देवाचं राज्य आपल्या हृदयात आहे का?
बायबलचं उत्तर
नाही, देवाचं राज्य हे ख्रिस्ती लोकांच्या हृदयातली फक्त एक भावना नाही. a तर बायबलमध्ये त्याला “स्वर्गाचं राज्य” म्हटलंय, याचाच अर्थ ते स्वर्गात आहे. (मत्तय ४:१७, किंग जेम्स व्हर्शन) देवाचं राज्य हे स्वर्गातून शासन करणारं एक खरंखुरं सरकार आहे. आणि हे बायबलच्या बऱ्याच वचनांवरून स्पष्ट होतं. त्यांपैकी काही खाली दिली आहेत:
देवाच्या राज्यात राजे, प्रजा आणि नियम आहेत. तसंच, देवाची इच्छा स्वर्गात आणि पृथ्वीवर स्थापित करणं हे या राज्याचं ध्येय आहे.—मत्तय ६:१०; प्रकटीकरण ५:१०.
देवाचं सरकार किंवा राज्य पृथ्वीवरच्या “वेगवेगळ्या राष्ट्रांतल्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या” लोकांवर राज्य करेल. (दानीएल ७:१३, १४) या राज्याला शासन करायचा अधिकार त्याच्या प्रजेने नाही तर स्वतः देवाने दिला आहे.—स्तोत्र २:४-६; यशया ९:७.
येशूने त्याच्या विश्वासू प्रेषितांना सांगितलं होतं, की तेही त्याच्यासोबत स्वर्गातल्या राज्यात “राजासनांवर बसून” राज्य करतील.—लूक २२:२८, ३०.
देवाच्या राज्याचे शत्रूही आहेत आणि या राज्याद्वारे त्यांचा नाश केला जाईल.—स्तोत्र २:१, २, ८, ९; ११०:१, २; १ करिंथकर १५:२५, २६.
स्वर्गाचं राज्य आपल्या हृदयात आहे किंवा ते एखाद्या व्यक्तीच्या हृदयातून राज्य करतं असं तर बायबल शिकवत नाही. पण “राज्याचं वचन” किंवा ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ आपल्या हृदयावर प्रभाव पाडू शकतो आणि आपण असा प्रभाव पडू दिला पाहिजे, असं मात्र बायबलमध्ये सांगितलंय.—मत्तय १३:१९; २४:१४.
“देवाचे राज्य तुमच्यात आहे” या शब्दांचा काय अर्थ होतो?
लूक १७:२१ या वचनाचं काही बायबलमध्ये ज्या प्रकारे भाषांतर केलंय, त्यामुळे देवाचं राज्य नेमकं कुठे आहे याबद्दल काही लोकांचा गोंधळ झालाय. उदाहरणार्थ, किंग जेम्स व्हर्शन या बायबलमध्ये असं म्हटलंय, “देवाचे राज्य तुमच्यात आहे.” या वचनाचा अचूक अर्थ समजून घेण्यासाठी आपण मागची पुढची वचनं विचारात घेतली पाहिजेत.
येशू हे शब्द बोलला त्या वेळी तो परूशी लोकांशी बोलत होता. हा धर्मपुढाऱ्यांचा एक गट होता. ते येशूचा विरोध करायचे आणि त्याला ठार मारायचा कट रचण्यात तेसुद्धा सामील होते. (मत्तय १२:१४; लूक १७:२०) येशूने त्यांना म्हटलं की देवाचं राज्य तुमच्यात आहे. मग जरा विचार करा, देवाचं राज्य या लोकांच्या कठोर हृदयात असणं किंवा त्यांच्या हृदयातली एक भावना असणं शक्य होतं का? उलट, येशूने त्यांना म्हटलं: “आत तुम्ही ढोंगीपणाने आणि अनीतीने भरलेले आहात.”—मत्तय २३:२७, २८.
इतर काही बायबल भाषांतरांमध्ये लूक १७:२१ याचा अर्थ अचूकपणे स्पष्ट करण्यात आलाय. उदाहरणार्थ, “देवाचं राज्य इथे तुमच्यासोबत आहे.” (तिरपे वळण आमचे; कंटेमप्ररी इंग्लिश व्हर्शन) “देवाचं राज्य खरंतर तुमच्यामध्ये आहे.” (नवे जग भाषांतर) स्वर्गाचं राज्य त्या परूशी लोकांच्या ‘सोबत’ किंवा ‘मध्ये’ आहे, असं येशूने म्हटलं, कारण त्या राज्याचा नियुक्त राजा म्हणजेच येशू तिथे त्यांच्यासमोर उभा होता.—लूक १:३२, ३३.
a बरेच ख्रिस्ती पंथ असं शिकवतात की देवाचं राज्य ख्रिस्ती व्यक्तीमध्ये, किंवा तिच्या हृदयात असतं. उदाहरणार्थ कॅथलिक एन्सायक्लोपिडिया यात असं म्हटलंय, “देवाच्या राज्याचा असा अर्थ होतो, की देव आपल्या हृदयात राज्य करत आहे.” तसंच जीझस ऑफ नॅझरेथ या पुस्तकात पोप बेनेडिक्ट १६ वे यांनी म्हटलं, की “आपण देवाचं ऐकतो तेव्हा देवाचं राज्य आपल्या हृदयात राहतं.”