व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्यासारखं तुम्ही यहोवाला जवळून ओळखता का?

नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्यासारखं तुम्ही यहोवाला जवळून ओळखता का?

“दुर्जनांना न्याय समजत नाही, पण परमेश्‍वराला शरण जाणांऱ्‍याना सर्व काही समजते.”—नीति. २८:५.

गीत क्रमांक: ४३, ४९

१-३. (क) या शेवटच्या दिवसांत देवाला विश्‍वासू राहण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करेल? (ख) या लेखात आपण काय शिकणार आहोत?

आपण शेवटच्या दिवसांतल्या अखेरच्या टप्प्यात जगत आहोत. दिवसेंदिवस दुष्ट लोक वाढत चालले आहेत. ते जंगली “गवताप्रमाणे उगवले” आहेत. (स्तो. ९२:७) म्हणून जेव्हा बरेचसे लोक देवाचं मार्गदर्शन स्वीकारत नाहीत, तेव्हा आपल्याला आश्‍चर्य होत नाही. पौलने ख्रिस्ती लोकांना म्हटलं: “वाईट गोष्टींच्या बाबतीत लहान मुलांसारखे व्हा” पण “समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखे व्हा.” (१ करिंथ. १४:२०) मग आपण प्रौढांसारखे कसे बनू शकतो?

याचं उत्तर आपल्याला लेखाच्या मुख्य वचनात मिळतं. त्यात म्हटलं आहे: “परमेश्‍वराला शरण जाणांऱ्‍याना सर्व काही समजते.” (नीति. २८:५) याचा अर्थ, यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी काय करण्याची गरज आहे हे त्यांना ‘समजतं.’ तसंच, नीतिसूत्रे २:७, ९ मध्ये असं सांगितलं आहे की योग्य ते करणाऱ्‍यांना यहोवा बुद्धी देतो. यामुळे त्यांना “धर्म, नीति व सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची” जाणीव होते.

नोहा, दानीएल आणि ईयोबकडे देवाकडून मिळणारी बुद्धी होती. (यहे. १४:१४) तीच बुद्धी आज देवाच्या लोकांकडेसुद्धा आहे. तुमच्याकडेही देवाने दिलेली बुद्धी आहे का? यहोवाचं मन आनंदित करायला ‘सर्वकाही समजून’ घेण्यासाठी तुम्हाला त्याची नीट ओळख झाली पाहिजे. म्हणून या लेखात आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: (१) नोहा, दानीएल आणि ईयोब यांना देवाची ओळख कशी झाली? (२) देवाची ओळख झाल्यामुळे त्यांना मदत कशी मिळाली? आणि (३) आपण त्यांच्यासारखा विश्‍वास कसा विकसित करू शकतो?

दुष्ट जगात नोहा देवासोबत चालला

४. नोहाला देवाची ओळख कशी झाली? आणि देवाची ओळख झाल्यामुळे त्याला कशी मदत झाली?

नोहाला देवाची ओळख कशी झाली? आदाम आणि हव्वा यांना मुलं झाली तेव्हापासून लोक तीन मार्गांद्वारे यहोवाबद्दल शिकले: त्याच्या सृष्टीद्वारे, त्याच्या इतर विश्‍वासू सेवकांद्वारे आणि देवाचं आज्ञापालन केल्यावर त्यांनी अनुभवलेल्या आशीर्वादांद्वारे. (यश. ४८:१८) सृष्टीचं निरीक्षण केल्यामुळे नोहाला, देव अस्तित्वात आहे याचे पुरावे मिळाले असतील आणि तो देवाच्या गुणांबद्दलही शिकला असेल. आणि यामुळे नोहाला समजलं असेल, की यहोवा हा शक्‍तिशाली आणि खरा देव आहे. (रोम. १:२०) अशा प्रकारे, नोहा देवाला मानत तर होताच, पण त्यासोबत त्याने देवावर भक्कम विश्‍वासही विकसित केला.

५. मानवांसाठी असलेल्या देवाच्या संकल्पाबद्दल नोहाला कसं शिकायला मिळालं?

