व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

येशूने शपथ घेण्याच्या प्रथेची निंदा का केली?

मोशेच्या नियमशास्त्रानुसार, काही विशिष्ट प्रसंगी यहुद्यांनी शपथ घेणं योग्य होतं. पण, येशूच्या काळात शपथ घेणं ही इतकी सामान्य गोष्ट झाली होती, की यहुदी लोक अगदी क्षुल्लक कारणांसाठीही शपथ घ्यायचे. आपलं बोलणं खरं आहे हे समोरच्या व्यक्‍तीला पटवून देण्यासाठी ते असं करायचे. पण, येशूने या निरर्थक प्रथेची दोन वेळा निंदा केली आणि असं शिकवलं, की “तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं.”—मत्त. ५:३३-३७; २३:१६-२२.

थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंटनुसार, शपथ घेणं ही यहुद्यांमध्ये किती सर्वसामान्य गोष्ट होती, हे टॅलमूड या यहुदी लिखाणातून दिसून येतं. कारण, कोणत्या शपथा पाळल्याच पाहिजेत आणि कोणत्या शपथा मोडल्या जाऊ शकतात हे त्या लिखाणात अगदी सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे.

पण, अशा चुकीच्या प्रथेची केवळ येशूनेच निंदा केली असं नाही. उदाहरणार्थ, यहुदी इतिहासकार फ्लेवियस जोसिफस याने अशा एका यहुदी पंथाबद्दल लिहिलं जे शपथ घेणं टाळायचे. त्या पंथाच्या सदस्यांचा विश्‍वास होता, की शपथ घेणं हे खोटं बोलण्यापेक्षाही वाईट आहे. त्यांच्या मते, इतरांनी आपल्यावर विश्‍वास ठेवावा म्हणून जर एखाद्याला शपथ घ्यावी लागत असेल, तर तो नक्कीच खोटारडा आहे. यहुदी अपॉक्रिफा लिखाणांतील सिराख किंवा एक्लिझियास्टिकस (२३:११) म्हणतं: “शपथ घेणारी व्यक्‍ती पूर्णपणे अधर्मी असते.” येशूने महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींसाठी घेण्यात येणाऱ्‍या शपथांची निंदा केली. आपण जर नेहमी खरं बोलत असू, तर आपलं बोलणं खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला शपथ घेण्याची गरजच पडणार नाही.