व्हिडिओ पाहण्यासाठी

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उतरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उतरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?

आपण कोणत्या प्रश्‍नांविषयी बोलत आहोत? मानवांना संभ्रमात टाकणाऱ्‍या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नांविषयी. पुढे दिलेले प्रश्‍न पाहा. तुम्ही कधी या प्रश्‍नांवर विचार केला आहे का?

  • देवाला खरोखरच आपली काळजी आहे का?

  • युद्ध, दुःख कधी नाहीसे होतील का?

  • मृत्यूनंतर आपले काय होते?

  • मृत जनांना पुन्हा भेटणे शक्य आहे का?

  • देव कोणाच्या प्रार्थना ऐकतो?

  • जीवनात खरा आनंद कसा मिळवता येईल?

तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरे कोठे मिळतील? जर तुम्ही जाणकारांना हे प्रश्‍न विचार­लेत तर तुम्हाला प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे मिळतील. वाचनालयांत किंवा पुस्तकांच्या दुकानात गेलात, तर या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा दावा करणारी हजारो पुस्तके तुम्हाला सापडतील. बहुधा या पुस्तकांतील माहितीतही विरोधाभास आढळतो. शिवाय, आज अद्ययावत वाटणारी पुस्तके उद्या कालबाह्‍य ठरतात आणि एक तर त्यांच्यात सुधारणा केल्या जातात किंवा नवीन पुस्तके त्यांची जागा घेतात.

तरीसुद्धा, एक असे विश्‍वसनीय पुस्तक आहे, ज्यात या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळतात. देवाला प्रार्थना करताना येशू ख्रिस्ताने असे म्हटले: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) ते वचन म्हणजेच पवित्र बायबल. वरील प्रश्‍नांची बायबलमधील स्पष्ट, खात्रीलायक उत्तरे पुढील पानांवर थोडक्यात दिलेली आहेत.

देवाला खरोखरच आपली काळजी आहे का?

हा प्रश्‍न का उद्‌भवतो? आपण राहत असलेल्या जगात अत्याचाराचे व अन्यायाचे राज्य आहे. पुष्कळ लोक असे मानतात की आपण जी दुःखे भोगतो ती सर्व देवाच्या मर्जीनुसारच.

बायबल काय शिकवते? देव कधीही वाईट गोष्टी घडवून आणत नाही. ईयोब ३४:१० मध्ये असे म्हटले आहे: “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाहि करावयाला नको.” देवाची अशी इच्छा आहे की मानवांनी पृथ्वीवर सर्वदा आनंदित राहावे. म्हणूनच तर, येशूने आपल्याला पुढीलप्रमाणे प्रार्थना करायला शिकवले. “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे . . . राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) देवाला खरोखर आपली काळजी वाटत असल्यामुळेच त्याने त्याचा हा प्रेमळ उद्देश पूर्ण करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही.—योहान ३:१६.

उत्पत्ति १:२६-२८; याकोब १:१३; आणि १ पेत्र ५:६, ७ देखील पाहा.

युद्ध, दुःख कधी नाहीसे होतील का?

हा प्रश्‍न का उद्‌भवतो? युद्धांमुळे आजही अगणित लोक मृत्यूमुखी पडत आहेत. या ना त्या मार्गाने सर्वांनाच दुःख भोगावे लागते. एकही जण यातून सुटलेला नाही.

बायबल काय शिकवते? देव अशा एका भवितव्याविषयी भाकीत करतो जेव्हा तो सबंध पृथ्वीवर शांती स्थापित करेल. त्याच्या राज्यात म्हणजेच, जेव्हा तो पृथ्वीवर शासन करायला सुरुवात करेल तेव्हा लोक “युद्धकला शिकणार नाहीत.” त्याऐवजी, ते “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील.” (यशया २:४) देव पृथ्वीवरून अन्याय व अत्याचार पूर्णपणे मिटवून टाकेल. बायबलमध्ये असे वचन देण्यात आले आहे: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी [ज्यांमध्ये आजच्या काळातील अन्याय व दुःखही समाविष्ट आहे] होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.

