व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल काय म्हणतं?

कृतज्ञता

कृतज्ञता

कृतज्ञता दाखवल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक, आणि भावनात्मक फायदे होतात हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे सर्वांनी हा गुण नेहमी दाखवला पाहिजे.

कृतज्ञता आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेकारक आहे?

मेडीकल सायन्स काय म्हणतं

हार्वड मेंटल हेल्थ लेटर याच्या एका लेखात असं म्हटलं आहे, “कृतज्ञता दाखवण्याचा, नेहमी आनंदी राहण्याशी जवळचा संबंध आहे. कृतज्ञता दाखवल्यामुळे लोक सकारात्मक विचार करू लागतात, चांगल्या अनुभवांची कदर करतात, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, ते वाईट प्रसंगांचा यशस्वी रीतीने सामना करू शकतात आणि घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतात.”

बायबल काय म्हणतं?

बायबलमध्ये आपल्याला कृतज्ञता विकसित करण्याचं प्रोत्साहन दिलं आहे. प्रेषित पौलाने लिहिलं, “तुम्ही कृतज्ञ असा.” त्याने स्वतः याबाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं. लोकांनी जेव्हा सुवार्तेला चांगला प्रतिसाद दिला तेव्हा त्याने “देवाची निरंतर उपकारस्तुती” केली. (कलस्सैकर ३:१५; १ थेस्सलनीकाकर २:१३) नुसतं आभारी आहे असं बोलण्याने नाही, तर कृतज्ञ मनोवृत्ती बाळगल्याने आपल्याला नेहमी आनंदी राहता येतं. त्यामुळे आपण राग, द्वेष अशा गुणांपासून स्वतःचं संरक्षण करू शकतो. कारण अशा गुणांमुळे दुसरे आपल्यापासून दूर जाऊ शकतात आणि आपण जीवनातला आनंद हरवून बसू शकतो.

आपल्या सृष्टिकर्त्यानेही याबाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. तो मानवांची कदर करतो! बायबलमध्ये इब्री लोकांस ६:१० या वचनात असं म्हटलं आहे: तुम्ही “करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” खरंच, कृतज्ञता न दाखवणं हे आपल्या सृष्टिकर्त्याला, अन्याय किंवा दुष्टता केल्यासारखं वाटतं.

“सर्वदा आनंदित असा; सर्व स्थितीत उपकारस्तुती करा.”१ थेस्सलनीकाकर ५:१६, १८.

कृतज्ञतेमुळे इतरांसोबत आपले नातेसंबंध कसे चांगले होतात?

तुमचा अनुभव काय म्हणतो

अनोळखी व्यक्तीने केलेल्या मदतीबद्दल जेव्हा आपण तिचे आभार मानतो तेव्हा त्या व्यक्तीला देखील आनंद होतो. तसंच आपल्याला जर कोणी एखादी भेटवस्तू दिली, प्रेमाचे दोन शब्द बोललं किंवा मदत केली आणि आपण त्यांचे मनापासून आभार मानले तर त्यांना आपण त्यांची कदर केल्याची जाणीव होते.

बायबल काय म्हणते

“दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हांलाही दिले जाईल.” असं येशूने म्हटलं. तो पुढे म्हणतो, “तुमच्या पदरात हलवून, दाबून, ओसंडून वाहणारे उत्तम माप ओतले जाईल.” (लूक ६:३८, ईझी-टू-रीड-व्हर्शन) आपण दक्षिण पॅसिफिक, वॅनुएतु इथं राहणाऱ्या रोझ नावाच्या एका मुलीचं उदाहरण पाहू जिला ऐकायला येत नाही.

रोझ यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळीत जायची. तिला किंवा तिथं कोणालाही सांकेतिक भाषा येत नव्हती. सांकेतिक भाषा येणारं एक जोडपं त्या मंडळीत आलं तेव्हा त्यांना ही समस्या कळली आणि त्यांनी सांकेतिक भाषा शिकवण्याचा क्लास सुरू केला. रोझ या गोष्टीसाठी खूप आभारी आहे. ती म्हणते, “माझ्यावर प्रेम करणारे इतके मित्र-मैत्रिणी मला भेटले की त्यामुळे मी खूप आनंदी आहे.” रोझ दाखवत असलेली कृतज्ञता आणि सभांमध्ये तिचा सहभाग या गोष्टी त्या जोडप्यासाठी कोणत्याही भेटवस्तूपेक्षा जास्त मौल्यवान आहेत. इतर बांधवांनी रोझशी संवाद साधता यावा यासाठी, सांकेतिक भाषा शिकण्याची जी मेहनत घेतली त्याबद्दल देखील रोझ कृतज्ञ आहे.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

“जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझे [देवाचे] गौरव करतो.”स्तोत्र ५०:२३.

तुम्ही कृतज्ञ मनोवृत्ती कशी विकसित कराल?

बायबल काय म्हणते

आपल्या भावनांचा आणि आपल्या विचारांचा जवळचा संबंध आहे. बायबलचा एक लेखक दावीद याने देवाकडे अशी प्रार्थना केली: “मी . . . तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो; तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करतो.” (स्तोत्र १४३:५) देवाने दाविदासाठी जे केलं होतं त्यावर त्याने विचार आणि मनन केलं. देवाच्या कार्यांवर मनन करणं त्याच्या जीवनाचा एक भाग होता आणि त्यामुळे तो कृतज्ञता दाखवू शकला.—स्तोत्र ७१:५, १७.

बायबलमध्ये आपल्यासाठी एक छान सल्ला दिला आहे: “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुती,” त्यांवर सतत मनन करा. (फिलिप्पैकर ४:८) इथं सतत मनन करत राहा याचा अर्थ असा होतो की आपण नेहमी त्यांवर विचार केला पाहिजे. असं केल्याने आपण कृतज्ञतेचा गुण दाखवू शकतो. (g16-E No. 5)

“माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार.”स्तोत्र ४९:३.