पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे का?
बायबलचं उत्तर
नाही. बायबलमध्ये पैशाला वाईट म्हटलेलं नाही. तसंच पैसा सगळ्या वाइटाचं कारण आहे असंही त्यात म्हटलेलं नाही. बरेच लोक बायबलच्या एका वचनाचा अर्धवट भाग घेऊन असं चुकीचं विधान करतात, की “पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे.” खरं पाहिलं तर बायबलच्या त्या वचनात असं म्हटलंय, की “पैशाचं प्रेम हे सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे.”—१ तीमथ्य ६:१०.
बायबल पैशाबद्दल काय म्हणतं?
बायबल मान्य करतं, की पैशाचा योग्य प्रकारे वापर केला, तर तो उपयोगी ठरू शकतो आणि त्यामुळे “संरक्षण मिळतं.” (उपदेशक ७:१२) यासोबतच, जे दुसऱ्यांना उदार मनाने आणि वेळ पडली तर पैसे देऊन मदत करतात, अशा लोकांची बायबलमध्ये प्रशंसा केली आहे.—नीतिवचनं ११:२५.
पण त्याच वेळेस आपण पैशाला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊ नये असंही बायबल सांगतं. ते म्हणतं: “आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा.” (इब्री लोकांना १३:५) दुसऱ्या शब्दांत, आपण पैशाला त्याच्या जागी ठेवलं पाहिजे आणि धनसंपत्तीच्या मागे नाही लागलं पाहिजे. याउलट, जीवनात ज्या गोष्टी खरोखर आवश्यक आहेत जसं की अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टींमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे.—१ तीमथ्य ६:८.
पैशावर प्रेम करण्याबद्दल बायबल आपल्याला सावध का करतं?
लोभी लोकांना सर्वकाळाचं जीवन मिळणार नाही. (इफिसकर ५:५) कारण लोभ एक प्रकारची मूर्तिपूजा म्हणजे खोटी उपासनाच आहे. (कलस्सैकर ३:५) तसंच, लोभी लोक सहसा त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होतात. नीतिवचनं २८:२० यात म्हटलंय, “जो श्रीमंत होण्यासाठी उतावळा असतो, तो निर्दोष राहणार नाही.” अशा लोकांच्या हातून ब्लॅकमेल, लुबाडणूक, फसवणूक, अपहरण किंवा खून यांसारखे अपराधही होऊ शकतात.
एखाद्याने अशा वाईट गोष्टी केल्या नाहीत, तरीसुद्धा पैशाच्या लोभामुळे इतर वाईट परिणाम होऊ शकतात. बायबल म्हणतं, की “ज्यांना कसंही करून श्रीमंत व्हायचं आहे, ते मोहात आणि पाशात सापडतात, आणि बऱ्याच मूर्खपणाच्या आणि घातक इच्छांना बळी पडतात.”—१ तीमथ्य ६:९.
पैशाबद्दल बायबलचा सल्ला पाळल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
पैशाच्या मागे लागून आपण चुकीच्या गोष्टी करत नाही आणि देवाच्या इच्छेच्या विरोधात वागत नाही, तेव्हा आपला आत्मसन्मान टिकून राहतो. तसंच, देवाचा आशीर्वादही आपल्यावर राहतो. जे देवाला खूश करायचा मनापासून प्रयत्न करतात त्यांना तो असं वचन देतो: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” (इब्री लोकांना १३:५, ६) तसंच, “विश्वासू माणसाला पुष्कळ आशीर्वाद मिळतील,” अशीही तो आपल्याला खातरी देतो.—नीतिवचनं २८:२०.