशयी आहे.”

रोक्साना पुढे आपली कहाणी सांगू लागते. तिच्या चेहऱ्‍यावर चिंता व काळजीचे भाव स्पष्ट दिसतात. “आमच्या लग्नाच्या दोन तीन आठवड्यांनंतरच समस्येला सुरवात झाली. माझे भाऊ आणि आई आम्हाला भेटायला आले होते; मी मोठ्या आनंदाने त्यांच्यासोबत हसतखेळत गप्पागोष्टी केल्या. पण ते गेल्यानंतर काय झाले काय माहीत, माझ्या पतीने मला रागाच्या भरात खूप जोरात सोफ्यावर ढकलले. हे सगळं खरंच घडतंय यावर मला विश्‍वासच बसेना.”

दुःखाची गोष्ट म्हणजे रोक्सानाच्या जीवनातील एक अतिशय कठीण परीक्षेची ही नुसती सुरवात होती कारण त्यानंतरच्या वर्षांत तिला वारंवार तिच्या पतीकडून मारहाण होत असे. जणू एक दुष्टचक्रच सुरू झाले होते. रोक्सानाचा नवरा तिला मारायचा, मग अगदी गयावया करून क्षमा मागायचा आणि पुन्हा कधी तिच्यावर हात न उचलण्याची शपथ घ्यायचा. आणि तो खरेच निदान काही दिवस तरी चांगले वागायचा. मग पुन्हा तोच प्रकार. रोक्साना म्हणते, “मी नेहमी विचार करायचे की या वेळी कदाचित तो बदलेल. कित्येकदा मी त्याला सोडून निघून गेले, पण प्रत्येक वेळी मी परत त्याच्याकडे यायचे.”

एखाद्या दिवशी आपल्या पतीचा हा मारहाणीचा प्रकार टोकाला जाईल अशी रोक्सानाला भीती वाटते. ती म्हणते, “त्याने माझा, मुलांचा आणि स्वतःचाही जीव घेण्याची धमकी दिली आहे. एकदा तर त्याने माझ्या गळ्यावर कात्री धरली होती. एकदा त्याने मला बंदुकीचा धाक दाखवला; माझ्या कानावर ती धरून त्याने चाप ओढला! सुदैवाने बंदुकीत गोळ्या नव्हत्या, पण मी मात्र भीतीनेच अर्धमेली झाले!”

चुपचाप सहन करण्याची परंपरा

जगभरात रोक्सानासारख्या लाखो स्त्रियांना हिंसक पुरुषांकडून अत्याचार सहन करावा लागतो. * त्यांच्यापैकी कित्येकजणी मूग गिळून सगळे सहन करतात. कोणाला सांगूनही काय उपयोग, असा त्या तर्क करतात. कारण अत्याचार करणारे कित्येक पती, “माझी बायको लहानसहान गोष्टींचा बाऊ करते” “तिला पराचा कावळा करण्याची सवय आहे,” अशा उडवाउडवीच्या गोष्टी करून आपल्यावर लावलेले दोष झटकून टाकतात.

आज अनेक स्त्रियांना सतत एका दहशतीखाली वावरावे लागते, आणि तेसुद्धा स्वतःच्याच घरात, जेथे त्यांना सर्वात सुरक्षित वाटले पाहिजे. ही एक दुःखाची गोष्ट आहे. पण सहसा त्यांना सहानुभूती मिळण्याऐवजी अत्याचार करणाऱ्‍या पुरुषालाच लोकांची सहानुभूती मिळते. काहीजण तर यावर विश्‍वासही ठेवायला तयार नसतात की समाजातला एक मान्यवर नागरिक आपल्या पत्नीला मारहाण करत असेल. अनीता नावाच्या एका स्त्रीने आपल्या प्रतिष्ठित पतीकडून होणाऱ्‍या अत्याचाराविषयी स्पष्टपणे बोलून दाखवले तेव्हा काय घडले हे पाहा. “आमच्या परिचितांपैकी एका गृहस्थाने मला म्हटले: ‘इतक्या सोज्वळ माणसावर तू असले आरोप लावतेस?’ दुसऱ्‍या एकाने तर म्हटले की मीच कदाचित माझ्या पतीला राग येईल असे वागत असेन! माझे पती खरोखरच माझ्यावर अत्याचार करत होते हे उघडकीस आल्यावरही, माझ्या स्नेह्‍यांपैकी काही मला टाळू लागले. त्यांच्या मते मी निमूटपणे सहन करायला हवे होते, कारण ‘शेवटी पुरुष पुरुष असतात.’”

अनीताच्या अनुभवावरून दिसून येते त्याप्रमाणे बऱ्‍याचजणांना विवाह जोडीदाराकडून होणाऱ्‍या अत्याचाराची दुर्दैवी वस्तुस्थिती पचवायला कठीण जाते. पण पत्नीला अर्धांगिनी म्हणणारा पती तिला इतकी क्रूर वागणूक कशी काय देऊ शकतो? आणि अशा हिंसाचाराला बळी पडणाऱ्‍या स्त्रियांना कोणत्याप्रकारचे साहाय्य देता येईल? (g०१ ११/८)

[तळटीपा]

^ या लेखमालिकेत नावे बदलण्यात आली आहेत.

^ अनेक पुरुषांनाही हिंसक वागणूक सहन करावी लागते हे आम्ही कबूल करतो. पण अभ्यासांवरून असे दिसून येते की हिंसाचारामुळे स्त्रियांना अधिक गंभीर दुखापती होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे या लेखांचा रोख हिंसाचाराला बळी पडणाऱ्‍या स्त्रियांवर आहे.

[४ पानांवरील चौकट/चित्र]

घरातील अत्याचार मारहाणीपुरता मर्यादित नाही

स्त्रियांविरुद्ध अत्याचाराचा नायनाट करण्याविषयीच्या संयुक्‍त राष्ट्राच्या घोषणापत्रात, “स्त्रियांविरुद्ध अत्याचार” ही संज्ञा “पुरूषांकडून स्त्रियांवर होणाऱ्‍या अशा कोणत्याही हिंसाचाराला लागू होते, ज्यामुळे त्यांना शारीरिक, लैंगिक अथवा मानसिक हानी होऊ शकते; यात एकांतात किंवा चारचौघांत दिलेल्या हिंसाचाराच्या धमक्या, जबरदस्ती करणे किंवा अधिकाराचा गैरवापर करून स्वतंत्रतेपासून वंचित करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.” या हिंसाचारात इतर गोष्टींव्यतिरिक्‍त, “कुटुंबात व समाजात होणारा शारीरिक, लैंगिक व मानसिक अत्याचार, मारहाण, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, हुंड्यावरून अत्याचार, वैवाहिक बलात्कार, स्त्रियांच्या जननेंद्रियांची काटछाट आणि स्त्रियांकरता अपायकारक असलेल्या इतर पारंपरिक प्रथा” समाविष्ट आहेत.