व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या सर्व दुःखांसाठी कोण जबाबदार आहे?

आपल्या सर्व दुःखांसाठी कोण जबाबदार आहे?

जर दुःख देवाकडून नाही, तर मोठ्या प्रमाणावर होणारी उपासमार, न संपणारी गरिबी, जीवघेणे युद्धं, गंभीर आजार आणि नैसर्गिक विपत्ती या सर्व गोष्टींसाठी कोण जबाबदार आहे? देवाचं वचन, बायबल आपल्याला मानवांच्या दुःखासाठी जबाबदार असलेली तीन मुख्य कारणं सांगतं:

  1. स्वार्थीपणा, लोभ आणि द्वेष. “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.” (उपदेशक ८:९) अपरिपूर्ण, स्वार्थी किंवा हिंसक मानवांमुळे सहसा लोकांना दुःखांचा सामना करावा लागतो.

  2. समय व प्रसंग. “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात” आणि यामुळे मानवांना बऱ्‍याचदा दुःखांचा सामना करावा लागतो. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) म्हणजेच, लोक चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे दुर्घटना घडतात. किंवा लोक निष्काळजीपणे वागतात किंवा चुका करतात आणि स्वतःवर दुःख ओढवून घेतात.

  3. जगाचा दुष्ट शासक. मानवांना दुःख का सहन करावं लागतं याचं मूळ कारण बायबल आपल्याला सांगतं. ते म्हणतं: “सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.” (१ योहान ५:१९) ती ‘दुष्ट’ व्यक्‍ती दियाबल सैतान आहे. हा शक्‍तिशाली आत्मिक प्राणी सुरुवातीला देवाचा स्वर्गदूत होता. पण तो “सत्यात टिकून राहिला नाही.” (योहान ८:४४) इतर काही स्वर्गदूतांनी सैतानाला साथ दिली आणि स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी देवाविरुद्ध बंड केला. अशा प्रकारे ते दुष्ट स्वर्गदूत बनले. (उत्पत्ति ६:१-५) जेव्हापासून सैतानाने आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांनी देवाविरुद्ध बंड केला तेव्हापासून ते या जगावर क्रूरपणे अधिकार गाजवत आहे. ही गोष्ट खासकरून आज आपल्या दिवसात स्पष्टपणे दिसून येत आहे. आज सैतान अतिशय क्रोधित आहे आणि “सबंध पृथ्वीवरील लोकांना” फसवत आहे. त्यामुळे पृथ्वीवर “मोठी विपत्ती ओढवली आहे.” (प्रकटीकरण १२:९, १२) खरंच, सैतान हा क्रूर हुकूमशहा आहे. मानवांवर येत असलेलं दुःख पाहून त्याला अतिशय आनंद होतो. सैतान मानवी दुःखांसाठी कारणीभूत आहे, देव नाही.

विचार करा: फक्‍त निर्दयी आणि दुष्ट व्यक्‍तीच निर्दोष मानवांवर दुःख आणू शकते. पण याउलट बायबल म्हणतं: “देव प्रेम आहे.” (१ योहान ४:८) देवाच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्त्वामुळे, त्याच्याकडून “दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको.”—ईयोब ३४:१०.

पण तुम्ही विचार कराल, ‘सर्वसमर्थ देव कितपत सैतानाला क्रूरपणे अधिकार गाजवायला परवानगी देईल?’ आधी पाहिल्याप्रमाणे देव दुष्टाईची घृणा करतो आणि आपलं दुःख पाहून त्याला खूप वाईट वाटतं. त्याचं वचन आपल्याला आर्जवतं: “आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.” (१ पेत्र ५:७) देवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि सर्व दुःखं व अन्याय दूर करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. देव सर्व दुःखं व अन्याय कसं काढेल याबद्दल पुढच्या लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे. *

^ परि. 7 जगात इतकं दुःख का आहे, याबद्दल अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं, कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला धडा २६ पाहा. या पुस्तकाची मोफत प्रत तुम्ही www.isa4310.com/mr या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.