लग्नाआधी मुलं होणं—हे पौरुषाचं लक्षण आहे का?
तरुण लोक विचारतात . . .
लग्नाआधी मुलं होणं—हे पौरुषाचं लक्षण आहे का?
“मी लग्न न झालेल्या कितीतरी मुलांना ओळखते जे बिनधास्त आपल्याला मुलं असल्याचं सांगतात; आणि अशा अविर्भावात सांगतात की जणू त्यांना या मुलांची काही काळजीच नाही.”—हॅरल्ड.
दरवर्षी अमेरिकेत १३-१९ या वयोगटातल्या जवळजवळ १० लाख मुली गरोदर राहतात. या मुलींना होणाऱ्या मुलांपैकी अधिकांश अनौरस असतात. पुढच्या दोन वर्षांच्या आत याच मुलींपैकी दर चारमधून एकीला आणखी एक अनौरस संतती होईल. अमेरिकेतल्या लहान मुलांपैकी कित्येकांना लहानपणी वडिलांचं प्रेम अनुभवायला मिळणारच नाही.
अल्पवयीन मुली गरोदर राहण्याचं प्रमाण इतर विकसित देशांच्या तुलनेत अमेरिकेत बरच जास्त असलं तरीसुद्धा ही समस्या काही अमेरिकेपुरतीच मर्यादित नाही. इंग्लंड व फ्रांस यांसारख्या काही युरोपियन देशांत, अल्पवयीन मुली गरोदर राहण्याचं प्रमाण जवळजवळ अमेरिकेइतकंच आहे. आफ्रिका व दक्षिण अमेरिकेच्या काही देशांत तर हे प्रमाण अमेरिकेपेक्षा दुप्पट आहे. पण मुळात या समस्येचं कारण काय?
समस्येचं कारण
आपण आज ‘कठीण दिवसांत’ राहात आहोत; यामुळेच आज नैतिकतेचा ऱ्हास होताना दिसत आहे. (२ तीमथ्य ३:१-५) अलीकडच्या काही वर्षांत घटस्फोटांचं प्रमाण अतिशय वाढलं आहे. समलिंगी आणि इतर प्रकारच्या जीवनशैली आता समाजात मान्य केल्या जात आहेत. उत्तेजक संगीत ॲल्बम, संगीत व्हिडियो, कामुक विषयांनी व दृश्यांनी रंगलेले मॅगझीन्स आणि त्यातल्या जाहिराती, सेक्सचं खुलेआम चित्रण करणारे टीव्ही कार्यक्रम व चित्रपट या सर्व गोष्टींचा आज तरुणांच्या कोवळ्या मनांवर परिणाम होत आहे. गर्भपात करवून घेणं आजकाल अगदी सोपं झालं आहे, तसच गर्भ निरोधक साधने देखील सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे बरेच तरुण सेक्सला एक खेळ समजू लागले आहेत. लग्नाआधीच पितृत्व आलेल्या एकानं म्हटलं: “मला फक्त मौज हवी, त्यासोबत जबाबदारी नको.” दुसऱ्या एकानेही असंच म्हटलं, “सेक्स हा एक खेळ आहे.”
अमेरिकेत अशी प्रवृत्ती सहसा गरीब वर्गातल्या मुलांमध्ये पाहायला मिळते. या विषयावर संशोधन करणाऱ्या इलायजा ॲन्डरसन यांनी शहरातल्या काही जुन्या वस्तींत राहणाऱ्या बऱ्याच मुलांच्या मुलाखती घेतल्या; त्यांचं असं मत आहे: “बऱ्याच मुलांना सेक्स हा फुशारकी मारण्याचा विषय वाटतो. जो जितक्या मुलींना फसवतो तितके त्याला सगळेजण मानतात.” पण अशी ही निर्लज्ज वृत्ती मुलांमध्ये का दिसून येते? ॲन्डरसन सांगतात की या मुलांच्या
जीवनात सर्वात जास्त महत्त्व “त्यांच्या दोस्तांना असतं. दोस्त म्हणतील तसं वागायला ही मुलं तयार असतात, त्यांना वागावच लागतं.”तर ॲन्डरसन यांच्या मते बऱ्याच मुलांना सेक्स हा खेळ वाटतो. या खेळाचा उद्देश “मुलीला फसवणं” इतकाच असतो. मग त्यासाठी एखादा मुलगा आपले कपडे, स्टाईल, हावभाव, कलागुण व गोड बोलण्याच्या कौशल्यानं मुलीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच मुलांसाठी हा “डाव्या हाताचा खेळ” असतो. पण ॲन्डरसन पुढे सांगतात की “मुलीला दिवस गेले हे कळताच, तो मुलगा तिच्यापासून दूर जाऊ लागतो.”—अविवाहित पिता —बदलत्या भूमिका आणि बदलते दृष्टिकोन, संपादक रॉबर्ट लर्मन आणि थियोडोरा ऊम्स.