बायबल म्हणतं “वचन ऐकल्यावरच विश्‍वास ठेवला जातो.” याचा अर्थ आपण इतरांकडून जे ऐकतो त्यामुळे आपल्याला विश्‍वास बाळगायला मदत होते. (रोम. १०:१७) नोहाने कदाचित यहोवाबद्दल त्याच्या नातेवाइकांकडून ऐकलं असावं. जसं की, नोहाचा पिता लामेख, (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) लामेखचा पिता मथुशलह आणि मथुशलहचा आजोबा, यारेद. देवावर विश्‍वास असणारा लामेख, आदामचा मृत्यू होण्याआधी जिवंत होता आणि नोहाचा जन्म झाल्यानंतरही ३६६ वर्षं यारेद जिवंत होता. * (लूक ३:३६, ३७) या लोकांनी आणि त्यांच्या पत्नींनी नोहाला खूप गोष्टी शिकवल्या असाव्यात. जसं की मानवांच्या सृष्टीबद्दल, मानवांनी पृथ्वी भरून जावी व त्यांनी देवाची सेवा करावी या देवाच्या संकल्पाबद्दल तो शिकला. आदाम आणि हव्वा यांनी यहोवाची आज्ञा मोडली हेदेखील नोहाला माहीत झालं असावं. तसंच, त्यांच्या निर्णयामुळे काय दुष्परिणाम झाले, हेसुद्धा तो आपल्या डोळ्यांनी पाहू शकत होता. (उत्प. १:२८; ३:१६-१९, २४) शिकलेल्या गोष्टी नोहाच्या मनाला भिडल्या आणि त्यामुळे तो यहोवाची सेवा करण्यासाठी प्रेरित झाला.—उत्प. ६:९.

६, ७. आशेमुळे नोहाचा विश्‍वास कसा बळकट झाला असेल?

आशेमुळे विश्‍वास बळकट होतो. नोहाच्या नावाचा अर्थ कदाचित “आराम” किंवा “दिलासा” असा होतो आणि त्यात आशेचा समावेश आहे. जरा विचार करा: नोहाला हे कळलं असेल तेव्हा त्याचा विश्‍वास नक्कीच बळकट झाला असेल! (उत्प. ५:२९) यहोवाने लामेखला आपल्या मुलाविषयी, नोहाविषयी असं म्हणायला प्रेरित केलं: “जी भूमि परमेश्‍वराने शापिली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करेल.” त्यामुळे देव परिस्थिती सुधारेल अशी आशा नोहाला होती. हाबेल आणि हनोख यांच्यासारखाच नोहालादेखील विश्‍वास होता की एक “संतती” सर्पाचं डोकं फोडेल.—उत्प. ३:१५.

उत्पत्ती ३:१५ मध्ये देवाने दिलेलं अभिवचन नोहाला पूर्णपणे समजलं नव्हतं. पण या अभिवचनात भविष्यासाठी एक आशा आहे हे त्याला समजलं होतं. हनोखनेदेखील अशाच प्रकारच्या संदेशाचा प्रचार केला होता. यहोवा दुष्ट लोकांचा नाश करेल असं त्या संदेशात म्हटलं होतं. (यहू. १४, १५) हनोखने सांगितलेल्या संदेशाची पूर्णता, खऱ्‍या अर्थाने हर्मगिदोनाच्या वेळी होईल. पण या संदेशामुळे नोहाचा विश्‍वास आणि आशा नक्कीच बळकट झाली असेल.

८. देवाची चांगल्या प्रकारे ओळख झाल्यामुळे नोहाचं संरक्षण कसं झालं?

