जगावरील दृष्टिक्षेप
जगावरील दृष्टिक्षेप
लहान मुलांनी दररोज किती पाणी प्यावे?
जर्मनीतील डॉर्टमुंड येथील बालपोषण संशोधन संस्थेच्या एका अभ्यासानुसार आणि टेस्ट नावाच्या एका पत्रिकेनुसार, एक ते चार वयोगटातली मुले फार कमी पाणी पितात. त्यामुळे त्यांना निर्जलीकरणाचा फार लवकर त्रास होतो. म्हणून या वयोगटातील मुलांनी दररोज एक लिटर पाणी प्यायलाच हवे, अर्थात जेवणाच्या वेळी पाणी पितात ते वेगळे. पण खरे पाहायला गेल्यास, ही मुले खूपच कमी पाणी पितात, म्हणजे प्रमाणापेक्षा एक तृतीयांश कमी. आणि यात नेहमी मुलांनाच दोषी ठरवले जाऊ शकत नाही, पुष्कळवेळा मूल पाणी मागते तेव्हा पाच पैकी एका मुलाला त्याचे आईवडिलच पाणी देत नाहीत. पण मुलांसाठी सर्वात उत्तम पेय कोणते आहे? स्वच्छ पाणी! असे टेस्ट पत्रिका म्हणते.
व्यस्त राहणाऱ्यांना दीर्घायुष्य
हार्वर्ड विद्यापीठाने घेतलेल्या अभ्यासानुसार, धार्मिक स्थळी किंवा रेस्टॉरंटला जाणे, खेळ तसेच चित्रपट पाहायला जाणे अशा सामाजिक गोष्टीत दंग असणारे वयस्कर इतरांपेक्षा जवळजवळ अडीच वर्षं जास्त जगतात. यात शारीरिक व्यायाम होत असल्यामुळे तब्येत चांगली राहते अशी आतापर्यंत समज होती; परंतु “जीवनाच्या सांजवेळी जगण्याकरता अर्थपूर्ण उद्देश असला की आयुष्य वाढते असा ठोस पुरावा आहे.” खरे तर, हा अभ्यास घेणारे हार्वर्ड येथील थॉमस ग्लास म्हणतात की, व्यस्त राहणाऱ्या प्रत्येकाचेच आयुष्य वाढते.
आरामाकरता पहिली पसंत
अलीकडेच एका अभ्यासात ३० राष्ट्रांतील एकूण १,००० लोकांना विचारण्यात आले की, तणाव कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी ते काय करणे पसंत करतात. रॉयटर्स वृत्त माध्यमानुसार, ५६ टक्के लोकांनी संगीताची निवड केली. संगीताला प्रथम स्थान देणारे ६४ टक्के उत्तर अमेरिकेत होते तर विकसित आशियाई राष्ट्रांमध्ये ४६ टक्के. एकंदर निकाल पाहिल्यावर, टीव्ही पाहणे दुसऱ्या क्रमांकावर होते आणि तिसऱ्या क्रमांकावर आंघोळ करणे. रोपर स्टॉर्च वर्ल्डवाईडने घेतलेल्या अभ्यासाचे संचालक टॉम मिलर म्हणाले की: “रेडिओ, टीव्ही, पर्सनल सीडी प्लेयर्स, इंटरनेट आणि इतर नवीन चॅनल्सद्वारे संगीत सहज उपलब्ध झाले आहे, आणि या साधनांची किंमत देखील जास्त नाहीए. त्यामुळे अर्धे अधिक जग तणाव घालवण्यासाठी संगीताचा उपयोग करते यात काही आश्चर्य नाही.”
दारिद्र्य—जागतिक समस्या
वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष, जेम्स डी. वोलफन्सोन यांनी अलीकडेच जगातल्या वाढत्या दारिद्र्याबद्दल चिंता व्यक्त केली. मेक्सिको सिटीच्या लॉ होरनॉदॉ वृत्तपत्रानुसार, वोलफन्सोन यांनी म्हटले की, जगातील ६०० कोटी लोकांपैकी एक तृतीयांश लोक अद्यापही अगदीच हलाखीच्या परिस्थितीत जगतात. तसेच, जगातील निम्मे लोक दर दिवशी दोन डॉलरहून कमी तर १०० कोटी लोक एक डॉलरहून कमी पगारात घर चालवतात. वर्ल्ड बँकेने गरिबी हटविण्याचे जे प्रयत्न केलेत त्याबद्दल त्यांनी कौतुक केले आहे; परंतु, वरील आकडेवारी हे दाखवून देते की ही एक सर्वत्र आढळणारी समस्या आहे आणि अजून तरी तिला आटोक्यात आणता आलेले नाही. ते म्हणाले की: “दारिद्र्य एक जागतिक समस्या आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही.”
