दररोज ॲस्प्रिन घेणे उचित की अनुचित?
दररोज ॲस्प्रिन घेणे उचित की अनुचित?
पुढील गोष्ट एका डॉक्टरने सांगितलेली सत्य घटना आहे. या घटनेवरून ही समस्या किती सामान्य आहे ते कळते.
घरातले सगळेजण चिंतेत होते. डॉक्टर देखील काळजीत पडले. ते म्हणाले, “रक्तस्राव लवकर बंद झाला नाही तर पेशन्टला रक्त द्यावं लागेल.”
कित्येक आठवड्यांपासून त्या पेशन्टच्या शौचातून रक्त पडत होते. त्याच्या पोटाला सूज आली आहे किंवा गॅस्ट्रायटिस झालाय असे त्याला सांगण्यात आले होते. पण नेमकं कारण डॉक्टरांनाही कळत नव्हतं. शेवटी त्यांनी विचारलं: “तुम्ही काही औषधं तर घेत नाहीये ना?”
त्यावर पेशन्ट म्हणाला: “नाही. फक्त माझ्या सांधेदुखीसाठी काही गोळ्या घेतोय.”
त्यावर डॉक्टर म्हणाले, “बघू त्या गोळ्या.” मग गोळ्यांचं पाकीट पाहिल्याबरोबर त्यांना “तो” पदार्थ सापडला. असेटेसॅलिसायलिक ॲसिड! हाच “तो” पदार्थ होता. मग काय, समस्याच सुटली. मग रुग्णाला ॲस्प्रिनची ती गोळी थांबवायला लावून त्याऐवजी आयनची आणि पोटातील रक्तस्राव बंद होण्यासाठी काही औषधं दिली; मग रक्तस्राव बंद झाला आणि हळूहळू त्याच्या रक्ताचे प्रमाणही वाढू लागले.
औषधांमुळे होणारा रक्तस्राव
जठरामधील रक्तस्राव ही औषधांमुळे निर्माण होणारी एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे. अनेक औषधांमुळं असं होऊ शकतं परंतु या समस्या मुख्यत्वे सांधेदुखी आणि वेदनाशामक औषधांमुळेच होत असतात. यांमध्ये नॉनस्टेरॉयडल ॲन्टी-इंफ्लेमेटरी ड्रग्स किंवा एनएसएआयडीएस (स्टेरॉईड्स नसलेली दाह शामक औषधे) या प्रकारची औषधं असतात. वेगवेगळ्या देशांमध्ये यांची वेगवेगळी नावे असतील.
दुकानात सर्रास मिळणाऱ्या अनेक औषधांमध्ये ॲस्प्रिन असतं; अनेक देशांमध्ये अलीकडच्या वर्षांत अधिकाधिक लोक ॲस्प्रिनचा दररोज वापर करू लागले आहेत. पण का?
ॲस्प्रिनची लोकप्रियता
हार्वर्ड हेल्थ लेटर या बातमीपत्रात १९९५ मध्ये “नियमित ॲस्प्रिनचा वापर जीवनदायक आहे” अशी बातमी आली होती. वेगवेगळ्या देशांमध्ये आणि अनेक वेळा घेतलेल्या अभ्यासांच्या आधारे संशोधकांचे असे म्हणणे आहे की, “ज्या ज्या व्यक्तीला हृदयविकार, पक्षघात किंवा गलशोथाचा त्रास आहे अथवा ज्याच्यावर कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी करण्यात आली आहे जवळजवळ त्या प्रत्येकाने दररोज ॲस्प्रिनची एक गोळी किंवा अर्धी गोळी घ्यावी. पण ॲस्प्रिनची ॲलर्जी असेल तर घेऊ नये.” *
इतर संशोधकांचे म्हणणे आहे की, पन्नाशी ओलांडलेल्या आणि हृदयविकाराचा धोका असलेल्या स्त्री-पुरुषांसाठी दररोज ॲस्प्रिन घेतल्याचे बरेच फायदे आहेत. शिवाय, अभ्यासांवरून हेही निष्पन्न झाले आहे की, दररोज ॲस्प्रिन घेतल्याने कोलन कॅन्सरचा धोका कमी होतो आणि दीर्घकाळासाठी ॲस्प्रिन जास्त प्रमाणात घेतल्यास मधुमेहींच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होऊ शकते.
