वास—समुद्राचा तळ गाठल्यानंतर लोकप्रिय
वास—समुद्राचा तळ गाठल्यानंतर लोकप्रिय
स्वीडनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
ऑगस्ट १०, १६२८. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील बंदरावर लोक झुंडीच्या झुंडीने आले होते. तिथे विशेष असे काय होते? त्या दिवशी वासा ही राजेशाही थाटातील युद्धनौका पहिल्यांदाच समुद्रात उतरणार होती. तिला बनवायला जवळजवळ तीन वर्षे लागली होती.
वासा ही काही साधीसुधी युद्धनौका नव्हती. संपूर्ण जगातील ही सर्वात शक्तिशाली नौका असावी अशी राजा गस्तावस II अडॉल्फस वासा याची इच्छा होती. डेन्मार्कचा राजा तोफांचे दोन मजली जहाज बांधत आहेत हे ऐकल्यावर राजा गस्तावसनेही वासा जहाजावर तोफांसाठी दुसरा मजला बांधण्याची आज्ञा दिली. आपल्या घराण्याचे नाव असलेले हे जहाज सर्वोत्तम असावे अशी त्याची इच्छा होती.
ही नौका बनवण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. यामध्ये ६४ तोफा बसवण्यात आल्या होत्या. शिवाय, नौकेचे सौंदर्य वाढवण्यासाठी ७०० हून अधिक मूर्ती व शिल्पांचा वापर केला होता. ही दिमाखदार आणि शक्तिशाली नौका त्या काळातील सर्वात वैभवी नौका वाटत होती. म्हणूनच तर, आपले वैभव आणि दिमाख दाखवण्यासाठी राजा वासाने हिचा उद्घाटन समारंभ थाटामाटात साजरा केला. या नौकेची किंमत स्वीडनच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील ५ टक्क्यांपेक्षा अधिक होती. या नौकेने स्टॉकहोमच्या समुद्रात प्रवेश केला तेव्हा सर्व लोकांच्या माना गर्वाने ताठ झाल्या आणि टाळ्यांचा गजर करीत लोकांनी आपला आनंद व्यक्त केला.
स्वीडनच्या वैभवाचा नाश
पण, वासा एक किलोमीटरचाही पल्ला गाठते न गाठते तोच वाऱ्याच्या एका जोरदार झोताने ती पाण्यात कलंडली. जहाजात चहूकडून पाणी भरू लागले आणि पाहता पाहता तिने समुद्राचा तळ गाठला. समुद्रात प्रवेश केल्या केल्या बुडालेली ही पहिलीच नौका!
बंदरावरील लोक पाहतच राहिले. स्वीडनची ही युद्धनौका युद्धात नव्हे तर वाऱ्याच्या एका झोतात चित झाली होती. तिने आपल्यासोबत ५० जणांना जलसमाधी दिली. . . . तेव्हापासून वासाचे नाव घेतले की मान गर्वाने उठण्याऐवजी शरमेने खाली झुकते.
या अपमानजनक दुर्घटनेचे जबाबदार कोण हे शोधण्यासाठी तातडीची सभा भरवण्यात आली. पण, राजा आणि त्याच्या नौदलातील दुय्यम वरिष्ठ नौसेनापती, क्लास फ्लेमिंग हे दोघे या दुर्घटनेला जबाबदार होते हे समजल्यावर मात्र मामला तेथेच दाबून टाकण्यात आला.
या दुर्घटनेत राजाचा हात होता हे कशावरून म्हणता येईल? राजाला स्वतःच्या पसंतीचे एक जहाज बनवायचे होते, त्यामुळे कारागीरांनी निमूटपणे राजाने दिलेल्या डिझाईनप्रमाणे जहाज बनवले; या डिझाईनची कारागीरांना कसलीही माहिती नव्हती. जहाज तयार झाल्यावर नौसेनापती फ्लेमिंगने जहाजाचे संतुलन ठीक आहे की नाही हे पाहण्याकरता ३० लोकांना जहाजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पळत जाण्यास सांगितले. जास्त लोक ज्या बाजूने पळायचे ती बाजू कलंडत असल्याचे त्याने पाहिले. तिसऱ्यांदा जेव्हा त्यांना पळण्याची आज्ञा देण्यात आली तेव्हा तर ते अक्षरशः उलटणारच होते, तेवढ्यात फ्लेमिंगने त्यांना थांबवले. या चाचणीवरून फ्लेमिंगला हे माहीत होते, की जहाज पाण्यात संतुलन राखू शकणार नाही पण तरीही तो काही बोलला नाही. पण राजा आणि कमांडरसारख्या बड्या लोकांवर आरोप लावण्याची हिंमत कोण करेल?