देवाबद्दल अचूक ज्ञान असल्यामुळे नोहाला कशी मदत झाली? यहोवाबद्दल शिकल्यामुळे नोहाला विश्‍वास आणि देवाकडून मिळणारी बुद्धी विकसित करायला मदत झाली. खासकरून, यहोवाला दुःख होईल असं कोणतंही काम करण्यापासून तो स्वतःचं संरक्षण करू शकला. यासाठी त्याने काय केलं? यहोवावर विश्‍वास नसलेल्या व त्याला नाकारणाऱ्‍या लोकांशी नोहाने मैत्री केली नाही, कारण त्याला यहोवाचा मित्र बनायचं होतं. त्या वेळी पृथ्वीवर आलेल्या शक्‍तिशाली दुरात्म्यांना पाहून लोक खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी कदाचित त्यांची उपासनाही करण्याचा प्रयत्न केला असावा. पण नोहा मात्र त्याबाबतीत फसला नाही. (उत्प. ६:१-४, ९) यासोबतच, मानवांना मुलं होऊन ही पृथ्वी भरून जावी या यहोवाच्या उद्देशाबद्दलही त्याला माहीत होतं. (उत्प. १:२७, २८) म्हणून जेव्हा दुरात्म्यांनी स्त्रियांशी लग्न केलं आणि त्यांना मुलं झाली, तेव्हा हे चुकीचं आहे हे त्याला माहीत होतं. ही मुलं मोठी झाल्यावर जेव्हा इतर मुलांपेक्षा खूप उंच धिप्पाड आणि ताकदवान बनली, तेव्हा तर त्याची याबाबतीत आणखीनच खात्री पटली. पुढे यहोवाने नोहाला सांगितलं की तो जलप्रलय आणून सर्व दुष्ट लोकांचा नाश करेल. यहोवाने दिलेल्या इशाऱ्‍यावर नोहाचा विश्‍वास असल्यामुळे त्याने जहाज बांधलं. यामुळे त्याचा व त्याच्या कुटुंबाचा जीव वाचला.—इब्री ११:७.

९, १०. आपण नोहाच्या विश्‍वासाचं अनुकरण कसं करू शकतो?

आपण नोहासारखा विश्‍वास कसा विकसित करू शकतो? यासाठी देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करणं, शिकलेल्या गोष्टींवर प्रेम करणं आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी व जीवनात चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांचा वापर करणं महत्त्वाचं आहे. (१ पेत्र १:१३-१५) विश्‍वास आणि देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीमुळे सैतानाच्या कुयुक्त्यांपासून आणि या जगाच्या प्रभावापासून आपलं रक्षण होईल. (२ करिंथ. २:११) जगातल्या लोकांना हिंसा, अनैतिकता आणि स्वतःच्या चुकीच्या इच्छा पूर्ण करायला आवडतात. (१ योहा. २:१५, १६) या दुष्ट जगाचा अंत जवळ आहे, या वास्तविकतेकडे ते दुर्लक्ष करतात. आपला विश्‍वास जर मजबूत नसेल तर आपणही त्यांच्यासारखाच विचार करायला लागू. येशूने आपल्या दिवसांची तुलना नोहाच्या दिवसांशी केली तेव्हा तो हिंसा किंवा अनैतिकता याबद्दल नाही, तर देवाच्या सेवेकडे आपलं दुर्लक्ष होण्याच्या धोक्याबद्दल बोलत होता हे विसरू नका.—मत्तय २४:३६-३९ वाचा.

१० स्वतःला विचारा: ‘मी यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखतो हे माझ्या जीवनावरून दिसून येतं का? यहोवाच्या नजरेत योग्य असलेल्या गोष्टी करण्यासाठी आणि देव लोकांकडून काय अपेक्षा करतो हे त्यांना शिकवण्यासाठी माझा विश्‍वास मला प्रेरित करतो का?’ तुम्हीसुद्धा नोहाप्रमाणे देवासोबत चालत आहात की नाही, हे या प्रश्‍नांच्या उत्तरांवरून तुम्हाला समजायला मदत होईल.

मूर्तिपूजक बाबेलमध्ये दानीएलने देवाकडून मिळणारी बुद्धी दाखवली

११. (क) तरुण असताना दानीएलचं देवाच्या वचनावर प्रेम होतं यावरून आपल्याला त्याच्या आईवडिलांबद्दल काय शिकायला मिळतं? (ख) दानीएलच्या कोणत्या गुणांचं तुम्हाला अनुकरण करायला आवडेल?

११ दानीएलला देवाची ओळख कशी झाली? दानीएलच्या आईवडिलांनी त्याला देवावर आणि त्याच्या वचनावर प्रेम करायला शिकवलं होतं. आयुष्यभर दानीएलने असंच केलं. वृद्ध झाल्यावरही तो शास्त्रवचनांचा मनापासून अभ्यास करायचा. (दानी. ९:१, २) दानीएल यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत होता. यहोवाने इस्राएली लोकांसाठी केलेल्या सर्व गोष्टी त्याला माहीत होत्या. दानीएल ९:३-१९ मध्ये दिलेल्या त्याच्या नम्र आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेवरून हे दिसून येतं. ही प्रार्थना वाचा आणि त्यावर खोलवर विचार करा. मग स्वतःला विचारा: ‘या प्रार्थनेवरून मला दानीएलबद्दल काय शिकायला मिळतं?’

