बायबल काय म्हणतं? | विश्वास
विश्वास
काही लोक धार्मिक असल्याचा दावा करत असले तरी, त्यांना “विश्वास” याचा अर्थ समजत नाही. विश्वास म्हणजे काय? तो असणं इतकं महत्त्वाचं का आहे?
विश्वास म्हणजे काय?
काही लोक काय म्हणतात:
काहींच्या मते विश्वास असणारी व्यक्ती, पुराव्याशिवाय डोळे बंद करून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवते. उदाहरणार्थ, एक धार्मिक व्यक्ती असं म्हणते, “माझा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे.” पण तिला जर असं विचारलं, “तुमचा असा का विश्वास आहे?” तर ती कदाचित उत्तर देईल, “लहानपणापासून माझ्यावर हेच संस्कार झाले” किंवा “लहानपणापासून मला हेच शिकवलं गेलं.” अशा लोकांच्याबाबतीत विश्वास असणं आणि डोळे झाकून एखादी गोष्ट स्वीकारणं यात काहीच फरक नाही.
बायबल काय म्हणतं?
“विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” (इब्री लोकांस ११:१) एका व्यक्तीचा कुठल्याही गोष्टीवर भरवसा असण्यासाठी त्यामागे सबळ कारणं असायला हवी. “भरवसा” या शब्दासाठी बायबलच्या मूळ भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे, त्याचा अर्थ नुसत्या आपल्या मनातील भावना किंवा कल्पना नव्हे तर त्याहून जास्त होतो. तेव्हा विश्वास असणं म्हणजे पुराव्यांवर आधारित भरवसा असणं.
“कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या [देवाच्या, NW] अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून [सृष्टीवरून, NW] ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.”—रोमकर १:२०.
विश्वास असणं इतकं महत्त्वाचं का आहे?
बायबल काय म्हणतं?
“विश्वासावाचून त्याला ‘संतोषविणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे खूप लोक देवावर फक्त यासाठी विश्वास ठेवतात कारण त्यांना तसं शिकवण्यात आलं आहे. कदाचित ते असं म्हणतील, ‘लहानपणापासून मला हेच शिकवलं गेलं.’ पण देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या उपासकांचा त्याच्या अस्तित्वावर आणि त्याच्या प्रेमावर मनापासून भरवसा असला पाहिजे. त्यामुळे बायबलमध्ये देवाला मनापासून शोधत राहण्यावर आणि जवळून ओळखण्यावर भर देण्यात आला आहे.
“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.”—याकोब ४:८.
तुम्ही तुमचा विश्वास कसा वाढवू शकता?
बायबल काय म्हणतं?
“ऐकल्यानेच विश्वास जागृत होतो” असं बायबल म्हणतं. (रोमकर १०:१७, सुबोधभाषांतर.) तेव्हा देवावर विश्वास वाढवण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे बायबलमध्ये त्याच्याबद्दल काय शिकवलं आहे ते ‘ऐकणे’. (२ तीमथ्य ३:१६) बायबलचा अभ्यास केल्याने तुम्हाला जीवनातील महत्त्वपूर्ण प्रश्नांची भरवशालायक उत्तरं मिळतील जसं की, देव कोण आहे? तो अस्तित्वात आहे याला काय पुरावा आहे? देव खरोखर माझी काळजी करतो का? भविष्यासाठी देवाचा काय उद्देश आहे?
बायबलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्हाला मदत करायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद होईल. jw.org या आमच्या वेबसाईटवर सांगितल्याप्रमाणे, “यहोवाच्या साक्षीदारांना, लोकांना बायबलविषयी शिकवायला खूप आवडतं पण ते कोणावरही यहोवाचा साक्षीदार बनण्याचा दबाव टाकत नाही. याउलट, बायबलमध्ये काय सांगितलं आहे हे सर्वांना ते आदरपूर्वक दाखवतात. कारण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हे निवडण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे.”
थोडक्यात सांगायचं तर, तुमचा विश्वास पुराव्यांवर आधारित असला पाहिजे. तुम्ही जे बायबलमधून वाचता ते कितपत सत्य आहे हे तुम्ही स्वतः पारखलं पाहिजे. असं केल्याने तुम्ही पहिल्या शतकातील पवित्र शास्त्राच्या विद्यार्थांचं अनुकरण करत असाल ज्यांनी “मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले.”—प्रेषितांची कृत्ये १७:११.
“सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३. (g16-E No. 3)