पण ॲस्प्रिनमुळे हे सगळे फायदे होतात कसे? याबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध नाही. परंतु, पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, ॲस्प्रिनमुळे रक्तबिंबिकांचा चिकटपणा कमी होत असल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या बनत नाहीत. आणि त्यामुळे हृदयाला आणि मेंदूला पोहंचणाऱ्या लहान
धमन्यांमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. अशाप्रकारे, शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना इजा व्हायची टळते.ॲस्प्रिनचे इतके फायदे असताना प्रत्येकजणच ॲस्प्रिन का घेत नाही? एक कारण म्हणजे, ॲस्प्रिनविषयी अद्यापही पुष्कळ गोष्टींची माहिती नाही. किती डोस घ्यावा याविषयी देखील स्पष्ट माहिती नाही. काही जणांचे म्हणणे आहे की, एक गोळी दिवसातून दोनदा घ्यावी तर काहींचे म्हणणे आहे की, एक लहान गोळी (लहान मुलांसाठी असलेला छोटा डोस) दिवसाआड घ्यावी. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा काही वेगळा डोस घ्यावा का? डॉक्टरांना निश्चित ठाऊक नाही. एन्टेरिक-कोटेड ॲस्प्रिन थोडीफार लाभदायक आहे असे मानले जाते पण बफर्ड ॲस्प्रिनविषयी अजूनही वाद चालला आहे.
सावधगिरी का बाळगावी?
तसे पाहिले तर ॲस्प्रिन हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. अमेरिकन इंडियन लोक वाळुंजीच्या झाडाच्या सालीतून ॲस्प्रिनचे घटक काढायचे. पण तरीही त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. ॲस्प्रिनमुळे काही लोकांना रक्तस्राव होतो, काहींना याच्या ॲलर्जीमुळे दुष्परिणाम होतो; शिवाय इतर अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणजेच, कोणीही दररोज ॲस्प्रिन घेऊ शकत नाही.
ज्या व्यक्तीला हृदयविकार, पक्षघात किंवा इतर आजार होण्याचा धोका आहे ती व्यक्ती आपल्या डॉक्टरांना ॲस्प्रिनच्या वापरामुळे होणारे धोके व लाभ याबद्दल विचारू शकते. त्याला किंवा तिला रक्तस्रावाचा त्रास नाही, ॲस्प्रिनची अलर्जी नाही किंवा पोटाचा त्रास नाही याची त्याने किंवा तिने खात्री करून घ्यावी. उपचार सुरू करण्याआधी इतर संभाव्य समस्या किंवा औषधाच्या दुष्परिणामांविषयी डॉक्टरांसोबत चर्चा करावी.
आधी सांगितल्याप्रमाणे, ॲस्प्रिन आणि ॲस्प्रिनसारख्या औषधांमुळे रक्तस्रावाचा धोका असतो. आणि अशाप्रकारचा रक्तस्राव चटकन लक्षात येत नाही व तो हळूहळू वाढत जातो. इतर औषधांविषयी देखील नीट विचार करावा; विशेषतः वेदनाशामक औषधांविषयी. कोणतीही वेदनाशामक औषधे वापरताना आपल्या डॉक्टरांना त्याविषयी सांगा. बहुतेक प्रसंगी, शस्त्रक्रियेच्या आधी औषधे घेण्याचे बंद करणे सर्वात उत्तम. किंवा नियमितपणे रक्ताच्या प्रमाणाची तपासणी करणेसुद्धा चांगले असेल.
पुढे समस्या टाळायच्या असतील तर बायबलमधील हा सल्ला आपण ऐकू: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” (नीतिसूत्रे २२:३) या वैद्यकीय बाबतीत, आपण चतुर मनुष्यासारखे असू या. म्हणजे, आपल्याला शारीरिक हानी पोहंचणार नाही.
[तळटीपा]
^ सावध राहा! कोणत्याही एका वैद्यकीय उपचाराची शिफारस करत नाही.
[२०, २१ पानांवरील चौकट/चित्र]
दररोज ॲस्प्रिन कोणी घ्यावी
• ज्या लोकांना हृदयविकार किंवा अरुंद झालेल्या ग्रीवा रोहिणींचा (मानेतल्या मुख्य धमन्यांचा) त्रास आहे.
• ज्यांना थ्रॉम्बॉटिक पक्षघात झाला आहे (जो गुठळ्यांमुळे होत असतो) किंवा ट्रान्सिएंट इस्केमिक अटॅक आला आहे (पक्षघातासारखा एक लहान झटका).
• पन्नाशी ओलांडलेल्या ज्या पुरुषांना, धूम्रपान, हायपरटेन्शन, मधुमेह, एकूण कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढलेले असणे, एचडीएल कोलेस्ट्रोलचे कमी प्रमाण असणे, अति लठ्ठपणा, दारूचे व्यसन, अकाली हृदयविकार (५५ वयाच्या आधी हार्ट अटॅक येणे) किंवा पक्षघाताचा घराण्यातच त्रास असणे, बैठी जीवनशैली यातील एका किंवा एकाहून अधिक कारणांमुळे हृदयाचा कोणताही त्रास असेल त्यांना.
• पन्नाशी ओलांडलेल्या स्त्रिया ज्यांना वर दिलेल्या त्रासांपैकी दोन किंवा अधिक त्रास आहेत त्यांना.
या बाबतीत कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
[चित्राचे श्रेय]
सूत्र: कन्स्यूमर रिपोट्र्स ऑन हेल्थ