देवाचा दृष्टकोन
पण खरच पितृत्व आल्यानं पुरुषत्व सिद्ध होतं का? सेक्स केवळ एक खेळ आहे का? आपला निर्माणकर्ता यहोवा देव असं समजत नाही. त्याचं वचन बायबल, यात तो स्त्री व पुरुषातील संबंधांच्या आदरणीय उद्देशाबद्दल सांगतो. पहिला पुरुष व स्त्री यांना निर्माण केल्यानंतर, बायबल सांगते की “देवाने त्यांस आशीर्वाद दिला; देव त्यांस म्हणाला: फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ति १:२७, २८) वडिलांनी मुलांना जन्म दिल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडून द्यावे असा देवाचा मुळीच उद्देश नव्हता. त्याने पहिल्या स्त्री व पुरुषाला विवाहाच्या कायमच्या बंधनात बांधले. (उत्पत्ति २:२४) त्यामुळे त्याची इच्छा ही होती की प्रत्येक मुलावर आई व वडील या दोघांच्या प्रेमाची सावली असावी.
पण काही काळातच पुरुष अनेक पत्नी करू लागले. (उत्पत्ति ४:१९) उत्पत्ति ६:२ यात सांगितल्यानुसार स्वर्गदूत देखील यातून सुटले नाहीत. “मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले.” मग त्यांनी मनुष्यांचे रूप घेतले आणि त्या सुंदर मानवकन्यांपैकी “ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.” (तिरपे वळण आमचे.) नोहाच्या काळात जलप्रलय आला तेव्हा या दुरात्म्यांना पुन्हा आत्मिक शरीर धारण करणं भाग पडलं. पण बायबल सांगते की त्यांना स्वर्गात प्रवेश मिळाला नाही आणि आता ते पृथ्वीच्या अंतराळात आहेत. (प्रकटीकरण १२:९-१२) सैतान व त्याच्या या दुरात्म्यांनी आज लोकांची मनं अगदी भ्रष्ट करून टाकली आहेत. (इफिसकर २:२) लग्नाआधीच मुलांना जन्म देणारे आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडून देणारे तरुण देखील नकळत सैतानाच्या दुष्ट प्रभावाला बळी पडून असं बेजबाबदार वर्तन करतात.
म्हणूनच बायबल आपल्याला असा सल्ला देते: “देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभु ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हास आगाऊ सांगितले होते व बजावलेहि होते.”—१ थेस्सलनीकाकर ४:३-६.
“जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे?” बऱ्याच तरुणांना हे हास्यास्पद वाटेल. ऐन तारुण्यात, लैंगिक वासना अतिशय तीव्र असताना हे जवळजवळ अशक्य आहे असंही काहींना वाटेल. पण वर दिलेल्या वचनात सांगितल्याप्रमाणे जारकर्म करणं हे “आपल्या बंधूचा गैरफायदा” घेणं आहे. एका मुलीला गर्भवती होऊ देणं व मग तिला निराधार सोडून देणं हे गैरफायदा घेणं नाही तर आणखी काय आहे? शिवाय, शरीर संबंधांतून संक्रमित होणारे निरनिराळे भयानक रोग (जेनीटल हर्पीझ, सिफिलिस, गनोरिया किंवा एड्स) तिला लागण्याची शक्यता आहे याचाही विचार केला जाऊ नये का? अर्थात, हे भयंकर परिणाम टाळण्याचेही उपाय आहेत. पण तरीसुद्धा एका मुलीला बदनाम करणं व तिला कौमार्यापासून वंचित करणं हे कोणत्याच दृष्टीने योग्य नाही. तेव्हा, जारकर्मापासून अलिप्त राहणंच सर्वात चांगलं आहे. हेच खरं तर प्रौढत्वाचं लक्षण आहे. अर्थात हे सोपं नाही. “आपल्या देहावर ताबा” ठेवून जारकर्मापासून अलिप्त राहण्यासाठी तुम्हाला दृढ संकल्प करावा लागेल. पण यशया ४८:१७, १८ यात सांगितल्यानुसार देव आपल्याला निरनिराळे नियम देऊन त्यांकरवी आपल्याकरता ‘जे हितकारक ते शिकवतो.’
“मर्दासारखे वागा”
मर्दासारखं वागणं म्हणजे काय? खरं पौरुष कशाने सिद्ध होते? लग्नाआधी मुलांना जन्म दिल्याने? बायबल १ करिंथकर १६:१३, १४.