स्तोत्र ३७:१०, ११; ४६:९; आणि मीखा ४:१-४ देखील पाहा.

मृत्यूनंतर आपले काय होते?

हा प्रश्‍न का उद्‌भवतो? बहुतेक लोक असे मानतात की मनुष्याच्या शरीरात वास्तव्य करणारे काहीतरी, मृत्यूच्या वेळी शरीरास सोडून इतरत्र जाते. काही लोक असे मानतात की मृत जन जिवंतांना अपाय करू शकतात. तसेच, काही जणांचे असे मानणे आहे की देव दुष्टांना नरकात सर्वकाळ यातना देतो.

बायबल काय शिकवते? मृत्यूनंतर मनुष्यांचे अस्तित्व मिटते. उपदेशक ९:५ म्हणते, “मृतांस . . . काहीच कळत नाही.” मृत जन ऐकू, पाहू, बोलू, किंवा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे, ते जिवंत लोकांना अपाय करू शकत नाहीत किंवा मदतही करू शकत नाहीत.—स्तोत्र १४६:३, ४.

उत्पत्ति ३:१९ आणि उपदेशक ९:६, १० देखील पाहा.

मृत जनांना पुन्हा भेटणे शक्य आहे का?

हा प्रश्‍न का उद्‌भवतो? आपण आपल्या प्रिय व्यक्‍तींसोबत जीवनाचा आनंद दीर्घकाळ लुटू इच्छितो आणि त्यामुळे आपल्या मृत प्रिय जनांना पुन्हा बघता यावे, त्यांना भेटता यावे अशी आपली उत्कट इच्छा असते.

बायबल काय शिकवते? मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत करण्यात येईल. येशूने असे वचन दिले होते: ‘स्मृती कबरेतील सर्व माणसे बाहेर येतील.’ (योहान ५:२८, २९, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन) पुन्हा जिवंत झालेल्यांना, देवाच्या मूळ उद्देशानुसार पृथ्वीवर नंदनवनात राहण्याची संधी मिळेल. (यशया ६५:२१, २५) देवाने आज्ञाधारक मानवांना परिपूर्ण आरोग्य व सार्व­कालिक जीवन देण्याचेही वचन दिले आहे. बायबलमध्ये असे म्हटले आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२९.

ईयोब १४:१४, १५; लूक ७:११-१७; आणि प्रेषितांची कृत्ये २४:१५ देखील पाहा.

देव कोणाच्या प्रार्थना ऐकतो?

हा प्रश्‍न का उद्‌भवतो? सर्वच धर्मांतील लोक प्रार्थना करतात. तरीसुद्धा, कित्येक लोकांना वाटते की त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर त्यांना मिळत नाही.

बायबल काय शिकवते? येशूने शिकवले की प्रार्थना करताना आपण वारंवार तेच-ते शब्द वापरण्याचे टाळले पाहिजे. त्याने असे म्हटले: ‘तुम्ही प्रार्थना करता तेव्हा व्यर्थ बडबड करू नका.’ (मत्तय ६:७) देवाने आपली प्रार्थना ऐकावी असे आपल्याला वाटत असेल, तर त्याला मान्य होईल अशी आपली प्रार्थना असावी. यासाठी, देवाला काय मान्य आहे हे जाणून घेण्याची व त्यानुसार प्रार्थना करण्याची गरज आहे. पहिले योहान ५:१४ येथे असे म्हटले आहे: “आपण [देवाच्या] इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.”

स्तोत्र ६५:२; योहान १४:६; १६:२३, २४; आणि १ योहान ३:२२ देखील पाहा.

जीवनात खरा आनंद कसा मिळवता येईल?

हा प्रश्‍न का उद्‌भवतो? पुष्कळ लोकांना असे वाटते की पैसा, प्रसिद्धी, किंवा सौंदर्य असल्यास आपण आनंदी होऊ शकतो. म्हणूनच, ते अशा गोष्टी मिळवण्यासाठी पूर्ण जीवन खर्ची घालतात. पण, नंतर त्यांना कळते की या गोष्टींमुळे ते आनंदी होऊ शकत नाहीत.

