देवाचं नाव काय आहे?
एखाद्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वातआधी तुम्ही त्याला त्याचं नाव विचाराल. जर तुम्ही देवाला त्याचं नाव विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल?
“मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.”—यशया ४२:८, पं.र.भा.
तुम्ही कदाचित म्हणाल: “देवाला तर बरीच नावं आहेत. आणि यहोवा हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकतोय.” पण बायबलच्या मूळ भाषेत देवाचं नाव जवळजवळ ७,००० वेळा आढळतं. हे नाव चार हिब्रू व्यंजनांनी मिळून बनलेलं आहे. ती व्यंजनं इंग्रजीत YHWH किंवा JHVH ही आहेत. मराठीमध्ये या नावाचं भाषांतर यहोवा असं करण्यात आलं आहे.
देवाचं नाव संपूर्ण हिब्रू शास्त्रात आणि अनेक भाषांतरांमध्ये आढळतं
हे नाव महत्त्वपूर्ण का आहे?
देवासाठी हे नाव महत्त्वाचं आहे. देवाला त्याचं नाव कोणीही दिलेलं नाही, तर त्याने स्वतः त्याची निवड केली आहे. यहोवाने म्हटलं: “हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.” (निर्गम ३:१५) बायबलमध्ये आपल्याला सर्वसमर्थ, पिता, प्रभू किंवा देव या व इतर पदवींपेक्षाही जास्त वेळा देवाचं नाव वाचायला मिळतं. तसंच ते अब्राहाम, मोशे, दावीद किंवा येशू या व बायबलमधल्या इतर वैयक्तिक नावांपेक्षाही जास्त वेळा आढळतं. आणि यहोवाचीही इच्छा आहे की त्याचं नाव सर्वांना माहीत असावं. बायबल म्हणतं: “तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”—स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.
येशूसाठी हे नाव महत्त्वाचं आहे. प्रभूची प्रार्थना म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेत येशूने आपल्या शिष्यांना पुढील प्रमाणे प्रार्थना करायला शिकवलं. त्याने म्हटलं: “तुझं नाव पवित्र मानलं जावो.” (मत्तय ६:९) येशूने स्वतः देवाला अशी प्रार्थना केली: “बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” (योहान १२:२८) येशूने देवाच्या गौरवी नावाला जीवनात प्रथम स्थान दिलं. त्यामुळेच तो त्याच्या प्रार्थनेत म्हणू शकला: “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलं आहे आणि पुढेही करीन.”—योहान १७:२६.
देवाला ओळखणाऱ्यांसाठी हे नाव महत्त्वाचं आहे. प्राचीन काळातल्या देवाच्या सेवकांना माहीत होतं की त्यांचं संरक्षण आणि उद्धार, देवाच्या अनोख्या नावाचा वापर करण्यावर अवलंबून आहे. “परमेश्वराचे [यहोवाचे, NW] नाम बळकट दुर्ग आहे, त्यांत धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.” (नीतिसूत्रे १८:१०) “जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल त्याला वाचवलं जाईल.” (प्रेषितांची कार्ये २:२१) बायबल म्हणतं की देवाची सेवा करणारे आणि सेवा न करणारे यांच्यात असलेला फरक देवाच्या नावावरून कळून येईल. “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर [यहोवा, NW] आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.”—मीखा ४:५; प्रेषितांची कार्ये १५:१४.
देवाच्या नावावरून आपल्याला काय कळतं?
देवाचं नाव त्याचे गुण प्रदर्शित करतं. अनेक विद्वानांनी असं म्हटलं आहे, की देवाच्या नावाचा अर्थ “तो व्हायला लावतो” असा होतो. मोशे नावाच्या आपल्या सेवकाशी बोलताना देवाने आपल्या नावाच्या अर्थाचं आणखी स्पष्टीकरण दिलं. त्याने मोशेला म्हटलं: “मला जे व्हायचं आहे, ते मी होईन.” (निर्गम ३:१४, NW) सर्व गोष्टी त्याच्यामुळे अस्तित्वात आल्या आहेत. पण त्याच्या नावावरून कळतं की त्याची भूमिका फक्त सृष्टिकर्तापर्यंतच सीमित नाही, तर त्यापेक्षाही जास्त आहे. त्याच्या नावावरून कळतं की त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी स्वतःला आणि त्याच्या निर्मितीला काहीही व्हायला लावण्याची क्षमता त्याच्यात आहे. देवासाठी वापरण्यात येणाऱ्या पदव्यांवरून जरी त्याचा दर्जा, अधिकार किंवा शक्ती सूचित होत असलं तरी फक्त त्याचं नाव यहोवा यावरून त्याचं पूर्ण व्यक्तिमत्त्व आणि तो काय बनू शकतो हे सूचित होतं.
त्याला आपल्यात आवड आहे हे त्याच्या नावावरून कळतं. देवाच्या नावाच्या अर्थावरून कळतं की त्याला आपली आणि त्याने घडवलेल्या गोष्टींची काळजी आहे. तसंच देवाने आपल्याला त्याचं नावही सांगितलं आहे. यावरून कळतं की आपण त्याला जाणून घ्यावं अशी त्याची इच्छा आहे. आपण त्याचं नाव विचारण्याआधीच त्याने ते सांगण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावरून हे स्पष्ट होतं की आपण त्याला एक काल्पनिक व्यक्ती म्हणून नाही, तर एक खरीखुरी व्यक्ती म्हणून समजावं आणि त्याच्याशी एक जवळचं नातं जोडावं अशी त्याची इच्छा आहे.—स्तोत्र ७३:२८.
देवाचं नाव वापरल्याने कळतं की आपल्याला त्याच्यात आवड आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला ज्याच्याशी मैत्री करायची आहे त्याला तुम्ही म्हणता की त्याने तुम्हाला नावाने हाक मारावी. पण जर त्या व्यक्तीने जाणूनबुजून तुम्हाला नावाने हाक मारली नाही तर? मग अशा वेळी तुम्हाला कसं वाटेल? तुमच्या मनात शंका येईल की त्या व्यक्तीला खरंच तुमच्याशी मैत्री करायची इच्छा आहे का. हीच गोष्ट देवाच्या बाबतीतही लागू होते. देवाने मानवांना त्याचं नाव सांगितलं आहे आणि त्यांनी त्याचा वापर करावा असं प्रोत्साहनही तो देतो. आपण जेव्हा असं करतो तेव्हा आपल्याला देवाशी एक घनिष्ठ नातं जोडायचं आहे हे आपण दाखवतो. तो “त्याच्या नामाचे चिंतन” करणाऱ्यांकडे लक्ष देतो.—मलाखी ३:१६.
देवाला जाणून घेण्याची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे त्याचं नाव माहीत करून घेणं. पण त्याचं नाव जाणून घेणंच पुरेसं नाही, तर आपण त्याचं व्यक्तिमत्त्वही जाणून घेतलं पाहिजे. तो कसा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे.
देवाचं नाव काय आहे? देवाचं नाव यहोवा आहे. त्याच्या नावावरून आपल्याला कळतं की तो उद्देश पूर्ण करणारा देव आहे