जगातल्या लोकांसारखं स्वार्थीपणे वागू नका
आज जगातल्या बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना इतरांकडून खास वागणूक मिळाली पाहिजे, मानसन्मान मिळाला पाहिजे. आणि तो आपला हक्कच आहे असं त्यांना वाटतं. असा विचार करणारे लोक स्वार्थी असतात. त्यांना कितीही मानसन्मान मिळाला तरी कमीच वाटतो. आणि त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींची त्यांना कदर नसते. शेवटच्या काळात असेच लोक असतील असं बायबल म्हणतं.—२ तीम. ३:२.
हे खरंय की फार पूर्वीपासूनच लोक स्वार्थी आहेत. उदाहरणार्थ, आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय हे आदाम आणि हव्वाने स्वतः ठरवलं. आणि त्यांच्या या निर्णयाचे घातक परिणाम आपल्या सगळ्यांनाच सहन करावे लागत आहेत. याच्या बऱ्याच शतकांनंतर, यहूदाचा राजा उज्जीया याला वाटलं की मंदिरात धूप जाळण्याचा त्याला हक्क आहे. पण ही खूप मोठी चूक ठरली. (२ इति. २६:१८, १९) तसंच, परूशी आणि सदूकी लोकांना वाटत होतं की ते अब्राहामचे वंशज असल्यामुळे त्यांना देवाची खास पसंती मिळण्याचा हक्क आहे.—मत्त. ३:९.
आपल्या आजूबाजूलाही स्वार्थी आणि गर्विष्ठ लोक आहेत. त्यांचा प्रभाव आपल्यावर होऊ शकतो. (गलती. ५:२६) त्यामुळे आपण कदाचित असा विचार करू की आपल्याला अमुक एक बहुमान किंवा खास वागणूक मिळालीच पाहिजे. असा विचार आपण कसा टाळू शकतो? सगळ्यात आधी, यहोवाला त्याबद्दल कसं वाटतं याचा आपण विचार करू शकतो. यासाठी बायबलची दोन तत्त्वं आपल्याला मदत करतील.
आपल्याला काय मिळालं पाहिजे हे ठरवायचा अधिकार यहोवालाच आहे. काही उदाहरणांचा विचार करा.
-
यहोवाला वाटतं की कुटुंबात पत्नीने पतीचा आदर केला पाहिजे. तसंच, पत्नीलाही पतीच्या प्रेमाची जाणीव झाली इफिस. ५:३३) ज्यांचं लग्न झालंय त्यांनी फक्त आपल्या जोडीदारावरच प्रेम केलं पाहिजे. (१ करिंथ. ७:३) आईवडीलसुद्धा अशी अपेक्षा करतात की मुलांनी त्यांचं ऐकलं पाहिजे. मुलांचीही अपेक्षा असते की आईवडिलांनी त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि अशी अपेक्षा करणं योग्यच आहे.—२ करिंथ. १२:१४; इफिस. ६:२.
पाहिजे. ( -
मंडळीतले वडील खूप मेहनत घेतात आणि त्यामुळे आपण त्यांचा आदर करावा असं यहोवाला वाटतं. (१ थेस्सलनी. ५:१२) पण मंडळीतल्या भाऊबहिणींवर अधिकार गाजवायचा त्यांना हक्क नाही.—१ पेत्र ५:२, ३.
-
देवाने सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या सत्तेखाली असलेल्या लोकांकडून कर घ्यायचा अधिकार दिलाय. तसंच, आपण त्यांचा आदर करावा असंही देवाला वाटतं.—रोम. १३:१, ६, ७.
यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे, आपल्याला जे मिळालं पाहिजे त्यापेक्षाही जास्त तो आपल्याला देतो. अपरिपूर्ण असल्यामुळे आपण सगळे मृत्यूच्या पात्र आहोत. (रोम. ६:२३) तरीसुद्धा यहोवाचं आपल्यावर एकनिष्ठ प्रेम असल्यामुळे तो आपल्याला बरेच आशीर्वाद देतो. (स्तो. १०३:१०, ११) त्याच्याकडून मिळणारा प्रत्येक आशीर्वाद किंवा बहुमान त्याच्या अपार कृपेमुळेच आपल्याला मिळालाय.—रोम. १२:६-८; इफिस. २:८.
आपण स्वार्थी आणि गर्विष्ठ वृत्ती कशी टाळू शकतो?
जगातल्या लोकांसारखा विचार करण्यापासून सावध राहा. आपल्यासोबत ही गोष्ट अगदी सहज होऊ शकते. हेच येशूने सांगितलेल्या उदाहरणातून दिसून येते. या उदाहरणात त्याने काही मजुरांबद्दल सांगितलं होतं. ते मजूर एक दिनारासाठी पूर्ण दिवस काम करायला तयार झाले होते. त्यानंतर, मालकाने आणखी मजुरांना कामावर घेतलं. संध्याकाळ झाल्यावर त्याने सगळ्यांना सारखीच मजुरी दिली. फक्त एक तास काम करणाऱ्यांनाही त्याने तितकीच मजुरी दिली. पण सकाळपासून कामाला लागलेल्या मजुरांना वाटलं, की आपण उन्हातान्हात दिवसभर काम केलंय त्यामुळे आपल्याला इतरांपेक्षा जास्त मजुरी मिळाली पाहिजे. (मत्त. २०:१-१६) या उदाहरणातून येशूने हे शिकवलं की देवाने आपल्याला जे दिलंय त्यातच आपण समाधानी असलं पाहिजे.
आभार माना; जास्त अपेक्षा करू नका. (१ थेस्सलनी. ५:१८) या बाबतीत प्रेषित पौलने एक चांगलं उदाहरण मांडलं. त्याला हव्या असलेल्या गोष्टी करिंथमधल्या भावांकडे मागायचा त्याला हक्क होता, पण तरीही त्याने त्या मागितल्या नाहीत. (१ करिंथ. ) आपणही जास्त अपेक्षा न करता आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाची कदर केली पाहिजे. ९:११-१४
नम्र असा. जेव्हा एक व्यक्ती स्वतःचाच जास्त विचार करते, तेव्हा सहसा तिला असं वाटू लागतं, की तिच्याकडे असलेल्या गोष्टींपेक्षा जास्त गोष्टी तिला मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या घातक विचारांवर मात करायला नम्रता आपल्याला मदत करेल.
नम्र राहण्याच्या बाबतीत दानीएल संदेष्ट्याने चांगलं उदाहरण मांडलं. तो शाही घराण्यातून होता, देखणा होता, हुशार होता आणि त्याच्याकडे बरीच कौशल्यं होती. या गोष्टींमुळे त्याला असं वाटू शकलं असतं की त्याला खास वागणूक आणि खास बहुमान मिळाले पाहिजेत. (दानी. १:३, ४, १९, २०) पण दानीएल नम्र राहिला आणि त्याच्या याच गुणामुळे तो यहोवाच्या नजरेत अनमोल ठरला.—दानी. २:३०; १०:११, १२.
तर चला, आज जगात सर्रासपणे दिसणारी स्वार्थी आणि गर्विष्ठ वृत्ती आपण टाळू या. यहोवा आपल्यावर अपार कृपा करून आपल्याला बरेच आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादांमुळे आपण नेहमी आनंदी राहू या.