१२-१४. (क) दानीएलकडे देवाकडून मिळणारी बुद्धी आहे हे त्याने कसं दाखवलं? (ख) दानीएलने दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि एकनिष्ठेबद्दल यहोवाने त्याला कसं आशीर्वादित केलं?

१२ देवाची चांगल्या प्रकारे ओळख करून घेतल्यामुळे दानीएलला कशी मदत झाली? एका विश्‍वासू यहुद्याला अशा मूर्तिपूजक राष्ट्रात देवाची सेवा करणं खूप कठीण होतं. उदाहरणार्थ, यहोवाने यहुद्यांना सांगितलं: “तुम्हास पकडून ज्या नगरास मी नेले त्यांचे हितचिंतन करा.” (यिर्म. २९:७) शिवाय यहोवाने यहुदी लोकांना अशीही आज्ञा दिली होती की त्यांनी मनापासून फक्‍त त्याचीच उपासना करावी. (निर्ग. ३४:१४) मग दानीएल एकाच वेळी या दोन्ही आज्ञा कशा पाळणार होता? मानवी शासकांपेक्षा यहोवाच्या आज्ञेचं पालन करणं जास्त महत्त्वाचं आहे, हे त्याला देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीमुळे समजायला मदत झाली. अनेक शतकांनंतर येशूने हेच तत्त्व शिकवलं.—लूक २०:२५.

१३ तीस दिवसांपर्यंत राजाशिवाय कोणत्याही देवाला किंवा व्यक्‍तीला प्रार्थना करू नये असा जेव्हा नियम काढण्यात आला, तेव्हा दानीएलने काय केलं याचा जरा विचार करा. (दानीएल ६:७-१० वाचा.) अशा वेळी दानीएल कारण देऊन म्हणू शकला असता, ‘फक्‍त ३० दिवसांचाच तर प्रश्‍न आहे.’ पण देवाच्या उपासनेपेक्षा त्याने मानवी नियमाला जास्त महत्त्व दिलं नाही. दानीएल कुठेतरी एकांतात जाऊन यहोवाला प्रार्थना करू शकला असता. पण लोकांनी त्याला नियमितपणे प्रार्थना करताना पाहिलं आहे, हे त्याला माहीत होतं. जर त्याने प्रार्थना करण्याचं बंद केलं असतं तर यहोवाची उपासना करण्याचं त्याने सोडून दिलं आहे, असा लोकांचा गैरसमज झाला असता. म्हणून जिवाची पर्वा न करता दानीएल नेहमीच्या ठिकाणी प्रार्थना करत राहिला.

१४ दानीएलने धैर्य दाखवलं आणि एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. यहोवाने त्याला याबद्दल आशीर्वाद दिला. त्याने चमत्कार करून दानीएलला सिंहांपासून वाचवलं. याचा परिणाम काय झाला? संपूर्ण मेद-पारस साम्राज्यात लोकांना यहोवाविषयी साक्ष मिळाली!—दानी. ६:२५-२७.

१५. आपण दानीएलसारखा विश्‍वास कसा विकसित करू शकतो?

१५ आपण दानीएलसारखा विश्‍वास कसा विकसित करू शकतो? भक्कम विश्‍वास विकसित करण्यासाठी देवाच्या वचनाचं फक्‍त वाचन करणंच पुरेसं नाही, तर त्यात दिलेल्या वचनांचा अर्थही समजून घेणं गरजेचं आहे. (मत्त. १३:२३) एखाद्या विषयाबद्दल यहोवा काय विचार करतो, त्याला कसं वाटतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून वाचलेल्या गोष्टींवर खोलवर विचार करणं गरजेचं आहे. यासोबतच सतत मनापासून प्रार्थना करणंही आवश्‍यक आहे; खासकरून समस्यांना तोंड देत असताना. आपण प्रार्थनेत यहोवाकडे बुद्धी आणि शक्‍ती मागतो तेव्हा आपण भरवसा बाळगू शकतो, की त्या गोष्टी तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पुरवेल.—याको. १:५.

चांगल्या व वाईट परिस्थितींत देवाने दिलेली तत्त्वं ईयोबने लागू केली

१६, १७. ईयोबला देवाची ओळख कशी झाली?

