व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीचा श्‍वास कोंडतोय!

हवा

हवा

आपल्याला हवेची गरज आहे, पण फक्‍त श्‍वास घेण्यासाठी नाही. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामुळे सूर्याच्या घातक किरणांपासून आपलं बरंच संरक्षण होतं. वातावरणामुळेच पृथ्वीवरचं तापमान शून्याखाली जात नाही आणि ती गोठत नाही.

पृथ्वीवरच्या वातावरणाला असलेला धोका

वायू प्रदूषणामुळे पृथ्वीवर असलेल्या सर्व सजीवांना धोका निर्माण होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षिततेच्या प्रमाणानुसार पृथ्वीवरच्या लोकसंख्येपैकी फक्‍त १ टक्का लोकसंख्या स्वच्छ हवा घेत आहे.

वायू प्रदूषणामुळे श्‍वसनाचा त्रास होऊ शकतो, फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो आणि हृदयविकारसुद्धा होऊ शकतो. असं मानलं जातं की वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जवळजवळ ७०,००,००० लोकांचा मृत्यू होतो.

पृथ्वीची नुकसान भरून काढायची क्षमता

आपल्या पृथ्वी ग्रहाला अशा क्षमतेसह बनवण्यात आलंय, ज्यामुळे सर्व सजीव सृष्टीला स्वच्छ हवा मिळत राहू शकते. पण मानवनिर्मित प्रदूषणाचं प्रमाण कमी असेल तेव्हाच या नैसर्गिक क्षमतेचा चांगला वापर होऊ शकतो. याची काही उदाहरणं आता आपण पाहू या.

  • आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जंगलं हवेमधून कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात. पण अनेकांना माहीत नसलेली एक मजेशीर गोष्ट अशी आहे, की किनारपट्टीवरच्या पाणथळ जमिनीवर उगवणारी खारफुटीची झाडं यापेक्षाही आणखी चांगलं काम करतात. ही झाडं उष्ण प्रदेशातल्या जंगलांपेक्षा पाच पट जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात.

  • अलीकडच्या अभ्यासावरून दिसून आलंय, की केल्पसारखे समुद्री शेवाळ वातावरणातून फक्‍त कार्बन डायऑक्साइड शोषूनच घेत नाही, तर ते कार्बन डायऑक्साइड समुद्र तळाशी गाडतंसुद्धा. पानांसारख्या दिसणाऱ्‍या केल्पच्या पात्यांमध्ये हवेने भरलेल्या छोट्याछोट्या पिशव्या असतात. त्यामुळे त्यांना अगदी दूरपर्यंत तरंगत राहता येतं. समुद्र किनाऱ्‍यापासून दूर गेल्यावर या पिशव्या फुटतात आणि कार्बन डायऑक्साइडने भरलेलं केल्प तळाला जातं. आणि असं दिसून आलंय, की तिथे ते शतकानुशतकं दबलेल्या अवस्थेत राहतं.

  • वातावरणात स्वतःला शुद्ध करण्याची जी जबरदस्त क्षमता आहे, ती कोव्हिड-१९ च्या लॉकडाऊनमध्ये दिसून आली. २०२० मध्ये जगभरातले कारखाने बंद झाले होते आणि रस्त्यांवर गाड्या धावायच्या थांबल्या होत्या, त्यामुळे वायू प्रदूषण खूप प्रमाणात कमी झालं होतं. आणि थोड्या काळातच हवा शुद्ध झाली होती. हवेच्या गुणवत्तेबद्दल २०२० मध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भाग घेतलेल्या अनेक देशांना असं दिसून आलं, की लॉकडाऊन लागल्यानंतर लगेचच हवेची गुणवत्ता वाढली आणि हवा शुद्ध झाली.

यावर केला जाणार उपाय

सायकलचा जास्तीतजास्त वापर केल्यामुळे वायू प्रदूषण कमी होऊ शकतं

उद्योगधंद्यांनी वायू प्रदूषण कमी करावं म्हणून सरकारं वेगवेगळी धोरणं राबवत आहेत. तसंच, वैज्ञानिकही वायू प्रदूषणाचे परिणाम कमी करण्यासाठी वेगवेगळे शोध लावत आहेत. उदाहरणार्थ, एका प्रक्रियेत सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू प्रदूषण करणाऱ्‍या घटकांना हानिकारक नसलेल्या घटकांमध्ये बदललं जातं. तसंच तज्ज्ञ, लोकांना असा सल्ला देतात की त्यांनी गाड्या वापरण्याऐवजी चालत जावं किंवा सायकल वापरावी. आणि घरांमध्ये कमी उर्जेचा वापर होईल असे पर्याय वापरावेत.

काही सरकारं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांना आधुनिक पद्धतीच्या शेगड्या पुरवत आहेत. पण तरी अनेकांसाठी त्या अजूनही उपलब्ध नाहीत

पण इतकंच पुरेसं नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँक यांसारख्या काही संस्थांच्या २०२२ च्या अहवालावरून हे सिद्ध होतं की आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

या अहवालात सांगितलं होतं की २०२० मध्ये जगातले एक तृतीयांश लोक स्वयंपाकासाठी असं इंधन आणि साधनं वापरतात, ज्यांमुळे वायू प्रदूषण होतं. बऱ्‍याच ठिकाणी पाहायला मिळतं, की नवीन गॅस शेगडी घेणं किंवा पर्यायी इंधन वापरणं खूप कमी लोकांना परवडतं.

काही आशा आहे का?​—बायबल काय म्हणतं?

“आकाश निर्माण करणारा आणि . . . पृथ्वी घडवणारा आणि तिच्यावरचं सगळं काही बनवणारा, तिच्यावर राहणाऱ्‍यांना श्‍वास, आणि तिच्यावर चालणाऱ्‍यांना जीवन देणारा, महान आणि खरा देव यहोवा म्हणतो. . . . ”​—यशया ४२:५.

देवानेच सर्वकाही निर्माण केलंय. आपल्याला श्‍वास घेण्यासाठी हवा बनवली आणि ती शुद्ध राहावी म्हणून काही नैसर्गिक चक्रंही बनवली आहेत. तसंच, त्याच्याकडे अमर्याद ताकद आहे आणि माणसांवर त्याचं प्रेम आहे. मग विचार करा, हवेतलं प्रदूषण काढून टाकण्यासाठी तो काहीच करणार नाही असं कधी होईल का? “आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय,” हा लेख पाहा.