पालकांसाठी
६: शिस्त
याचा काय अर्थ होतो?
शिस्त लावणं याचा अर्थ मार्गदर्शन देणं किंवा शिकवणं असा होतो. कधीकधी मुलांची चूक सुधारणंही यात सामील असतं. आणि बऱ्याचदा यात मुलांना योग्य निवड करण्यासाठी मदत व्हावी म्हणून नैतिक शिक्षण देणं सामील असतं.
हे का महत्त्वाचं?
मागच्या काही दशकांत काही घरांमध्ये शिस्त लावणं नाहीसं झालं आहे. कारण पालकांना अशी भीती वाटते की तसं केल्यामुळे मुलांच्या आत्मसन्मानाला ठेच लागते. पण सुज्ञ पालक वाजवी नियम बनवतात आणि आपल्या मुलांनी ते पाळावेत यासाठी त्यांना प्रशिक्षण देतात.
“कोणती गोष्ट करावी आणि कोणती करू नये हे मुलांना सांगावं लागतं. यामुळे त्यांना जबाबदार प्रौढ व्यक्ती बनायला मदत होते. शिस्त लावली नाही तर मुलं सुकाणू नसलेल्या जहाजासारखी बनतील. अशी जहाजं एकतर भरकटतात किंवा उलटतात.”—पिंकी.
तुम्ही काय करू शकता?
सातत्य ठेवा. जर तुमच्या मुलाने नियम मोडला तर त्याचे परिणाम त्याला भोगू द्या. पण जर त्याने नियम पाळला तर त्याची स्तुती करा.
“या जगात आज्ञाधारकता फार कमी पाहायला मिळते आणि म्हणून माझी मुलं जेव्हा माझं ऐकतात, तेव्हा मी त्यांना नेहमी शाबासकी देते. यामुळे जेव्हा शिस्त लावली जाते तेव्हा ती स्वीकारणं त्यांना सोपं जातं.”—क्रिस्टीना.
बायबल तत्त्व: “मनुष्य जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.”—गलतीकर ६:७.
वाजवी असा. शिस्त लावताना मुलांचं वय, क्षमता आणि चुकीचं गांभीर्य लक्षात घ्या. चुकीच्या गोष्टी केल्याने कोणते परिणाम होऊ शकतात हे त्यांना सांगा. जसं की, मोबाईलचा दुरुपयोग केल्याने तो त्याच्याकडून काही काळासाठी काढून घेण्यात येईल हे त्याला सांगा. पण त्यासोबतच हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लहान चुकीसाठी पराचा कावळा करण्याची गरज नाही.
“माझ्या मुलाने जाणूनबुजून आज्ञा मोडलीय, की योग्य निर्णय घेण्यात त्याच्याकडून काही चूक झालीय हे जाणण्याचा मी प्रयत्न करतो. कारण वाईट सवयीमध्ये आणि चुकीमध्ये फरक असतो. वाईट सवय मुळासकट काढावी लागते आणि चूक फक्त लक्षात आणून द्यावी लागते.”—विलसन.
बायबल तत्त्व: “आपल्या मुलांना चीड आणू नका, नाहीतर ते निराश होतील.”—कलस्सैकर ३:२१; तळटीप.
प्रेमळ असा. आईवडिलांचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे ते आपल्याला शिस्त लावतात हे मुलांना कळतं, तेव्हा शिस्त स्वीकारणं आणि त्यानुसार वागणं त्यांना सोपं जातं.
“आमच्या मुलाने चुका केल्या तेव्हा आम्ही त्याला आठवण करून दिली की त्याने आधी घेतलेल्या सर्व योग्य निर्णयांबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही त्याला समजावतो की जर त्याने आपली चूक सुधारली तर त्याचं नाव खराब होणार नाही. आणि त्याला मदत करायला आम्ही नेहमी त्याच्यासोबत आहोत.”—डॅनीयेल.
बायबल तत्त्व: “प्रेम सहनशील आणि दयाळू असते.”—१ करिंथकर १३:४.