१६ ईयोबला देवाची ओळख कशी झाली? ईयोब इस्राएली नव्हता. पण तो अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा दूरचा नातलग होता. या सेवकांना यहोवाने स्वतःविषयी आणि मानवजातीबद्दल असलेल्या संकल्पाविषयी सांगितलं होतं. यांपैकी बरीच मौल्यवान सत्यं कोणत्यातरी मार्गाने ईयोबलाही समजली होती. (ईयो. २३:१२) तो यहोवाला म्हणाला: “मी तुझ्याविषयी कानाने ऐकले होते.” (ईयो. ४२:५, पं.र.भा.) याशिवाय यहोवाने स्वतः असं म्हटलं, की ईयोबने त्याच्याबद्दलचं सत्य इतरांना सांगितलं.—ईयो. ४२:७, ८.

सृष्टीकडे पाहून यहोवाच्या गुणांचं परीक्षण केल्यामुळे आपला विश्‍वास मजबूत होतो (परिच्छेद १७ पाहा)

१७ सृष्टीतल्या गोष्टी पाहूनही ईयोबला यहोवाच्या गुणांची ओळख झाली. (ईयो. १२:७-९, १३) मनुष्य देवाच्या तुलनेत किती लहान आहे हे शिकवण्यासाठी यहोवा आणि अलीहू या दोघांनी सृष्टीतल्या गोष्टींचा वापर केला. (ईयो. ३७:१४; ३८:१-४) यहोवाच्या शब्दांचा ईयोबवर गहिरा परिणाम झाला आणि तो नम्रपणे देवाला म्हणाला: “तुला सर्व काही करता येते; तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे.” तो पुढे म्हणाला: मी “धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करत आहे.”—ईयो. ४२:२, ६.

१८, १९. ईयोब देवाला चांगल्या प्रकारे ओळखतो हे त्याने कसं दाखवलं?

१८ देवाची चांगल्या प्रकारे ओळख करून घेतल्यामुळे ईयोबला कशी मदत झाली? ईयोबला देवाच्या तत्त्वांची चांगली समज होती. तो यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत होता आणि यामुळे योग्य ते करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळाली. उदाहरणार्थ, आपण जर इतरांशी दयाळूपणे वागलो नाही तर देवावर प्रेम असल्याचं आपण दावा करू शकत नाही, हे ईयोबला माहीत होतं. (ईयो. ६:१४) तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असा त्याने विचार केला नाही. याउलट, गरीब असो वा श्रीमंत त्याने त्यांना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणेच वागवलं. ईयोबने म्हटलं: “ज्याने मला गर्भाशयात निर्माण केले त्याने त्यालाही नाही का केले?” (ईयो. ३१:१३-२२) श्रीमंत आणि नावाजलेला असतानाही ईयोब गर्विष्ठ बनला नाही किंवा त्याने इतरांना स्वतःपेक्षा कमी लेखलं नाही. खरंच, लोकांना चांगली वागणूक न देणाऱ्‍या आजच्या काळातल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांपेक्षा ईयोब किती वेगळा होता!

१९ ईयोबला यहोवापेक्षा कोणत्याही गोष्टीला आपल्या जीवनात जास्त महत्त्व द्यायचं नव्हतं; मग ती भौतिक गोष्ट असली तरीही. त्याने जर तसं केलं असतं तर “देवाशी मी दगा केला आहे” असं त्याला वाटलं असतं. (ईयोब ३१:२४-२८ वाचा.) तसंच, विवाह हे स्त्री-पुरुषामधलं एक पवित्र बंधन आहे असं ईयोब मानायचा. तो कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही, असा निर्धारही त्याने स्वतःच्या मनाशी केला होता. (ईयो. ३१:१) ही गोष्ट उल्लेखनीय आहे. कारण ईयोब अशा काळात जगला जेव्हा एका पुरुषाला एकापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न करण्याची यहोवाने अनुमती दिली होती. ईयोबची इच्छा असती तर त्याने स्वतःसाठी आणखीन एक बायको केली असती. पण यहोवाने पहिल्या विवाहाची योजना एकाच स्त्री-पुरुषामध्ये केल्याचं ईयोबला माहीत होतं आणि ईयोबने त्या प्रमाणेच निर्णय घेण्याचं ठरवलं. * (उत्प. २:१८, २४) जवळपास १६०० वर्षांनंतर, येशूनेसुद्धा याच तत्त्वाबद्दल शिकवलं. ते म्हणजे, एका पतीची एकच पत्नी असायला हवी आणि फक्‍त त्यांच्यातच शारीरिक संबंध असले पाहिजेत.—मत्त. ५:२८; १९:४, ५.