वेळच नाही
जर्मन वृत्तपत्र जीसनं ऑल्जीमाइनं यात सांगितल्यानुसार, युरोपातील अधिकांश लोकांना दिवसाचे २४ तास पुरेनासे झाले आहेत. मग ते नोकरी करणारे असोत किंवा घर सांभाळणारे असोत नाहीतर रिकाम्या वेळेचा आनंद घेणारे असोत प्रत्येकाचे म्हणणे आहे की वेळच पुरत नाही. बॅम्बर्ग विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ मान्फ्रेट गारहामर म्हणतात की, “४० वर्षांआधीच्या तुलनेत आज लोक कमी वेळ झोपतात, कमी वेळात जेवण उरकतात आणि कामालाही घाईघाईने
जातात.” सर्व युरोपियन राष्ट्रांमध्ये दैनंदिन जीवन धावपळीचे बनले आहे हे अभ्यासावरून त्यांना आढळले. वेळ वाचवणाऱ्या गृहोपयोगी वस्तू आणि कामाची वेळ कमी करूनही “जीवनातील धकाधकी काही कमी” झालेली नाही. उलट, जेवणांची सरासरी वेळ २० मिनिटांनी आणि रात्रीची झोपही ४० मिनिटांनी कमी झाली आहे.तणावाचा सामना
तुम्हाला मानसिक ताण जाणवतो का? एल युनिव्हर्सल यातील वृत्तानुसार, मेक्सिकन इन्स्टिट्यूट ऑफ सोश्यल सेक्युरिटीने तणावाचा सामना करण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. सहा ते दहा तासांची आपापल्या शरीराच्या गरजेनुसार हवी तेवढी झोप घ्यावी. सकाळी चांगला आणि संतुलित नाश्ता, दुपारी पोटभर जेवण आणि संध्याकाळी हलके जेवण करावे. तज्ज्ञांचा असाही सल्ला आहे की, चरबीदार अन्न कमी खावे, मीठ कमी वापरावे आणि चाळिशीनंतर दूध आणि साखरेचे प्रमाण कमी करावे. वेळ काढून शांत चित्ताने मनन करावे. शिवाय, निसर्गाशी नाते जोडून तणाव कमी करता येतो.
हुशार पक्षी!
टर सोव्हाझ ही फ्रेंच निसर्ग पत्रिका म्हणते की, “कलकत्त्यातल्या चिमण्या मलेरियाच्या संसर्गापासून दूर आहेत.” तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार मलेरियाचा प्रतिरोध करणाऱ्या क्वीनाईन या घटकाचे अधिक प्रमाण असलेल्या एका झाडाची पाने या चिमण्या खातात. परंतु, या झाडांच्या शोधात त्यांना खूप दूरवर जावे लागते. आपल्या घरट्यासाठीही त्या ही पाने वापरतात. सदर पत्रिका पुढे म्हणते की, “शहराची आवड असलेल्या परंतु मलेरियाची भीती वाटणाऱ्या चिमण्यांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी चांगलाच मार्ग शोधून काढलेला दिसतो.”
“देव कोणाच्या बाजूला आहे?”
खेळाविषयी लिखाण करणारे सॅम स्मिथ लिहितात की, “मला कोणाच्याही विश्वासाची टीका करायची नाहीये, पण खेळाच्या वेळी फाजिल धार्मिकतेचा देखावा करणे म्हणजे अति होत नाही का? [गोल] केल्यावर फुटबॉल खेळाडू लगेच प्रार्थना का करायला लागतात मला समजत नाही?” गेम संपल्यावर एकत्र येऊन भक्तिभावाने प्रार्थना करणारे हेच खेळाडू लॉकर रूममध्ये मात्र “वार्ताहरांना शिवीगाळ” करण्यात किंवा खेळाच्या आवेशात येऊन इतर खेळाडूंना “इजा पोहंचवण्याचा प्रयत्न” करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. स्मिथ पुढे म्हणतात की, देव अशी कोणा एका गटाची बाजू घेतो असे म्हणणे म्हणजे “देवावरील विश्वासाचा अपमान केल्यासारखे आहे.” शेवटी ते आपल्या लेखात लिहितात: “खेळ-क्रिडेला जिथल्या तिथं ठेवलेलं बरं. उगाच धर्माशी त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये.”
लहानगी मुले आणि टीव्ही
दोन वर्षांहून लहान वयाच्या मुलांनी टीव्ही पाहू नये असे अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिआट्रिक्सने सुचवल्याचे वृत्त द टोरोंटो स्टार यात दिले आहे. टीव्ही, “मुलांच्या सामाजिक, भावनिक आणि समजशक्तीच्या विकासाच्या आड येतो.” त्यामुळे, लहान वयात होणाऱ्या मेंदूच्या विकासाबद्दल केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, पालक आणि मुलांना सांभाळणारे यांचा मुलांशी थेट संपर्क असायला हवा. परंतु, सगळेच तज्ज्ञ यास सहमत नाहीत. उदाहरणार्थ, कॅनेडियन पेडिआट्रिक सोसायटी म्हणते की, दिवसातून केवळ ३० मिनिटे पालकांच्या देखरेखीत टीव्हीवरील चांगले कार्यक्रम पाहिले तरी मुलांना “पालकांकडून शिकण्याची संधी मिळते.” परंतु, या दोन्ही संस्थांच्या मते लहान मुलांच्या खोल्यांमध्ये टीव्ही किंवा कम्प्युटर असू नये आणि पालकांकडे वेळ नाही म्हणून मुलांना टिव्हीसमोर बसवून ठेवू नये. कारण याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी “त्यांना बाहेर खेळण्यास, वाचन करण्यास, कोडी सोडवण्यास अथवा इतर खेळ खेळायचे उत्तेजन द्यावे” असे सांगितले जाते.