“कधीकधी वाटतं, आपण स्वप्न तर पाहात नाही ना!”
“कधीकधी वाटतं, आपण स्वप्न तर पाहात नाही ना!”
लूर्देज आपल्या अपार्टमेंटच्या खिडकीतून शहराचे दृश्य एकटक पाहात आहे. आपले थरथरणारे ओठ लपवण्याच्या प्रयत्नात तिने तोंडावर हात ठेवला आहे. तब्बल २० वर्षे, आपला नवरा ॲल्फ्रेडो याचा हिंसक अत्याचार सहन करणारी ती एक लॅटिन-अमेरिकन स्त्री आहे. ॲल्फ्रेडो आता बदलला आहे. पण तरीसुद्धा आपल्याला सहन कराव्या लागलेल्या शारीरिक आणि भावनिक दुःखाबद्दल बोलणे अजूनही लूर्देजला कठीण जाते.
“आमचे लग्न होऊन दोन आठवडेही झाले नव्हते तेव्हा हा प्रकार सुरू झाला,” लूर्देज अगदी हळू आवाजात सांगते. “एकदा त्याने मला इतक्या जोरात मारले की माझे दोन दात पडले. दुसऱ्यांदा तो मला ठोसा मारणार इतक्यात मी त्याला चुकवले आणि त्याचा हात कपाटावर आदळला. पण लाथाबुक्क्यांपेक्षा त्याचे बोलणे जास्त लागायचे. तो मला ‘नसती ब्याद’ म्हणायचा आणि मला काहीच अक्कल नसल्यासारखा माझ्याशी वागायचा. मला त्याला सोडून जावेसे वाटायचे, पण तीन मुलांना घेऊन मी कुठे गेले असते?”
ॲल्फ्रेडो अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तो सांगू लागतो, “मी स्वतः एक वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे, मला कोर्टात हजर राहण्याचा आदेश आणि पत्नीला मारहाण न करण्याचे कायदेशीर आदेशपत्र देण्यात आले तेव्हा मला लाजिरवाणे झाले. मी बदलण्याचा प्रयत्न केला, पण काही दिवसांनंतर मी पुन्हा तसेच वागायला लागलो.”
मग हा बदल कसा घडून आला? लूर्देज थोडी सावरली आहे, ती सांगते: “जवळच एक दुकान चालवणारी स्त्री यहोवाच्या साक्षीदारांपैकी आहे.” मला बायबलचे ज्ञान घ्यायला आवडेल का असे तिने स्वतःहून मला विचारले. अभ्यासातून मला हे शिकायला मिळाले की यहोवा देव स्त्रियांना कमी लेखत नाही. मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहू लागले, अर्थात सुरवातीला ॲल्फ्रेडो खूप संतापला. पण माझ्यासाठी मात्र राज्य सभागृहात निरनिराळ्या लोकांशी ओळख व मैत्री करून त्यांच्यासोबत भेटण्याबोलण्याचा अनुभव नवीन होता. मी माझे स्वतःचे विश्वास बाळगू शकते, ते मोकळेपणाने व्यक्त करू शकते आणि इतरांना देखील ते शिकवू शकते याची जाणीव झाली तेव्हा मला आश्चर्य वाटले. देवाला माझी किंमत आहे असे मला जाणवू लागले आणि यामुळे मला धैर्य आले.
“एक महत्त्वाची घटना मी कधीही विसरणार नाही. ॲल्फ्रेडो अजूनही दर रविवारी कॅथलिक मासला जायचा. मी यहोवाच्या साक्षीदारांत सहभागी झाल्याबद्दल तो तक्रार करत होता. मी त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवून अगदी शांतपणे पण आत्मविश्वासने म्हणाले: ‘ॲल्फ्रेडो, तू विचार करतोस तसा मी करत नाही.’ आणि काय आश्चर्य, त्याने माझ्यावर हात उचलला नाही! त्यानंतर काही काळातच माझा बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणजे पाच वर्षांत त्याने मला एकदाही मारले नाही.”
पण याहीपेक्षा मोठे बदल घडून येणार होते. ॲल्फ्रेडो सांगतो: “लूर्देजचा बाप्तिस्मा होऊन तीन वर्षे झाल्यानंतर माझ्यासोबत काम करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाने मला त्याच्या घरी आमंत्रित केले आणि बायबलमधून अनेक रोचक गोष्टी सांगितल्या. मी माझ्या पत्नीला न सांगता त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागलो. काही काळातच मीसुद्धा लूर्देजसोबत सभांना जाऊ लागलो. तिथे ऐकलेली बरीच भाषणे कौटुंबिक विषयांवर असायची आणि ती ऐकल्यावर मला स्वतःची खूप लाज वाटायची.”
मंडळीतले सदस्य, ज्यांत पुरुषही सामील होते सभा संपल्यानंतर केर काढायचे, हे पाहून ॲल्फ्रेडोवर खूप चांगला प्रभाव पडला. तो त्यांच्या घरी जायचा तेव्हा पती आपल्या पत्नींना ताटवाट्या धुवायलही मदत करतात हे त्याने पाहिले. या लहानलहान गोष्टींतून ॲल्फ्रेडोला खरे प्रेम काय असते ते प्रत्यक्षात पाहायला मिळाले.
यानंतर काही काळातच ॲल्फ्रेडोचा बाप्तिस्मा झाला आणि आता तो व त्याची पत्नी पूर्ण वेळेचे सेवक या नात्याने कार्य करत आहेत. लूर्देज सांगते, “बहुतेक वेळा आता तो मला जेवणं झाल्यावर टेबल स्वच्छ करायला मदत करतो आणि अंथरुणं घालतो. स्वयंपाक छान झाला की तो आवर्जून तारीफ करतो; तसेच, कोणते संगीत ऐकायला आवडेल किंवा घरच्या उपयोगाच्या कोणत्या वस्तू घ्याव्यात यांसारख्या गोष्टींसंबंधी तो मला निर्णय घेऊ देतो. पूर्वी ॲल्फ्रेडोने असे कधीच केले नसते! अलीकडेच, त्याने पहिल्यांदा माझ्यासाठी बाजारातनं फुलं आणली. कधीकधी वाटतं, आपण स्वप्न तर पाहात नाही ना!” (g०१ ११/८)
[१० पानांवरील चित्र]
“देवाला माझी किंमत आहे याची मला जाणीव झाली. यामुळे मला धैर्य मिळाले”
[१० पानांवरील चित्र]
ॲल्फ्रेडोने मंडळीतल्या सदस्यांना, पुरुषांना देखील सभा झाल्यावर केर काढताना पाहिले तेव्हा त्याच्यावर फार चांगला प्रभाव झाला
[१० पानांवरील चित्र]
पती आपल्या पत्नींना भांडी धुण्यासही मदत करतात हे त्याने पाहिले
[१० पानांवरील चित्र]
“अलीकडेच, पहिल्यांदा त्याने माझ्यासाठी फुलं आणली”