जहाज बुडून काही वर्ष झाल्यानंतर म्हणजे १६६४-६५ सालादरम्यान, स्वीडन नौदलातील एका भूतपूर्व अधिकाऱ्याने एका उपकरणाद्वारे वासा जहाजात लावलेल्या तोफा बाहेर काढल्या. त्यानंतर मात्र वासा हळूहळू समुद्रात ३० मीटर खोल असलेल्या गाळात आणखीनच रुतत गेले आणि त्याबरोबरच त्याच्या आठवणीही नाहीशा झाल्या.
गाळातून वर काढणे
ॲन्डर्स फ्रॅन्झेन नावाचा एक पुरातत्त्वशास्त्रज्ञ कित्येक वर्षांपासून वासाविषयीच्या जुन्या दस्तऐवजाचा अभ्यास करीत होता आणि समुद्राच्या तळाशी त्याचा शोध घेत होता. अखेर, १९५६ सालच्या ऑगस्ट महिन्यात वासा त्याच्या हाती लागले. या जहाजाच्या लाकडाचा एक तुकडा वर आणण्यासाठी त्याने एका विशिष्ट उपकरणाचा उपयोग केला. नंतर मग त्याने फार कौशल्याने अख्खी वासा नौकाच समुद्रातून वर काढून बंदरावर उभी केली.
एप्रिल २४, १९६१ रोजी म्हणजे बरोबर ३३३ वर्षांनंतर वासा नौका स्टॉकहोमच्या बंदरावर उभी होती. लोकांनी पुन्हा एकदा तिचे जोराने स्वागत केले. परंतु आता ही नौका फक्त प्रदर्शनालायक होती. शिवाय, समुद्री पुरातत्त्वशास्त्रज्ञांसाठी ती जणू माहितीचा एक खजिना होती. २५,००० हून अधिक कलाकृतींवरून १७ व्या शतकातील या युद्धनौकेविषयी बरीच मनोरंजक माहिती त्यांना मिळाली. शिवाय, त्या काळी जहाजे आणि मूर्ती कशा बनवल्या जात हे देखील त्यांना कळाले.
पण वासा नौकेवरील सगळ्या वस्तू जशाच्या तशा कशा राहिल्या? एक कारण म्हणजे, ही नौका एकदम नवीन होती. दुसरे कारण म्हणजे, ही नौका समुद्राच्या कमी खारट असलेल्या गाळात रुतून बसल्यामुळे, समुद्रात पडलेल्या लाकडी वस्तूंना सहसा लागणारी समुद्री कीड या नौकेच्या लाकडाला लागली नव्हती.
विद्वानांचे म्हणणे आहे की वासा नौकेला स्थिर ठेवण्यासाठी २४० टनापेक्षा अधिक वजनाची आवश्यकता आहे. पण वासा वर फक्त १२० टन वजन ठेवण्यात आले कारण आणखी वजन ठेवण्यासाठी जहाजावर जागा नव्हती. शिवाय खूप वजन झाल्यामुळे खालच्या मजल्यावरील छिद्रांमधून पाणी आत शिरून नौका पाण्यात बुडण्याची शक्यता होती. वासा नौका दिसायला सुंदर होती. फक्त एकच खोट तिच्यात होती: तिला स्वतःचा तोल सावरता येत नव्हता. या साध्यासुध्या कारणापायी ती समुद्रात तग धरू शकली नाही.
आज ही नौका म्युझियमची आकर्षक शो पीस बनली आहे. ही जगातील सर्वात जुनी नौका आहे. १६२८ साली झालेल्या दुर्घटनेनंतर या नौकेतील एक एक वस्तू जशी का तशी आहे. दर वर्षी ८,५०,००० पर्यटक १७ व्या शतकातल्या या दिमाखदार व वैभवी नौकेला पाहायला येतात. अहंकारामुळे व निष्काळजीपणामुळे जहाज बांधकामातील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची ती आठवण करून देते.
[२६ पानांवरील चित्र]
राजा गस्तावस II अडॉल्फस वासा
[चित्राचे श्रेय]
Foto: Nationalmuseum, Stockholm
[२६, २७ पानांवरील चित्रे]
३०० पेक्षा अधिक वर्ष समुद्राच्या तळात दडलेली “वासा” आता जगासमोर आली आहे
[चित्राचे श्रेय]
Genom tillmötesgående från Vasamuseet, Stockholm
[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]
Målning av det kapsejsande Vasa, av konstnär Nils Stödberg