काय बरोबर आणि काय चुकीचं: बायबलच्या मार्गदर्शनामुळे मदत होऊ शकते
बायबलच्या मार्गदर्शनामुळे लाखो लोकांना जीवनातल्या या चार गोष्टींमध्ये भरवशालायक मदत मिळाली आहे.
१. लग्न
लोकांचे लग्नाबद्दल आणि आपण आपल्या जोडीदारासोबत आनंदाने कसं राहू शकतो, याबद्दल वेगवेगळे विचार आहेत.
बायबल म्हणतं: “तुमच्यापैकी प्रत्येक जण जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं. त्याच प्रकारे, पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.”—इफिसकर ५:३३.
याचा अर्थ: लग्नाची व्यवस्था देवाने केली आहे. म्हणून एका जोडप्याला आनंदी राहायला कशाची गरज आहे हे त्याला चांगलं माहीत आहे. (मार्क १०:६-९) पती आणि पत्नी स्वतःपेक्षा आपल्या जोडीदाराची काळजी करतात, तेव्हा ते दोघं आनंदी राहू शकतात. पतीचं आपल्या पत्नीवर प्रेम आहे हे तो आपल्या वागण्यातून आणि तिची काळजी करून दाखवून देऊ शकतो. आणि पत्नी आपल्या पतीचा आदर करते हे ती आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवून देऊ शकते.
बायबलच्या मार्गदर्शनामुळे फायदा: वियतनाममध्ये राहणाऱ्या क्वाँग आणि थी यांना वाटायचं, की ते त्यांच्या लग्नात कधीच आनंदी राहू शकत नाहीत. क्वाँग थीसोबत प्रेमाने वागत नव्हता. तो म्हणतो: “मला तिच्या भावनांची काळजी नसायची आणि मी नेहमी तिचा अपमान करायचो.” थीला घटस्फोट हवा होता. ती म्हणते: “मला असं वाटायचं की माझा माझ्या पतीवर भरवसा नाहीये आणि मी त्याचा आदर करू शकत नाही.”
नंतर क्वाँग आणि थी यांना कळलं की लग्नाबद्दल बायबल काय शिकवतं. त्यांना हेसुद्धा कळलं की बायबलच्या इफिसकर ५:३३ मधलं तत्त्व आपल्या लग्नात कसं लागू करायचं. क्वाँग म्हणतो: “या वचनातून मला समजलं, की मी थीसोबत प्रेमाने वागलं पाहिजे. तिला हे जाणवलं पाहिजे, की मी तिच्यावर प्रेम करतो. आणि मला तिच्या भावनांबद्दल, रोजच्या गरजांबद्दल आणि शारीरिक गरजांबद्दल कदर आहे. आणि मी असं केलं तर तीसुद्धा माझ्यावर प्रेम करेल आणि माझा आदर करेल.” थी म्हणते: “मी इफिसकर ५:३३ मधलं तत्त्व जितकं जास्त लागू करते आणि माझ्या पतीचा आदर करते, तितकं तो जास्त माझ्यावर प्रेम करतो. आणि मला त्याच्यासोबत सुरक्षित आणि आनंदी वाटतं.”
लग्नाबद्दल अजून माहिती जाणून घ्यायला, सावध राहा! क्र. २ २०१८ मधून “आनंदी कुटुंबाचं गुपित काय?” हा jw.org/mr वरचा लेख पाहा.
२. इतरांशी कसं वागायचं?
कधीकधी लोक इतरांचा, ते दुसऱ्या जातीचे, दुसऱ्या धर्माचे किंवा दुसऱ्या देशाचे असल्यामुळे द्वेष करतात. तसंच, कधीकधी लोक कसे दिसतात किंवा लैंगिक संबंधांबद्दल त्यांची निवड वेगळी असल्यामुळेसुद्धा त्यांचा द्वेष केला जातो.
बायबल म्हणतं: “सर्व प्रकारच्या लोकांचा आदर करा.”—१ पेत्र २:१७.