२०. यहोवाला आणि त्याच्या स्तरांना चांगल्या प्रकारे ओळखल्यामुळे आपल्याला योग्य मित्र आणि मनोरंजन निवडण्यासाठी कशी मदत होते?

२० आपण ईयोबसारखा विश्‍वास कसा विकसित करू शकतो? यासाठीही यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखणं आणि शिकलेल्या गोष्टींनुसार वागणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, बायबल म्हणतं: यहोवा “निर्दोष रक्‍त” पाडणाऱ्‍या हातांचा द्वेष करतो आणि आपण सत्य लपवणाऱ्‍या लोकांसोबत मैत्री करू नये. (नीतिसूत्रे ६:१६-१९; स्तोत्र २६:४ वाचा.) स्वतःला विचारा: ‘या वचनांवरून मला यहोवाच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल काय कळतं? यावरून माझ्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असली पाहिजे हे मी कसं ठरवू शकतो? ज्यांच्याशी मी मैत्री करतो, इंटरनेटवर मी जे पाहतो, आणि जे मनोरंजन करतो या सर्वांवर यहोवाच्या विचारसरणीचा कसा परिणाम व्हायला हवा?’ यहोवाला तुम्ही किती जवळून ओळखता हे समजून घेण्यासाठी या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला मदत करतील. या दुष्ट जगाचा प्रभाव आपल्यावर व्हावा अशी आपली मुळीच इच्छा नाही. म्हणून आपण आपल्या ‘समजशक्‍तीला’ प्रशिक्षित केलं पाहिजे. म्हणजेच चांगल्या व वाईट आणि शहाणपणाच्या व मुर्खपणाच्या गोष्टींतला फरक ओळखायला शिकलं पाहिजे.—इब्री ५:१४; इफिस. ५:१५.

२१. यहोवाचं मन आनंदित करणाऱ्‍या ‘सर्व गोष्टी समजण्यास’ आपल्याला कशामुळे मदत होईल?

२१ यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी नोहा, दानीएल आणि ईयोब यांनी त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न केले. यहोवाने त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिला आणि त्याचं मन आनंदित करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या ‘सर्व गोष्टी समजण्यास’ मदत केली. यहोवाच्या पद्धतीने कार्य केल्याने जीवनात यश मिळतं हे या तिघांच्या उदाहरणावरून सिद्ध होतं. (स्तो. १:१-३) त्यामुळे स्वतःला विचारा: ‘मी नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्यासारखं यहोवाला जवळून ओळखतो का?’ खरंतर या विश्‍वासू सेवकांच्या तुलनेत आज आपण यहोवाला आणखीन चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. कारण यहोवाने त्याच्याबद्दल बरीच माहिती आज आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. (नीति. ४:१८) त्यामुळे बायबलचा मनापासून अभ्यास करून त्यावर खोलवर विचार करा. पवित्र आत्मा मिळावा यासाठी प्रार्थना करा. असं केल्याने या दुष्ट जगाच्या प्रभावापासून तुमचं रक्षण होईल. आणि यामुळे तुम्ही देवाकडून मिळालेल्या बुद्धीनुसार कार्य कराल आणि स्वर्गात राहणाऱ्‍या तुमच्या पित्याशी तुमचं नातं आणखी घनिष्ठ होईल.—नीति. २:४-७.

^ परि. 5 नोहाचा पणजोबा हनोखसुद्धा “देवाबरोबर चालला.” पण नोहा जन्माला येण्याच्या ६९ वर्षांआधी त्याचा मृत्यू झाला.—उत्प. ५:२३, २४.

^ परि. 19 नोहानेसुद्धा हेच केलं होतं. आदाम आणि हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडल्यावर लोकांनी एकापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न केलं. पण नोहाने मात्र एकाच स्त्रीसोबत लग्न केलं.—उत्प. ४:१९.