दुःख अनावर होतं तेव्हा . . .
अमेरिकेत राहणाऱ्या सॅलीचं * उदाहरण घ्या. चक्रीवादळात तिने आपलं खूपकाही गमावलं. ती म्हणते: “मला वाटायचं आता बस्स! मी आणखी जास्त दुःख सोसू शकत नाही. बरेच दिवस मला वाटायचं की आता माझ्याकडे सहन करण्याची जराही शक्ती उरलेली नाही.”
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा काय? ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी जॅनिस म्हणते: “जेव्हा माझ्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला तेव्हा मी पूर्णपणे हादरून गेले. मग मी स्वतःला कसंबसं सावरण्याचा प्रयत्न केला. मी देवाकडे अगदी रडून प्रार्थना केली, की मी हे दुःख आणखी सहन करू शकत नाही. मला मरण येऊ दे, नाही जगायचं मला!”
आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत हे जेव्हा दॅनिएल नावाच्या व्यक्तीला कळलं तेव्हा त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं. तो म्हणतो: “माझ्या पत्नीने माझा विश्वासघात केल्याबद्दल कबूल केलं तेव्हा मला वाटलं की जणू माझ्या काळजात कोणीतरी सुराच भोसकला आहे! मला वारंवार वेदना व्हायच्या. असं वाटायचं जणू तो सुरा सतत कोणीतरी माझ्या काळजात खूपसत आहे आणि ही भावना बऱ्याच महिन्यांपर्यंत राहिली.”
तुम्हालाही यांच्यासारख्या वेदना होत आहेत का? तुम्ही पुढे दिलेल्या समस्यांपैकी एखाद्या समस्येचा सामना करत आहात का?
अशा समस्यांचा सामना करत असतानाही जीवन कसं अर्थपूर्ण बनू शकतं, याबद्दल टेहळणी बुरूजच्या या अंकात चर्चा करण्यात आली आहे.
सर्वातआधी आपण पाहू या, की जेव्हा नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा आपण कशा प्रकारे तिचा सामना करू शकतो?
^ या अंकात दिलेली काही नावं बदलण्यात आली आहेत.