याचा अर्थ: बायबल आपल्याला असं शिकवत नाही, की लोक वेगळ्या जातीचे, वेगळ्या देशाचे किंवा समलैंगिक असल्यामुळे आपण त्यांचा द्वेष करावा. याउलट लोक कोणत्याही जातीचे असो, देशाचे असो, गरीब किंवा श्रीमंत असो बायबल आपल्याला त्यांचा आदर करायला शिकवतं. (प्रेषितांची कार्यं १०:३४) जरी आपल्याला लोकांची मतं पटत नसली, ते कसे वागतात हे पटत नसलं तरी आपण त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागू शकतो.—मत्तय ७:१२.
बायबलच्या मार्गदर्शनामुळे फायदा: डॅनीएलला असं शिकवण्यात आलं होतं, की आशियामधून आलेले लोक त्याच्या देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून तो आशियामधून आलेल्या लोकांचा द्वेष करायचा आणि बऱ्याच वेळा सगळ्यांसमोर त्यांचा अपमान करायचा. डॅनीएल म्हणतो: “मला असं वाटायचं की मी माझ्या वागण्यातून देशप्रेम दाखवतोय. मला असं कधीच वाटलं नाही मी जसा विचार करतोय आणि वागतोय ते चुकीचंय.”
पण पुढे जाऊन बायबल काय शिकवतं हे डॅनीएलला कळलं. तो म्हणतो: “मला माझी विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलावी लागली. मला आता लोकांना देवाच्या नजरेने पाहायला शिकायचं होतं. मला हे कळलं की आपण कुठल्याही देशाचे असलो तरी आपण एकसारखेच आहोत.” आता इतर देशाच्या लोकांना भेटल्यावर कसं वाटतं हे तो सांगतो, “ते कुठल्या देशाचे आहेत हा विचारही आता माझ्या मनात येत नाही. माझं सगळ्या लोकांना प्रेम आहे आणि जगभरात माझे खूप जवळचे मित्र आहेत.”
याबद्दल जास्त माहितीसाठी सावध राहा! क्र. ३ २०२०, मधून “भेदभावाच्या आजारावर काही इलाज आहे का?” हा jw.org/mr वरचा लेख पाहा.
३. पैसा
बरेच लोक आनंदी राहण्यासाठी आणि चांगलं भविष्य मिळवण्यासाठी खूप श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतात.
बायबल म्हणतं: “पैशामुळे जसं संरक्षण मिळतं, तसं बुद्धीमुळेही संरक्षण मिळतं; पण ज्ञानाचा फायदा असा, की ज्याच्याकडे बुद्धी असते, त्याच्या जिवाचं ती रक्षण करते.”—उपदेशक ७:१२.
याचा अर्थ: आपल्याला पैशांची गरज आहे. पण त्यामुळे आपल्याला आनंद मिळेल आणि चांगलं भविष्य मिळेल याची आपण काहीच खातरी देऊ शकत नाही. (नीतिवचनं १८:११; २३:४, ५) याउलट, आपण बायबलमध्ये दिलेल्या देवाच्या बुद्धीप्रमाणे चाललो तर आपल्याला खरा आनंद मिळेल आणि आपलं भविष्यही सुरक्षित होईल.—१ तीमथ्य ६:१७-१९.
बायबलच्या मार्गदर्शनामुळे फायदा: इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या कार्डो नावाच्या एका व्यक्तीला श्रीमंत व्हायचं होतं. तो म्हणतो, “लोक फक्त ज्या गोष्टींचा विचार करू शकतात त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. मी ठिकठिकाणी फिरू शकत होतो, महागड्या वस्तू, गाड्या आणि घरं घेऊ शकत होतो. पण हे जास्त काळ टिकलं नाही. मला लुबाडण्यात आलं. जो पैसा मिळवण्यासाठी मी इतकी वर्षं मेहनत केली होती तो एका क्षणात नाहीसा झाला. मी श्रीमंत व्हायला बरीच मेहनत केली, पण शेवटी माझ्या वाट्याला दुःख आणि निराशाच आली.”
