व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीचा श्‍वास कोंडतोय!

गोडं पाणी

गोडं पाणी

पृथ्वीवरच्या सजीवांसाठी पाणी खूप महत्त्वाचंय, आणि खासकरून गोडं पाणी. सर्व सजीव सृष्टीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तलाव, नदी, पाणथळ जमीन आणि जमिनीखालच्या पाण्यामुळे आपल्याला आणि प्राण्यांना पिण्याचं पाणी मिळतं. तसंच, या पाण्यामुळे आपल्याला शेतीही करता येते.

गोड्या पाण्याची कमतरता

आपल्या पृथ्वीवरचा बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे. पण जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे “फक्‍त ०.५% गोडं पाणी वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध आहे.” हे पाणी इतक्या कमी प्रमाणात असलं, तरी एवढंच पाणी सजीव सृष्टीसाठी पुरेसं आहे. पण हे पाणीसुद्धा प्रदूषित होत चाललंय किंवा माणसांच्या वाढत्या गरजांमुळे आणि हवामान बदलांमुळे या पाण्याची कमतरता भासत आहे. हे जर असंच चालत राहिलं, तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या ३० वर्षांमध्ये पाच अब्ज लोकांना गोड्या पाण्याचा तुटवडा सहन करावा लागेल.

पृथ्वीची नुकसान भरून काढायची क्षमता

पृथ्वीवरच्या नैसर्गिक चक्रांमुळे आपल्या पाण्याचा पुरवठा टिकून राहतो. तसंच, मातीमुळे, जलचरांमुळे आणि अगदी सूर्यप्रकाशामुळेसुद्धा पाणी शुद्ध ठेवायला मदत होते. खाली दिलेल्या मुद्द्‌यांमुळे आपल्याला या गोष्टीचा पुरावा मिळतो, की पृथ्वीमध्ये स्वतःचं नुकसान भरून काढण्याची क्षमता आहे.

  • असं दिसून आलंय की माती पाण्याला दूषित करणाऱ्‍या बऱ्‍याचशा गोष्टी काढून त्याला शुद्ध करते. पाणथळ ठिकाणांमध्ये अशा काही वनस्पती असतात, ज्या पाण्यातून नायट्रोजन, फॉस्फरस आणि कीटकनाशक घटक काढून टाकतात.

  • काही नैसर्गिक घटकांमुळेसुद्धा पाणी दूषित होतं. पण शास्त्रज्ञांना कळलंय की निसर्गातल्या भौतिक आणि जैविक प्रक्रियांमुळे पाणी शुद्ध राहतं. पाणी प्रदूषित करणारे हे घटक वाहत्या पाण्यात मिसळतात आणि सूक्ष्मजींवांद्वारे त्यांचं विघटन होतं.

  • गोड्या पाण्यात राहणारे शिंपल्यातले जीव पाण्यातून काही हानिकारक रसायनं काही दिवसांतच काढून टाकू शकतात. आणि हे ते जलशुद्धीकरण प्रकल्पांपेक्षा प्रभावशाली पद्धतीने करू शकतात.

  • जलचक्रामुळे पाणी पृथ्वीवरच फिरत राहतं. यामुळे आणि इतर नैसर्गिक प्रक्रियांमुळे पाणी वातावरणाच्या बाहेर जात नाही किंवा नाहीसं होत नाही.

यावर केला जाणारा उपाय

आपल्या वाहनांमधली ऑईलची गळती दुरुस्त करून आणि हानिकारक रसायनांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून आपण गोड्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होण्यापासून रोखू शकतो

तज्ज्ञ असा सल्ला देतात की आपण नेहमी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. पाण्याचं प्रदूषण कमी व्हावं म्हणून ते काही सल्लेही देतात. जसं की गाडीतून जर ऑईल गळत असेल, तर ती दुरुस्त करून घ्यावी. तसंच, वापरत नसलेली औषधं, विषारी रसायनं गटारीत, नाल्यात किंवा शौचालयात टाकू नये.

वैज्ञानिकांनी खाऱ्‍या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यात करण्यासाठी काही आधुनिक उपाय शोधून काढलेत. पिण्याच्या पाण्याचं प्रमाण वाढावं हा त्यामागचा उद्देश आहे.

पण एवढंच पुरेसं नाही. फार मोठ्या प्रमाणात खाऱ्‍या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करण्याची ही प्रक्रियासुद्धा चांगला उपाय नाही. कारण यात भरपूर पैसा आणि ऊर्जाही जाते. २०२१ मध्ये पाण्याच्या व्यवस्थापनेबद्दल असलेल्या एका अहवालात संयुक्‍त राष्ट्र संघाने असं म्हटलं: “जगभरात याबाबतीत केले जाणारे प्रयत्न आणखी दुपटीने वाढवण्याची गरज आहे.”

काही आशा आहे का?​—बायबल काय म्हणतं?

“देव . . . पाण्याचे थेंब वर ओढून घेतो; धुकं गारठून पावसाचे थेंब तयार होतात. मग ढगांतून पाऊस बरसू लागतो; मानवजातीवर पावसाच्या धारा बरसतात.”​—ईयोब ३६:२६-२८.

पृथ्वीवरचं पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी देवाने नैसर्गिक चक्रं बनवली आहेत.​—उपदेशक १:७.

विचार करा: निर्माणकर्त्याने पृथ्वीवरचं पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी अद्‌भुत प्रक्रिया बनवल्या आहेत. तर मग, माणसांनी जे नुकसान केलंय ते तो भरून काढू शकत नाही का? नक्कीच भरून काढू शकतो. असं करण्याची त्याच्याकडे ताकद आहे आणि तशी त्याची इच्छाही आहे. पान १५ वरचा “आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय,” हा लेख पाहा.