बायबल काय शिकवते? खरा आनंद आपण कसा प्राप्त करू शकतो याचे रहस्य येशूने सांगितले. त्याने म्हटले: “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.” (लूक ११:२८) मानवांनी आपली सर्वात महत्त्वाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरच त्यांना खरा आनंद मिळू शकतो. ही गरज म्हणजे, देवाविषयी व आपल्याकरता असलेल्या त्याच्या उद्देशा­विषयी सत्य जाणून घेणे. देवाविषयीचे हे सत्य आपल्याला बायबलमध्ये सापडते आणि ते जाणून घेतल्यामुळे, कोणत्या गोष्टी जीवनात खरोखर महत्त्वाच्या आहेत व कोणत्या नाहीत हे ओळखायला आपल्याला मदत मिळते. जसजसे आपण बायबलमधील तत्त्वांनुसार जीवनात निर्णय घेऊ लागतो व वागू लागतो, तसतसे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनते.—लूक ११:२८.

नीतिसूत्रे ३:५, ६, १३-१८ आणि १ तीमथ्य ६:९, १० देखील पाहा.

येथे आपण सुरुवातीला दिलेल्या सहा प्रश्‍नांची बायबलमधील उत्तरे थोडक्यात पाहिली. तुम्हाला आणखी जाणून घेण्यास आवडेल का? जर तुम्ही देवाविषयी व आपल्याकरता असलेल्या त्याच्या उद्देशाविषयी सत्य जाणून घेण्यास उत्सुक असाल, तर नक्कीच तुम्हाला आणखी माहिती घ्यावीशी वाटेल. कदाचित तुमच्या मनात दुसरेही काही प्रश्‍न असतील. उदाहरणार्थ, ‘देवाला जर आपली काळजी आहे, तर मग त्याने आजपर्यंत इतकी दुष्टाई व दुःख का राहू दिले? मला आपले कौटुंबिक जीवन आणखी आनंददायी कसे बनवता येईल?’ या व अशा इतर प्रश्‍नांची पूर्ण समाधानकारक उत्तरे बायबलमध्ये आहेत.

तरीसुद्धा, बायबल समजण्यास कठीण आहे असे समजून अनेक जण बायबलमध्ये आपल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यास टाळाटाळ करतात. तुम्हाला बायबलमधून तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यास मदत हवी आहे का? यासाठी तुम्हाला साहाय्यक ठरतील अशी दोन साधने यहोवाचे साक्षीदार देऊ करत आहेत.

पहिले म्हणजे, बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक. ज्यांच्याजवळ कमी वेळ आहे अशा लोकांना, जीवनातील महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची बायबलमधील सुस्पष्ट उत्तरे पडताळून पाहण्यास मदत करण्यासाठीच हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. दुसरे म्हणजे, मोफत गृह बायबल अभ्यासाची सुविधा. यामध्ये, तुमच्या परिसरात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांपैकी एखादा सदस्य, दर आठवड्यात तुमच्या घरी किंवा दुसऱ्‍या एखाद्या सोयीच्या ठिकाणी तुमच्यासोबत बायबलविषयी थोडा वेळ चर्चा करण्यास येऊ शकेल. या विनामुल्य सुविधेचा जगभरातील लाखो लोकांनी फायदा घेतला आहे. यांपैकी बरेच जण रोमांचित होऊन, “मला सत्य सापडले आहे!,” असे म्हणण्यास प्रेरित झाले आहेत.

यापेक्षा मौल्यवान प्राप्ती आणखी कोणती असू शकते? बायबलमधील सत्य आपल्याला अंधश्रद्धा, गोंधळात टाकणाऱ्‍या शिकवणी, व अनाकलनीय भय यांपासून मुक्‍त करून, जीवनात आशा, उद्देश आणि खरा आनंद देते. येशूने म्हटले: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.”—योहान ८:३२.