तरुण लोक विचारतात
डेटिंग—भाग १: मी डेटिंगसाठी तयार आहे का?
डेटिंग म्हणजे काय?
काही लोक फक्त मजा म्हणून किंवा टाईमपास म्हणून डेटिंग करतात. पण एक जोडपं एकमेकांसोबत वेळ घालवतं आणि आपण एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतो का ते पाहतं, त्याला या लेखात “डेटिंग” असं म्हणण्यात आलंय. त्यामुळे डेटिंगला एक उद्देश असतो. आणि तो उद्देश फक्त समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधणं इतकाच नसतो.
काही काळाने, डेटिंगमुळे तुम्हाला एक निर्णय घेता आला पाहिजे. तो निर्णय एकतर लग्न करायचा असू शकतो किंवा मग डेटिंग थांबवायचा असू शकतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा डेटिंग सुरू करता, तेव्हा तुम्ही यांपैकी कोणत्याही परिणामासाठी तयार असलं पाहिजे.
थोडक्यात: जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही डेटिंगसाठी तयार आहात, तर तुम्ही लग्नासाठीही तयार आहात याची तुम्हाला खातरी असली पाहिजे.
तुम्ही डेटिंगसाठी तयार आहात का?
डेटिंगचा शेवट लग्नानेही होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कोणत्या गुणांचा तुमच्या नात्यावर परिणाम होईल याचा विचार करा. उदाहरणार्थ, खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या:
कौटुंबिक नाती. तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत आणि भावंडांसोबत जसं वागता, खासकरून तणावात असताना, त्यावरून सहसा कळतं की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कसं वागाल.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “सर्व प्रकारचा द्वेष, राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ, तसंच सगळा दुष्टपणा आपल्यामधून काढून टाका.”—इफिसकर ४:३१.
स्वतःला विचारा: ‘माझे आईवडील आणि भावंडं माझ्या बाबतीत असं म्हणतील का, की मी त्यांचा आदर करतो? जेव्हा आमच्यात तूतू-मैमै होते तेव्हा मी शांत राहून त्यांच्याशी बोलतो, की माझा पारा चढतो?’
आत्मत्याग. लग्न झाल्यावर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा विचार करावा लागेल आणि कधीकधी त्याच्या आवडीनिवडींसाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग करावा लागेल.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “प्रत्येकाने स्वतःचा नाही, तर नेहमी दुसऱ्याचा फायदा पाहावा.”—१ करिंथकर १०:२४.
स्वतःला विचारा: ‘नेहमी माझ्या मनासारखंच झालं पाहिजे यावर मी अडून राहतो का? मी समजदार आहे असं लोकांना वाटतं का? मी स्वतःच्या इच्छांपेक्षा दुसऱ्यांच्या इच्छांना महत्त्व देतो हे मी कोणत्या मार्गांनी दाखवलंय?’
नम्रता. एक चांगला जोडीदार तोच असतो, जो स्वतःच्या चुका कबूल करतो आणि त्यासाठी मनापासून माफी मागतो.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “आपण सगळेच बऱ्याच वेळा चुकतो.”—याकोब ३:२.
स्वतःला विचारा: ‘मी माझ्या चुका कबूल करायला तयार असतो का, की मी बहाणे देतो? जेव्हा लोक मला सल्ला देतात तेव्हा मी लगेच चिडतो का, किंवा मला खूप जास्त वाईट वाटतं का?’
पैसा. विवाहात सहसा पैशांमुळे भांडणं होतात. पण जबाबदारीने पैसे हाताळणारी व्यक्ती हे वाद टाळू शकते.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याला एक बुरूज बांधायचा असेल, तर तो आधी बसून खर्चाचा हिशोब लावणार नाही? आणि तो पूर्ण करायची आपली ऐपत आहे की नाही याची खातरी करणार नाही?”—लूक १४:२८.
स्वतःला विचारा: ‘मी खूप सांभाळून पैसे खर्च करतो, की मी नेहमी कर्जात असतो? मी जबाबदारीने पैसे खर्च करतो हे कशावरून दिसून येतं?’
आध्यात्मिकता. जर तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असाल, तर तुम्हाला नियमितपणे बायबल वाचायची आणि सभांना हजर राहायची सवय असली पाहिजे.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.”—मत्तय ५:३.
स्वतःला विचारा: ‘मी माझी आध्यात्मिकता टिकवून ठेवायला मेहनत घेतो का? मी या गोष्टींना माझ्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतो का, की इतर गोष्टींना याच्या आड येऊ देतो?’
थोडक्यात: प्रत्येकालाच एका चांगल्या जोडीदाराची अपेक्षा असते. त्यामुळे तुम्ही जर चांगला जोडीदार बनायला मेहनत घेतली, तर अशीच एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते.