मुख्य विषय | आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवाल?
२ योग्य वातावरण तयार करा
-
तुम्ही आजपासून पौष्टिक आहार घेण्याचं ठरवलंय. पण आईस्क्रीम पाहिलं की तुमचा स्वतःवर ताबा राहत नाही.
-
तुम्ही सिगरेट सोडण्याचा पक्का निर्धार केला आहे आणि तुमच्या मित्राला हे माहीत असूनही, तो पुन्हा तुम्हाला सिगरेट देतो.
-
आज तुम्ही व्यायाम करणार असं ठरवलं होतं पण कपाटात जॉगिंगचे बूट शोधणंदेखील तुम्हाला जीवावर येतं.
वर दिलेल्या तिन्ही उदाहरणांमध्ये कोणतं साम्य आहे? वेळोवेळी हे अनुभवातून स्पष्ट झालं आहे की चांगल्या सवयी जोपासणं आणि वाईट सवयी सोडणं यावर आपल्या आसपासच्या परिस्थितीचा प्रभाव असतो. म्हणजे आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो किंवा जी परिस्थिती कधी-कधी आपण स्वतःवर ओढवून घेतो.
बायबल तत्त्व: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.”—नीतिसूत्रे २२:३.
पुढचा विचार करा, असा सल्ला बायबलमध्ये दिला आहे. आधीच विचार केल्याने आपल्या ध्येयांच्या आड येणारी परिस्थिती आपल्याला टाळता येईल. तसंच चांगल्या सवयी जोपासायला मदत होईल, अशा वातावरणात आपण राहू. (२ तीमथ्य २:२२) थोडक्यात सांगायचं तर, आपली परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळणं हे आपल्याच हातात असतं.
स्वतःसाठी चुकीच्या गोष्टी करणं कठीण करा आणि चांगल्या गोष्टी करणं सोपं करा
तुम्ही हे कसं करू शकता
-
चुकीच्या गोष्टी करणं तुम्हाला कठीण जाईल असं काहीतरी करा. उदाहरणार्थ, तुम्हाला जंक फूड खाणं पूर्णपणे बंद करायचं असेल, तर असे खाद्यपदार्थ तुमच्या किचनमध्ये ठेवूच नका. म्हणजे पुन्हा जेव्हा ते पदार्थ खाण्याची तुम्हाला इच्छा होईल तेव्हा ती इच्छा सोडून देणं जास्त सोपं जाईल आणि ती पूर्ण करणं जास्त कठीण होईल.
-
चांगल्या गोष्टी करणं स्वतःसाठी सोपं करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही रोज सकाळी उठून व्यायाम करण्याचं ठरवलं आहे, तर तुमचे व्यायामाचे कपडे आदल्या रात्रीच बेडजवळ तयार ठेवा. चांगल्या गोष्टी करण्याची सुरुवात जितकी सोपी ठेवाल, तितकंच त्यांना नियमित करणं तुम्हाला सोपं जाईल.
-
आपले मित्र विचारपूर्वक निवडा. कारण आपण ज्यांच्या संगतीत राहतो त्यांच्यासारखेच होतो. (१ करिंथकर १५:३३) त्यामुळे अशा लोकांची संगती टाळा ज्यांच्यामुळे तुम्हाला वाईट सवयी सोडणं जड जाईल. आणि असे मित्र निवडा जे तुम्हाला चांगल्या सवयी जोपासायला मदत करतील. (g16-E No. 4)