सांगते: “सावध असा, विश्वासात स्थिर राहा; मर्दासारखे वागा; खंबीर व्हा. तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करावे.”—‘मर्दासारखे वागणे’ म्हणजे सावध असणे, विश्वासात स्थिर व खंबीर असणे आणि प्रेमळ असणे. हे गुण केवळ पुरुषांनाच नव्हे, तर स्त्रियांनाही लागू होतात. तुम्ही हे आध्यात्मिक गुण संपादन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा लोक तुमचा आदर करू लागतात, एक जबाबदार पुरुष म्हणून ते तुमची प्रशंसा करतात. या पृथ्वीवर होऊन गेलेल्या सर्वश्रेष्ठ मनुष्याचा, येशू ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. लोकांनी त्याला छळलं, शेवटी मारून टाकलं, पण शेवटपर्यंत तो कसा मर्दासारखा वागला, कसा खंबीर व निर्भय राहिला यावर विचार करा. विरुद्धलिंगी व्यक्तींसोबत येशूचं वागणं कसं होतं?
येशूचा बऱ्याच स्त्रियांशी संपर्क आला. त्याच्या अनुयायांपैकी बऱ्याच स्त्रिया होत्या आणि यांपैकी काही “आपल्या पैशाअडक्याने त्यांची [त्याची व त्याच्या प्रेषितांची] सेवाचाकरी करीत असत.” (लूक ८:३) खासकरून लाजाराच्या दोन बहिणी येशूला जवळच्या वाटायच्या. बायबल तर म्हणते, “मार्था, तिची बहीण . . . ह्यांच्यावर येशूची प्रीति होती.” (योहान ११:५) येशू परिपूर्ण असल्यामुळे तो सर्वगुणसंपन्न होता यात शंका नाही; पण अनैतिक कृत्ये करण्याकरता स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी कधी त्याने आपल्या गुणांचा, मोहक स्वभावाचा किंवा आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा वापर केला का? उलट बायबल सांगते, की “त्याने कोणतेही पाप केले नाही.” (१ पेत्र २:२२, ईजी टू रीड व्हर्शन) एकदा तर एक पापी स्त्री जी कदाचित एक वेश्या असावी, “त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले,” तेव्हा देखील येशूने तिच्यासोबत अयोग्य व्यवहार केला नाही. (लूक ७:३७, ३८) या अबला स्त्रीचा गैरफायदा घेण्याचा विचारही येशूच्या मनात आला नाही! त्याला त्याच्या भावनांवर पूर्ण ताबा होता—तो खरा मर्द होता. त्याने स्त्रियांना पुरुषांची वासना तृप्त करण्याचं साधन म्हणून तुच्छ लेखलं नाही; उलट त्याने त्यांच्याबद्दल आपुलकी व आदर दाखवला.
एक तरुण ख्रिस्ती पुरुष या नात्याने तुम्ही देखील येशूच्या आदर्शाचे अनुकरण करा, तुमच्या मित्रांचे अनुकरण करू नका. यामुळे, अनैतिक कृत्ये करून कोणाचा “गैरफायदा” घेतल्याचा दोष तुमच्यावर येणार नाही. तसंच अनौरस संततीला जन्म देण्याच्या दुःखदायक अनुभवातून तुम्हाला जावं लागणार नाही. जारकर्मापासून अलिप्त राहिल्यामुळे काही लोक कदाचित तुमची टिंगल करतील. पण आठवणीत असू द्या, काही काळ आपल्या दोस्तांना खूष करण्यापेक्षा देवाच्या इच्छेप्रमाणे वागून त्याला संतुष्ट केल्यामुळे शेवटी तुम्हालाच दीर्घकाळचा फायदा होईल.—नीतिसूत्रे २७:११.
पण आधी अनैतिक कृत्ये करणाऱ्या काही तरुणांनी आता तो मार्ग सोडून दिला आहे आणि मनःपूर्वक पश्चात्ताप केला आहे. अशा तरुणांबद्दल देवाचा कसा दृष्टिकोन आहे? राजा दावीदाने देखील गंभीर पाप केलं होतं, पण त्याने पश्चात्ताप केला तेव्हा देवाने त्याला क्षमा केली. त्याप्रमाणे या तरुणांना देखील देव क्षमा करेल यात शंका नाही. (२ शमुवेल ११:२-५; १२:१३; स्तोत्र ५१:१, २) पण एखादी अविवाहित मुलगी गर्भवती झाली असेल तर? यासाठी जबाबदार असलेल्या मुलानं तिच्याशी लग्न करावे का? होणाऱ्या मुलाप्रती त्याच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? पुढचा लेख या प्रश्नांची उत्तरे देईल.
[१५ पानांवरील चित्रे]
बऱ्याच तरुणांना अनैतिक वर्तनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव नाही