कार्डोने बायबलमध्ये दिलेला पैशांबद्दलचा सल्ला लागू करायला सुरुवात केली. तो आता श्रीमंत बनायच्या मागे लागत नाही तर साधं जीवन जगतोय. तो म्हणतो: “देवासोबत एक चांगलं नातं असणंच खरी श्रीमंती आहे. आता रोज रात्री मला चांगली झोप लागते आणि मी खऱ्या अर्थाने आनंदी आहे.”
पैशाबद्दल बायबलचा दृष्टिकोन जाणून घ्यायला टेहळणी बुरूज क्र. ३ २०२१ मधून, “शिक्षण आणि पैसा चांगल्या भविष्याची गॅरेंटी देऊ शकतात का?” हा jw.org/mr वरचा लेख पाहा.
४. सेक्स
आपण कोणासोबत लैंगिक संबंध ठेवू शकतो आणि कोणासोबत नाही याबद्दल लोकांची खूप वेगवेगळी मतं आहेत.
बायबल म्हणतं: “तुम्ही पवित्र असावं आणि अनैतिक लैंगिक कृत्यांपासून स्वतःला दूर ठेवावं. तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या शरीरावर, पवित्रतेने आणि आदराने नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. देवाला न ओळखणाऱ्या विदेश्यांसारखं लोभीपणाने, अनियंत्रित लैंगिक वासनेच्या आहारी जाऊ नका.”—१ थेस्सलनीकाकर ४:३-५.
याचा अर्थ: कोणासोबत लैंगिक संबंध ठेवावेत याबद्दल बायबलमध्ये स्पष्ट मर्यादा घालून दिल्या आहेत. व्यभिचार, वेश्यावृत्ती, लग्न न झालेल्यांमध्ये शारीरिक संबंध, समलैंगिक संबंध, आणि प्राण्यांसोबत संबंध ठेवणं यांना बायबलमध्ये “अनैतिक लैंगिक कृत्यं” असं म्हणण्यात आलंय. (१ करिंथकर ६:९, १०) सेक्स ही देवाकडून मिळालेली एक भेट आहे. पण ते लग्न झालेल्या स्त्री-पुरुषामध्येच झालं पाहिजे अशी देवाची इच्छा आहे.—नीतिवचनं ५:१८, १९.
बायबलच्या मार्गदर्शनामुळे फायदा: ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी कायली म्हणते, “माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा मला असं वाटायचं की मी सेक्स केलं तर मला प्रेम मिळेल आणि सुरक्षित वाटेल. पण झालं उलट, मला कधीच सुरक्षित वाटलं नाही आणि मला दुःखच मिळालं.”
काही काळाने सेक्सबद्दल बायबल काय शिकवतं याबद्दल कायली शिकली आणि ते तिने आपल्या जीवनात लागू केलं. ती म्हणते: “मी पाहू शकले की देवाने घालून दिलेल्या या स्तरांमुळे दुःख आणि त्रासापासून आपण वाचू शकतो. देवाच्या इच्छेप्रमाणे जगल्यामुळे आता मला प्रेम आणि सुरक्षा अनुभवता येते. बायबलचं मार्गदर्शन लागू केल्यामुळे मी बऱ्याच दुःखांपासून वाचले आहे.”
याबद्दल जास्त जाणून घ्यायला, “लग्न न करता सोबत राहण्याबद्दल बायबल काय म्हणतं?” हा jw.org/mr वरचा लेख पाहा.
बरोबर काय आणि चुकीचं काय हे जाणून घ्यायला आपला निर्माणकर्ता आपल्याला मदत करतो. त्याच्या नैतिक स्तरांप्रमाणे जीवन जगणं नेहमीच सोपं नसतं. पण असं केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. यामुळे आपण कायम आनंदी राहू याची आपण खातरी बाळगू शकतो.