तरुणांसाठी
१०: भरवशालायक
याचा काय अर्थ होतो?
भरवशालायक असणाऱ्या व्यक्तीवर तिच्या पालकांचा, मित्रांचा आणि बॉसचा विश्वास असतो. अशी व्यक्ती नेहमी नियमांचं पालन करते, दिलेलं वचन पूर्ण करते आणि नेहमी खरं बोलते.
हे का महत्त्वाचं?
सहसा तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळतं, ते तुम्ही इतरांचा किती विश्वास कमावला आहे यावर अवलंबून असतं.
“आपल्या पालकांचा भरवसा मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही प्रौढ आणि जबाबदार झाला आहात हे दाखवणं. आणि हे तुम्ही पालक सोबत असतानाच नाही तर ते सोबत नसतानाही दाखवणं गरजेचं आहे.”—सारा.
बायबल तत्त्व: “आपले आचरण चांगले ठेवा.”—१ पेत्र २:१२.
तुम्ही काय करू शकता?
तुम्हाला आणखी भरवशालायक बनायचं असेल किंवा गमावलेला भरवसा पुन्हा मिळवायचा असेल तर पुढे दिलेले सल्ले तुम्हाला मदत करतील.
प्रामाणिक असा. तुम्ही खोटं बोललात तर इतर जण तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण जर तुम्ही आपल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या तर तुम्ही इतरांचा विश्वास मिळवू शकता.
“सगळं काही सुरळीत चालू असतं तेव्हा प्रामाणिक राहणं सोपं जातं. पण तुमचं नाव खराब होईल असं काही तुमच्या हातून घडलं आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे कबूल केलं तर इतरांचा तुमच्यावरचा भरवसा वाढेल.”—केवीन.
बायबल तत्त्व: “सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागण्याची आमची इच्छा आहे.”—इब्री लोकांना १३:१८.
जबाबदार बना. अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, मुलाखती घेणाऱ्यांपैकी ७८ टक्के लोकांनी म्हटलं, की कंपनी एका व्यक्तीला कामासाठी निवडते, तेव्हा अनेक महत्त्वाच्या गुणांसोबतच ती व्यक्ती जबाबदार आहे का हेही पाहते. तुम्ही जबाबदार बनायला आतापासूनच शिकलात, तर मोठेपणी तुम्हाला त्याचा फायदा होईल.
“आईबाबांनी दिलेलं काम मी जबाबदारीने आणि त्यांनी आठवण करून न देता पूर्ण करते तेव्हा ही गोष्ट ते पाहतात. ही गोष्ट मी जितकी जास्त करते तितका माझ्यावरचा त्यांचा भरवसा वाढतो.”—सेरीना.
बायबल तत्त्व: “तू माझ्या सांगण्यानुसार वागशील याची मला खातरी आहे . . . मी जे सांगितले त्यापेक्षाही तू जास्त करशील हे मला माहीत आहे.”—फिलेमोन २१.
धीर धरा. तुमची शारीरिक वाढ होत आहे हे इतरांच्या लगेच लक्षात येईल, पण तुम्ही प्रौढ आणि जबाबदार बनत आहात हे त्यांना लगेच कळणार नाही, तर त्यासाठी वेळ लागेल. म्हणून तुम्ही धीर धरला पाहिजे.
“तुम्ही फक्त एकदा जबाबदारीने काम पार पाडलं म्हणजे इतर जण तुमच्यावर भरवसा ठेवतील असं नाही. पालकांचा आणि इतरांचा भरवसा मिळवण्यासाठी वेळ जाऊ देणं आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे.”—ब्रॅन्डन.
बायबल तत्त्व: “सहनशीलता परिधान करा.”—कलस्सैकर ३:१२.